दिगंतर

Submitted by Abuva on 20 March, 2024 - 00:57
Google Gemini Generated image of a soaring bird

"उलुपी येतेय इथे", चित्रांगदा उत्साहानं म्हणाली.
"कधीऽ? तुला कसं कळलं?" अर्जुनोवाच.
"कावळ्या, डोकं वापर रे जरा! उदयननं सांगितलं, दुसरं कोण सांगणार? आज सकाळी त्याला इमेल आली आहे पुण्यातून."
"पण मग उलुपीनं का नाही मेल केली?"
"करेल रे... बरं, मी काय विचार करत होते, आपण तिघांसाठी एक अपार्टमेंट शोधायचं का?"
"तिघं?"
"हो, तिघं मिळून राहू. एक गाडी लीझ करू. पुढच्या आठवड्यात माझं ड्रायव्हिंग लायसन्स येतंय."
"अं, चालेल."
"काय जसं काही‌ उपकार केल्यासारखे - च्यालेल.. जरा हास की. आमच्या दोघींबरोबर रहायचं म्हटलं तर इतर मुलं जीव टाकतील. आणि तू, च्यालेल.."
"नाही गं, चांगलंच आहे पण इतर लोकं काय..."
चित्रांगदेनं त्याला तडक तोडलं, "खड्ड्यात गेलं पब्लिक!"
"उलुपीच्या घरचे?"
"ते तिचं ती बघेल. आमचं मागेच बोलणं झालंय. आता तू चल बघू. रेन्टल ऑफिसमधे जाऊन नाव नोंदवून येऊ."

---

आज दुपारी उलुपी यूएसला जायला निघणार होती. हे नवीन शतकाच्या सुरुवातीचे दिवस होते. अजून यंत्रणा तेवढ्या सरावल्या नव्हत्या. त्यामुळे एका यूसमधे असलेल्या कलीगच्या घरून, म्हणजे म्हैसूरहून काही पार्सल आलं होतं. ते उलुपीला तिकडे घेऊन जायचं होतं. मग आता उलुपीच्या घरी ते पोचतं करण्याचं काम माझ्यावर आलं होतं. लवकर लंच आटपून निघालो. रात्रीची फ्लाईट पकडायला ती साधारणतः तीन-चार वाजता पुण्यातून निघणार होती. माझा हा तिच्या घरी जायचा, तिच्या घरच्यांना भेटायचा पहिलाच प्रसंग होता.
गावातला वाडा‌ पाडून‌ झालेलं अपार्टमेंट. आजूबाजूला अजूनही बरेचसे जुने वाडे होते. दोन जिने चढून वर गेलो. बेल दाबली. उलुपीच्या वडिलांनी दार उघडलं. अगदी कृश देहयष्टी. हातात काठी, डोळ्यावर चष्मा. दुपारीही त्यांनी स्वेटर घातलं होतं. ओळख सांगितली. वाट बघतच होते. बसा म्हणाले. बसलो. उलुपीला मोठा भाऊ होता हे मला माहिती होतं. पण तसा विचार करता, ते वयाच्या मानाने खूपच थकलेले वाटत होते. मग उलुपी‌ बाहेर आली. तिनं सगळ्यांशी ओळख करून दिली. तिला पार्सल सुपूर्द केलं. तिची आई आली. चहा करते म्हणाली. नाही-हो झालं. पण सगळ्यांनाच हवा होता. चला, चहा घेऊ. उलुपी पॅकिंग करायला म्हणून आत गेली. इथे वातावरणात मात्र एक विचित्र ताण जाणवत होता. एकदा उलुपी तिकडे जाऊन राहून आल्यानं ते पहिलटकरिणीचं टेन्शन खरं तर असायचं कारण नव्हतं. मग का?
तेवढ्यात चहा आला, माझ्या उलुपीच्या वडिलांशी गप्पा सुरू होत्या. पुणेकरांच्या काय कुठून तरी ओळखी निघतातच! त्या गप्पांत कळलं की गेल्या वेळी उलुपी परत येण्यासाठी एवढ्या निकरानं का भांडली होती. त्यावेळी तिच्या वडिलांना बायपास करायला सांगितली होती. पण त्यांनी हट्ट धरला की करायची नाही. लक्षात घ्या, मी सांगतोय त्या काळी बायपास ही इतकी सोपी शस्त्रक्रिया नव्हती, आणि स्वस्त तर नव्हतीच नव्हती. मग त्यांचं मन वळवायला आणि ऑपरेशनसाठी राजी करायला उलुपी तातडीनं परत आली होती. खरं तर हे त्यावेळीच तिनं का सांगितलं नाही कळत नाही. आम्ही रोबोट आणि बॉस नसून माणसंच आहोत हे दाखवून द्यायला कदाचित कमी पडलो असावोत. वाईट वाटलं. चहा संपवून मी निघालो. तोवर तिची कॅब आलीच होती. तिला "शुभास्ते पंथानः" करून मी रजा घेतली.

