
स्वयंपाकघरातील सोनं… हळद
भारतीय स्वयंपाकात हळदीचा वापर खुप पूर्वीपासून आणि अगदी मुबलक प्रमाणात होतो. हा एक अत्यावश्यक मसाला आहे. मिसळणाच्या डब्यातील मोहरी संपली असली तर त्या ऐवजी जिरं घालून वेळ भागवून नेता येते पण हळद नसली तर ठेवणीतल्या बरणीतील हळद काढावीच लागते, त्या शिवाय स्वयंपाक होऊच शकत नाही.
आमच्या लहानपणी श्रावणी सोमवारचं खूप प्रस्थ होतं. लहान मुलं सोडून सगळ्यांचा उपास असे. मुलांना ही नॉर्मल जेवण न देता धान्य फराळ म्हंजे प्रत्येक गोष्ट भाजून घेऊन मग शिजवायची असे पदार्थ खाऊ घालत असत. आधी भाजून घेतलेल्या तांदळाचा भात आम्हाला आई श्रावणी सोमवारी करत असे. त्याला " सोजी " असं फार गोड नाव होतं. एरवी रोजच्या भातात हळद घालत नाहीत पण सोजीमध्ये आवर्जून हळद घातली जात असे. बाकी सगळं सेम फक्त हळद हा एकच जास्तीचा पदार्थ घातलेला तो पिवळा भात लहानपणी आमचा खुप आवडता होता जो आम्हाला फक्त श्रावणी सोमवारी दुपारच्या जेवणातच मिळत असे. असो. अर्थात उपम्या सारख्या काही पदार्थात मात्र हळद एकदम वर्ज्य. हळद घातली तर तो उपमा न होता तिखट मीठाचा शिरा होईल. अगदी एक चमचा हळदीने पदार्थाच्या रंग रुपात जमीन अस्मानाचा फरक पडतो तो असा. आहे की नाही हा हळदीचा महिमा…
हळदीचे औषधी गुणधर्म ही खुप आहेत. हळदी मुळे कांती सुधारते . “ हलदी और चंदन का अनोखा उबटन “ ही विको ची जिंगल पाठच आहे सर्वांना. अजून ही लहान बाळांना तेल आणि वस्त्रगाळ केलेल्या हळदीने चांगल्या सतेज कांतीसाठी मालिश करतात. गरम दूध आणि हळद हे खराब घश्यासाठी एक उत्तम औषध आहे. तसेच आमची आजी लहानपणी आम्हाला खोकला झाला की हळद, गुळ आणि थोड तूप अस एकत्र कालवून त्याच्या वाटण्या एवढ्या आकाराच्या गोळ्या करून ठेवत असे औषध म्हणून. अर्थात त्या गोळ्या आम्ही औषधा प्रमाणे न खाता लिमलेटच्या गोळ्यांसारख्या सारख्या खात होतो हा भाग निराळा. हिंग, हळद आणि थोडं मीठ एकत्र करून ते दुखणाऱ्या दातावर चोळल्याने दात दुखी ही कमी होते हा स्वानुभव आहे.
किती ही काळजी घेतली तरी स्वयंपाक करताना कधीतरी बोट कापलं जातच. कापलेल्या जागी हळद घालून दाबून धरलं की रक्त यायचं तर थांबतच शिवाय हळद जंतुनाशक असल्याने जखम चिघळायची ही भीती रहात नाही. मी कधी ही कृत्रिम मलम लावत नाही कापलं तर, नैसर्गिक हळदी वर जास्त विश्वास आहे माझा. तसेच स्वयंपाक करताना जखमेवर लावलेलं क्रीम अनावधानाने एखद्या पदार्थात जाईल ही भीती असते . हळद मात्र नैसर्गिक असल्याने निर्धोक आहे. मुका मार लागला तर पूर्वी अंबे हळद आणि तुरटी उगाळून त्याचा लेप दुखऱ्या भागावर लावत असत. अर्थात आता हा उपाय कोणी करत असेल असं वाटत नाही.
