गझल
संध्याकाळची वेळ . मोठं रोमँटिक वातावरण ! बाहेर मुसळधार पाऊस. धरतीशी लडिवाळ नाही तर जोरकस सलगी करणाऱ्या आषाढसरी !
त्या सभागृहात कार्यक्रम रंगात आला होता . गझलांचा कार्यक्रम. शांतपणे ,आतल्या अगदी आतल्या जखमा कुरवाळणारा .
तुडुंब गर्दी होती. त्यातही तरुणाईची खरी गर्दी . बाकी थोडीफार पिकली पानं होती ; पण ती घरी वेळ जात नाही म्हणून आलेली .
कारण तसंच होतं ना. कार्यक्रम शामकुमारचा होता . तरुण ,राजबिंडा ,नवोदित गझल गायक . पण तयारी अशी की पार बुजुर्ग वाटावा .
त्यामुळेच तर गर्दी होती आणि तरुण मुलांची जास्त अन हो मुलींचीही . असतं वय एखाद्यावर जीव टाकायचं . येड लागायचं . एखादी अप्राप्य गोष्ट म्हणल्यावर तर पोरी जास्तच जीव टाकतात आणि तो जो कोणी असतो ना तोही इमानेइतबारे त्यांचा जीव काढत असतो.
तो एकेक गझल पेश करत होता . अंतरात्म्यातून. एखादी मराठीही. पाऊस, विरह अन प्रेम. बाहेर पाऊसच पाऊस . पण आतही लोक भावनांच्या वर्षावात भिजून गेले होते .
तो आज भलताच मूडमध्ये होता आणि रसिकही .एकेक फर्माईश चालली होती . पण वेळ संपत आली होती. आता थांबायला हवं होतं. आयोजकांचा तसा निरोपही आला होता .
शेवटची गझल- तसं त्याने अनाऊन्स केलं .
ती मात्र कातिल हवी होती. कार्यक्रमाचा कळस ! ती गझल कुठली हे त्याने आधी ठरवलेलं होतं .
पण त्याने ती अचानक बदलली .
तो गाऊ लागला. भैरवीचे सूर छेडत .
फिर मिलोगे कहीं यूं
ये पता न था ....
कमाल ! कमाल शब्द , कमाल धून अन कमाल आवाज. हरवलेल्या प्रेमाला साद घालणारा, काळीज चिरणारा ,डोळ्यांत पाणी आणणारा …
जणू प्रेमाचा मेघमल्हारच ! काही पोरीतर डोळे टिपू लागल्या .
त्याच्या या आताच्या आवाजात काहीतरी वेगळी जादू होती . त्याचा आवाज काही वेगळाच लागला होता . दैवी . कातर !
बाहेर खतरनाक पाऊस .त्या शांत गझलेला द्रुतलयीत ताल देणारा .
लोकांनी वन्स मोअर दिला -
तो पुन्हा तीच गझल गाऊ लागला .
पण नाही - ती आधीची कशिश या आवाजात नव्हतीच . त्या गझलपुरता आधी तो - तो नव्हताच जणू. कोणी वेगळाच . हा बदल त्याला स्वतःलाच कळला . पण त्याने गझल पूर्ण केली .
त्याने ऐनवेळी दुसरीच गझल गायली होती. कारण -
ऐकायला ती आली होती - जिला त्याची नजर नेहमीच शोधत असे . चिरल्या काळजाने. त्याच्या दिलातला दर्द तीच तर होती . आधीही अन आताही .
अन ती नजरेला पडावी . कधी ? तर शेवटच्या गझलला. कंबख्त नसीब !
अन वन्स मोअरला ती निघूनही जावी ना . तो येडा पाऊस गपकन थांबल्यासारखी ! काही क्षण तसेच अधुरे ठेवून … तिच्या नव्याबरोबर.
पैसेवाल्या आयोजकांच्या पोराबरोबर.
छान.
छान.
एक से बढकर एक लेख येतायत
एक से बढकर एक लेख येतायत तुमचे.
मस्त.
मस्त.
भारी
भारी
वाचकमंडळी आपला ऋणी आहे .
वाचकमंडळी
आपला ऋणी आहे .
Sundar
Sundar
छान लिहिलंय
छान लिहिलंय
आवडली
आवडली