'पुअर थिंग्ज्स' वयात येण्याची एक तिरपाकडी (परि)कथा

Submitted by अमितव on 19 March, 2024 - 10:33
पुअर थिंग्ज्स

पुअर थिंग्ज्स

व्हिक्टॉरिअन लंडन मधलं एक भलंमोठं नोकर चाकरांनी भरलेलं घर. कृष्णधवल पडद्यावर एक लहान मुलगी दिसते आहे. दिसायला अशी काही लहान वाटत नाहीये, पौंगडावस्थेतील असावी. पण तिच्या एकूण वागण्या-बोलण्यातून, बोलण्या-चालण्यातुन, शब्दसंग्रह, भाषेच्या वापरावरुन तिच वय, तिचं भावनिक वय लहानच वाटत आहे. कदाचित स्पेशल नीड असावी. तिची काळजी घ्यायला नोकर चाकरांची फौज आहे. पण कोणी तिला काही शिकवत नाही असं दिसतंय. ती जे काही वागेल, बोलेल त्यातुन जे काही पसारे होतील ते चकार शब्द न काढता आवरायचे. तिला काही इजा पोहोचत नाही ना इतकंच बघायचं, असं त्यांचं काम असावं असं दिसतंय. असं वाटण्याचं कारण म्हणजे, बहुतेक दृष्यांत असलेले तिचे वडिल किंवा वडिलकीच्या भूमिकेतंल पात्र. विक्षिप्त शास्त्रज्ञ. पण या सगळ्या परिस्थितीवर चांगलंच जरबेचं नियंत्रण असलेले दिसत आहेत.

चित्रपट चालू केल्यावर पहिल्या काही क्षणांत मला इतकं दिसलं, किंवा तसं असावं असं मी ताडलं. साधारण चित्रपट बघण्यापूर्वी अगदी संपूर्ण प्लॉट वाचला नाही तरी तो कशाबद्दल आहे, किमान ट्रेलर तरी बघुनच चित्रपट बघितला जातो. पण 'एमा स्टोनला' ऑस्कर मिळालेलं बघितलं आणि डिस्नीवर हा चित्रपट दिसल्यावर शुक्रवारी दुपारी काम अर्धवट सोडून बाकी काहीही न वाचता, कुठली मुलाखत वगैरे न बघता तो चालू केला त्यामुळे पुढे काय वाढलेलं आहे याची अजुन तरी मला अजिबातच कल्पना न्हवती.

तिचा बाप... बापच म्हणू आपण त्याला, ती त्याला गॉड (गॉडविन बॅग्स्टर - ) म्हणते...सर्जन आहे. त्याचा चेहरा बघितला की फ्रँकेस्टाईन आठवतो. चेहरा किमान सहा सात तुकड्यांत शिवलेला आहे. बाकी शरीरातील किती अवयव असे जोडलेले असतील कोण जाणे. तो शल्यचिकित्सा शिकवतो, आणि ते करतानाही शरीरातील अवयव काढून ते बदलणे अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया तो करत असावा असं एकुण परिस्थिती वरुन वाटतंय. तर तो त्याच्या विद्यार्थ्यांपैकी एकाला मॅक्स मकॅन्डेल्सला (रेमी युसुफ) त्या मुलीच्या म्हणजे 'बेला बॅक्स्टरच्या' (एमा स्टोन्स) वागण्या बोलण्यात काय फरक पडतो आहेत याच्या नोंदी ठेवायला त्याच्याच घरी बोलावतो.

पुढचा चित्रपट ही कथा आहे एका 'वयात' येणार्‍या मुलीची. वयात येताना तिला जगाची.. आपल्या दृष्टीने चांगल्या, वाईट, झगमगत्या, कचकड्या जगाची... सफर घडवुन आणतो डंकन वेडर्बन (आपला मार्क रफेलो , बोलेतो हल्क.). हा या कथेत का आणि कसा येतो आणि काय काय करतो ते चित्रपटात समजेलच. म्हटलं तर मार्कचं पात्र अगदी खलनायकी नाही तरी गडद रंगाचं आहे. आपल्याला राग यावा असं, पण तरी नाळही जुळावी असं. ते मार्क रफेलोने साकारलं आहे म्हटल्यावर तो आवडण्याशिवाय गत्यंतरच रहात नाही. काय गुणी अभिनेता आहे! आता हा चित्रपट जवळ जवळ रोम-कॉम होऊ लागला आहे. पण बेला तिच्या निरागस, ज्ञानपिपासू आणि तर्कनिष्ठ जाणिवेतून आपल्याला एक एक धक्के देत राहते, आणि हसवतही.

बेला 'वयात' येण्यापूर्वी अशा काही परिस्थितीतून आलेली आहे की तिला काही पूर्वग्रह नाहीत. नाहीत म्हणजे अजिबातच नाहीत. ती सगळ्या जगाकडे, आपण ज्याला चांगलं वाईट म्हणतो, आणि हे वाईट आपल्या नजरेत अगदी घृणास्पद वाईटही असू शकेल, तर या सगळ्या पसार्‍याकडे संपूर्ण पूर्वग्रह विरहित आणि तरीही डोळस दृष्टीने बघते. त्या बर्‍या-वाईटाचे रसरसून अनुभव घेते. अगदी आकंठ म्हणू असे! आपल्या पांढरपेशा.. आता पांढरपेशाच कशाला... शरीर विकायला लागणे, हा कुणाहीसाठी वेदनादायकच अनुभवच.. तर इथपासून सगळ्या प्रकारचे अनुभव घेते. बुद्धीनिष्ठ तार्कीक अनुभव. मानवी भावभावना समजुन घेण्याचा, लैंगिकसुख अनुभवण्याला असोशीने सामोरी जाते. त्यातुन झरझर अनेक गोष्टी शिकते. त्यात हे रोकडे शरीर आले, हे सारं जग चालवणारा नियंता म्हणजे... पैसा आला, मेंदू जसा एकेक अनुभव घेतो तसा त्याच्यात काय आणि कसा केमिकल लोचा होतो ते आलं... सगळं शिकण्याच्या लालसेतून ती शिकत रहाते. एका परिस्थितीत आपल्याला यात एक विनोद दिसू लागतो. अगदी खळखळून हसू येईल इतका विनोद, जवळपास प्रत्येक दृष्यांत विनोद. खळकळुन हसुन झालं की त्याच विनोदावर टंग-इन-चीक हसुन विचारांची चक्र चालू करणारा विनोद. हे फार फार रोचक आहे. हा विनोद डार्क आहे, ट्विस्टेड आहे, परिकथा वाटेल असा निरागसही आहे, आणि शब्दांत मांडता येणार नाही असा ही आहे. पण कुठेही डोळ्यातुन पाणी वगैरे काढणारा नाही.