परदेशी जाण्याचे मार्ग मोकळे होऊन काहीच वर्षं झाली होती, फार तर एखादं दशक. नशीब म्हणा वा‌ काहीही, या लाटेबरोबर मीही देशोदेशी फिरलो होतो. पण या दहापेक्षाही कमी वर्षांच्या काळात माणसांचे अनेक अनुभव गाठीला लागले होते. आजचा उलुपीचा हा असा अनुभव. जिवावर बेतणाऱ्या शस्त्रक्रियेची वार्ता लागू न देणारी ही मुलगी. या उलट आमची एक त्राटिका होती जी तिच्या आईच्या कॅटरॅक्टच्या ऑपरेशनसाठी अकांडतांडव करून भारतात परत आली होती. उलुपीनं मात्र सहानुभूतीचा मार्ग न अवलंबता नियमांवर बोट ठेवलं होतं, आणि आमची नाराजी ओढावून घेतली होती. असते एकेकाची विचारसरणी. कुठला मार्ग श्रेयस्कर याचा विचार करत करतच मी घरी गेलो.

---

उलुपीला एअरपोर्टवर पिकअप करायला उदयन आणि चित्रांगदा गेले होते. आता तुम्ही म्हणाल काय पोरकटपणा आहे? कशाला जावं लागतं पिकअपला? तर त्याचं असं आहे की आमची एक छोटी आयटी कंपनी आहे. त्यामुळे एकमेकांना आम्ही धरून असतो. त्यातूनच कुटुंब असल्याची एक भावना निर्माण होते. (मग त्यात कुटुंबात असलेल्या लाथाळ्याही आल्याच!) त्यामुळे एअरपोर्टवर आणणे-सोडणे ही परंपरा होती. तर एअरपोर्टला गाडी पार्क करून दोघेही, उदयन आणि चित्रांगदा, उलुपीची वाट पहात होते. दोघांनीही कॉफी‌ घेतली होती. उदयन घड्याळाकडे बघत होता. समोरच्या इंडिकेटरवर उलुपीची फ्लाईट लॅंड झाल्याचं दिसतं होतं. "अच्छा है, फ्लाईट टाईमपें है. मला अवंतिकेला घेऊन पीसीपी कडे जायचं आहे. वेळेत पोचलं पाहिजे!"
"का रे, काय झालं? काल तर आपण भेटलो होतो. तेंव्हा बरी होती की अवंतिका!"
"नाही, नेहेमीचा चेकअप आहे..."
"..?" चित्रांगदानं त्याच्याकडे प्रश्नार्थक पाहिलं.
उदयनला ती स्मितरेषा लपवणं कठीण गेलं. त्यानं मान फिरवली. बट नॉट बिफोर चित्रांगदा सॉ द स्माईल लाईट अप हिज फेस!
"उदयन, न्यूज आहे? न्यूज आहे! वॉव, उदयन कॉंग्रॅट्सऽऽ"
आजूबाजूची मंडळी जरा दचकली या आरडाओरडीनं. पण बहुतेक त्यांनाही अंदाज आला असावा. कारण उदयन लाजून लालबुंद झाला होता. "अरे, अवंतिका ऐसा सोच रही है रे. जाऊन चेक करतो आज! पण तू बोंबाबोंब करू नकोस हां! मला अवंतिकेनं बजावून सांगितलं होतं..."
"नाही सांगत रे, पण मला‌ तुझा फोन दे, मी अवंतिकेला फोन करते."
"माझे आई,‌ गप्प बसायला काय घेशील? ती अवंतिका खून करेल माझा."
"ठीके रे. पण कन्फर्म झालं की मलाच पहिल्यांदा सांगायचं हं"
"हो बाई, नक्की सांगीन"

हे होई तोवर उलुपीच्या फ्लाईटचे पॅसेंजर्स दिसायला लागले होते. भारतातून येणाऱ्या फ्लाईट्सच्या पॅसेंजरांची अवस्थाच अशी असते की ते पटकन ओळखता येतात! असो. तर ही उलुपी आलीच. प्रवासाचा शीण होता तिच्या चेहेऱ्यावर. पण त्या इमिग्रेशनच्या तावडीतून सुटल्याचा आणि पोहोचल्याचा आनंदही! त्यात चित्रांगदा दिसताच तिच्या चेहेऱ्यावरचा थकवा‌ कुठच्या कुठे पळाला. उदयननं पुढे होऊन तिच्या हातातली ट्रॉली घेतली. इकडे चित्रांगदा-उलुपी भरतभेट झाली. त्या दोघींच्या किलबिलाटाकडे(!) दुर्लक्ष करून उदयन पार्क केलेल्या गाडीकडे ट्रॉली ढकलत निघाला.

