दुःस्वप्न

Submitted by Abuva on 30 March, 2024 - 09:33
DaLLE-2 generated image of crushed, used beer can in a corner of an untidy place

अर्जुन मीटिंग संपवून परतला‌ तेंव्हा उदयन आणि चित्रांगदा केबिनमध्ये होते. ते लंच करून परत आले होते. या मीटिंगमध्ये अडकल्यानं अर्जुनचा लंच बुडला होता. पण टेबलावरच त्याचं सॅन्डविच दिसत होतं. धापकन खुर्चीत सांडत अर्जुन म्हणाला, "च्यायला, संपता संपत नाहीत यांच्या कटकटी. हे असंच हवं अन् तसंच हवं." तो लॅपटॉप उघडत होता. "का विचारलं तर एकाला धड कारण देता येत नाही. मग साठमारी. तुझं खरं का माझं खरं... झाला तुमचं लंच?"
त्याचं लक्ष आता दोघांकडे गेलं. आत आल्यावर त्याला काही तरी‌ वेगळं जाणवलं होतं. पण त्याचं लक्ष नव्हतं. आता उदयनकडे बघताच त्याला तो वास एकदम जाणवला. त्यानं धसक्यानं चित्रांगदेकडे पाहिलं. तिची नजर त्याला काही तरी सांगत होती. तो हतबुद्ध झाला. उदयन म्हणाला, "भाई, लंच तो कर लो.." त्याचे शब्द अडखळत होते, शब्दांना बीअरचा वास येत होता, डोळे तारवटले होते.
अर्जुनच्या डोक्यात तिडीक गेली. "उदयन, बीअर पी के आये हो? कस्टमर साईटला? लंचला? आर यू आऊट ऑफ युवर माईंड?" तो बोलता बोलता ताडकन‌ उभा राहिला. त्या धक्क्याने खुर्ची मागे ढकलली गेली. "चित्रांगदा, व्हॉट नॉनसेन्स?" चित्रांगदा काही म्हणायच्या आत उदयन म्हणाला,‌ "भाई, चिडलास का? अरे एक तर बीअर मारली आहे!"
"कस्टमर साईटला‌ असताना? वर्किंग डेला?" अर्जुनच्या चेहेऱ्यावर संताप दिसत होता. तो उदयनला पुढे काहीही बोलू न देता म्हणाला, "उदयन, गो बॅक टू हॉटेल राईट नाऊ. राईट नाऊ. आत्ताच्या आत्ता. इथे थांबायचं नाही." उदयनच्या चेहेऱ्यावर आश्चर्य होतं. चित्रांगदाच म्हणाली, "अर्जुन, आपण चेक आऊट करून आलोय." अर्जुनचा संताप यत्किंचितही कमी झाला नाही, "देन गो समव्हेअर, पण इथे थांबायचं नाही." त्याला सुचलं, "जा, कॅब घे आणि‌ एअरपोर्टला जा. तिथे झोप बाकावर. पण इथे नाही."
आता उदयनच्या चेहेऱ्यावर राग दिसायला लागला होता. "तू मला ऑर्डर करतोयस?" अर्जुन क्षणभर थबकला. तेव्हढ्यात चित्रांगदा म्हणाली, "अर्जुन, अरे ऐक." अर्जुन क्षणाचा विलंब न लावता म्हणाला, "उदयन, मी तुला ऑर्डर करत नाहीये. पण तुला ऑर्डरच हवी असेल तर मी आत्ता बॉसला फोन लावतो." उदयनचा चेहेरा बघण्यासारखा