अश्या ह्या बहुगुणी हळदीला देवाच्या पूजेत कुंकवा बरोबरीचा मान नाही मिळाला तरच नवल. आणि गंमत म्हणजे अस्सल पंढरपुरी नैसर्गिक कुंकू ही हळदी पासूनच तयार करतात. नवरदेवाच्या आणि नवऱ्या मुलीच्या अंगाला हळद लावल्याशिवाय लग्न लागूच शकत नाही. हल्ली तर हळदीचा मोठाच समारंभ आयोजित करतात लग्नाच्या दोन दिवस आधी. हळकुंड हे वंशवृद्धीच प्रतीक मानलं जातं त्यामुळे सुवासिनीची अगर देवीची ओटी भरताना तांदूळ आणि नारळ ह्या बरोबर मूळ असलेलं हळकुंड ही लागतचं. एवढं सगळ असलं तरी हळद म्हटलं की डोळ्यासमोर ऊभी राहते ती हळदीने माखलेली खंडेरायाची सोन्याची जेजुरी…
हळकुंडापासून रोजच्या वापरात असणारी हळद पूड तयार करणं हे मात्र तसं जिकिरीचं काम आहे. पूर्वी घरोघरी हळकुंड उन्हात वाळवून मग ती खलबत्त्यात फोडून घेऊन मग जात्यावर दळून वर्षभराची हळद घरीच तयार करण्यात येत असे. नंतरच्या काळात ती घरी न दळता दळायला डंक्यावर देणं रूढ झालं आणि आता तर जनरली रेडिमेड हळद पावडरच घरात येते. आमच्याकडे ठाण्याला ही हळद पावडर रेडिमेडच येते पण हळदीची लागवड करण्यापासून ते थेट ती दळून आणे पर्यंतची सगळी उस्तवार आमच्या कोकणातल्या घरी केली जाते.
पावसाळ्याच्या सुरवातीला हळदीची लागवड किंवा पेरणी करतात. हळदीचे पीक हातात यायला साधरण सात आठ महिने तरी लागतात. साधारण श्रावण महिना आला की हळदीची रोपं चांगलीच तरारतात. पानं चांगली लांब रुंद, हिरवीगार आणि तजेलेदार दिसतात. हळदीची पानं हाताने नुसती जरा चुरडली तरी त्यांना मन ताजतवानं करणारा टिपिकल हळदीचा सुवास येतो. पावसाळ्यात अंगावर पावसाचे थेंब मिरवणारी ती पानं फारच सुन्दर दिसतात. हळदीची रोपं सरळसोट न वाढता चारी बाजूंनी गोल होत वाढत जातात ती रोपं फार उंच ही वाढत नाहीत त्यामुळे सरळ रेषेत लागवड केलेलं, जमिनीलगत पसरलेलं हळदीचे शेत फार म्हंजे फारच सुन्दर दिसत.
हे हळदीचे रोप. हे मायबोली आयडी अनया हिच्या शेतातील आहे. तिने लेखात डकवण्या साठी मला मुद्दाम हा फोटो सेंड केला आज.
थँक्यु सो मच अनया....

श्रावणात येणाऱ्या नागपंचमीच्या पूजेचा नाग हळदीच्या पानावरच स्थापन करतात. आणि नागपंचमी ला ज्या पातोळ्या करतात त्या ही हळदीच्या पानातच वाफवतात. पिठोरीला केल्या जाणाऱ्या खीरी मध्ये वेलची वगैरे न घालता स्वादासाठी हळदीचे पानच घातले जाते. गणपतीत उकडीचे मोदक हळदीच्या पानावर ठेवून वाफवले तर त्यांचा ही स्वाद कैक पटीने खुलतो. अश्या खास दिवशी हळदीच्या पानांना इतकी मागणी असते की कधी कधी पुरवठा कमी पडतो. जेव्हा हवी तेव्हा पानं हमखास मिळावीत म्हणून शहरात काही जण फक्त पानांसाठी कुंडीत हळद लावतात.
साधारण दिवाळी नंतर जमिनीखाली हळदीचे कंद तयार होतात. बाजारात ओली हळद विकायला येऊ लागते. आवळा, आलं आणि ही ओली हळद किसून केलेलं लोणचं भन्नाट लागत. फेब्रुवारी महिन्यात हळदीच्या रोपांची वरची पान सुकायला लागणे ही जमिनीत हळदीचे कंद पक्व झालेत हे समजण्याची खूण. कोयत्याने अलगद खणून काढतात हे जमीनीखालचे हळदीचे मोठे मोठे कंद. त्यातले काही आपल्या तळहाता एवढे मोठे ही असतात. त्यांना भरपूर माती लागलेली असते म्हणून ते तीन चार वेळा धुवून स्वच्छ करतात आणि मग उकळत्या पाण्यात घालून दहा पंधरा मिनिटं शिजवतात. नंतर ते चाळणीत ओतून पाणी काढून टाकतात आणि आठ दहा दिवस उन्हात चांगली खडखडीत वाळवली की बाजारात मिळतात तशी हळकुंड तयार होतात. ही गिरणीतून दळून आणली की हळद पावडर तयार. ज्या दिवशी हळद दळून घरी येते त्या दिवशी घरभर हळदीचा घमघमाट सुटलेला असतो.