---

उलुपी आता चित्रांगदा आणि अर्जुन सोबतच रहाणार होती. त्यामुळे चित्रांगदेनं तिच्यासाठी जय्यत तयारी करून ठेवली होती. उदयनच्या सोबतीनं जाऊन तिनं आवश्यक ते फर्निचर भाड्याने आणि भांडीकुंडी, इतर सामान विकत आणलं होतं. एका बेडरूममध्ये त्या दोघी, आणि दुसऱ्यात अर्जुन अशी व्यवस्था होती.
अर्जुन ऑफिसमधून नुकताच पोचला होता आणि चहा करत होता!
"उलुपी, वेलकम!" करत त्यानं दार उघडलं.
उलुपी काही बोलण्याच्या आतच चित्रांगदानं फर्माईश केली, "कावळ्या, चहा टाकला आहेस ना?" अर्जुन हो म्हणाला.
"उदयन, चाय पी के जाना प्लीज"
"आत्ता नाही. मला‌ घाई आहे. आत्ता उलुपीला रिलॅक्स होऊन दे, मी आणि अवंतिका येऊ नंतर" असं म्हणत त्यानं निरोप घेतला.

आल्या आल्या उलुपीनं तिथल्या लॅंडलाईनवरून घरी इंटरनॅशनल कॉल केला. व्यवस्थित पोहोचल्याचं कळवलं. मग तिघे बसले गप्पा मारत! पुण्याच्या, टीमच्या, प्रोजेक्टच्या, घरच्या, इकडच्या तिकडच्या... बरोबर होतं तिनं आणलेला चिवडा काय, लाडू काय, आणि काय काय. आणि सीड्यांवर नवनवीन पिक्चरची गाणी वाजत होती.. ओ रे छोरी.. राधा कैसे ना जले...

---

उदयन जागा झालाच होता, तोच त्याचा मोबाईल रिंगला. इंडिया ऑफिसचा इतक्या सकाळी फोन? अनपेक्षित होता. उलुपी पोचल्याची मेल तर त्यानं काल रात्रीच पाठवली होती. पुण्याचा डायरेक्टर बोलत होता. "उदयन सॉरी यार, भल्या पहाटे फोन केला. पर बातही ऐसी है..."
"बोला ना सर, नो‌ प्रॉब्लेम"
"बॅड न्यूज है, उलुपीके फादर पास्ड अवे"
"कायऽऽ?"
"हो, तासभरच झालाय. त्यांच्या घरून मला आत्ताच मला फोन आला. मॅसिव्ह हार्ट ॲटॅक. त्यांना माहीत नव्हतं उलुपीला कसं कॉन्टॅक्ट करावं."
"ओ नो! कालच तर ती पोचली आहे इथे!"
"हो"
"मग आता काय करायचं?"
"घरच्यांची‌ इच्छा आहे तिनं परत यावं"
"..."
"येस, आय नो व्हॉट यू आर थिंकींग. बट वी हॅव टू डू व्हाट्स बेस्ट फॉर हर."
"एनी वे, मी आत्ताच तिच्या घरी जातो आणि तिला.. सांगतो. बघू काय होतंय."
"करेक्ट, आणि काय होतंय मलाही कळव."
"येस. व्हॉट अ टेरिबल सिच्युएशन..."

