व्ही फॉर – भाग दोन

Submitted by बिपिनसांगळे on 12 February, 2024 - 10:53

व्ही फॉर – भाग दोन
------------------------
मयत उरकून ते परत निघाले.

गाडीत खास पोरं होती ; पण सगळेच शांत होते . कारण दिप्या शांत होता. पोरांना वाटत होतं की भाई दुःखात आहे - मोठ्या भाईच्या . ते खरंही होतं; पण दिप्या या क्षणाला डबल दुःखात होता .

पण तो हे कोणाला बोलला नव्हता . त्याला हे कोणाला सांगायचं नव्हतं . स्वतःचं दुःख तो गुमान गिळत , बाहेर बघत बसला होता . त्याला बाहेरचं काही दिसत नव्हतं . त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते . आणि बोलावं म्हणलं तरी कसं बोलणार ? असं त्याला वाटत होतं - आता तो मुख्य होता . त्यांच्या गँगचा डॉन ! त्याला एकदम पोक्त झाल्यासारखं वाटत होतं . तो कमजोर आहे असं पोरांना कुठूनच वाटता काम नये , असं त्याचं मन त्याला म्हणत होतं .

गाडीने वेग घेतला तशी त्याच्या डोक्यातली चक्रं फिरू लागली. त्याच्या डोळ्यांपुढे मोठा भाई होता, त्याचं वागणं त्याचं दिसणं , त्याचा दरारा होता ... नवीन जबाबदारी होती.

वाटेत खड्डा आला . गचका बसला तसं त्याचं विचारचक्र तुटलं.

मग डोळ्यांपुढे फक्त -रिया रिया अन रिया !
XXX

तो आठवणीत हरवला ...

दीपक कॉलेजमध्ये गेला तसा वाईट पोरांच्या संगतीला लागला. त्याची भाईगिरी चालू झाली . पण इथेतिथेच . थोड्या प्रमाणात.

एके दिवशी तो पोरांच्या घोळक्यात उभा होता . चर्चा अर्थातच भाईगिरी ! अचानक त्याला रिया दिसली. साधी पोरगी पण आकर्षक बांध्याची ,आकर्षक चेहऱ्याची . मोकळ्या सोडलेल्या केसांनी तिच्या चेहऱ्याला आणखीच गोडपणा आणला होता . तो तर तिच्या एका दिसण्यातच पागल झाला.

त्याला नजरेसमोर सतत रियाच दिसू लागली . दिवस-रात्र ! वेडं वय !

एवढा हाणामाऱ्या करणारा गडी तो ! कायम हत्यार बाळगून फिरणारा गडी तो ! पण तिच्याशी बोलायचं म्हणल्यावर त्याची फाटायला लागली .

एके दिवशी त्याने हिंमत करून तिला थांबवलं. .. त्याचा निष्कर्ष एवढाच- तिचा नकार !

पण त्याच्या मनातून ती काही केल्या जाईचना.

पुढे कॉलेज गॅदरिंगला पोरापोरांच्या भांडणात एकाच खून झाला. त्या ग्रुपमध्ये दिप्या होता . त्या गुन्ह्यात तो आत गेला . कॉलेज सुटलं. शिक्षण संपलं. पण गुन्हेगारीत त्याची पीएचडी झाली आतमध्ये ! खरं तर तो मूळचा हुशार पोरगा होता . तिथून तो बाहेर आला तो पूर्ण भाई बनूनच !

तो मोठा भाईच्या गँगमध्ये सामील झाला . त्याचे कारनामे सुरु झाले . त्याचं नाव शहरात गाजायला लागलं.

एके दिवशी त्याने मोठाच डाव रचला . त्याने रियाला किडनॅप केलं. आणि मोठ्या भाईच्या फार्महाऊसवर नेलं .

' रिया, माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझ्याशी लग्न करशील?' त्याने मोठ्या आशेने विचारलं .

पुढे काय वाढून ठेवलंय हे रियाला माहिती नव्हतं . ती घाबरली होती तरीही, ती बाणेदार पोर उत्तरली ,' कधीच नाही ! '

याच गोष्टीवर , याच गोष्टीवर तर फिदा होता तो !

' पण का रिया ? मी तुला राणीसारखी ठेवीन गं !'

'तुझं माझ्यावर एवढं प्रेम आहे ?' तिने विचारलं .

'हो आहे ! बोल काय करू तुझ्यासाठी ? काय पाहिजे ते सांग . आत्ता हजर करतो . का कोणाचा जीव घेऊ ते सांग .'

' बस ? एवढंच ? अरे , फक्त जीव घेणं एवढंच सुचू शक तं का तुला ? '

तो ब्लॅक झाला .

' अच्छा ? ठीक आहे. तुझं माझ्यावर जर एवढं प्रेम असेल तर तू ही निवडलेली वाट सोडू शकशील - माझ्यासाठी?' ती म्हणाली .

तो विचारात पडला . त्याला पटकन उत्तर सुचेना . तिच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं.

अन दिप्या म्हणाला ,'सोडली! ही भंगार लाईन आपण सोडली !'

बाकीची पोरं तो येडा आहे अशा नजरेने बघू लागले. त्यांच्यासाठी दिप्याभाई एकदम डॅशिंग होता .

त्याने तिला परत सुखरूप आणून सोडलं. त्याच्या साथीदारांनाही समजावलं.

पण सगळं काही सरळ नसतंच.

त्याच रात्री त्याच्यावर हल्ला झाला . एका जुन्या भांडणाच्या वादातून . थेट पोटातच गोळी घुसली होती त्याच्या.

थेट आयसीयू ! तो वाचणं कठीणच होतं.

xxx
क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults