चक्र (भाग ३ - अंतिम)

Submitted by Abuva on 12 April, 2024 - 21:36
Gemini generated oil painting of a quarter moon from a rooftop

(भाग २: https://www.maayboli.com/node/84975)

कोजागिरीचा आठवडा होता. उलुपीच्या फ्लॅटच्या टेरेसवर चांदणं पडलं होतं. आजुबाजूला जवळ एवढी उंच बिल्डिंग नसल्यानं एक सुकून होता. समोर अर्जुन आणि उलुपी बसले होते. हातात कॉफीचे मग होते.

जेवणं लवकरच आटपली. बरेच म्हातारे (वृद्ध म्हणायचं - इति...) होते, त्यामुळे पथ्याप्रमाणे वेळेवर जेवण म्हटल्यावर आठच्या आत! मगाशी उलुपीनं समोरच्या काकूंचा उल्लेख केला होता नं, ते चित्रांगदाचे आई-वडील. आम्ही आहोत म्हणून तेही त्यांचं जेवण घेऊन इकडेच आले. अर्जुनचे वडील होतेच. अर्जुनची आई काही दिवस बहिणीकडे गेली होती, म्हणून त्यांची भेट झाली नाही. आणि दोन नातवंडं! उलुपी या गोतावळ्यात लीलया वावरत होती. घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टींवर तिची छाप दिसते होती. घरात भडक, दिलखेचक अशी एकही गोष्ट नव्हती. लहान मुलं असलेल्या घरात असावा तोच पसारा होता, नसता नाजुकपणा आणि कलाकुसर नव्हती. पण जे होतं त्या प्रत्येक वस्तूचा आब सांभाळून त्यांना त्यांचा अवकाश मिळेल हे बघितलं होतं. तीच बाब घरातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलही म्हणता येईल! सगळ्यांचा वावर सहज होता. ओढून ताणून कुठलीच गोष्ट होतं नव्हती. अर्जुनचे वडील तर काय गोष्टीवेल्हाळ इसम! पण तेही सगळ्यांना गप्पांमध्ये सामावून घेत होते. चित्रांगदाची आई मात्र जरा गप्पगप्पशी होती. बायकोशी बोलल्या त्या. पण मला वाटतं, एकंदरच चित्रांगदा प्रकरणाचं दडपण म्हणा, त्यांच्या मनावर असावं. पण या सगळ्या वेळात कुणीही करणचा उल्लेखही केला नाही. खरं तर मला ते नाव आठवतही नव्हतं, मी कशाला विचारतोय! चित्रांगदा ही बिझनेस टूरला गेली आहे आणि येईल एकदोन दिवसांत अशा थाटात सगळे तिच्याविषयी बोलत होते. बरं, म्हा.. वृद्धांची संध्याकाळची जेवणं ती कितीशी? पोरांचं आटपलं आणि चित्रांगदाचे बाबा त्यांना खेळवायला घेऊन गेले. उद्या शनिवार, म्हणजे शाळा-ऑफिसची कुणालाच घाई नव्हती. बायकोनं उलुपीला मागचं आवरायला मदत केली. तोपर्यंत अर्जुन एक कॉल आटपून आला.

मग टेरेसवर बसून शीतल चांदण्यात चित्रांगदा-करणची वरची कथा अर्जुन-उलुपीनं उलगडली. लग्न झाल्या झाल्या अर्जुन आणि उलुपीनं आमची कंपनी सोडली होती. या गोष्टीला दहापेक्षा जास्त वर्षं झाली असावीत, नै? आता जाईच आठ-नऊ वर्षांची आहे म्हणजे बघा नं. बरं, माझा तो पंटर यांचा मॅनेजर होता तोवर यांच्या प्रगतीच्या कथा कळायच्या. चित्रांगदाचं लग्न झाल्याचं त्यानं सांगितलं होतं की! पण त्यानं कंपनी बदलल्यावर तोही कनेक्ट गेला. माझ्या आयुष्यात चढउतार यायचे ते आलेच, ज्यामुळे मी या सगळ्या वर्तुळापार गेलो होतो! थोडक्यात काय तर पुलाखालून लई पाणी वाहून गेलं होतं.

