दुसऱ्या दिवशी साडेचारच्या ठोक्याला हॉटेलच्या रिसेप्शनिस्टचा फोन, 'मिस्टार अँड मीसेश गूहो टू शी यू'. 'पाठव त्यांना वर', मोठं ऐटीत सांगितलं मी. बेल वाजल्यावर दार उघडलं. वयाच्या मानाने वजन भलतंच आटोक्यात, किंबहुना कमीच झालेलं असावं असं वाटलं; थकल्यासारखीही दिसत होती. पण चेहऱ्यावरचा मिश्किल भाव आणि चैतन्य मात्र तेच होतं. तेच खट्याळ डोळे, तशाच दोन्ही गालांवरच्या खळ्या! पूर्वीं केसांचं पोनीटेल असे, आता चांगला अस्सल बंगाली बौदी सारखा केसांचा चापूनचोपून घातलेला खोपा होता. अजूनही एवढे भरगच्च केस बघून माझा हात नकळत माझ्या डोक्याकडे जाणार होता - झाकून घ्यायला. 'ओरी बाब्बा! कॉतो मोटू होये गॅछो!' ने भानावर आणलं - एवढं डोळ्यात भरण्यासारखं वजन वाढलं असेल कधी जाणवलं नव्हतं. 'अँड यू लुक व्हेरी प्रेटी टू!' इतपतच टोमणा स्फुरला तीन सेकंदात. मग पूर्णेन्दूशी ओळख - कुठच्याही मध्यमवयीन बंगाली बाबूसारखाच दिसत होता तो. नांवाप्रमाणेच गोलमटोल. कुठल्यातरी सेंट्रल गव्हर्नमेन्टच्या मोठ्या ऑफिसात कोणीतरी मोठा होता, ते त्याच्या अतिरेकी पुस्तकी इंग्रजीमधूनच जाणवत होतं. मी अमेरिकेतून आलेला असल्यामुळे इंग्रजी सोडून कुठचीही भाषा माझ्या कानातून आत शिरत नसेल अशी त्याची कल्पना दिसली - ती मात्र बिनधास्त अखंड अस्खलित बंगालीत बोलत होती.
मग त्यांच्या गाडीतून त्यांच्या घरी. छोटासा टुमदार फ्लॅट - मन लावून सजवलेला दिसत होता. जेवायला आम्ही तिघंच असूनही बेत गावजेवणाचा होता. जेवतांना गप्पा बहुतेक आमच्या दोघांच्याच. माझ्या बायको-मुलांची चौकशी. कोण, किती, काय करतात... तिच्या प्रश्नांचा आणि त्यामागच्या कुतूहलाचा धबधबा अवाक करणारा होता. मी गमतीने म्हटलं 'एक बायको, एक मुलगा आणि एक मुलगी. झालं समाधान?' नाटकी चेहऱ्याने चुकचुकत म्हणाली 'एवढ्या वर्षात अमेरिकेत राहूनही एकच बायको? काय उपयोग तिथे राहून!' मग थोडी गंभीरपणे टीव्हीवर नजर खिळवून म्हणाली 'मला खात्री आहे, ती नक्की खूप सुंदर असणार. तोमार चॉईस जे!' मी नुसताच हसलो - 'ज्याई बॉलो (काहीही!)'. 'बायकोचा सोड, पण मुलांचा सुद्धा एकही फोटो बरोबर ठेवावासा वाटत नाही तुला?' ह्यावरून एक लेक्चर! त्यांना दोघांना मूल-बाळ नव्हतं. मी संसाराच्या गोष्टी तिथेच थांबवल्या; मग बहुतांश आमच्याच जुन्या आठवणी. हा काय करतो, तो कुठे असतो. अमका प्रोफेसर आजकाल अमेरिकेत असतो, ते अमुक गेले माहितेय का वगैरे. गप्पांच्या बरोबरीने आग्रह करकरून खायला घालत होती मला.
जेवण उरकून वाळलेल्या हातांनी तसेच कितीतरी वेळ आम्ही टेबलावर गप्पा मारत बसलो होतो. पूर्णेन्दूमोशाय बहुतेक गप्पच होते - अगदीच विचित्र दिसू नये म्हणून मध्येमध्ये जुजबी भाग घेत होते आमच्या संभाषणात. शेवटी मीच हात धुवायला उठलो. मग मघई पानाचा आग्रह - पूर्णेन्दू तत्काळ उठला, मी घेऊन येतो सगळ्यांसाठी पान! मी म्हटलं, मीही येतो तुमच्याबरोबर - तेवढेच पाय मोकळे करता येतील. ती भांडी आवरायला लागली.