झाला होता. चित्रांगदा म्हणाली, "अर्जुन.." हात वर करून तिचं बोलणं तोडत अर्जुन म्हणाला, "चित्रांगदा, तू याला घेऊन एअरपोर्टवर जा. मी इथल्या मीटिंग संभाळतो. तुला कळतंय नं मी काय सांगतोय? मी‌ उदयनच्या ऐवजी मीटिंग अटेंड करतो. या क्षणी तुम्ही निघा. आत्ता चुकून जरी बॉब किंवा लॅरी इथे आले ना तर लाज निघेल." उदयन म्हणाला "यार कुणाला समजणार आहे? चित्रांगदा तू सांग, तुला काही तरी‌ कळतंय का की मी बीअर प्यालोय का काय प्यायलोय?" चित्रांगदा त्याला‌ म्हणाली, "येस उदयन, कळतंय. मी तुला तेंव्हाच सांगत होते.."
"डोन्ट बी अ फूल", उदयन कडाडला. "तुम्हाला काय करायचं मी दारू प्यायलो का काय प्यायलो ते? मी काय वाट्टेल ते पिईन. यू विल ऑल्सो, इन माय प्लेस..." बोलता बोलता त्याचा ताव ओसरला. तो खुर्चीवर मागे मान टाकून वर करून छताकडे बघायला लागला. त्याची प्रतिक्रिया बघून अर्जुन नरमला. त्याची आणि चित्रांगदेची नेत्रपल्लवी झाली. तिनं डोळ्यांनीच खुणावलं की काही तरी विशेष घडलंय. अर्जुन तिला मानेनेच म्हणाला निघा. तिनंही मान डोलावली.
अर्जुन ऑलमोस्ट नॉर्मल आवाजात म्हणाला, "उदयन, आय रिक्वेस्ट यू. आता दोन-तीन तासच राहिले आहेत आपले इथे, एनी वे. आपली संध्याकाळची फ्लाईट आहे. तुम्ही पुढे जा एअरपोर्टला. ॲन्ड रिलॅक्स देअर. मी फायनल मीटिंग संपवतो लॅरी बरोबरची आणि येतोच."
चित्रांगदा ही म्हणाली, "उदयन, आपण दोघं निघूयात. अर्जुन कॉन्क्लुडिंग मीटिंग सांभाळेल."
उदयननं मान खाली केली. तो डोळ्यांतलं पाणी लपवत होता. त्यानं लॅपटॉप समोर ओढला, आणि काही तरी करायला लागला. वातावरणात ताण होता. नजर चुकवत तो म्हणाला, "माझी डॉक्युमेंट्स कॉमन फोल्डरला कॉपी करतोय. बघून घे." चित्रांगदा ही तेच करायला लागली. अर्जुनचा राग आता ओसरला होता. शेवटी कस्टमर कमिटमेंटचा प्रश्न होता. काम होणं आवश्यक होतं.
दोन मिनिटांनी त्यानं सगळं चेक करून आवश्यक ती डॉक्युमेंट्स आहेत असं सांगितलं. न बोलता उदयन आणि चित्रांगदानं सामान गुंडाळलं. अर्जुन त्यांना केबिनच्या दारापर्यंत सोडायला गेला. चित्रांगदेला म्हणाला, "मी‌ येतोच मीटिंग संपवून". दारातून बाहेर पडता पडता उदयननं त्याच्या खांद्यावर थोपटले. अर्जुननं त्याच्या हातावर आश्वासक हात ठेवला. उदयननं अर्जुनची नजर पुन्हा चुकवली पण त्याचे डोळे अजूनही भरलेलेच होते.

