गझल गायकीतील मखमल हरपली

Submitted by बेफ़िकीर on 26 February, 2024 - 07:40

त्याच्याकडे गुलाम अलीसारखी अस्सल गझल गायकी नव्हती. जगजीत सारखा दर्दभरा आवाज नव्हता. त्याच्याकडे वेगळ्याच गोष्टी होत्या ज्या गझल रसिकांसाठी नाविन्यपूर्ण व स्वागतार्ह होत्या. मखमली आवाज, तुलनेने सहज समजतील अश्या उर्दू गझलांची निवड, संस्मरणीय चाली, वैविध्यपूर्ण संगीत आणि गझल गायनावर स्वतः हावी न होण्याचा दुर्मीळ गुण!

पंकज उधास गेला आणि गझल गायकीतील मखमल हरपली. 'शराब' चे काहीसे उदात्तीकरण हा ठपका त्याच्यावर ठेवला गेला खरा, पण त्यातही त्याने अफाट रंग भरले. गझल रचणाऱ्याचे श्रेय मोठे हे मान्य करूनही असे म्हणावे लागेल की पंकज उधासने गझल गायकी एका वेगळ्या अर्थाने एका वेगळ्या उंचीवर नेली. त्याने गझल 'आम' केली, अधिक श्रवणीय केली, मधाळ केली आणि जेव्हा गझल गायकी आता संपते की काय असे वाटू लागले तेव्हाच नेमकी ती स्वतःच्या शैलीत जगवून दाखवली.

पंकज उधासबद्दल जाहीररीत्या लिहिण्यासारखे माझ्याजवळ इतकेच! मात्र व्यक्तिशः मला काळजाचा एक तुकडा तुटल्याची जाणीव होत आहे. किशोर गेला तेव्हा असेच झाले होते. फार लहानपणापासून पंकज उधासच्या गझल गायनाने गारुड केले होते. सुरुवातीला चाली व आवाज फक्त आवडायचे. मग अर्थ कळू लागला. मग तख्तल्लूस प्रकार समजला. तेव्हापासूनच माझ्यावर गझलेचा प्रचंड प्रभाव आहे. त्याने गायलेल्या किमान साथ सत्तर गझला तर तोंडपाठच आहेत तेव्हापासून! बरेचसे / बहुतेक मराठी गझलकार भटसाहेबांची पुस्तके वाचून गझल लेखनाकडे वळतात. मी पंकज उधासने गायलेल्या गझला ऐकून व डॉ सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे पुस्तक वाचून गझल लिहू लागलो.

आजची संध्याकाळ एक फार मोठे दुःख घेऊन आली आहे. मनाच्या अगदी जवळचे कोणीतरी गेल्याचे दुःख आहे हे!

हे शब्द उच्चारावेसे वाटत नाहीत, पण...

भावपूर्ण श्रद्धांजली!

=====

-'बेफिकीर'!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल असा काही प्रकार असतो हे माहित झाले पंकज उधास मुळे. अगदी बालवयात 'चिठ्ठी आयी है' ऐकले आणि भरल्या घरात राहत असताना दुःख दाटून आले होते. माझ्या मावशीकडे पंकज उधासची कॅसेट होती. त्यामुळे 'चांदी जैसा रंग' वगैरे ऐकली जायचीच. काही वर्षानंतर दिग्गजांची गझल ऐकली आणि पंकज उधास या नावाला असलेली शाईन थोडी कमी झाली. काही काळाने मेलोड्रॅमॅटिक वाटले तरी परदेशात असताना 'चिठ्ठी' ऐकायचे कधी धाडस झाले नाही.
नंतर एकदम आवडले ते 'और आहिस्ता कीजिये बातें' हे गाणे. लाईट रोमँटिक असे हे गाणे पंकज उधासच्या आवाजातल्या नॅचरल प्लेझंट मूडमुळे अजून खुलले.
पंकज उधास यांना मनःपूर्वक श्रद्धांजली..

त्यांच्या लाईफ स्टोरी या गझल आल्बम नंतर गझल आवडू लागल्या होत्या. एक तरफ उस्का घर एक तरफ मैकदा..... थोडी थोडी पिया करो... त्यानंतर त्यांना दोन वेळा लाईव्ह ऐकायचे भाग्य देखील लागले होते... त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

भावपूर्ण श्रद्धांजली!
पंकज उधास म्हटलं की सर्वप्रथम आठवतं ते ' चिठ्ठी आयी हैं ' गाणं! संजय दत्त पेक्षा ते गाणं पंकज उधास चं म्हणून जास्त लक्षात राहिलं. ' आज फिर तुमपे प्यार आया हैं ', ' चांदी जैसा रंग हैं तेरा ', ' ना कजरे की धार ', ' मोहब्बत इनायत करम देखते हैं ', ' जिये तो जीये कैसे ' ही अजून काही गाजलेली गाणी.
मला पंकज उधास ची ओळख सर्वात आधी गझल गायक म्हणून माझ्या वडीलांमुळे झाली. ' झील में चाॅंद नजर आये थी हसरत उसकी ' आणि ' घुंगरू टूट गये ', ह्या दोन गझला शाळेत असताना ऐकल्या होत्या.