बाहेर पडल्यावर पूर्णेन्दू म्हणाला, 'युआर भिजीट इज हायली ओब्लायजिंग हां. माने, शुचिश्मिता इज शो, की बॉलो, एकशायटेड'. मी म्हटलं, 'आपण बंगालीत बोलूया का? मला ऐकायला खूप आवडतं आणि मोडकंतोडकं बोलता सुद्धा येतं.' मग तो बोलायला लागला, 'काल तुझा फोन आल्यापासून तिच्यात नवीनच चैतन्य उभारलंय. गेल्या कित्येक दिवसात तिने खाण्या पिण्यात, स्वैपाकात अजिबात रस घेतला नव्हता. अर्थात स्वैपाकाची बाई आहे; तिच्या ह्या परिस्थितीत स्वैपाक करणं सोडाच, तिला धड खाणं सुद्धा जात नाही.' चर्रकन मला एकदम जाणवलं, आम्हाला आग्रह करण्याच्या आणि मला शेकडो प्रश्न विचारण्याच्या भरात तिने जेमतेम दोन घास भात वाढून घेतला असेल स्वतःसाठी. हसण्या खिदळण्यामध्ये 'अशी फिगर मेंटेन करतेस होय!' असं तरी विचारता आलं असतं! 'तिच्या ह्या परिस्थितीत म्हणजे?'. पूर्णेन्दू खरंच अवाक झाला - 'तिचा विग तुझ्या लक्षात आला होता ना? पोलाईटपणे तू त्याबद्दल काहीच बोलला नाहीस, जाणवलं मला. (अरे वेड्या, अडाण्यांना पोलाइट नाही रे म्हणत इंग्रजीत!, जाऊ दे.) तिला हसत ठेवलंस हे कितीतरी महत्वाचं होतं माझ्या दृष्टीने - आज किती महिन्यांनी एवढी छान गेली आमची संध्याकाळ. तिला अजूनही किमो चालू आहे. काही दिवस चांगले असतात, पण कालपासून तिच्यात जो उत्साह दिसतोय तो अलौकिक! सगळे मनाचे खेळ, मनाची साथ असली की ती निभावून नेते. पण बऱ्याच वेळा मात्र ती फार थकलेली असते. खरंतर दोघेही हताश आहोत, कारण डॉक्टरांनी डेडलाईन दिलेलीच आहे. चार, फार फार तर सहा महिने.'
डेड लाईन! का हा माणूस नको तिथे इंग्रजी पाजळतो? खूप खोल जबरदस्त ओरखडा उठवून गेला तो शब्द.
घरी परतल्यावर तिच्या नजरेला नजर देणं मला शक्यच नव्हतं. तिला समजलं - तीही जुनीच सवय! हसली, म्हणाली मघाशी आलं होतं माझ्या लक्षात तुला माझ्या काळ्याभोर दाट केसांचा हेवा वाटतोय, तुझे पिकले ना सगळे! आणि तरीही बुद्दू तो बुद्दूच! मग बोलत होती बराच वेळ, स्वीकारानंतर येणाऱ्या शांतपणे. ती एकेकाळी रवींद्र संगीत शिकत असे. मी आठवण करून दिली, 'म्हण ना एक तरी'. बरेच आढेवेढे घेऊन, 'तुला तेव्हा फार आवडत असे' असं म्हणून तिने गुणगुणायला सुरुवात केली 'गोधुली गगने मेघे, ढेकेछिलो तारा; आमार ज्या कोथा छिलो, होये गॅलो शारा' (संध्याकाळच्या धूसर नभात, ढगांच्या आड लपले होते तारे; जे सांगायचे मनात होते, संपूनच गेले ते सारे ) अजूनही माझं अतिशय आवडतं गाणं... पण आता त्या ओळी, तिच्याकडून, पूर्ण ऐकवणारंच नव्हत्या. तिला थांबवून मी मधलीच ओळ म्हटली 'आर की कोखून कोबे, एमून शोंध्दा हॉबे?' (आता पुन्हा अशी संध्याकाळ कधी आणि कुठे येणार?) गप्पच झालो मग दोघेजण.
दारातून निघतांना तिने पटकन एका पिशवीमधून एका महागड्या दिसणाऱ्या साडीची घडी काढून माझ्या हातात ठेवली - 'बॅगेत वरती राहील नक्कीच! तुझ्या बायकोसाठी. ही नेसून तिचा फोटो काढून पाठव मला; बघू दे माझ्या कल्पनेतल्यासारखीच सुंदर दिसते की नाही.' मी थक्क! हे मला पारच अनपेक्षित होतं. कसनुशा चेहऱ्याने तिला शेवटी खरं ते सांगितलं. 'अगं, कल्पनेतल्या माणसांची वर्णनं करणं, त्यांची चित्रं रेखाटणं सोपं असतं. ही प्रत्यक्षातली साडी कशी नेसवणार ना त्या कल्पनेला?'
