अमेय - भाग २

Submitted by हौशीलेखक on 20 March, 2024 - 21:29

नेहमीप्रमाणे आपल्याच तंद्रीत चालत अमेय शाळेतून घरी येतो, तर दाराला कुलूप! त्याला एकदम आठवतं, सकाळी आई म्हणाली होती 'आज दुपारी मेघाची डान्स प्रॅक्टिस आहे. मला बहुतेक उशीर होईल घरी यायला. तोपर्यंत वरती लेले मावशींकडे बस.'. त्याला खरं तर हे असलं दुसऱ्याकडे बसून रहायला अजिबात आवडत नाही, शेजारी असले म्हणून काय झालं! कुक्कुलं बाळ का आहे तो आता? लेले मावशी तस्सच वागवतात त्याला अजून. नाईलाज म्हणून तो जिना धाडधाड चढून वरती जातो. मावशींनी बहुतेक त्याला रस्त्यातून येतांनाच बघितलं असणार, ब्लॉकचा दरवाजा सुद्धा उघडाच आहे. तो आत जातो, नेहमीच्या सवयीनी बॅकपॅक दाराशीच टाकतो. मावशीही घाईघाईनी नेहमीच्या कपात दूध आणून देतात - बारा वर्षाची मुलं काय दूध पितात का! कोण सांगणार ह्यांना. दुधाबरोबर नेहमीचा प्रश्न 'हं, आज काय शिकवलं शाळेत?'... उत्तरादाखल एक निरर्थक 'काय नाय' त्यांच्या तोंडावर टाकून, एकदाचं दूध पिऊन तो मुठीनंच तोंड पुसतो आणि धावत मावशींच्या बाल्कनीत जाऊन उभा रहातो. ह्यांच्या ब्लॉकला काय छान बाल्कनी आहे, सोसायटीत येणारा रस्ता पार दूरवर दिसतो. खाली खेळणारी मुलं, गाड्या, बसेस, फेरीवाले, दुकानं, गर्दी, गोंगाट ... सगळं बघत तो क्षणार्धात पार रमून जातो. मागे मावशी आपण एकट्याच बडबडतो आहोत हे लक्षात येऊन स्वैपाकघरात निघून जातात आणि स्वैपाकाला लागतात.

मेघाचा हात घट्ट पकडून आई बसमधून उतरतांना अमेयला दिसते. घरापासून शंभर पावलं नसेल तो बस स्टॉप. म्हणजे आता इथे थांबायची काही गरज नाही. मावशींना जातो म्हणून सांगायला अमेय किचनमध्ये जातो. मावशी त्याच्या दिशेला पाठ करून सिंकमध्ये भांडी विसळत असतात. बाजूला तो धुसफुसता प्रेशर कुकर चालू असतो. 'आई आलीच; मी घरी जातो' एवढं घाईघाईत तो ओरडून सांगतो आणि धाडधाड पायऱ्या उतरून आपल्या ब्लॉकच्या बाहेर येऊन थांबतो. आणखी दोन मिनिटात, मेघाला घेऊन आई येतेच. घरात गेल्यावर लगेच तिचा पहिला प्रश्न,
‘भूक लागली असेल ना? लाडू देऊ का?’
‘नको, मावशींकडे कपभर दूध आत्ताच प्यायलं’.
'मग थँक्यू म्हटलंस का त्यांना?'
‘एवढ्या तेवढ्यावरून थँक्यू काय म्हणायचं सारखं’ - तो थोडा वरमलाय.
'खाली आलास त्यांना माहिती तरी आहे का?'
‘हो, जातो म्हटलं मी त्यांना’ – हे अगदीच मुळमुळीत, खालच्या आवाजात.
'थांब, मीच जाऊन बोलून येते त्यांच्याशी.' असं म्हणून आई मावशींकडे जाते.