----

उलुपीचा आतल्या खोलीतून आवाज येत होता. ती पुण्याला घरी फोनवर बोलत होती. अर्जुन आणि उदयन अवघडून कोचावर बसले होते. फोन बंद झाला. दोन मिनिटांनी ती आणि चित्रांगदा बाहेर आल्या. उलुपीचे डोळे रडून रडून लाल झाले होते. उदयन उठला आणि त्यानं उलुपीच्या डोक्यावरून हात फिरवला. पुन्हा एकदा तिला हुंदका अनावर झाला. चित्रांगदानं तिला कोचावर बसवलं आणि शेजारीच बसली. अर्जुननंही तिला खांद्यावर थोपटले. त्याचेही डोळे भरलेले होते. उदयन खिडकीशी उभा राहून बाहेर बघू लागला.
दोन मिनिटांनी उलुपी म्हणाली, "उदयन..." पण तिचा कंठ रुद्ध झाला अन् ती थांबली.
जरा वेळ जाऊ‌ देऊन उदयन म्हणाला "उलुपी, आय अंडरस्टॅंड इफ यू वॉंट टू रिटर्न टू इंडिया राइट अवे. मी आत्ता तिकीट काढतो." यावर उलुपीनं नकारार्थी मान हलवली. पण ती अजूनही‌ बोलू शकत नव्हती.
"उलुपी, प्लीज, डोंट थिंक अबाउट एनी थिंग राईट नाऊ. खर्चेका सवाल नहीं है, प्रोजेक्टची काळजी आम्ही करतो. अर्जुन आणि चित्रांगदा सांभाळतील. बट आय थिंक युवर फॅमिली नीड्स यू"
उलुपीनं निग्रहानं नकारार्थी मान हलवली.
"उदयन, मला परत जायचं नाहीये." ती म्हणाली.
तिनं मान वर केली. तिचा रडवेल्या चेहेऱ्यावर एक निश्चय दिसत होता. "मी येतानाच वडिलांचा निरोप घेऊन आले होते. त्यांची तब्येत काय होती ते आम्हाला दिसत होतं, डॉक्टरांनीही सांगितलं होतं. ऑपरेशनचा फारसा उपयोग झाला नव्हता हे खरं होतं."
उदयन काही म्हणणार तोच तिनं त्याला थांबवलं, "आईला वाटत होतं की मी परत भारतात यावं. पण मी असं परत गेलेलं माझ्या बाबांना आवडणार नाही. तसं त्यांनी मला निक्षून सांगितलं होतं."
आता सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी होतं.
"ते म्हणाले होते, एकदा माझ्यासाठी तू परत आलीस. मला जीवनदान दिलंस. त्या क्षणापुरती तू माझी आई झालीस. पण तुझ्या या बापाला आता जगणं कठीण झालंय. आता माझ्यात जीव अडकवू नकोस. मला मुक्त कर. येशील तर कार्यभाग साध्य करून ये. तेंव्हा असलो तर भेटूच. नाही तर जिथे असेन तिथून तुला माझा आशीर्वाद कायम आहेच!"

उलुपीच्या शांतवलेल्या चेहऱ्यावर निर्धार दिसत होता. मात्र इतर सगळ्यांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

किती छान लिहिली आहे.
ह्या आधीच्या ह्याच लोकांच्या हलक्या फुलक्या रोमॅंटिक कथा होत्या.
ह्यात उलुपी भलतीच strong girl म्हणून जाणवली.

>>>>>>शुभास्ते पंथानः
किती दिवसांनी हा वाक्प्रचार ऐकला.
कथा फार आवडली. उलुपीने वडीलांकरता नाही तर आईकरता जायला हवे होते. गेलेला सुटतो, मागचे शोकाकुल होतात. आणि आईला अशा वेळी मुलगी असणे फार गरजेचे वाटू शकते.

ओह
रडवलंत एकदम.उलुपी चांगली मुलगी आहे.खरंतर जाऊन यायला हरकत नव्हती, काम चालू होण्यापूर्वी असे झाले त्यामुळे जाऊन येऊन चालू करता आले असते

एकदम ट्विस्ट टाकल्यामूळे महाभारतामधे उलुपीचा असा काही ट्वीस्ट आहे का ह्याचा विचार करायला लागला.

सर्व प्रतिसादांचे स्वागत.
खरोखरच उलुपी वेगळ्या मुशीतून घडली होती. हे पुढच्या काही कथांत जाणवेलच.

असामी, महाभारताचा रेफरन्स येईलही. पण तो टॅन्जन्शिअल असेल!

(थोडा छळवाद)
ही कथामालिका भूतकाळात घडलेल्या घटनांचं - २५ ते ३० वर्षं - चित्रिकरण म्हणून मांडली आहे. म्हणजे महाभारतासारखं - घडून गेल्या नंतर.
पण हे नामकरण (अ, चि, उ) हे आम्ही त्यांच्याशी ओळख झाल्यावर दोन-चार महिन्यांत केलंय - रामायणासारखं आधी! ते करताना भविष्यातल्या त्यांच्या जीवनयात्रेची जाण कशी असणार आम्हा पामरांना? तेव्हा नाव सोनुबाई, हाती कथलाचा वाळा - हे होणारच. रेफरन्सेस न शोधलेलेच बरे!

खरंतर तुम्ही ही कथा टाकलीत, त्याच वेळी मी ती वाचायला घेतली आणि कुठलीही प्रतिक्रिया यायच्या आधी मी ती वाचून इथे प्रतिसाद द्यायचं ठरवलं होतं. पण कथा इतकी आवडली की ती नंतरही पुन्हा वाचत बसले आणि प्रतिसाद द्यायचा रहून गेला. उलुपी ग्रेट आहे!
मस्त कथा!

कथा आवडली. उलुपीचे व्यक्तिमत्वही खूप भावले.
तिच्या पुढील कथा वाचण्यास उत्सुक आहे.

छान आहे कथा..
सुंदर फुलवली आहे.