सायकलवाली

Submitted by बिपिनसांगळे on 15 August, 2024 - 03:08

सायकलवाली

पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर .
एक सायकल मजेत चाललेली . लेडीज सायकल . ती वाडिया कॉलेजहून निघाली होती , ती कॅपिटल टॉकीजला . कॅम्पमध्ये . तिथे बॉबी लागलेला . ऋषी आणि डिम्पल ... म्हणजे काय ? खलासच ! त्यावेळचा सुपर डुपर हिट पिक्चर ! तरुण पोरापोरींच्या त्यावर उड्या पडत होत्या . यात नवल ते काय ?
लेडीज सायकल म्हणजे - चालवणारी अर्थातच मुलगी होती . गोड अन अवखळ . पांढऱ्या रंगाचा चिकनचा कुर्ता घातलेली .
पण - तिच्या मागे कॅरियरवर अजून कोणी होतं . अन ती कोणी एखादी मुलगी नव्हती ; तर तो तिच्या वर्गातला एक मुलगा होता . पण नुसता मुलगा नाही ...
आताच्या जमान्यात सायकल नसते, दुचाकी असते आणि तो पोरगा असा नुसता बसला नसता ... ती पडतेय की काय खाली, अशा पद्धतीने त्याने तिला मागून गच्च धरलं असतं ! आणि तिलाही ते आवडलं असतं अर्थात .
पण ही जुनी गोष्ट . एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालातली. म्हणजे ते काय दृश्य असेल ? याचा तुम्ही विचार करू शकता . खतरनाक आणि त्या काळातलं प्रचंड धाडसी !
तो मागे बसून थरथर कापत होता . कुठून सिनेमाची अवदसा सुचली , असे विचार त्याच्या डोक्यात . त्याच्या कापण्याने सायकलही हलत होती . आणि चालवणारीचं डोकं हलत होतं .
" ए शहाण्या ! जर गप बस ना . नाहीतर तू चालव . "
तो म्हणाला , " लेडीज सायकल अन मी चालवू ? डोकंबिकं फिरलंय का माझं ? ए बाई , मी चालत येतो हवं तर टॉकीजला . पण हे नको . कोणी पाहिलं तर मार खावा लागेल मला . अन तुझं काय ? कॉलेज बंद होईल तुझं !"
त्यावर ती बिन्धास पोरगी म्हणाली , " येड्या ! मी नाय घाबरत न तू काय घाबरतो ? चल !"
त्र्याहत्तरला आलेला तो बॉबी सिनेमा. अजूनही गर्दी खेचत होता . पण आता मॅटिनीला आलेला. मॅटिनीमुळेच तर तरुण पोरांना परवडणारा . नाहीतर पैसे आणायचे कुठून ? त्या काळात पिक्चर बघायला मिळणे म्हणजे ? लय लय मोठी गोष्ट . जणू एक सोहळाच !
कॉलेजमध्ये सकाळचा कार्यक्रम झाल्यावर पोरं टाईमपास करत होती. त्या सोनेरी दिवसांचा आनंद लुटत होती. आणि तिच्या डोक्यात बॉबी आला. जायचं कसं ? तिच्याकडे सायकल होती. याच्याकडे ती नव्हती . त्या काळात स्वतःच्या मालकीची सायकल म्हणजे ... आणि पैसे ? तेही अर्थातच तिच्याकडेच होते .
मग ती म्हणाली ,” आपण सायकलवर जाऊ या डबलसीट .”
तो म्हणाला,” मी चालत येतो . वेळ आहे तेवढा .”
पण ती म्हणाली , “नाही . आपण एकत्र जाऊ या . “
बापरे ! एकाच वेळी त्याला ते हवंसंही वाटलं आणि नकोसंही . त्याच्या अंगावर काटेही आले आणि रोमांचही .
मग त्याने धाडस केलं . अरे यार ! ती पोरगी असून मागे बसायला सांगते आणि आपण खुळ्यापरी ...
इतक्या जुन्या दिवसातलं ते कॅम्प . डौलात नटलेलं . खिचाट गजबजाट अख्ख्या पुण्यातच नव्हता ; तर कॅम्पची बातच न्यारी ! मोकळे , मोठे रस्ते, भरपूर हिरवीगार झाडं. जुन्या ब्रिटिशकालीन वास्तू . इतर पुण्यात क्वचित दिसणाऱ्या भारी मोटारगाड्या .
पाऊस थांबलेला . चक्क कडक ऊन . पण आल्हाददायक वातावरण होतं . मोठा छान दिवस होता . त्यात त्याला ती अन तिला तो सोबत . अजून काय पाहिजे ?
कौन्सिल हॉल , पूना क्लब , ब्लु नाईल , दोराबजी एकेक ठिकाण मागे पडत होतं . वेस्टएन्ड टॉकीज , कयानी बेकरी आणि शेवटी कॅपिटल .
पडद्यावर राज कपूरने मुद्दाम साकारलेली लव्हस्टोरी .
त्यात तरुण वय , उसळतं रक्त आणि सोबतीला प्रेम . तो सिनेमा दोघांनी किती पाहिला ? देव जाणे . पण जेवढा पाहिला तो अख्ख्या थिएटरमधल्या प्रेक्षकांपेक्षा जास्त मन लावून पाहिला हे नक्की .