थोड्याशा अपराधी भावनेनी, अमेयच्या डोळ्यांसमोर मावशींची पाठमोरी आकृती उभी रहाते. त्याला एकदम जाणवतं, मावशी उत्तरादाखल काहीच बोलल्या नव्हत्या. बहुतेक त्यांना ऐकू नसेल गेलं. एकीकडे तो नळ चालू आणि दुसरीकडे कुकर! त्यांचा कुकर मोडका असणार नक्कीच, आपल्या कुकरच्या कशा स्पष्ट शिट्या ऐकू येतात... मावशींचा कुकर अखंड धुमसत असल्यासारखा नुसता फुसफुसत असतो, त्याची पूर्ण शिट्टी कधी वाजतच नाही. त्यांना बरोबर माहिती आहे गॅस नेमका कधी बंद करायचा. पण त्या विसरल्या तर? आत्ता त्या भांडी घासताहेत, बरीच दिसत होती भांडी. त्यात झालं दुर्लक्ष, राहिला गॅस मोठा... कुकर काय नुसता शांतपणे फुसफुसत राहिलाय... आतमध्ये वाफ कोंडून राहिल्येय.. जास्त.. जास्तच.. जास्तच. तिला बाहेर पडायचंय, पण कुठेच वाट नाही. धुसफूस वाढत्येय… मावशी त्यांच्या भांडी घासण्यात सगळं विसरून गेल्या आहेत. त्या दिवशी मास्तर काय म्हणाले होते, कोंडलेल्या वाफेत फार प्रचंड ताकद असते. ती राक्षसी ताकद त्या मोडक्या कुकरच्या झाकणाला झुगारून देते... थडाडकन ते झाकण उडालं, बाजूच्याच सिंक मध्ये भांडी घासत असणाऱ्या मावशींच्या तोंडावर... होरपळून टाकणारी ती गरम वाफ... अमेय नकळत अंग चोरून घेतो, त्याचं तोंड आ वासतं, मोठ्यानी ओरडायला उघडावं तसं, घशातून आवाज मात्र बिलकुल येत नाही. बाजूला खेळत बसलेल्या मेघाचं मात्र त्याच्याकडे लक्ष जातं, त्याचा हरवलेला भयाकूल चेहरा तिला जाणवतो, आजकाल तिला सुद्धा सवय झाल्येय त्याच्या ह्या दिवास्वप्नांची. हातातली खेळणी सोडून खिदळत त्याच्या जवळ येऊन, आईची नक्कल करत ती म्हणते 'काय, कुठे तंद्री लागल्येय! अभ्यास झाला का?' तो तिला बाजूला ढकलतो, एरवी चिडला असता तिच्यावर, पण आता सुखावतो की डोळ्यासमोर दिसलं, त्यातलं काही खरं नव्हतं... आता तर आई वरती त्यांच्याशी बोलत असेल. कशाला असलं काही होणारे!...

अमेयची आई समोरचं दृश्य बघून जागच्या जागीच थरारली आहे! मावशींच्या ब्लॉकचा दरवाजा उघडाच आहे, दारापाशीच मावशी, दाराकडे पाठ करून भ्रमिष्टासारख्या किंचाळण्याच्या अविर्भावात, पण निःशब्द, गोठलेल्या! ती त्यांच्या नजरेचा मागोवा घेते. दारातून दोन पावलं आत येऊन ती बघते. किचनमध्ये ज्वालामुखीचा स्फोट व्हावा तसे जागोजागी उद्रेकाचे पुरावे. सिंकच्या आसपास काचेच्या भांड्यांचे, कप-बशांचे विखुरलेले तुकडे; गॅसच्या आसपास सगळीकडे उडालेली भाताची शितं आणि वरणाच्या डाळीचे ओघळ, एक खूप उबट वास! गॅस चालू आणि कुकरचं झाकण सिंकमध्ये! काय झालं तरी काय ह्या घरात! ती जपून चालत जाऊन प्रथम गॅस बंद करते, मावशींना हात धरून सोफ्यावर बसवते, त्यांना पाणी देते. हळूहळू त्यांना वाचा फुटते. त्यांच्या थोड्या असंबद्ध बोलण्यामधून तिला बोध होतो, भांडी घासत असतांना त्यांना अमेयची भयानक किंकाळी ऐकू आली, म्हणून त्या थर्र होऊन ह्याला काय झालं बघायला बाहेर आल्या, दिसत नाही कुठे, म्हणून दार उघडून हाक मारणार तेवढ्यात किचनमध्ये हा भयानक स्फोट!
- काय सांगता! कधी झालं हे?
- आत्ता, अगदी दोन मिनिटांपूर्वी हो, तुम्ही जिन्यात असाल...
- छे, अमेय कशाला ओरडतोय? आणि मी नाही ऐकलं ते! तो घरी बसलाय, तेच तर मी तुम्हाला सांगायला येत होते.
- नाही, पण काटा येतो हो अंगावर. मी तिथेच असते तर... देवा! ती उसळती वाफ, आणि केवढं तापलेलं जड झाकण ते.. कल्पनाच करवत नाही. कशात एवढी गुंगले कोणास ठाऊक.. तो कुकरखालचा गॅस बंद करायचं पार विसरूनच गेले.
- होतं हो असं कामात गुंतलं की. चला! बरं झालं, काही का होईना, पण तुम्ही नेमक्या त्या वेळी तिथून बाहेर आलात. मोठी आपत्ती टळली. बसा तुम्ही इथेच थोडा वेळ, मी आवरते किचनमधलं.

तिच्या डोक्यातून मात्र काही केल्या जात नाहीय; अमेय खाली घरात बसलाय, तर मावशींनी त्याचं ओरडणं कुठे ऐकलं... आणि आपल्याला कसं नाही ऐकू आलं!

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सर्व प्रतिक्रियांबद्दल अनेक धन्यवाद! आपली कथा वाचकांना आवडते / समजते आहे का नाही, का नाही; हे समजून घेणं लेखकाला फार महत्वाचं असतं. पुभाप्र म्हणजे काय? Happy

आवडले लिखाण
पुभाप्र
मायबोलीवर स्वागत .