कंकणे

Submitted by द्वैत on 25 February, 2024 - 01:40

अकल्पित काही घडावे असे की
निळीशार व्हावी नभाची कडा
कुठे हालता रानवारा जरासा
पडो पावलांशी फुलांचा सडा

फुले वेचिता वेचिता गीत यावे
कुण्याकाळच्या प्रेयसीचे मुखी
कळे भान येता मला सूर देते
अरे! लेक माझी गुणी लाडकी

तिच्या या सुरांचे नभी चंद्र होती
आणि सांडती अंगणी चांदणे
पहाटे जरा लागता नीज डोळां
पुन्हा किणकिणाती मुकी कंकणे

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. तुमच्या कविता नेहमी आवडतात, तशी हीही आवडली; फक्त शेवटच्या ओळीतला किणकिणाती हा शब्द थोडा विचित्र वाटला.