तळजाई टेकडीवरील फिटनेसची जत्रा

Submitted by चामुंडराय on 4 February, 2024 - 11:31

गेल्या काही वर्षांमध्ये बहुसंख्य जनता ही आरोग्याबद्दल जागरूक झाली आहे. योगासने, विविध खेळ, व्यायामशाळा आणि इतर माध्यमांद्वारे आरोग्य आणि स्वास्थ्य मिळवण्याचे प्रयत्न होत आहेत. योग्य पोषण, व्यायाम, शारीरिक हालचाल (NEAT exercise) आणि पुरेशी विश्रांती ह्या द्वारे तंदुरुस्ती मिळवण्याचे आणि रोगांना दूर ठेवण्याचे अनेकांचे ध्येय आहे. मात्र सर्वत्र मिळणारे आणि सहज उपलब्ध असणारे चविष्ट परंतु अस्वच्छ परिस्थितीत तयार केले जाणारे व निम्न पोषणमूल्ये असणारे स्ट्रीट / फास्टफूड, मिठाया, तळलेल्या आणि चीझ, बटरचा अतिरिक्त मारा असलेल्या खाद्यपदार्थांमुळे भारतीयांचे आरोग्य धोक्यात आहे.

आरोग्यपूर्ण जीवनासाठी व्यायामप्रकार निवडताना "चालणे" हा अतिशय सोपा, बिनखर्चाचा, बहुसंख्याकांना सहज करता येणारा व्यायाम आहे. मानव "चालणे" ही क्रिया लाखो वर्षें करत आलेला आहे. सजगतेने चालून वजन कमी करण्याचे आणि स्वास्थ्य लाभाचे उद्दिष्ट ठेवून लोकं बागांमध्ये, शहरातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील टेकड्यांवर चालायला जात आहेत. स्थानिक प्रशासन देखील अशा ठिकाणी वॉकिंग ट्रेल्स्, जॉगिंग ट्रॅक्स्, ओपन जिम् वगैरे सुविधा उपलब्ध करून सामान्य जनतेला व्यायाम करण्यास प्रवृत्त करत आहे.

ह्या वेळेच्या भारत भेटीमध्ये पुण्यातील तळजाई टेकडीला आणि जवळच्या बागेला सकाळी आणि संध्याकाळी चालण्यासाठी भेट देण्याचा योग आला. पूर्वी पुण्याबाहेर असणाऱ्या परंतु आता शहराचा सर्व बाजूंनी विस्तार झाल्यामुळे जणू मध्यवर्ती ठिकाण झालेल्या निसर्गरम्य आणि विविध वनस्पतींनी नटलेल्या तळजाई टेकडीवर चालण्यासाठी अतिशय उत्तम सोय करण्यात आली आहे. पश्चिम घाटाचा भाग असलेल्या पुण्याच्या आजूबाजूच्या टेकड्यांपैकी तळजाई ही एक महत्वाची टेकडी आहे. मुळात टेकडीवर असलेल्या वनक्षेत्राचे वन खात्याने जाणीवपूर्वक संवर्धन करून विविध स्थानिक फळ आणि फुलझाडे लावली आहेत. सर्व बाजुंनी बंदिस्त आणि राखीव क्षेत्र असल्याने पुण्याच्या मध्यवर्ती भागात घनदाट जंगल तयार झाले आहे. ही टेकडी जैवविविधतेने समृद्ध आहे आणि जागोजागी पाण्याची कृत्रिम तळी तयार केल्याने अनेक पक्ष्यांचे आवडीचे स्थान आहे. पक्षीनिरीक्षक आणि पक्षीतज्ञांमध्ये लोकप्रिय आहे. वनस्पतीशास्त्र अभ्यासकांचे देखील आवडीचे ठिकाण आहे.

Taljai-7.jpg

कमी अधिक लांबीचे वॉकिंग ट्रेल्स असल्याने लोकं आपापल्या क्षमते प्रमाणे चालणे, धावणे करतात. योगसाधना, समूहाने व्यायाम, ध्यानधारणे साठी खास जागा आणि खुले व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. अगदी ठळकपणे लक्षात आलेली एक आनंदाची बाब म्हणजे इतरत्र सर्वत्र दिसणारा प्लास्टिकचा कचरा टेकडीवर चालताना क्वचितच अपवादाने दिसून आला. त्याबद्दल जागरूक नागरिकांचे, वेळोवेळी साफसफाई करणाऱ्या स्वयंसेवकांचे आणि प्रशासनाचे अभिनंदन. गर्दीच्या वेळी अरुंद पायवाटेवर नागरिक प्रसंगी बाजूला थांबून एकमेकांना जागा करून देत असल्याचे पाहण्यात आले. अशीच शिस्त वाहन चालकांनी वाहन चालवताना पाळली तर पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात कमी होईल असा विश्वास वाटतो.