ते बाहेर आले . तो म्हणाला , " हा ऋषीचा रोल खरं तर मला मिळणार होता . राज कपूर बऱ्याचदा पुण्यात यायचा . कॅम्पमध्ये तर हमखास . त्यावेळी तो या रोलसाठी एक देखणा पोरगा शोधत होता . त्याला मी दिसलो - मॅनिज बुक स्टॉलमध्ये . त्याला मी जाम आवडलो . पण ऐनवेळी त्याने ऋषीला चान्स दिला . पार्शलिटी ! शेवटी पोरगा ना तो त्याचा . "
त्यावर ती म्हणाली , " फेकाड्या ! किती फेकशील रे ? तुला माहितीये ना - झूठ बोले कौवा काटे १ "
नुकत्याच पाहिलेल्या सिनेमातलं फेमस गाणं तिने त्याला ऐकवलं .अन कोणाला न कळेलसं , ती पटकन त्याच्या गालाला चावली . लाडाने !
"असं होणार असेल , कावळा असा चावणार असेल तर मग मी जास्त फेका टाकीन हां ! " तो म्हणाला .
सायकलची चाकं अशीच फिरत राहिली . पण कधीतरी पंक्चर ? ... ते होतंच .
एके दिवशी ती म्हणाली , " राजा , सायकलला दोन चाकं असली तरी ती कधी एकत्र येत नाहीत रे ! "
ही गोष्टही जुनी आणि त्यात दोघांची जात वेगळी .
----------
पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस .
सकाळची प्रसन्न वेळ . रस्त्यावर सगळीकडे कार्यालयं , शाळा इथे जाणारी मंडळी. आवरून , नटूनथटून. पोरं गणवेशाला कडक इस्त्री करून , कॅनव्हासच्या बुटांना पांढरं पॉलिश करून . शिक्षिका खास ठेवणीतल्या पांढऱ्या -बिंढऱ्या साड्या नेसून . गाड्या , मुलांच्या सायकली यावर ध्वज . चौकाचौकात तिरंगा विकणारी गरीब पोरं .
ठिकठिकाणी लागलेले स्पिकर्स . हे एक बरं असतं . गाणीबिणी जोरात लावली की देशप्रेम दाखवण्याचा एक सोपस्कार सहजपणे पार पडल्यासारखं वाटतं .
पण एकंदरीत माहौल उत्साहाचा !
कॅम्पमधल्याच एका शाळेत त्याने नातवाला ध्वजवंदनाच्या कार्यक्रमासाठी आत सोडलेलं . कार्यक्रम संपून , त्याला पुन्हा घेऊन जाण्यासाठी तो वाट पहात थांबलेला .
आणि त्याच्याजवळ एक कार येऊन थांबली . आतून ती उतरली .
काय दिवस होता . काय योगायोग होता !
" अरे , काय ? ओळखलंस की नाही ? “ तिने विचारलं .
तो दिलखुलास हसला . म्हणाला , " अगं , आज सकाळीच तुझी आठवण काढली मी . आज पंधरा ऑगस्ट ना . मी म्हणलं , पन्नास वर्षं झाली , आपली सायकलवाली परत भेटली नाही . म्हणलं , गचकलो तर माझा आत्मा भटकत राहील या कॅम्पात .तुझ्या आठवणीत . तू भेटलीस - आता सुखाने मरीन मी. नो प्रॉब्लेम ! "
ती हसली . म्हणाली , " अजून तुझा तो चेष्टेखोर स्वभाव गेलेला दिसत नाही ! फेकाड्या ! किती फेकशील रे ? म्हणे, मी पुन्हा भेटले नाहीतर आत्मा भटकत राहील या कॅम्पात ! "
त्यावर तिचं म्हणणं कबूल असल्यासारखं तो म्हातारा गालात खट्याळ हसला . म्हणाला , " झूठ बोले कौवा काटे ! "
त्यावर ती जाडुली , गोडुली म्हातारी चक्क लाजली . या वयातही .
" कशी आहेस तू ? " आता त्याच्या स्वरात भिजलेपण आलेलं .
" मी छान आहे रे . मी आता दिल्लीला असते . पुण्यात येत नाही आता . काही प्रॉपर्टीची कामं होती म्हणून आले होते ... आज वाटलं जरा फिरावं कॅम्पमध्ये . सकाळच्या पारी . पंधरा ऑगस्ट आहे ना आज ! .... "
त्याने विचारलं , "माझी आठवण ... ती अजून जपून ठेवली आहेस का गं मनात ? "
ती काहीच बोलली नाही . तिने फक्त एक नजर टाकली त्याच्याकडे .करुण ! त्या नजरेत दुःख होतं , आठवण होती अन ते जुनं प्रेमही .
“आणि ती सायकल ... ती आहे का गं अजून ? " त्याने खुळ्या अपेक्षेने विचारलं .
" हो तर . तीसुद्धा ! आजही जपून ठ्वलीये मी...पण तुला बसता नाही येणार आता . "
त्यावर तो गदागदा हसला , म्हणाला . " जाड म्हातारे ! तुला चालवता येणार आहे का आता ? तेही डबलसीट ? "
त्यावर पाणीभरल्या डोळ्यांनी ती म्हणाली , " तसं नाही रे ! ती सायकल आजही जरी जपून ठेवली असली ; तरी ते कॅरियर मी त्याच वेळी काढून टाकलं . "
---------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे वाह मस्तच आहे गोष्ट. ( मला फक्त ते " जाड म्हातारे " हे संबोधन खटकलं, छापील/ कृत्रिम वाटलं त्या पेक्षा नुसतंच "जाडे" किंवा " म्हातारे" असं म्हणेल कोणी आपल्या मैत्रिणीला. ) बाकी गोष्ट टॉप आहे.