गेल्या दहा वर्षांत त्यांनी आर्थिक, भौतिक, सामाजिक सगळ्याच बाजूंनी लक्षणीय प्रगती केली होती. आता आम्ही बसलो होतो तोच फ्लॅट बघा नं. बरं ते नंतर बघू. पण अर्जुन टेक्नॉलॉजीत दादा झाला होता. कंपनीत व्हीपी लेव्हलला पोहोचला होता. उलुपीनं कधीच जॉब सोडला होता, आणि ती गृहकृत्यदक्ष गृहिणी झाली होती. पण तिचं कलेच्या क्षेत्रात, समाजसेवेत बरंच काम होतं. चित्रांगदा व्हीपी प्रॉडक्ट म्हणून या नव्या कंपनीत जॉईन झाली होती. बरोबर आहे हो, करणनं कंपनीतच केलेल्या लफड्यानंतर तिथे सन्मानानं जगणं मुष्कीलच होतं तिच्यासाठी...

मला प्रश्न पडला होता, की कुठल्या आत्मियतेनं ही दोघं त्यांचं मन, चित्रांगदाच्या जीवनातले हे समरप्रसंग माझ्यासमोर उलगडून बसले होते? बरं, मी काही तो फ्लॅट घेणार नव्हतो - बजेट, बजेट, बजेट! मग हा आपलेपणा? बहुतेक माझ्या बायकोचा स्वभाव उलुपीला आवडला असावा, आश्वासक, आधारवत वाटला असावा! असते एकेकात ती खुबी!

---

गेल्या वर्षी थंडीत ही करणची भानगड उघडकीला आली होता. त्यानंतर करणनं चित्रांगदाची समजूत काढायचा, माफी मागायचा खूप प्रयत्न केला होता. पण त्याची‌ बाजू लंगडी होती. बरीच भवती-न-भवती होऊन शेवटी ही फायनल मीटिंग ठरली होती. आज आम्ही बसलो होतो ना, त्याच हॉलमध्ये (लिव्हिंग रूम म्हणायचं - इति बायको!) चौघेही बसले होते. बाहेर ग्रीष्माचं उन तापलं होतं.

करण म्हणाला, "तो अब डिवोर्स फिक्स है. कोई बात नहीं. आय मेड एव्हरी एफर्ट टू हील द वुंड. चित्रांगदा, मी तुला कधीच दोष देणार नाही. पण आज परत एकदा तू माझी बाजू ऐकून घे.
मी कंपनीसाठी रेव्हेन्यू आणत होतो. मला दिसत होतं की पैसा कुठे आणि कसा आहे, किती आहे. मै आजतक समझ नहीं पाया की चित्रांगदा तुम, और सच में तो आप तीनोंने, मेरी नई कंपनी निकालनेकी बात क्यूं नहीं मानी? अर्जुन टेक्नॉलॉजी देऊ शकत होता. चित्रांगदानं प्रॉडक्ट आणि प्रोजेक्ट हॅंडल केले असते. आणि उलुपी, इफ यू हॅड ॲग्रीड, सारा कारोबार तुझ्या हातात सोपवणार होतो! पण तुम्ही सगळेच मागे सरलात. का? क्यूं मेरे अर्मानोंको पैरों तले कुचला आपने? माझ्यावर विश्वास का दाखवू शकला नाहीत?"
सगळे गप्प होते.
"मग माझा ताबा सुटत गेला. तो दिसणारा पैसा माझं मनःस्वास्थ बिघडवून गेला! ही सगळी नौबत तुमच्यामुळे आली आहे. थ्री ऑफ यू हॅव गॅन्ग्ड अप अगेन्स्ट मी, अगेन ॲन्ड अगेन, एव्हरी टाईम! आय ट्राईड टू गेट क्लोज टू यू, उलुपी, ॲज अ ब्रदर, ॲज अ क्लोज-कॉन्फिडान्ट. पण वो हो नही पाया, तुझ्या मनात माझ्याबद्दल नफरत वाढत गेली."
"करण, मी माझ्याकडून होताहोईतो तुला मदतच केली आहे.." उलुपी म्हणाली
"लुक, मला माहिती आहे, की चूक माझी आहे. ही काही सगळी एक्सक्यूजेस नाहीत. पण तुमच्या लक्षात येतंय नं?"
अर्जुन बोलायला लागला, "करण, आम्ही घट्ट मित्र आहोत हे तुला लग्नापूर्वी माहिती होतं, आजही तीच परिस्थिती आहे. पण तुला जर वाटत असेल की चित्रांगदा आमच्या सल्ल्यानं वागते तर ते चुकीचं आहे"
करण म्हणाला, "बट शी इज इन्फ्युअन्स्ड बाय यू, युवर ॲप्रोच, युवर डिसीजन्स" आवाजातून त्याची चिडचीड स्पष्ट होती. "मैने उसको कई बार बोला, हम यूएस शिफ्ट हो जाते हैं..."
आता चित्रांगदा बोलायला लागली, "ये यूएस जाने की बात तुमने पिछले चार-छे महिनेंमे बोली है, जब की तुम पहलेही उसके साथ रहने लगे थे! क्या मतलब है इसका? कुछभी बको मत!" तिचा आवाज चढला होता.

