प्राक्तन

Submitted by कविन on 27 February, 2024 - 03:36

उष्टेमाष्टे खरकटलेले
असे काही मी खातच नाही
स्वप्नं पहावे असे काही तर
पोट रिकामे; झोपच नाही

उजाड माळावरी वस्तीला
क्षण सुखाचा फिरकत नाही
भुयारातल्या अंधाराची
ओढ अताशा थांबत नाही

इतके सारे वार सोसूनी
उमेद कशी रे संपत नाही?
वेताळाचा प्रश्न 'उगाचच'
तरी उत्तरे विक्रम 'काही'

गतकाळाचे व्रण पुसटसे
वस्तीवर ना दुसरे काही
सूर्य उगवतो नेमाने, तो
वसा घेतला मोडत नाही

गोठवणार्‍या थंडीसारखे
दु:ख जाहले, हरकत नाही
पाणी बन तू, पाण्यामधले
जीवन गोठून थांबत नाही

असेच असते वेताळा हे,
चक्र अखंडीत चालत राही
जसे 'तुझे नि माझे प्राक्तन'
याला दुसरे उत्तर नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोठवणार्‍या थंडीसारखे
दु:ख जाहले, हरकत नाही
पाणी बन तू, पाण्यामधले
जीवन गोठून थांबत नाही

वा!