पण हे ती असं सगळं का करते? आपण तर असं वागत नाही ना? मग हे सगळं एक रुपक आहे का? तर अर्थतच आहे. यात अनेकोनेक एकावर थर असलेली रुपकं आहेत. अगदी खोर्‍याने आहेत. तिरपाकडी आहेत. एमा स्टोन आपल्या देहबोलीतून, आवाजातून, चालण्यातून, लकबीतून बेलाच्या जडण घडणीत होत जाणारे सूक्ष्म बदल अगदी मार्मिकपणे दाखवते. कथा पटकथा, संवाद, अभिनय, कपडे, कॅमेरा, दृष्यात्मकता आणि दृष्यांगणित बदलत जाणारं, आपल्या जाणीवेला समजेल असं बदलत जाणारं पार्श्वसंगीत. यॉर्गोस लॅटिमोस! ते म्हणतात ना 'द होल इज ग्रेटर दॅन सम ऑफ पार्ट्स'!

यॉर्गोस लँटिमोसच्या ह्या चित्रपटातील सगळ्याच गोष्टी विचारपूर्वक निवडलेल्या, विलक्षण आहेत. सुरुवातीची बेला, त्या बॅक्स्टर मँशन मध्ये गॉड सोबत रहाणारी बेला, संपूर्णपणे कृष्णधवल आहे. तिच्या अविरत अनुभव घेण्याच्या भुकेमुळे ती रफेलो बरोबर जगाची सफर करायला निघाल्यावर त्या दृष्यांत रंग भरू लागतात. रंग भरलेले सुंदर तर आहेतच, पण सगळे पेस्टल कलर. नवी पहाट दिसते ती पण पेस्टल रंगात. नंतर पॅरीस मधले प्रसंग, त्यात तिच्या भूतकाळाच्या आधीचा तिने जगलेला पण आठवणींतून समूळ नाश झालेला भूतकाळ. यासगळ्याला कोर्‍या पाटीने सामोरे जाणे, अगदी भिडणेच. यात अनेकदा फिश लेन्स वापरली आहे. त्यातुन नक्की काय फरक दाखवायचा आहे, ती नक्की कोणाची नजर आहे हे मला बघताना तरी समजलं नाही.

एकदा पाटी कोरी असेल आणि ही कोरी पाटी निव्वळ अनुभवांनी, शिक्षणाने, वाचनाच्या अभावाने कोरी नाही तर याव्यतिरिक्त आपण माणसामाणसातील परस्पर व्यवहारातून जे अतीप्रचंड ज्ञान मिळवतो, त्याच्या जोरावर आडाखे बांधतो, काळ्या पांढर्‍या करड्या रंगात माणसे रंगवतो, आपल्याला स्वतःला इतरांसमोर सतत सादर करत रहातो, लोक काय म्हणतील याचा सदैव मन:पटलावर नेणिवेत जयघोश चालू ठेवतो या सगळ्याचा अभाव एखाद्या व्यक्तीत असेल तर आपण त्याला लाज कोळून प्यायलेला वगैरे म्हणू, किंवा स्पेशल आहे म्हणून सहानुभूती देऊ... पण हे सगळं एका अतीव निरागसतेतून आलेलं बघणं विस्मयकारी आहे.

**** याच्या पुढे एक किंवा दोन स्पॉयलर असतील. बाकी हा काही सस्पेन्स थ्रिलर वगैरे सिनेमा नाही. सिनेमात स्पॉयलर असे काही नाहीत. ते दिले अथवा न दिले तरी दृष्य परिणाम, कथावस्तू आणि त्याची मांडणी इतकी अफाट परिणामकारक आहे की स्पॉयलरचा फरक पडू नये. शिवाय हे स्पॉयलर गॅहम नॉर्टन शो मध्ये एमा आणि मार्क रफेलो आलेले असताना त्यांनी सांगितले आहेत. चित्रपटातही ते पहिल्या अर्ध्यातासात समजतं. त्यामुळे फार काही बिघडणार नाही. तरी वाचयचं नसेल तर इथे थांबा. ****

आणखी एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो. बेला हा एक गॉडचा प्रयोग आहे. फॅन्केस्टाईन प्रयोग आहे. ते सगळं शरीर बेलाचं आहे, पण मेंदू लहान बाळाचा आहे. ते कसं झालं काय झालं हे चित्रपटांत कळेलच पण ते फार महत्त्वाचं नाही. तर अशी ही 'अनुभवविरहीत प्रोसेसर आणि फॉर्मॅटेड मेमरी' जर पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीला लाभली तर.... आणि या तर पासूनच ही विलक्षण परिकथा चालू होते आणि आपल्या डोक्यात विचारांचे काहुर माजवुन संपते.

---------------------------------------------------------------------------------------
टीपा:
चित्रपटात नग्न आणि प्रणयदृष्ये खोर्‍याने आहेत.
ग्रॅहम नॉर्टन शो मध्ये एमा आणि मार्क.
एमा स्टोनचा बेस्ट अ‍ॅक्ट्रेस ऑस्कर. किती लाघवी असावं कोणी!
ब्रॅडली कूपर आणि एमा स्टोनच्या गप्पा. यात ती लहान मुलीपासून प्रौढ महिले पर्यंत असणारा ग्राफ. त्यातील सुरुवातीचे आणि शेवटचे सीन्स एका लोकेशनला असल्याने ते आधी चित्रित करणे इ. बद्दल बोलली आहे. दोघांनी अगदी दिलखुलास मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत आणि फारच छान दिसत आहेत. ब्रिलियंट गप्पा आहेत. नक्की बघा.