उलुपी आता मधे पडली, "करण, चार-सहा महिन्यांपूर्वी पर्यंत आपण खूप छान, जवळचे, जिवाभावाचे मित्र होतो. एकमेकांवर विश्वास होता. पण या विश्वासाच्या आवरणाखाली तुझे वेगळेच उद्योग चालू होते."
अर्जुन म्हणाला, "दोन वर्षांपूर्वी तुझ्यावर डेलिबरेटली कस्टमर हातातून घालवल्याच आरोप झाला. जरी त्यातून निष्पन्न काही झालं नाही, तरी तू इथेच कन्फेस केलं होतंस ना की तुला बॉसला अद्दल घडवायची होती? ठीक आहे, तो तुझ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा, करिअरचा भाग असेल. पण... पण हे लक्षात घे की त्यावर्षी आपली कंपनीचा टेकओव्हर त्यामुळे रद्द झाला. दॅट वॉज अ व्हिशस मूव्ह. थांब, मला बोलू दे. तरीही तुला ग्लोबल मार्केटिंग हेड बनवलं. बरोबर आहे?"
"येस, आय डिझर्व्ह्ड इट, डोंच्यू थिंक?"
"शक्य आहे. एवढं निश्चित की कंपनीत तुझ्यापेक्षा सुटेबल कोणीही नव्हता"
"ॲन्ड आय ग्र्यू द यूएस बिझनेस थ्रीफोल्ड्स इन वन इयर!"
"हो."
उलुपी म्हणाली, "इथे तुझ्या बिझनेस ॲक्युमेनचा प्रश्न नाहिये, करण. पण माणूस म्हणून तू काय विचार करतोस हा प्रश्न आहे. आता सगळ्यांनाच माहितेय की ती मुलगी तुला बार मध्ये भेटली, आपण यूएस ऑफिस सुरू करण्यापूर्वी! तुझे तिचे संबंध काय होते ते तुलाच माहिती, पण शी वॉज रिक्रूटेड ऑन युवर रेकमेंडेशन. तुझ्या शिफारिशीमुळे शी वॉज गिव्हन द ॲवार्ड. आज तिचं यूएसमध्ये घर आहे ते कुठल्या आणि कुणाच्या पैशांवर? गेल्या वर्षी यू केम क्लोझ टु बी सॅक्ड, का? किती पैसे खाल्लेस तू आणि गेले कुठे ते पैसे? आज कंपनीचा टेकओव्हर किंवा आयपीओ सगळं थांबलंय ते का? या स्कॅंडलमुळे, करेक्ट? गेल्या दोन क्वार्टर्समध्ये कंपनीचा बिझनेस तीस टक्के डाऊन आहे. चाळीस लोकं काढावी लागली आहेत. कुणामुळे? तुझ्या स्वतःची कंपनी चालू करण्याच्या अतिरेकी स्वप्नासाठी तू किती जणांचा बळी घेतो आहेस, करण? आणि तू आमच्या नकारानं बिथरला असशील असं मला वाटत नाही. तू खूप चांगला, अनुभवी मार्केटर आहेस. तुला नकार नवे नाहीत. सो क्विट लायिंग. मला तर पक्कं वाटतं तुझ्या अफेअरसाठी तुला पैसा लागत होता. त्यात तू अडकलास."
"बघा, आत्तासुद्धा तुम्ही तिघे व्हर्सेस मी एकटा हेच चित्र आहे."
चित्रांगदाचा आवाज तिरस्कारानं थरथरत होता. "यू शुड बी द लास्ट पर्सन टू क्लेम व्हिक्टिमहूड... इतका स्वार्थी, नीच इसम मला, व्योमला गेली दोन वर्षं फसवून, व्यभिचार करून जगतोय हे किती हर्टफुल आहे! मला तुझं तोंडसुद्धा पहायचं नाहीये! युवर इन्फिडेलीटी, खरं तर मूर्खपणा, माझ्या आणि व्योमच्या मुळावर आलाय. तुझे आईबाप तिकडे तुझ्या नावानं खडे फोडताहेत. यू आर पर्सोना-नॉन-ग्राटा इन द इंडस्ट्री, करण. वॉज 'दॅट' वर्थ ऑल धिस? व्योमला बाप असून बाप नसणारे, आणि कदाचित आईही..."
"व्हॉट डू यू मीन?"
"यू हॅव रुइन्ड माय पर्सनल ॲन्ड प्रोफेशनल लाईफ, करण. काय अब्रू, काय इज्जत शिल्लक ठेवली आहेस आता? व्हेअर इज द प्राईड? मग काय अर्थ आहे जगण्यात?" चित्रांगदा तीरासारखी आत निघून गेली. उलुपीनं अर्जुनला इशारा केला. तो तिच्या मागे गेला.
"करण, आता तू जा. जे घडलंय ते दारूण आहे. देअर इज नो वे टू वॉक धिस बॅक. तू म्हणालास ना की मला बहिण मानतोस? मग ऐक. तू व्योमचा पिता आहेस हे विसरू नकोस. आता मोअर दॅन एनी थिंग, यू नीड टू बिल्ड युवर लाइफ अराउंड दॅट आयडेंटिटी, एक सजग पिता म्हणून, एक मायाळू बाप म्हणून. ॲज बेस्ट ॲज पॉसिबल. ही इज द मोस्ट इनोसंट ॲन्ड वर्स्ट सफरर ऑफ धिस ट्रॅजेडी. व्योम इथेच राहील. म्हणून तुला इथं यावंच लागेल. आणि तेवढे संबंध रहावेत असं मला वाटतं, कारण व्योमला वडील, आजी-आजोबा मिळावेत हीच माझी इच्छा आहे. पण आय विल बी द आरबायटर ऑफ युवर कन्डक्ट. तुझी वर्तणूक चांगली राहिली तरच. करण, डू व्हॉट यू डू बेस्ट, ॲन्ड बी द बेस्ट फादर दॅट यू कुड..."