---

या प्रसंगापूर्वी सुमारे वर्षभर अगोदरची गोष्ट सांगतो.
शुभंकरच्या वाढदिवसाची पार्टी स्नोस्टॉर्म मुळे कॅन्सल करावी लागली होती. तुम्हाला माहित नसेल नाही का! तर शुभंकर म्हणजे उदयन आणि अवंतिकेचा मुलगा. जानेवारी एंडला त्याचा पहिला वाढदिवस जोरात करायचा प्लॅन होता. पण ऐनवेळी त्या वादळानं गोची केली होती. बरं, झालं काय होतं की शुभंकरच्या बारश्याच्या वेळी अवंतिका नीट रिकव्हर झाली नव्हती. त्यामुळे तेव्हा काही मोठा घाट उदयननं घातला नव्हता.
मग होळीचं निमित्त काढून या वीकेंडला वाढदिवसाचा मोठा धमाका उडवून द्यायचा प्लॅन झाला. पण सगळे हॉल्स आणि कम्युनिटी चर्चेस वगैरे ऑलरेडी होळीनिमित्त बुक झाली होती. त्यामुळे उदयनच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्स मधेच पूलसाईड पार्टी करण्याची परमिशन त्यानं काढली होती. ओपन-एअर पूल असल्यानं आणखी महिनाभर तरी तो बंदच होता, कारण ऑफिशिअली विंटर संपला नव्हता.
खूप धमाल आली. सकाळभर होळी आणि रंग खेळले सगळे. बाहेरचं केटरिंग होतं. पण उदयन - अवंतिकेनं खूप कष्ट घेऊन सगळं ऑर्गनाईझ केलं होतं. खरा पार्टीचा हाय पॉइंट त्यांनी ठेवलेली ट्रेझर हंट गेम होता. त्यांच्या कॉम्प्लेक्समध्ये अनेक ठिकाणी‌ क्ल्यूज दडवून ठेवले होते. पण फायनल क्ल्यू जवळच्या मॉलमध्ये होता! तिथल्या एका कुकी शॉप मध्ये! ट्रेझर हंटमध्ये भाग घेऊन तिथे येणाऱ्या प्रत्येकाला एक कुकी बास्केट गिफ्ट मिळाली होती. मग मुलांचे खेळ होते. शेवटी गाणी! उदयन वॉज ग्रेट फॅन ऑफ, हू एल्स, किशोरकुमार! त्याला साथ द्यायला अवंतिका आणि चित्रांगदा होत्या. बॉसची बायकोही झकास गाणी गायची! थंडीनं बाहेर बसणं अशक्य होईपर्यंत हा धिंगाणा, दंगा-मस्ती चालू होती. शुभंकरचा पहिला बर्थडे तर दिमाखात साजरा झाला!
होळी आणि मग दिवसभर नाचल्यानं रात्री मंडळी मुडद्यासारखी झोपली होती. भल्या पहाटे चित्रांगदाचा फोन‌ खणखणला. उदयन होता. "चित्रांगदा, व्हेरी सॉरी, पण तू आत्ता येशील का? अवंतिका बेशुद्ध पडली आहे. मी‌ॲम्ब्युलन्स बोलावली आहे. पण शुभंकरकडे बघायला.." चित्रांगदा ताडकन उठली. "उदयन, व्हॉट हॅपन्ड? एनी वे, मी दहा मिनिटात पोहोचते. माझ्याकडे तुमच्या घराच्या किल्ल्या आहेत. यू डोन्ट वरी." तिच्या बोलण्यानं उलुपी जागी झाली होतीच. त्यांनी‌ अर्जुनला उठवलं. अर्जुन उदयनला मदत लागेल म्हणून हॉस्पिटलकडे निघाला. चित्रांगदा आणि शुभंकर यांची घट्ट मैत्री होती! ती बेबीसिटींग करायची शुभंकरचं. त्यामुळेच उदयननं शुभंकरसाठी चित्रांगदाला हाक मारली होती.

पुढचे चार दिवस अवंतिका हॉस्पिटलमध्ये होती. चित्रांगदा आणि उलुपी ह्या उदयनच्या घरी जवळजवळ आठवडाभर रहात होत्या. म्हणजे बाकी सगळ्या सहकाऱ्यांची, त्यांच्या बायकांची आवश्यक ती मदत होतीच. पण शुभंकरची काळजी मात्र मुख्यत्वे चित्रांगदेनं घेतली. तिच्या आणि शुभंकरच्या गट्टीवर बॉसलाही कॉमेंट केल्याशिवाय रहावलं नाही. "चित्रांगदा, तुला मुलं एवढी आवडत असतील असं वाटलं नव्हतं हं...” सगळ्यांसाठीच ते नवल होतं.

प्रेग्नंन्सीपासून अवंतिकाच्या काहीना काही तब्येतीच्या कुरबुरी चालू होत्या. या वेळी मात्र अवंतिकाचं नीट निदान झालं. ते काही फार आशादायी नव्हतं. तिला डिजनरेटिव्ह डिसीज होता. उदयन आणि अवंतिका दोघंही हादरले होते. उदयन तर कोलमडून गेला होता. तान्हा शुभंकर पदरात. हे असं निदान, की ज्यात पुढे काय होईल ते अनिश्चित. जिच्यावर अनेक वर्षं जिवापाड प्रेम केलं अशी सखी-सहधर्मचारिणी जगण्याची धडपड करतेय. आणि संसाराची, करीयरची सगळी स्वप्न धुळीत मिळताहेत काय अशी भिती. आता फक्त एकापुढे एक दिवस जोडत आयुष्य काढायचं...