लेट शो वर स्टीव्हन कोलबेअर बरोबर.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*मला वर जलतरंग ऐवजी 'harp' (हार्प) लिहायचं होतं. एक तंतुवाद्य आहे. **वरच्या इंग्रजी ओळी Weeknd आणि Doja Cat यांच्या गाण्यात येतात. त्या इथं चपखल बसल्या.

काय जबरदस्त मांडणी केली आहेस तू. हे शब्दबद्ध करणे सोपे काम नाहीच.
चित्रपट पाहिला.
खूप वेगवेगळ्या लेअर वर बरंच काही समांतर सुरू आहे आणि त्यातल्या काही लेयर चा अर्थ निसटता कळतोय तर काही पातळीवचं काहीतरी सुटतंय/ निसतंटय असे काहीसे मिक्स फिलिंग आले मला.
परिकथाच आहे. आणि तिरपागडी आहेच.

पुढे spoiler असतील. सावधान. नका वाचू हवेतर.

गॉड आणि त्याच्या घरातल्या कुत्रा कोंबडा मिक्स, डुक्कर बदक / कोंबडा मिक्स असे बघून त्या गॉडचे सर्जन असणे चांगलेच ठसते, त्याच्याही बालपणी त्याच्या बाबाने त्याच्यावर केलेले प्रयोग तो सांगतो आणि त्याच्या तश्या असण्यामागे हे ही हातभार का असे जाणवले.
सब्जेक्ट ला पूर्ण कंट्रोलमध्ये ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न , त्यासाठी काही गोष्टी बेला ला सांगणे, घाबरवणे वै.
बेला हे character फारच युनिक. सगळ्या गोष्टीत लॉजिक शोधणे , कळणे, त्यात नीतिमत्ता म्हणजे काय ह्याचे कोणतेही पूर्वग्रह नसणे. त्यामुळे तिला रफेलो का चिडतोय हेच लक्षात येत नाहीये.
Btw, तिला कंट्रोल करण्याचा प्रयत्न तो ही करतोय.
आणि ती साहसी ट्रिप वर आहे. तिला अनुभव गोळा करायचे आहेत.
तिच्याकडे पॅरिस मध्ये ग्राहक म्हणून येणारे एकेक तर कसले नमुने आहेत.
वरती प्रतिसादातही बरेच चांगले विवेचन केले आहे.
गरिबी पाहिल्यावर होणारे दुःख, त्यांना मदत करण्याची तिची भावना, तुटलेल्या पायऱ्या, तिने पैसे त्या बोट वरील कर्मचाऱ्याकडे देणे ( ते काही गरजूकडे पोहचणार नाहीत हे आपल्याला कळते ), जगाकडे वाईट अनुभव किंवा आजवर जे अनुभवले त्यामुळे थोडयाशा नकारात्मकतेने बघणारा किंवा ह्यात काही बदल होउ शकत नाही असे वाटणारा तो कृष्णवर्णीय प्रवासी, वयस्कर स्त्री प्रवासी, बेलाचे सगळेच डायलॉग, polite सोसायटीचा उल्लेख. सगळं उच्च. काही काही प्रसंगात एक तीर अनेक निशाण असेही वाटले. नेमके सांगता येत नाहीये.
प्रचंड वेगळा प्रयोग.

अगदीच तुलना नव्हे पण
दुसऱ्या गोला से आया हुवा एलियन आमिर खान ह्या गोला वर असे का हे शोधत असतो त्याची क्षणभर ( आणि एकदम किंचितशी ) आठवण झाली. पण perspective आणि ट्रिटमेंट प्रचंड वेगळे आहे.

काल पाहिला! जबरदस्त. फार आवडला मला!
कथा, अभिनय, व्हिजुअल्स, बॅकग्राउंड स्कोर सगळेच विलक्षण आहे . व्हॉट अ‍ॅन एक्सपिरियन्स!
सिनेमाबद्दल आधी काहीच वाचले /पाहिले नाही हे बरे झाले.
स्पॉयलर्स :
.
.
.

जगरहाटीची, सामाजिक चौकटींची काहीच कल्पना नसलेल्या व्यक्तीच्या नजरेतून जग पहाणे ही कन्सेप्ट पूर्वी येऊन गेलेली आहे. पण हा सिनेमा एकदम वेगळ्याच लेवल ला आहे.
बेला ची युनिक कंडीशन, मुळात एका अ‍ॅडल्ट शरीरातील सर्व नॉलेज, मेमरीज पुसून त्यात लहान मुलाचा - तोही त्याच स्त्रीच्या बाळाचा मेंदू बसवणे या कन्सेप्ट मधल्या मॉरल, लॉजिकल शक्यता डोके भंजाळवतात. आपले पुढे काय होईल कथा कशी पुढे जाईल याचे आडाखे चुकतातच.
बेलाची आधीची शारिरीक गरजांपुरते सीमित जग असलेली निरागस बालिका ते भाषा, विचार, अनुभव डेवलप झाल्यानंतर तिची जगाबद्दल, व्यक्तींबद्दल बदलणारे पर्स्पेक्टीव्ज हे फार फेअरीटेल क्लिशे होऊ शकले असते पण यात ते फार विलक्षणपणे समोर येते.
स्त्री म्हणून आयुष्याच्या प्रत्येक स्टेज मधे प्राप्त करू पाहणारे, कन्ट्रोल करू पाहणारे पुरुष, त्यांच्याशी तयार झालेली वेगवेगळ्या लेवल ची नाती, नंतर स्वतः प्रगल्भ होत गेल्यानंतर प्रत्येक नात्यातून आउटग्रो होऊन, प्रत्येक गुंत्यातून सहजपणे पाय सोडवत तिने स्वतःच्या बुद्धीने, मर्जीने निवडलेले मार्ग हे एक बाई म्हणून मला अजूनच जास्त अद्भुत वाटत गेले! दिग्दर्शकाच्या क्रिएटिविटी ला दाद द्यावी असे अनेक प्रसंग, डायलॉग्ज आहेत. अमित ने मस्त नेमक्या शब्दात लिहिलंय.
बायदवे, मला शेवटी ती गॉड चा ब्रेन वाचवून आल्फी ला बसवते की काय असे वाटून गेले. Happy
गॉड चे कॅरेक्टर काही वेळ खूप डार्क वाटते, नंतर त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते. तसेच मार्क रफेलोचे. मज्जा आणली आहे त्याने.
मला पण तो डान्स चा सीन फार आवडला Happy धमाल आहे!
फेलिसिटी हा गॉड चा दुसरा बेला सारखाच एक्सपेरिमेन्ट पण ती बेला होऊ शकत नाही! तिच्यामुळे बेलाचे स्वत्न्त्र व्यक्तिमत्त्व अजून हायलाइट होते असे मला वाटले.