Taljai-6.jpg

चालण्याच्या वाटेवर जेथे फाटे फुटतात तेथे टेकडीवरील पायवाटेचे नकाशे लावले, ट्रेलच्या लांबीबद्दल आणि मुख्य प्रवेशद्वारापर्यंत लागणाऱ्या सर्वसाधारण वेळेबद्दल माहिती दिली तर नवीन चालायला येणाऱ्या नागरिकांना त्याचा फायदा होईल. ठराविक अंतरावर पिण्याच्या पाण्याच्या वॉटर फाऊंटनची सोय केली तर नागरिकांना पाण्याची बाटली जवळ बाळगण्याची गरज भासणार नाही. टेकडीवर संरक्षित क्षेत्रात स्वयंचलित वाहनांना बंदी आहे ही समाधानाची बाब आहे. मात्र टेकडीवर भटकी कुत्री मोठ्या प्रमाणावर दिसून आली. एखादी दुर्घटना घडण्याची वाट न बघता त्यावर वेळीच उपाय योजना करण्यात यावी.

टेकडीवर चालताना "चरैवेति चरैवेति..." ह्या मंत्राचे अनुकरण करणारे पुणेकर मुख्य प्रवेशद्वारा बाहेर आल्यावर मात्र "चरत रहा, चरत रहा..." हा मंत्र जपतात की काय न कळे! तेथे जणू जत्रा भरलेली असते. भजी, सामोसा, थालीपीठ, डोसा अश्या खाद्यपदार्थापासून ते विविध प्रकारचे ज्यूसेस् आणि सुप्स्, स्प्राउटची भेळ असे तुलनेने पौष्टिक असलेले पदार्थ देखील उपलब्ध असतात आणि पुणेकरांच्या त्यावर उड्या पडतात. कोणतीही विशिष्ट "वेळ" नसणारा परंतु वेळेला "हवाच" असणारा अमृततुल्य चहा असंख्य प्रकारात उपलब्ध असतो. पुणेकर त्याचा चवीने आस्वाद घेताना दिसतात. चालून जेव्हढ्या कॅलरी खर्च झाल्या असतील त्यापेक्षा तेथील खाद्यपदार्थ खाऊन जास्त कॅलरींची भर घालणाऱ्या पुणेकरांपैकी कोणी टेकडीवर चालायला सुरुवात केल्यावर वजन वाढल्याची तक्रार केली तर आश्चर्य वाटायला नको. पुणेकरांचा वजन कमी करण्याचा प्रवास यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा.

Taljai-3.jpgTaljai-2.jpg

विविध भाज्या आणि फळे विक्रीला उपलब्ध असल्याने आरोग्याबद्दल जागरूक असलेल्या सद्गृहिणी त्याचा लाभ घेतात त्याबरोबरीने गृहकृत्यदक्ष आणि भार्याज्ञाधारक सद्गृहस्थ देखील खरेदी करताना दिसतात.

Taljai-4.jpg

बाजूला असंख्य स्वयंचलित दुचाकी अगदी शिस्तीत उभ्या केलेल्या दिसतात. मुख्य रस्त्यावर चारचाकी देखील असतात परंतु सायकल मात्र एक देखील दिसून आली नाही ही खेदाची बाब आहे. स्वयंचलित दुचाकी आणि चारचाकी ऐवजी जेव्हा पार्किंग लॉटमध्ये सायकलींची गर्दी होईल तेव्हा प्रदूषणाची पातळी कमी होऊन खऱ्या अर्थाने पुणेकरांना आरोग्याचा लाभ होईल.

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या शहराच्या आजूबाजूच्या गावांतील 'डोंगरमाथा, डोंगरउतार' क्षेत्रातील १:५ ग्रेडिएन्ट असलेल्या किंवा समुद्रसपाटीपासून १९०० फूटांपेक्षा अधिक उंचीवरील (1900' AMSL) सर्व जागांवर नियोजनाप्रमाणे जैवविविधता उद्याने (Bio Diversity Parks) करण्याचे काम तातडीने हाती घेतल्यास पुण्याच्या वन वैभवात भर पडून प्रदूषणाची पातळी कमी होईल आणि पुणेकरांची "जीवन गुणवत्ता" (Quality of Life) उंचावेल ह्यात तिळमात्र शंका नाही.

भवतु सब्ब वॉकर्स फिट् !

Taljai-5.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"संपूर्ण मायबोलीवरचं नवीन लेखन" ह्या मुख्य पानावर फोटो का दिसत नाही?
मात्र आयकॉन वर क्लीक केल्यावर धागा उघडतो आहे.
मेरा क्या चुक्या?