---

कुण्या एका शुक्रवारी संध्याकाळी उदयन काम संपवून घरी आला. अवंतिका तयारच होती. शुभंकरचीही सगळी तयारी झाली होती. तोही बाहेर जायच्या, खेळायच्या मूडमध्ये होता. मॉलमध्ये जाऊन त्याला प्लेपेनमध्ये सोडला. मग थोडी खरेदी उदयननं केली, थोडी अवंतिकानं. नंतर फूड कोर्टमधे बसले. आज मूड चायनीजचा होता. मस्त खाणं झालं. तोवर शुभंकरही झोपायला आला होता. निघाले. घरी आले. अवंतिका शुभंकरला झोपवायला गेली. उदयन टीव्हीसमोर बसला. थोडा वेळ झाला तरी अवंतिका का आली नाही हे बघायला गेला, तर अवंतिका तिथेच थकून गाढ झोपली होती. त्यानं दरवाजा नीट बंद करून घेतला.
उदयन परत आला. येताना फ्रीज उघडून एक बीअर घेतली. टीव्ही बंद करून त्यानं सिस्टिम लावली. आवडता किशोर, त्याचीच गाणी लावली. बाल्कनीत उभा राहिला. आसपास सामसूम झाली होती. रस्ता मोकळा होता. रस्त्याच्या उतारावरून पिवळ्या स्ट्रीट लाइटच्या पेंगुळलेल्या खांबांची रांग मोठ्या रस्त्याला जाऊन मिळत होती. अंधारलेल्या जगावर तो पिवळा प्रकाश अवकळा पसरवत होता. समरमधल्या गरमीत हवांच्या झुळका गारवा आणण्याऐवजी तल्खी वाढवत होत्या. हातातली थंड बीअर मात्र घुटक्या घुटक्याला थंडावा देत होती. झोपेची वेळ उलटून गेली होती. पण डोक्यातले घरघरणारे विचार.. ते कुठले झोपू देतायत? एका बीअरची दोन झाली. तिसरीही उतरली. उदयनच्या डोळ्यांसमोर भूतकाळाच्या विळख्यात भविष्याच्या चित्रांची सरमिसळ झाली होती, भविष्याचा श्वास कोंडत होता, ऊर धपापत होता. तिकडे किशोर रात्रीचे ख्वाब पुन्हा पुन्हा जागवत होता. प्रेयसीला आर्त हाक घालत होता. कधी जिंदगीका सफर सुहाना सांगत होता, तर कधी जीवनाचं विविधरंगी तत्वज्ञान सांगत होता. उदयन मात्र त्याच्या विचारांच्या आवर्तात भोवंडत होता. कदम साथ ना देण्यावर बात आली तेंव्हा अजूनही त्यांच्या जागीच असणाऱ्या पण आता मात्र उदयनच्या टप्प्याबाहेर दिसणाऱ्या मंजिलांच्या आसक्तीनं तो मनसोक्त रडला.

अर्ध्या रात्री कधी तरी जाग येऊन अवंतिका बाहेर आली. लिव्हिंग रूममधला टेबललॅम्प चालू होता. किशोर अजूनही गळत होता. मुरगाळून सोफ्यावर पडलेल्या उदयनपलिकडे बीअरचा रिकामा सिक्सपॅक आ वासून पडला होता. त्या मंद प्रकाशात आपल्या जीवनातल्या अंधाराची जाणीव होऊन अवंतिका खुर्चीत बसली. अगतिक, हताश. तिचे डोळे पाण्यानं भरून आले. बाहेर पिवळ्या दिव्यांच्या खांबांची गस्त चालूच होती.

---

शनिवारी खरं तर एक्स्ट्रा काम होतं. उशीर झाला तरी उदयन आलाच नव्हता. आता हे नेहमीचंच झालं होतं.