सामो, तुम्ही बेला मध्ये अडकला असाल. मला एकदा बेला त्या क्षणात, अ‍ॅनलिटिकल, आणि पूर्वग्रहविना बघते आहे समजल्यावर मोरॅलिटीचे बंधन तुटले. नाही आवडला हे मोकळेपणे सांगितल्याबद्दल धन्यवाद.
मानव, बघा मिळाला की.
सोनाली, भरत, माझेमन. अन्जू, हपा, स्वाती२, अवल, ऋतुराज, वावे धन्यवाद.
सुनिधी, हो. नग्नता इतकी जास्त आणि डायरेक्ट असुनही मेंदूला विचाराच्या फेर्‍यात अडकवून ठेवणे सोपे नाही. कथा, कॅमेरा, अभिनय आणि एकुणच दिग्दर्शन! कमाल आहे.

अस्मिता, डंकन म्हातारा दिसला आहेच. पण त्याला तसाच दाखवला आहे. डंकनला ती पूर्वग्रहविरहित आणि स्वतंत्र असल्याने खरंच आवडते का? त्याला वरच्या कारणांनी आवडते ते नीटसं आलय का? माझं सुटलं असेल.
त्याला फक्त सेक्श्युअल प्लेझर आणि पार्टीतली शोभेची बाहुली व्यतिरिक्त काही डीपर कारणाने आवडली होती असं मला वाटलं नाही. ती पुस्तकं वाचू लागते. तिच्या जगाबद्दलच्या, परिस्थितीबद्दलच्या जाणिवा प्रगल्भ बनू लागल्या हे त्याला अजिबातच झेपत नाही. आता सेक्शुअली पण आपल्या कह्यातुन सुटली हे जेव्हा त्याला ती तुझ्यापेक्षा जास्त आनंद दुसर्‍याने दिला आणि वर पैसे दिले म्हणून सांगते तेव्हा खरंतर गंभिर होऊन बघायची, परिस्थितीबद्दल खिन्न होऊन ओठावर ओठ दाबुन सुस्कारा सोडून हसायची परिस्थिती आहे. पण आपल्याला खळखळून अगदी मनापासून हसू फुटतं. मला तर वाईट वगैरे जराही वाटलं नाही. नॉर्मली वाटलं असतं. पण इथे त्या जगात असूनही पार वेगळं झाल्याचं फील होतं. तो वेश्यागृहाबाहेरचा बर्फातला सीन फार भारी आहे.

नक्कीच फक्त संगीतासाठी परत बघायचा आहे. तू म्हणते आहेस तसं ती प्रगल्भ होताना संगीत, पीसेस बदलतात, पण पहिल्यांदा बघताना तिकडे फार लक्ष द्यायला वेळच न्हवता. आउटग्रो झाली आणि सेक्स कॉमेडी बद्दल +१. ती एल्फीकडे जाते त्यात ती दरी कोसळणार हे आधीच समजलेलं तरी ते नक्की काय आहे, ती कल्पना आवडली मला.

एकच व्यक्ती (शरीर) पण वाढीच्या वयातली भोवतालची परिस्थिती बदलली (मेंदू वेगळा असल्याने) तर किती भिन्न बनू शकते. आणि शारीरीक वाढ आणि बौद्धिक वाढ, शारीरिक वाढ झाल्यावर झालेली बौद्धिक वाढ ... हा एक लेअर सांगायचा म्हणून तो शेवटचा पॅच टाकलाय असं वाटलं. जे अफलातून आहे. फक्त त्याला इकडे प्राणीसंग्रहालयात आणून कर्मफळाचं रजिस्टर बॅलन्स करायची इतकी काही गरज न्हवती. अर्थात ते ही ठीकच आहे. क्रूर भागत विनोद वाटणे, पण ते ही काही विचित्र प्लेझरमुळे नाही तर निरागसतेतून, त्या जाणिवेतून हे फारच काही तरी वेगळं न सांगण्यासारखं होतं.

सगळे छान लिहिताय, स्पॉयलरसाठी धन्यवाद. मला आवडतात वाचायला आणि पिक्चर काही बघणार नसल्याने अजूनच आवडतात. अगदी डिटेल कोणी स्टोरी लिहिली तरी आवडेल वाचायला. वेगवेगळ्या कमेंट्समधून chara सर्व छान उलगडली जातायेत, विशेषतः नायिका.

बघायला थोडा जड जाईल बहुतेक. सामो यांनी जो आक्षेप घेतलाय तेच वाटेल मला, म्हणून बघायला जड जाईल असं वाटतंय.

झकास, अगदीच. तुटलेल्या पायर्‍या आणि जगातलं दु:ख बघुन वर अनेकांनी बुद्ध आठवला लिहिलयं त्याला ही +१. लेख लिहिताना बरंच काही लिहायचं होतं पण स्पॉयलर येऊ लागल्याने ते सगळं काढून टाकलं. आता तुम्ही सगळे प्रतिसाद देत आहात त्यात आठवेल तसं लिहितो.

