टेक्सस अॅश

Submitted by -शर्वरी- on 5 February, 2024 - 11:49

टेक्सस अॅश

या इथे मी कधीच एकटी नसते. माझ्यासाठी हा जगातला सगळ्यात सुंदर कोपरा आहे. इथे खुप जण येतात. खासकरुन hummingbirds. त्यांना माझी बहुतेक अडचण होत नाही. मी आले तरी ते उडून जात नाहीत. ते मला घाबरत नाहीत किंवा मला माणूस म्हणुन वेगळं काढत नाहीत. मी अशा सुंदर ठिकाणी बसुन फक्त माणसालाच सुचतील अशा गोष्टी करत असते. चहा पिणे, भेळ खाणे किंवा या पक्षांचे फोटो काढण्याचा प्रयत्न करणे. हे सगळे मी त्यातल्यात्यात कमी आवाज करता करते म्हणुन बहुतेक ते मला चालवून घेतात त्यांच्यात.

हे जे हिरवं झाड आहे ना ह्याला पाहिल्याबरोबर ते मला आवडलं होत. पण मानवी (आणि एकुणच उपयुक्ततावादी) स्वभावाप्रमाणे असही वाटलं होत की ईथे पेरु किंवा आंबा असता तर जास्त मजा आली असती. पण ते एक वाटु शकतंच. इतर जागांवर पेरु आणि आंबा लावुन वाढवण्याचे खुप प्रयत्न करुन मग शेवटी या टेक्सास अॅश ला आम्ही आपलं म्हंटलं. पण हा करंटेपणाच. कारण हे खुपच सुंदर झाड आहे. अगदी अप्रतिम सुंदर. त्याच्याखाली उभे राहिले की आकाश दिसत नाही. थंडी सुरु होण्यापूर्वी त्याचे पान न् पान लालसर सोनेरी होतं. ते भरजरी वैभव पहातच रहावे असे असते.

हे झाड ही या कोपऱ्याची ओळख आहे. त्याच्याखाली आम्ही कढीपत्ता लावलाय. मायेची सावली धरणे म्हणजे काय याचा अर्थ मला खऱ्या अर्थाने तेंव्हा समजला जेव्हा इथल्या उन्हाळ्याची भट्टी तापली. त्याच्या सावलीत इतरही अनेक नाजुक झाडे आहेत. ते सगळेजण एकमेकांबरोबर राहुन निशब्दपणे संवाद साधतात असं मला वाटतं. म्हणुन मग मी तिथं त्यांचे सळसळणारे शांततेचे गीत ऐकत बसते.

खरतरं इथे एक छोटेखानी मंदिर बांधावे असे मला अगदी पहिल्यांदा इथे आल्यापासुनच वाटते. पण मग वाटते, ही झाडे, पाने,फुले आणि पक्षी यांनी मिळुन इथे निसर्गाचे मंदिर बांधलेले आहेच. या झाडाच्या खोडाला हात लावला तर ते थेट विठ्ठलाच्या पायाशी घेऊन जाते. डोळे मिटले तर माझ्या मुळांशी पोहचवते. हे झाड साधंसुध नाही. सगळ्यांना शांतवणारं, क्लिष्ट आयुष्य सरळ करणारे, त्याच्या सावलीत बसणाऱ्याच्या मनाचे तळे निळशार करणारे झाड आहे हे. डोळे मिटून तपश्चर्या करणाऱ्या एखाद्या ऋषीकुमारासारखे. टेक्सस अॅश. नावाला साजेसे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलं आहे
आणखी फुलझाड आजूबाजूला लावता येतील. फुलपाखरांना आकर्षित करणारी काही फुलझाडे.....

सुंदर लिहिले आहे.
तिथल्या वातावरणात तुळस टिकत असेल तर झाडाखाली तुळशी वृंदावन ठेवू शकता.

मनापासून धन्यवाद सर्वांना.

छान लिहिलं आहे. त्या झाडाखाली पगोडा लॅनटर्न ठेवून त्यात लेड मेणबत्ती वगैरे ठेवली तर? +१ खरंच सुंदर कल्पना आहे, सायो.

ऋतुराज, तुमची सूचना मनापासून आवडली. बागेत खास मधमाश्यांसाठी आणि फुलपाखरांसाठी पुष्कळ रानफुले (wildflowers) येतील असे बघतो.

चैत्रगंधा, तुळस पण आहे एका बाजुला Happy

छान लिहिले आहे Happy

मी मॉर्निंग वॉकला जातो तिथेही असेच एक छोटेसे नाजूकसे झाड माझ्या आवडीचे आहे. मी त्याच्या जवळच्या बेंचवरच विश्रांतीला बसतो. जेणेकरून ते मला समोर दिसत राहील... हा लेख त्यामुळेच रीलेट सुद्धा झाला.

>>> मी तिथं त्यांचे सळसळणारे शांततेचे गीत ऐकत बसते.
छान लिहिलंय.
तुमचा बोधिवृक्ष तुम्हाला सापडला तर! अभिनंदन! Happy

मोहन्याची आठवण आली. आमच्या बागेतली चिकूचं झाड माझं आवडतं होतं. छान लिहिलंय. मला पण आवडला हा कोपरा.

तुमचा बोधिवृक्ष तुम्हाला सापडला तर! अभिनंदन! Proud I wish, स्वाती.
मैत्रेय, धनुडी सूचना आणि कौतुकाबद्दल खुप आभार.

मस्तच.

लेख वाचताना तुमच्या शब्दांवर तरंगायला झाले. खुपच ह्रुद्य लेखन. अशी एखादी जागा - शांतावणारी, आश्वस्त करणारी असतेच आपल्या आसपास कुठेतरी. पूर्ण उर्जेनिशी आणि ममत्वानी आपल्याला सामावून घेणारी...

धन्यवाद !