(लेख मस्त जमलाय हे सांगायचं राहिलंच Happy )
तो लेखन करायला घेताना मुख्य चित्र पर्याय येतो तसा टाका परत एडिट करून
Screenshot_2024-02-04-22-44-20-226_com.android.chrome.jpg

छान लिहिले आहे
तळजाई टेकडी माबोवर फोर्मला आली आहे Happy

छान लिहिलंय. तिथे नेहमी/अनेकदा जात असल्याने खूपच पोहोचला लेख, काही मुद्दे जे अगदी माझ्या मनात येऊन जातात तिथे गेल्यावर ते लेखात जसेच्या तसे आलेत

१. आतमध्ये बऱ्याच वाटा उपवाटा आहेत. जिथे वाटा फुटतात त्या प्रत्येक ठिकाणी आपण कुठे आहोत आणि प्रत्येक वाट कुठे जाते व किती अंतर चालावे लागेल याचे फलक लावणे खूप गरजेचे आहे. आत गेल्यावर, विशेषता मधल्या वाटांनी गेल्यास, काहीही कळत नाही. अनेकदा तिथे वाटा हरवलेले व गोंधळलेले लोक एकमेकांना वाटा विचारताना दिसतात. गुगल नेव्हिगेशन सुद्धा तितकेसे उपयोगी पडत नाही आतमध्ये.

२. कुत्र्यांच्या समस्येने सगळ्या पुण्यातल्या सोसायट्या हैराण झालेल्या आहेतच. तळजाई टेकडी सुद्धा अपवाद नाही. आतल्या भागात काही मोजकी कुत्री मोकाट फिरताना दिसतात. तशी ती मुकाट्याने आपापल्या वाटेने जाणारी आहेत, चालणाऱ्याच्या अंगावर येत नाहीत. पण धोका आहेच. काही लोक आपल्या श्वानासाहित फिरायला येतात आणि आत त्याला मोकळे सोडतात हे सुद्धा थांबवणे गरजेचे आहे.

३. पायवाटा मातीच्या आहेत त्या पक्क्या करण्याबाबत दोन प्रवाह असू शकतात (आहेत). एक, ज्यांना त्या जशा आहेत तशाच (मातीच्या) ठेवायच्या आहेत. आणि दुसरे, ज्यांना त्या डेव्हलप करून पक्क्या कराव्यात असे वाटते. पैकी मी दुसऱ्या गटात येतो. कारण पावसाळ्यात अक्षरशः हाल होतात चालताना.

बाकी, तळजाईला येणारे चालून जितक्या कॅलोरिज खर्च करतात त्याच्या दुप्पट बाहेर येऊन खातात हे सुद्धा अगदी अगदी झाले Lol

छान लिहिलंय. मनातले काही मुद्दे लेखात जसेच्या तसे आलेत.

जत्रा हा खूपच समर्पक शब्द योजला आहात.
जत्रा म्हटली की हौशे नवशे गवसे सगळे आलेच

mi_anu - प्रशंशात्मक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
मी दोन वेळा फोटो डिलीट करून री-लोड केला परंतु अजूनही अनुक्रमणिकेत, मुख्य पानावर फोटो दिसत नाही. तसेच लेखाच्या शेवटी काही फोटो अपलोड करायचे आहेत परंतु कसे करायचे कळले नाही.

Srd, हरचंद पालव, ऋतुराज, भरत आणि ऋन्मेSSष - प्रशंशात्मक प्रतिक्रियेबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद

कुमार१ - प्रशंशात्मक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. NEAT बद्दल थोडीफार गुगलोत्पन्न माहिती असली तरी वैद्यकीय दृष्टिकोनातून त्यावर लिहावे ही आग्रहाची विनंती.

अतुल - प्रशंशात्मक आणि विस्तृत प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. मी स्वतः आणि माझा स्थानिक मित्र चालताना चुकलो त्यामुळे फलक लावणे आवश्यक वाटते. पावसाळ्यात काय अवस्था असते कल्पना नाही परंतु तुमचे म्हणणे पटले, चिखल असेल तर चालणे अवघड होईल.

हर्पेन- प्रशंशात्मक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. चालण्यासाठी प्रवेशद्वारातून आत गेलो तेव्हा बाहेर फारसे काही नव्हते परंतु चालून झाल्यावर बाहेर पडताक्षणी भज्यांचा वास आला आणि बघतो तर बाहेर जणू जत्रा भरली होती तेव्हाच लक्षात आले की लिहिण्यासाठी हा चांगला विषय आहे.

तळजाई टेकडी भटकंती हे आता माझ्या डोक्यात घुसले आहे. पुढच्या पुणे वारीमध्ये तो भाग पिंजून काढायचं ठरवलं आहे. @अतुल यांचा मुद्दा क्र (१) - वाटा मातीच्याच ठेवाव्यात अशा मताचा मी आहे. माथेरानचं उदाहरण घ्या. मागच्या दोन वर्षांत तिकडे पेवर ब्लॉक्स घालून चालणे सोपे केले. तरीही शेवटी ते सिमेंटच. उष्णता फार शोषते. मातीत कॅल्शम सोडते. किडामुंगींना चांगले नाही. दगडांचे छोटे तुकडे बसवले असते तर चालले असते.जेवढे नैसर्गिक ठेवाल तेवढे चांगले. आता इ ऑटो रिक्षा सुरू झाल्या. हळूहळू त्यांची रहदारी एवढी वाढेल की घोडे वाल्यांचा धंदा बंद होईल. नाक्यावर सिग्नल लावतील. मातीच्या वाटांची गंमत फारच चांगली असते.