मै,
तिला लहान बाळाचा मेंदू आहे जेव्हा समजतं तेव्हा माझ्या डोक्यात आधी आता हार्मोनल लोच्या, जे हार्मोन मेंदू नियंत्रित करतो आणि जे इतर अवयव करतात इ. इ. अगदी लॉजिकल गोष्टी येऊ लागल्या. त्या न येता जे दिसतं आहे त्यातली मजा घ्यायला अंमळ जरा वेळच गेला. बराच वेळ तू म्हणते आहेस तसे लॉजिकल आडाखे मनात तयार होत होते आणि ते तुटत होते.
या सगळ्या गुंत्यात त्या वेश्यागृहात त्या ब्लॅक मुली बरोबरचे (सॉरी नाव विसरलो) आणि त्या ओनर बरोबरचे प्रसंग सोडले तर ती इतर स्त्रीयांशी जे काही जुजबी बोलते त्यात कायम पुरुषी जग, पुरुष याचेच संदर्भ असतात. ती बाकी कुठल्याच स्त्री शी का जोडली जात नाही? मार्था बरोबरही तू पुरुषांबरोबर झोपत नाहीस हा एक घर केलेला डायलॉग आहे. पण त्यात ही पलंगावर नसलेले 'पुरुषच' आहेत. अजुनही काही प्रसंग होते, पण मला आता आठवडाभराने नाही आठवत. ते मनात टिकले नाही.

गॉडच्या मेंदू बद्दल तर अगदी अगदी. मला तो गॉडचा मेंदू असणार याची खात्रीच होती. त्याने आणखी एक आयाम मिळाला असता का?
पहिल्या केस मध्ये एक नवा कोरा मेंदू वाढलेल्या शरीरात. दुसर्‍याकेस मध्ये एक जिनियस, मॅड, कन्ट्रोलिंग हायपर मेंदू.... अल्फीच्या क्रुकेड मेंदूला रिप्लेस.... .पण नको. आता हे लिहिल्यावर तसं नाही केलं हेच बरं वाटतंय आणी जे दाखवलं आहे तेच जास्त योग्य आहे असं वाटतंय. तसंच गॉडचा मेंदू वाचवणे हे आपलं प्रेम, विरह इ.इ. भावनांचा अविष्कार आहे. त्या भावना अजुन तिच्यात नसाव्यातच.

ती बाकी कुठल्याच स्त्री शी का जोडली जात नाही? >>> हो त्या ब्लॅक मुलीशी बाँडिंग होतं आणि मार्थाशी सुद्धा होतंच, पण तिच्या केअरटेकर सोबतही काही बाँडिंग नाही दाखवलेलं.
प्रेम, विरह इ.इ. भावनांचा अविष्कार आहे. त्या भावना अजुन तिच्यात नसाव्यातच. >> सुरुवातीला भावना वगैरे नसतील पण ह्यूमन मेन्दू ला प्रेम, सेपरेशन हे समजते की. शिकवावे लागत नाही. त्यामुळे मला वाटते गॉड बद्दल तिच्या मनात भावना असतातच. आणि तसेही जग बघून आल्यावर तिच्यात तेवढी मॅचुरिटी आणि "माणूसकी" आलेली असावीच, त्याला गुडबाय करताना वगैरे ती अटॅचमेन्ट दिसते.
पण येस आधी मला वाटले ती रोबॉट सारखी झाली आहे की काय, विदाउट एनी एम्पथी. सुरुवातीला बेडूक फाटकन मारते, प्रेतावर वार करते वगैरे. नंतर तिला जेलसी वगैरे भावना लक्षात येत नाहीत. तेव्हाही. पण मग लक्षात आले की एकनिष्ठ असणे हे कंडिशनिंग आहे ते ती शिकलेलीच नाही. नंतर त्या मरणार्‍या गरीबांना बघून तिला दु:ख होते तेव्हा तिला एम्पथी ही भावना आहे हे दिसते.

आपल्याला खळखळून अगदी मनापासून हसू फुटतं. मला तर वाईट वगैरे जराही वाटलं नाही.>>> +१

डंकनला इतर स्त्रियांपेक्षा वेगळी वाटली असं त्याने बोलून दाखवलं( गच्चीवर(?)). त्यातून तिचं हे असं लहरी आणि विक्षिप्त असणं बघून वाटलं असावं असं मला वाटलं. Hulu हा सिनेमा वुमन्स हिस्ट्री मंथ म्हणून बघायला सुचवत होतं पण प्रामाणिकपणे सांगायचं तर मला यात वुमन एम्पावरमेंट वगैरे आढळलं नाही हे एक सायन्स फिक्शन+ टन ऑफ सेक्शुअल एक्सपेरिमेंट + फाईन्डिग यूवर सेल्फ (who is coincidentally a woman) वाटलं. ते विनोदही सगळे त्यातूनच होत गेलेले वाटले आणि तेव्हाचे अपेक्षित नॉर्मही त्यामुळेच एकदम अंगावर आले नाहीत. मला तिचा फियान्से शेवटी तुझं शरीर आहे आणि तुझ्याशी शय्यासोबत करण्यासाठी तीस फ्रँक फार कमी आहेत असं म्हणतो, ते चक्क गोग्गोड आणि रोमँटिक वाटलं. मलाच सुरवातीचा अर्धा पुन्हा बघावा लागणार आहे. एवढा सेक्स पुन्हा बघायचा कंटाळा / शिसारी आली आहे. कामसूत्रा ऑफ द अनडेड Lol

हा सिनेमा आवडलेल्यांना सलमा हायेकचा 'फ्रिडा' बघा असं सुचवेन. तो फारच जिवंत आणि जंगली होता. फ्रिडा खरोखरच होती आणि ती Bohemian spirit असलेलीच वाटली.

अंजूताई,
ती हीच बेला असते फक्त मेंदू वेगळा असतो. नंतरचा मेंदू तिच्याच पोटातल्या बाळाचा असतो.

बरोबर.. गच्चीवर काहीतरी बोललेला. आता लक्षात नाही.