---

अर्जुन एअरपोर्टवर पोहोचला. सोपस्कार आटपून फ्लाईटच्या गेटवर पोहोचला. अजून वेळ होता. बेताचीच गर्दी होती. पण शुक्रवार असल्यानं वीकएन्डसाठी - घरी जायला, वा गेटअवेसाठी - फ्लाईट पकडायला गर्दी होणार हे नक्की होतं. उदयन आणि चित्रांगदा गेटजवळ बसले होते. चित्रांगदानं अर्जुनला येताना पाहिलं. उदयन केंव्हाचा काचेतून बाहेर नजर लावून बसला होता. त्याला येतेच सांगून ती उठली.
"बराय का?"
"हो."
"काय झालं त्याला एकदम सटकायला? चार दिवस तर बरा होता"
"तेच तुला सांगायचंय. गेल्या आठवड्यात त्यांना एक ऑर्गन डोनर मिळाला होता. त्याच्या टेस्ट चालल्या होत्या. ते मॅच व्हावं लागतं ना. आज आम्ही लंच घेत असताना त्याला एक फोन आला. मला कळलं नाही पण तो फोन घेण्यासाठी बाहेर गेला. काय बोलणं झालं काय माहित. पण त्यानं बराच वेळ घेतला. वाट पाहून मी फोन वर फोन केले, पण हा पठ्ठ्या उचलायलाच तयार नाही. शेवटी मी बाहेर आले तर हा बाहेर उभा. प्यायलेल्या अवस्थेत. तसाच कॅबमध्ये घातला आणि ऑफिसवर घेऊन आले."
"नशीब कस्टमरकडे कोणाच्या लक्षात आलं नाही."
"मग त्यानं इथे येताना सांगितलं की डोनर मॅच झाला नाही. त्याचाच त्याला शॉक बसला. दे हॅड अ लॉट्स ऑफ होप्स."
"फक!"

परतीच्या प्रवासात फारसं कुणीच कुणाशी बोललं नाही. फ्लाईट लॅन्ड झाल्यावर बॅगेज क्लेमपाशी तिघे उभे होते. उदयननं दोघांच्या खांद्यावर हात ठेवले. म्हणाला, "सॉरी गाईज, पुन्हा असं होणार नाही." ॲन्ड ही हग्ड देम बोथ.

---

शनिवार होता. दुपारची वेळ. अवंतिकानं शुभंकरला भरवलं. उदयन म्हणाला मी झोपवतो त्याला. अवंतिका काल पासून बघत होती. टूरवरून आल्यापासून उदयन काहीसा वेगळा वागत होता. काल रात्री त्याच्या नेहेमीच्या सवयीनं बीअर पीत गाणी ऐकत बसला नव्हता. आज सकाळपासून घरातली बरीच कामं त्यानं केली होती. चित्रांगदेला विचारलं पाहिजे की टूरवर काही... का ऑफिसात काही घडलंय? त्याच्या अनियमिततेबद्दल तक्रार तिला माहित होतीच. ती जरा काळजीत पडली. सरळ उदयनलाच विचारू, झालं. ती घरकाम आटपून लिव्हिंग रूममध्ये आली. उदयन बसलाच होता. "झोपलाय शुभंकर”, त्यानं सांगितलं.
"उदयन, सगळं ठीक आहे ना ऑफिसमध्ये? कामावर?”
उदयननं तिच्याकडे पाहिलं. "हो, ठीक आहे की.” तो सहजपणे म्हणाला.
"पिक्चर देखना है? बऱ्याच दिवसांत पाहिला नाहीये आपण.”
उदयन उठला, शोधशोध करून त्यानं एक डीव्हीडी काढली.
टीव्हीवर आनंदचे टायटल्स बघताच अवंतिका अस्वस्थ झाली.
"नही देखनी है मुझे आनंद”, ती आक्रसून म्हणाली.
उदयन म्हणाला, "ओके डार्लिंग. गाणी बघायची? चालेल?” आज खूप दिवसांनी उदयनच्या तोंडून डार्लिंग ऐकलं होतं अवंतिकेनं. तिनं होकार दिला.
दोघं सोफ्यावर बसले होते. त्याच्या मनात काय चाललंय याचा तिला अंदाज येत नव्हता. पण काही तरी घडणार आहे ह्याची मानसिक तयारी तिनं केली.

'कहीं दूर जब दिन ढल जाये' चे सुरूवातीचे गहिरे सूर वाजले. स्क्रीनवर आनंदचा दर्दभरा, झाकोळलेला चेहेरा उमटला. गाणं सुरू झालं आणि अवंतिकानं उदयनच्या खांद्यावर डोकं ठेवलं.
'ये मेरे सपने, यहीं तो है अपने' हे ऐकताना उदयनचा बांध फुटला. त्याच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वहायला लागले. अवंतिका तर कधीच विकल होऊन स्फुंदत होती. गाणं संपलं. उदयननं टीव्ही बंद केला. अवंतिकेला त्यानं समोर बसवलं. "हमारे सपने हमारे है, अवंतिका. मी हे विसरलो होतो. मला माफ कर, अवंतिके, तुझ्याविना मी एकटाचं स्वप्नं बघू लागलो होतो. तुझा हात सोडून भरकटलो होतो. कसं सांगू की मी माझ्या दुःखात तुला विसरलो होतो, तुझ्या दुःखांना विसरलो होतो. स्वार्थी आहे मी. किती पोकळ, खोखला आहे गं मी, दुर्बळ, भेकड...”
"नाही रे, उदयन, नाही”, अवंतिका कळकळीनं म्हणाली.
"बोलू दे मला, अवंतिके, आज बोलून मोकळा होणार आहे मी. मला स्वप्न नव्हे तर दुःस्वप्नं पडत होती. आठवतंय तेव्हापासून आपण,.. आपण दोघं मिळून ही स्वप्नं बघितली आहेत. या पुढची स्वप्नंही आपणंच बघायची आहेत. तुझ्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या बाळासाठी. नशीबानं आपल्याला पुन्हा नवी स्वप्न बघायची संधी दिली आहे. ती मला दुःखात, दारूत, दुनियादारीत वाया घालवायची नाहीये. मी तुझी साथ सोडून कुठेतरी भरकटलो होतो. मला परत घे, अवंतिके...”
अवंतिकेनं त्याला घट्ट कवळून घेतलं. काही काळ दोघांनीही दुःखाचे कढ उतू जाऊ दिले.
उदयन म्हणाला, ”काल मला अर्जुननं ऑफिसमधून हाकलून दिलं. नाही, चूक माझीच होती. मी दारू पिऊन ऑफिसला जाणं चूकच होतं. पण त्या एका घटनेनं मला जाग आली. मी किती बहकलो होतो ते त्याच्या निर्भत्सनेतून मला उमगलं. तू आहेस म्हणून माझ्या बीभत्स वागण्याला समजावून घेत होतीस. ऑफिसमधल्यांनीही किती सोसलं असेल! पण आता मी जागा झालोय. त्या दुःस्वप्नांतून बाहेर आलोय. अवंतिके, मला माफ कर..”
अवंतिका आता सावरली होती. तिनं उदयनच्या ओठांवर हात ठेवला. तिच्या चेहेऱ्यावर एक स्मित उमटलं. उदयनच्या हातातून तिनं रिमोट घेतला आणि पुढचं गाणं लावलं..

जिंदगी कैसी ये पहेली हाए
कभी तो हसांये
कभी ये रूलाये...

---

काळ हेच अनेक गोष्टींचं औषध असतं म्हणतात ना, तेच खरं. उदयननं हा जॉब सोडला. आउट वेस्ट, त्यानं लोकल गव्हर्नमेंटमध्ये कमी दगदगीचा, कमी जबाबदरीचा रोल घेतला. तिथे त्याला अवंतिकेकडे, तिच्या तब्येतीच्या देखभालीकडे लक्ष द्यायला वेळ देता आला. त्याच्या गाण्याबजावण्याच्या आवडीला छान वाव मिळाला. अवंतिका ऑर्गन ट्रान्सप्लांटनंतर बरंचसं सुसह्य जीवन जगू शकतेय. शुभंकर आता मोठा झालाय! नोकरी करतोय, आईबाबांची काळजी घेतोय आणि लोकल बॅन्डमध्ये गातोसुद्धा. चित्रांगदामावशी मारते बरं का मधूनमधून चक्कर, तिच्या टूर शेड्यूलमधून वेळ आणि संधी मिळाली की! तिचा आवडता भाचा आहे ना!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त लिहिता तुम्ही.तुमची पात्रं उलुपी अर्जुन चित्रांगदा आता एकदम घरातली झालीत.
शेवट चांगला झाला हे खूप बरं वाटलं.देव उदयन अवंतिका ला जास्तीत जास्त एकत्र सुखी आयुष्य देवो.

खूपच छान ! शेवट सकारात्मक झाला हे वाचून छान वाटले . सगळी पात्रे डोळ्यासमोर उभी राहतात गोष्ट वाचताना ..