विस्फारल्या डोळ्यांनी ती जेमतेम मला ऐकू जाईल असं म्हणाली 'पुढच्या वेळी, पुढच्या जन्मात, पत्रांची उत्तरं द्यायला, नाहीतर फोन करायला एवढा उशीर नको करू.'
विमान उडतांना मी मनाला पुन्हा पुन्हा बजावलं - पुन्हा ह्या शहरात पाऊल सुद्धा टाकणार नाही कधी.
ह्या जन्मी तरी.
(समाप्त)
सुंदर
सुंदर
सुंदर!!. पहिला भाग वाचल्यावर
सुंदर!!. पहिला भाग वाचल्यावर वाटलं उगीचच क्रमशः वाली गोष्ट वाचायला घेतली. आता वाचलीच ,तर वाट पहाणं आलं! पण तुम्ही लवकर लिहून संपवलीत पण. . . बंगाली भाषेबद्दल आकर्षण आहे. या गोष्टीत तर बंगाली भाषापण एखाद्या कॅरेक्टर इतकीच महत्त्वाची आहे.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
सुंदर कथा..
सुंदर कथा..
छानच आहे कथा. आवडली. वेगवान
छानच आहे कथा. आवडली. वेगवान आहे आणि तोच वेग शेवटपर्यंत पर्फेक्ट टिकवून ठेवलाय.
कथेच्या स्वागताबद्दल सर्वांना
कथेच्या स्वागताबद्दल सर्वांना धन्यवाद! कथेतील बंगाली वाक्यांविषयी रस दाखवल्यामुळे, लिहावंसं वाटतं की शेवटी उल्लेख केलेलं गाणं खरेच रवींद्र संगीतातील एक सुप्रसिद्ध गीत आहे. त्याच्या शब्दांवरुनच मला कथा लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. इच्छा असल्यास हे यू ट्यूब वर ऐकता येईल - https://www.youtube.com/watch?v=JuEb-XIPrXs
नाजूक विषयाची हळवी, हळूवार,
नाजूक विषयाची हळवी, हळूवार, कलात्मक हाताळणी खूप आवडली कथा...
कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते
कहींसे निकल आए जनमोके नाते
छान कथा.
छान कथा.
अनया - https://www.youtube.com/channel/UChsj1wzW_F9PQtyO25XbqfQ
या बंगालीचे ऑनलाईन क्लास घेतात.
स्मिताके, बघते. धन्यवाद
स्मिताके, बघते. धन्यवाद
अनया, मी क्लास घेतलेला नाही,
अनया, मी क्लास घेतलेला नाही, फक्त चॅनेल पाहते. लहानपणी शेजारी बंगाली होते, तेव्हा थोडंफार समजत होतं. आता विस्मरणात गेलं आहे, म्हणून हा चॅनल पाहत असते.
दारुण शुंदोर कोथा! अगदी
दारुण शुंदोर कोथा! अगदी भिडणारी!
आपण कथेत वेळोवेळी वापरलेले बंगाली शब्द, वाक्ये खूप आवडली. शेवटही मला आवडला. तिच्या शेवटच्या दिवसात, तिला, तिच्या आठवणीत दाटणारा कोणी आहे हे कळलं हे खूप परिणामकारक रितीने सांगितलं आहे.
बंगाली भाषा रोशोगुल्ल्यासारखी अगदी गोड वाटते ऐकताना. मी पण कधीतरी पूर्वी बंगाली शिकले होते. त्या क्लासच्या सरांनी आमची कलकत्ता आणि शातिनिकेतनात सहल पण घडवली होती.
स्मिता के, त्या आता घेत नाहीत
स्मिता के, त्या आता घेत नाहीत म्हणे ऑनलाईन क्लासेस!
अर्रर्र .. मग त्यांनी चॅनेलवर
अर्रर्र .. मग त्यांनी चॅनेलवर लिहिलेलं बदलायला हवंय.
आजच दोन्ही भाग वाचुन काढले.
आजच दोन्ही भाग वाचुन काढले. फारच आवडली कथा.
मधे मधे पेरलेली बंगाली खुप गोड आहे. >> +१
नितांत सुंदर उतरली आहे कथा.
नितांत सुंदर उतरली आहे कथा.
Pages