वूमन फक्त योगायोगाने होती... हिस्ट्री मंथ जरा बळच झालं.
बाकी तू वूमन आहे म्हटल्यावर, त्या ऐवजी पुरुष असता तर? विचार डोक्यात आला. तर असा सिनेमा झाला असता का? पूर्वग्रह विरहित पुरुषावर सिनेमा करताना इतकी सेक्ष्यालिटी फ्रंट आणि सेंटरला असती का? का मग समलिंगी दाखवून सोपा मार्ग निवडला असता?
इंट्रीगिंग!

अस्मिता, मिन्स ती कोण असते, काय करत असते. प्रोफेशन काय असतं, कॉलेजगोईंग वगैरे असते का असं विचारायचं होतं.

एका अतिश्रीमंत अरिस्तोक्रॅटची बायको असते. दुसऱ्याच्या त्रासात, क्लेशात आनंद मानणारी, पाताळयंत्री. मूल होणार आहे समजल्यावर मूल नको असल्याने मुलाचा आणि तिचा जीव देते/ घेते.

त्या ऐवजी पुरुष असता तर? विचार डोक्यात आला. >>> Happy 'पोलाइट सोसायटी'ची बंधनं बायकांवर असतात तशी (तेवढी) पुरुषांना नसतात मुळात. त्यामुळे एखाद्या पुरुषाने ती बंधने न समजणे/ न मानणे हे तेवढे इफेक्टिव झाले असते का असे वाटले.
बायदवे सेक्शुअ‍ॅलिटि हाच मुख्य फोकस आहे असे मला नाही वाटले. ती भूक सुरुवातीला तिला सर्वात महत्त्वाची वाटते, पण हळू हळू त्याकडेही बघण्याचा अँगल बदलतो की. नंतर सेक्स दाखवलेला असला तरी प्रॉस्टिट्यूशन करताना ती त्याकडे एक पैसा मिळवण्याचे साधन म्हणून बघते. बोटीवर त्या मार्थासोबतचा कोण तो त्या ब्लॅक माणसासोबत तसे काही करताना दखवलेले नाही. त्याच्याशी फक्त वैचारीक चर्चा Happy

सगळं शिकण्याच्या लालसेतून ती शिकत रहाते. एका परिस्थितीत आपल्याला यात एक विनोद दिसू लागतो. अगदी खळखळून हसू येईल इतका विनोद, जवळपास प्रत्येक दृष्यांत विनोद. खळकळुन हसुन झालं की त्याच विनोदावर टंग-इन-चीक हसुन विचारांची चक्र चालू करणारा विनोद. हे फार फार रोचक आहे. हा विनोद डार्क आहे, ट्विस्टेड आहे, परिकथा वाटेल असा निरागसही आहे, आणि शब्दांत मांडता येणार नाही असा ही आहे. पण कुठेही डोळ्यातुन पाणी वगैरे काढणारा नाही. >>> हे अवघड वाटतं हाताळणी म्हणून. इंटरेस्टिंग आहे.

चित्रपट पाहीन कि नाही माहिती नाही. परीक्षण मात्र आवडलं.
रंगसंगती मधले फरक हे जास्त आवडलं. रसास्वाद कसा घ्यावा याचं उदाहरण आहे.

फिश आय लेन्स बद्दलचं निरीक्षण इंटरेस्टींग आहे. चित्रपट पाहिलेला नाही. पण वाईड एंगल किंवा शार्प कर्व्हज दाखवण्यासाठी या लेन्स वापरल्या जातात. रंगही उठावदार होतात. क्षितीज अधिक गहीरे दाखवता येते. याच बरोबर डिस्टॉर्शन ( विकरण) साठी फिश लेन्स वापरल्या जातात. भूतकाळातल्या घटनांचे डिस्टॉर्शन असे काहीसे प्रतिकात्मक म्हणायचे असेल तर माहिती नाही. अशा पद्धतीने कुणी वापरले आहे का ?

वेश्यागृहाबाहेरचा बर्फातला सीन फार भारी आहे >> अमितव, अगदी, तो सीन मला सर्वात जास्त आवडला.

आता आठवलं की ती दु:खी होते (हॅरी बरोबरचा) तो सीन मात्र माझ्या मते डायरेक्टरला परिणामकारक करायला जमला नाही, पण ठीक आहे. तो तीही भावना दाखवण्यापुरताच होता. आणि डंकन का प्रेमात पडतो ते ही दाखवायला नीट जमले नाही. अचानकच तो प्रेमात आल्यासारखा वागु लागतो. (आपण समजुन घ्यायचे की तिच्या सहवासात, आपल्याला न दाखवलेल्या सीनमधल्या तिच्या अतीस्पष्ट लखलखीत उघड्या व्यक्तिमत्वावर भाळला असावा). तेही परिणामकारक झाले असते तर बेश्ट झाले असते, पण चलेगा. (अस्मिताने लिहिले तसे पुन्हा हुकलेल्या खाचाखोचा पहायला आवडला असता परंतु ते सीन पहायचे , पळवायचे जिवावर आलंय त्यामुळे सध्या तरी नाही)

काल (एकदाचा) पूर्ण केला. (मुलांचा डोळा चुकवायचा म्हणताना माझाच डोळा लागायची वेळ व्हायची, त्यामुळे बघायचं राहून जात होतं Proud )
एकदा पाहून (तोही तुकड्यांत) पूर्णपणे कवेत येणारा हा चित्रपट नाही हे नक्की. मला पुन्हा बघावा लागेल. तरीही जे विचार, प्रश्न, युरेका मोमेन्ट्स येत गेल्या त्या तशाच्या तशा इथे लिहित आहे.