चित्तरंजन भटचा शेर आठवला:

"तूच सांग आजकाल चालले कसे तुझे?"
चार शब्द बोललीस, वाटले बरे किती

माझे अश्या कथानकावर खूप शेर आहेत, पण त्यातला आत्ता फक्त एकच देतो

पुन्हा कित्येक वर्षांनी तिला भेटायचे आहे
मधे बोलायचे नाही बरे? फाजील दुःखांनो?

उत्तम कथा

तिने ते कॅरियर त्याच वेळी काढून टाकलं
>> पुन्हा कुणी त्यावर बसुन तिच्या आयुष्यात येऊ नये म्हणून

आणि हा नातवाला सोडायला आला होता

मिलॉर्ड ये बहुत ना-इन्साफी हय !!
.

छान.
१९७४ सालातलं वर्णन, वातावरणनिर्मिती आवडली.

>>१९७४ सालातलं वर्णन, वातावरणनिर्मिती आवडली >>+१
>>ते कॅरियर मी त्याच वेळी काढून टाकलं . ">> अरेरे! माणसे अशी मनाची दारं बंद का करुन टाकतात हा प्रश्न मला कायम सतावतो.
बेफि, शेर आवडला.

वेमा ,
सस्नेह नमस्कार .

हे कुठे द्यावे हे कळेना म्हणून मी इथे देतो आहे .

माझा पासवर्ड बरोबर असूनही मला प्रत्येक वेळी नवीन पासवर्ड मागवून घ्यावा लागत आहे .

कृपया सेटिंग चेक करावे , ही विनंती .

खूप आभार आणि शुभेच्छा !

सगळ्या वाचक मंडळींचे मी खूप आभार मानतो .
प्रतिसाद दिलेल्या आणि वाचनमात्र असलेल्या साऱ्यांचेच .
स्नेह असावा .

धनुडी
तुमचा मुद्दा पटला . खरोखर . ही लिहिताना झालेली घाई / गडबड .

मला म्हातारपणी जेव्हा मैत्रीण भेटेल तेव्हा ... हाहाहा !

बेफी
तुमचा शेर म्हणजे कमाल ! कलेजाचीर !

वावे
आपला वावर आता कमी झाला आहे का ?

राजा मनाचा
मिलॉर्ड ये बहुत ना-इन्साफी हय !!
हा प्रतिसाद मला जाम आवडलेला आहे .

तिचं लग्न झालेलं आहे - नाही , हे मी कथेत लिहिलेलं नाही . सायलेंट आहे .
आपला आपला अर्थ ...

ललिता - प्रीती
१९७४ सालातलं वर्णन, वातावरणनिर्मिती आवडली.
संपादकांच्या नजरेतून अशी प्रतिक्रिया की छान वाटतंच .

फक्त कथा छोटी करायची म्हणून त्याचे फक्त उल्लेख काय ते दिले आहेत . जास्त तपशील दिले नाहीत .

एक महत्त्वाचा उल्लेख द्यायचा होता , असे आता वाटते -

कॅपिटल टॉकीज आता व्हिक्टरी म्हणून ओळखले जाते .
तिथे २३ जानेवारी १९४३ या दिवशी भारतीय क्रांतिकारकांनी बॉम्बस्फोट घडवला होता . आणि ती केस पूर्ण देशात कॅपिटल बॉम्ब केस म्हणून त्या काळी गाजली होती.

मला स्वतःला ही कथा लिहिताना खूप मजा आली

पण एक महत्त्वाची गोष्ट

माबोचे आभार

खूप लोक वाचत असतात
विशेष म्हणजे जे सदस्य नाहीयेत असे सुद्धा वाचक . आणि त्यांची संख्या मोठी आहे

.

खूप सुंदर कथा ... !

मैत्रीचा सुवर्णमहोत्सव त्यांनी साजरा केला ... कदाचित दोघांनी थोडी हिंमत केली असती तर प्रेमाचा सुवर्ण महोत्सवही साजरा करता आला असता ...
भाग्यवान होते दोघेपण पन्नास वर्षानेही त्यांची भेट होऊ शकली .....