---

उलुपी म्हणाली, "चित्रांगदा झाली आहे बरीचशी रिकव्हर. पण..."
"ते साहजिकच आहे म्हणा. डायव्होर्स ही काही साधी गोष्ट नाही", मी म्हणालो.
बायको म्हणाली, "एवढं प्रेम तिला मुलांचं, पण आज त्याच चित्रांगदाला, तिच्या स्वतःच्या पिल्लापासून दूर रहावं लागतंय. दैव काय काय परीक्षा पहाणार आहे कोण जाणे...” या उल्लेखानं सगळेच खंतावले. देअर आर नो विनर्स इन अ डिव्होर्स...

अर्जुन म्हणाला, "तिच्या जोडीला म्हणून मीच आता त्यांच्या कंपनीत जॉईन व्हायचा निर्णय घेतलाय!"
चित्रांगदेनं अर्जुनाला फोडला? व्हॉट द...? चित्रांगदेनं अर्जुनाला फोडला?? आयला, ही गोष्ट माझ्या ओळखीचा होती!!!
"हिस्टरी रिपीट्स..?” मी गर्रकन वळून उलुपीकडे पाहिलं.
तिच्या लक्षात आलं. ती हसली आणि म्हणाली, "नाही, मी नाही आता जाणार या दोघांच्या पाठीमागे!" आम्ही सगळेच हसलो.
अर्जुन उलुपीला उचकवायला म्हणाला, "पण आम्ही प्रपोजल देणार आहोत - पुणे ॲज प्रॉडक्ट सीओई! मग तर येशील ना?!"

धोबीपछाड...!

(इत्यलम्)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

का संपली?
सगळे भाग वाचायला मजा आली. प्रत्येकाची लिंक छान लावली आहे. कनेक्टेड आहेत.
खरंतर आणखी वाचायला आवडलं असतं पण अतिरेक झाला असता. टिपिकल वे ने संपली कहाणी पण मज्जा आली.