******** इथून पुढे स्पॉइलर्सच स्पॉइलर्स असतील ********

१. बेलाने प्रेग्नन्ट असताना आत्महत्येचा प्रयत्न करणं आणि तेव्हाच गॉडने तिच्यात हे 'ट्रान्स्फॉर्मेशन' घडवून आणललेलं दाखवणं हा मास्टरस्ट्रोक वाटला मला, कारण फक्त स्त्रीकडेच असणारी पुनरुत्पादनाची क्षमता आणि मानवी मूल इतर जीवसृष्टीच्या मानाने कितीतरी अधिक काळ परावलंबी असणं हे जवळपास सगळ्या सोशल कंडिशनिंगच्या मुळाशी असतं.

२. जो 'गॉड' म्हणायचा, तोही इतर कोणाच्यातरी इमॅजिनेशन आणि एक्स्परिमेन्टेशनचं फलित आहे. आणि तो त्याचे स्वतःचे प्रयोग करतोच आहे. म्हणजे माणूस हे 'देवा'चं सृजन आणि देव हे माणसाचं?

३. 'गॉड'च्या 'प्रयोगशाळेत' आपल्याच मुलीचा मेंदू डोक्यात बसवलेल्या बेलाव्यतिरिक्त बदकाचं शिर बसवलेलं डुक्कर किंवा तत्सम 'प्रयोग' आहेत. त्या प्रयोगांचा उद्देश काय आहे? त्यातून कुठल्या एका 'परफेक्शन'कडे वाटचाल होताना दिसते आहे का? की हा सगळा विरंगुळ्याचा खेळच सुरू आहे?
हे जग जसं आहे तसंच का आहे? माणसाला दोन डोकी किंवा तीन स्तन का नाहीत? माणसाने निर्माण केलेल्या देवदेवतांना प्राण्यांची डोकी आणि आठदहा हात का असतात?

४. बेलाचं 'इव्होल्यूशन' पाहणं फार इन्टरेस्टिंग आहे आणि मॅस्लोच्या हायरार्की ऑफ नीड्सशी समांतर वाटतं. केवळ शारीरिक प्लेझर्स कळण्या/मिळवण्यापासून सुरू झालेला बेलाचा प्रवास अ‍ॅक्सेप्टन्स आणि सेल्फ अ‍ॅक्च्युअलाय्झेशनपाशी पोचतो. मग ती 'गॉड'ला त्याच्या प्रयोगांबद्दल - आणि प्रयोगशीलतेबद्दल - क्षमा करू शकते आणि तिचं स्वतःचं इप्सित निश्चित करू शकते.
आता या वळणाशी पोचेतो गॉड तिचा निर्माता असला तरी नियंता राहिलेला नाही.

५. वर तो 'आहे रे' आणि 'नाही रे'मधला जिना तुटलेला असण्याचं इन्टर्प्रिटेशन आलेलं आहेच. तिथे तिची सहसंवेदना जागी होते हेही खरंच, पण त्यानंतरची आपल्या मर्यादांची तिला होणारी जाणीव आणखी हृद्य आहे. बेस्ट इन्टेन्शन्स आणि आपल्याजवळचं होतं नव्हतं ते सगळं पणाला लावण्याची तयारी दाखवली तरी जग बदलणं सोपं नाही याचा स्वीकार. आणि एकदा तो झाल्यावर 'मग मी माझ्या परीने काय करू शकते' याचा शोध हा तिला त्या सेल्फ अ‍ॅक्च्युअलायझेशनकडे नेणारा रस्ता आहे.

६. ती अमितने उल्लेख केलेली फिशआय लेन्स आणि अनसेटलिंग पार्श्वसंगीत हे नेमकं त्यासाठीच वापरलं आहे असं वाटलं - तिचा येट अनसेटल्ड माइंडसेट दाखवायला. तिचा आत्मशोध सुरू आहे आणि जोवर तिला घटितं 'प्रोसेस' करून त्यांचा अर्थ आणि पॅटर्न मेंदूत 'सेटल' करता येत नाही, तोवर ती घटितं त्या फिशआय लेन्समधून दिसतात - अशी माझी एक थिअरी आहे, पण ती कन्फर्म करायला मला सिनेमा पुन्हा पहावा लागेल.

७. प्रत्येक नवीन 'चॅप्टर'च्या सुरुवातीला ती बहुधा सेरेब्रल फ्लुइडमध्ये मेंदूच्या कुठल्यातरी स्लाइसवर तरंगताना दिसते असं वाटलं - बहुधा त्या अपकमिंग चॅप्टरमध्ये नवनवीन न्यूरोसेन्टर्स जागृत होत आहेत असं दर्शवायला - ही आणखी एक थिअरी, जी कन्फर्म करायला मला सिनेमा पुन्हा पहावा लागेल.

८. पूर्वाश्रमीच्या नवर्‍याकडे जावंसं वाटणं हा त्या मॅस्लोच्या हायरार्कीमधला 'सेन्स ऑफ बिलॉन्गिंग' शोधायचा प्रयत्न असेल का?

९. बेलाचं कुठलंही सोशल कंडिशनिंग झालेलं नाही, पण इन्स्टिंक्ट्सचं काय? म्हणजे तिला मोनॉगमी कळणार नाही, पण पझेसिव्हनेस कळेल ना? तो तर बाळं आणि पेट्सही दाखवतात. मग तो बेलात अजिबातच कसा नाही? सेक्शुअल प्लेझर समजतं, पण रोमान्स कुठल्याच वळणावर उमलत नाही तो कसा?

१०. एमा स्टोनने बेलाचं उत्क्रांत होत जाणं फार सुंदर पोर्ट्रे केलं आहे - वेल डिजर्व्ड ऑस्कर!
तिची भाषा कशी बदलत जाते ते ऐकायला मला फार्फार आवडलं - त्याचे मार्क्स स्क्रीनप्लेला!
म्हणजे आपल्या मुलांची भाषा 'डा - डा, मा - मा' पासून डेव्हलप होत गेलेली आपण पाहिलेली असते, पण ती प्रोसेस कित्येक वर्षं सुरू असते. इथे ते स्टिल कॅमेराने कॅप्चर केलेली सीडलिंगपासून झाड वाढतानाची फिल्म दोन मिनिटांत बघायला कशी अद्भुत वाटते, तसं वाटतं!