खरं तर तामिळनाडू मधील सेलम ह्या भागातली हळद सर्वात उत्कृष्ट समजली जाते. सांगली ची हळद ही प्रसिद्ध आहेच पण त्याही पेक्षा आमची कोकणातली गावठी हळद खूपच छान असते असं मला वाटतं. ती अगदी थोडी घातली तरी रंग तर छान येतोच पण तिचा स्वाद ही अप्रतिम असतो. विकतच्या अगदी प्रसिद्ध ब्रँड च्या हळदीला ही तो स्वाद येत नाही असं मला वाटतं. कोकणातील लोह मिश्रित मातीमुळे तिला पिवळट केशरी रंग प्राप्त होतो असं म्हणतात. कोकणातून आम्ही हळद आणतो मुंबईच्या घरी प्लॅस्टिक पिशवीत पॅक करून पण जर ती तशीच प्लॅस्टिक पिशवीत ठेवली तर महिन्याभरातच प्लॅस्टिक पिशवी बाहेरून चिकट होते. तसेच पिशवी जिथे ठेवली असेल तिथे हळदीचा पक्का डाग ही पडतो. हे टाळण्याचा सोपा मार्ग म्हंजे ती काचेच्या बाटलीत भरून ठेवणे. हळदी मधलं ऑईल रिलीज झाल्यामुळे हे घडतं हा माझा तर्क . जाणकारांनी ह्यावर अधिक प्रकाश टाकावा.
टर्मरिक लाटे सारखी पेयं लोकप्रिय झालेल्या परदेशात ही फेमस झालेल्या आपल्या बहुगुणी हळदीची गोष्ट इथे समाप्त.
हेमा वेलणकर
अंजू, जि, सामो, अस्मिता,
अंजू, जि, सामो, अस्मिता, ऋतुराज, माधव, प्रज्ञा, urmilas सर्वांना धन्यवाद...
अंजू मला ही कापल्यावर सर्वात बेस्ट वाटते हळद. रक्त पटकन
थांबत नाही म्हणून तुझ्या साठी तर खुप जास्त...
अस्मिता मस्त लिहिलं आहेस. लग्नात जे कंकण बांधतात त्यात हळकुंड असतेच ... लग्नाच्या दुसऱ्या दिवशी माहेरी जाऊन ते सोडण्याची पद्धत ही आहे. हळदीच्या गोळ्या मिळतात माहित नव्हते, टर्मरिक लाटे च माहित आहे फक्त. तू म्हणतेस ते बरोबर आहे " अति सर्वत्र वर्ज्ययेत" . . पूर्वी मुलीने पोहे वगैरे डब्यात नेले की तिच्या परदेशी मैत्रीणीना पिवळा रंग केशर घातल्याने आलाय असं वाटे.
हळद एवढी माहित नव्हती तेव्हा त्यांना.
ऋतुराज, किती सुंदर लिहिलं आहे, मनाने कोकणात पोचले वाचताना. हळद ह्या शब्दाचा उगम ही नव्हता माहित... धन्यवाद.
हेमाताई, तुम्हाला असे काही सुचतेच कसे? किती साधा विषय
आहे आणि तुम्ही त्याचे "सोने" करून ठेवले आहे. >> माधव
धन्यवाद . आमच्याकडे ही ॲनिमिक हाच शब्द आहे हळद कमी घातली गेली असेल तर ..
प्रज्ञा, धन्यवाद... बाकी काही नाही तरी कापलं तर वापरच हळद सर्वात इफेक्टिव वाटते मला ती. बाकी कोकणातल्या हळदीला भेसळ युक्त म्हटल्यावर आलेली तुझी रिॲक्शन एकदम च पटली.
अंजू मला ही विकतची फिक्या पिवळ्या रंगाची आणि कोरडी भुसभुशीत भेसळ युक्त वाटते.
खुप सुन्दर लेख
खुप सुन्दर लेख
एक विचारायचं होतं . आंबेहळद खाऊ शकतो का? म्हणजे edible आहे का ती?
लेख छान आणि प्रतिसाद देखील
लेख छान आणि प्रतिसाद देखील छान
स्वाती आंजर्लेकर, झकासराव
स्वाती आंजर्लेकर, झकासराव धन्यवाद.
एक विचारायचं होतं . आंबेहळद खाऊ शकतो का? म्हणजे edible आहे का ती? >> हो खाऊ शकतो नक्कीच .. ओल्या हळदीे च लोणचं करतात त्यात वापरतात आंबे हळद, भाजी वाल्यांकडे असते विकायला. पण हळद पूड करतात की नाही अंबे हळदीची ते माहित नाहिये.
ऋतुराज, माधव
ऋतुराज, माधव
Informative posts. Loved them.
हळदीचे शास्त्रीय नाव Curcuma ! शब्दाची उगमकथा रोचक.
The Hundred Foot Journey - बघणार !
Pages