संवाद

Submitted by श्रीराम_देशपांडे on 29 August, 2024 - 08:51

नवी केलीस तू सुरुवात आई
कशी आहेस वैकुंठात आई?

अकल्पित हे कसे घडले अचानक?
असह्य आहे हा आघात आई...

तुला सोडावयासाठीच केला
यमाने वेदनेचा घात आई

मला तर जाणवत आहे अजूनी
तुझा पाठीवरीचा हात आई

मनी काहूर उठते भावनांचे
स्मृतींची मग होते बरसात आई

नकोसा वाटतो श्रावण असा हा
तुझा उत्साह नाही ज्यात आई

जखम भरणार नाही ही कधीही
हा घाला खोल आहे आत आई

Group content visibility: 
Use group defaults