११. सर्वात महत्त्वाचा प्रश्न : Who are the poor things in Poor Things? Happy
ते 'बिच्चारे' असं (अनेकवचनी) कोणाला उद्देशून आहे नाव?

तुम्हाला कोणाला यातल्या प्रश्नांची उत्तरं सापडली असतील तर ऐकायला आवडतील. Happy
(आणि उत्तरं माहीत असून तुम्ही जर ती दिली नाहीत तर काय होतं हे तुम्हाला माहीत आहेच! Proud )

Lol
सॉरी सॉरी - गिल्टी अ‍ॅज चार्ज्ड! वाईट सवय आहे खरी. बरं, आता नाही करत आणखी एडिट. Happy

२. माणूस हे 'देवा'चं सृजन आणि देव हे माणसाचं?
दोन्ही संकल्पना आहेत पण त्या सुखाने coexist होत आहेत.

३. त्या मानवाआधी प्राण्यांवर केलेल्या प्रयोगाच्या पायऱ्या आहेत. गिनिपिग्ज.

माणसाला दोन डोकी किंवा तीन स्तन का नाहीत? >>>>
तसं असतं तर आपण माणसाला एक डोकं व दोन स्तन का नाहीत म्हटलं असतं. निदान एक तरी आहे याचे समाधान मानावे.

माणसाने निर्माण केलेल्या देवदेवतांना प्राण्यांची डोकी आणि आठदहा हात का असतात?
>>>> आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळा देह आणि मन असणाऱ्यांबद्दल सुद्धा आपल्याला सहवेदना वाटावी म्हणून हा समजेल असा सर्वात सोपा मार्ग आहे. करुणेला रूपकांचा आधार दुसरं काय. आपण काही येशू ख्रिस्त नाही आतून करुणेचा पाझरबिझर फुटायला म्हणून ही बाह्य ठिगळं.

पूर्वाश्रमीच्या नवर्‍याकडे जावंसं वाटणं हा त्या मॅस्लोच्या हायरार्कीमधला 'सेन्स ऑफ बिलॉन्गिंग' शोधायचा प्रयत्न असेल का?
>>>> 'सेन्स ऑफ सेल्फ' किंवा आपली आत्मिक पाळंमुळं शोधणं ही उत्सुकता. त्याने रोजच्या अनाकलनीय प्रश्नांची उत्तरं मिळतील ही आशा.

९. इन्स्टिंक्ट आहेत की, कानाखाली देते की रफेलोच्या. पण ते अनाहूतपणे येतात. तिला किंवा त्याला एकमेकांबद्दल प्रेमच नाही, फक्त आकर्षण आहे मग रोमॅन्स कसा निर्माण होणार. सुपरफिशियल नातं होतं, ऑब्सेसिव्ह फक्त. He couldn't catch up with her (intellectually) so expected her to trim herself down to fit the norms and his own expectations.

१०. दैवाने किंवा परिस्थितीने ज्यांच्यावर अन्याय केला आहे, किंवा ज्यांचा अकाली मृत्यू झाला आहे त्यांना नवजीवन दिले जातेय म्हणून 'पुअर थिंग्ज'.

मी फक्त डोक्याची शंभर शकलं होऊ नयेत म्हणून लिहिले, विक्रमवेताळ वाचले आहे. हे सगळे 'विक्रमाचे' अंदाजच आहेत आणि तुम्ही तरीही उडून जाणार ह्याची कल्पना आहे.

हाहा धन्यवाद. (अजून उडाले नाही Proud )

>>> त्या मानवाआधी प्राण्यांवर केलेल्या प्रयोगाच्या पायऱ्या आहेत. गिनिपिग्ज.
but that's the point, right? माणूस हा 'बेस्ट येट' प्रयोग आहे हे कशावरून? Happy

२. हा फार इन्टरेस्टिंग टेक आहे.
८. पूर्वाश्रमीच्या नवर्‍याकडे जावंसं वाटणं >> आधीच्या लाइफ बद्दल फक्त कुतुहल (आणि अजून एक अ‍ॅडव्हेन्चर)
९. - डंकन मधे पोटेन्शियल फेअरीटेल प्रेमी होण्याची शक्यता होती पण ती वेगाने मॅचुअर होते आहे, वाचन , अनुभवाने समृद्ध होते आहे, आणि त्यामुळेच बहुधा प्रत्येकच नात्यातून झपाट्याने आउटग्रो होते, आधी आवडणार्‍या गोष्टी तिला दररोज खुज्या वाटतायत. त्याच कारणामुळे रोमान्स पण "घडला नसावा" .(असे मी अनुमान काढले!)
१०. याला +१११
११ हा प्रश्न मलाही पडला .

माणूस हा 'बेस्ट येट' प्रयोग आहे हे कशावरून?

त्यांनी तसं काहीच म्हटलं नाही, 'बेस्ट' नाही 'वर्स्ट' नाही किंवा 'धिस इज ईट' पण नाही. More like 'Keep doing what you are doing'.

रोमान्स फक्त राफेलोच्याच संदर्भात नव्हे, कोणासाठीच - किंवा कोणाव्यतिरिक्तही! तो गुलाबी चष्माच मुळात चढत नाही तिच्या डोळ्यांवर.
आणि हे फक्त प्रेमाच्या संदर्भातही नाही, एकंदर स्वप्नाळूपणा अशा अर्थीही.

हं .. म्हणजे स्वप्नाळूपणा हा कंडिशनिंग मुळे येतो असे म्हणावे का?!! Happy फक्त त्या मोमेन्ट मधे जगणे, एखादी गोष्ट हवी वाटली तर ती प्राप्त करण्याचे त्या त्या वेळी शक्य ते प्रयत्न करणे, मिळाल्यास खूष होणे, बस्स.

>>> म्हणजे स्वप्नाळूपणा हा कंडिशनिंग मुळे येतो असे म्हणावे का?
असं त्यांना म्हणायचं आहे की काय असा प्रश्न मला पडला.

>>> More like 'Keep doing what you are doing'.
हो, एग्झॅक्टली! पण to what end?

Pages