कोडे

Submitted by काव्यधुंद on 29 February, 2024 - 00:38

तू कोडे मनास पडलेले, तू भास अंतरी दडलेले
तू येशील म्हणता म्हणताना, मृगजळ हवेत विरलेले

तू काल सोडल्या वाटा, तू पायी रूतता काटा
गालावरती नकळत माझ्या, अश्रू दोन ओघळलेले

तू ज्योत निरांजन वाती, तू एकांतातील साथी
असून माझ्या सभोवती, माझ्यापासून दुरावलेले

तू गंध कोवळा पानी, तू कुण्या गावची राणी
स्वप्नसुंदरी राज्य मनाचे, तुझ्याच हाती गेलेले

तू कानी येता शीळ, जणू क्षणात सरला काळ
मनी आठवून साठवताना, निसटून हरवून गेलेले

तू चराचरातून विहरत, भिनलेले गीत अनावर
पूर्णत्वाला अपूर्णेतेची किनार देऊन उलगडलेले

तू पुन्हा नव्याने समजून, गेलीस जराशी हासून
ते हास्य कोरले हृदयावरती फिके कधी ना पडलेले

तू आज जीवाची सोबत, तू उद्या उषेचे स्वागत
मी घडलो तेव्हा घडलेले, उन्मळलो तेव्हा तुटलेले

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults