परतीची वाट
तिरिमिरीत त्याने पायात चपला अडकवल्या अन् तो घराबाहेर पडला. बाहेर मे महिन्याचं ऊन रणरणत होतं. संतापाने त्याची लाही लाही होत होती. कडकडत्या उन्हाचं तर त्याला भानही नव्हतं.
‘साला एक दिवस सुखाचा मिळत नाही ह्या घरात.. घालवला.. आजचा रविवार पण घालवला ह्या बाईने..’ तो धुमसत होता. ‘रोज काहीतरी कारण मिळतच हिला भांडायला..’
‘आज कशावरून भांडण काढलं हिने ..?’ आता तर तो मूळ मुद्दाही विसरला होता. दिवसाची रोजची सुरवताच कुठल्या तरी वादाने व्हायची. काहीही कारण पुरायच, घरात भांडण सुरू व्हायला. त्याचं डोकं नुसतं सणसण करत होतं. तसाच चालत तो कॉलनीच्या टोकाशी आला.
समोर आडवा मुख्य रस्ता होता. एवढ्या उन्हात पूर्ण रस्ता अगदी निर्मनुष्य होता. माणसं आपापल्या घरात जेवून खाऊन सुस्त पडली होती. उन्हा मुळे डांबरच काय, आजूबाजूची मातीही डोळ्यांवर प्रकाश फेकून मारत होती. डोळे उघडे ठेववत नव्हते. त्याला तसेही आता ते बंदच करायचे होते कायमचे. सगळं जग निवांत होतं. फक्त त्याच्या घरातच कधी निवांतपणा.. सुस्तपणा नसायचा. सतत बायकोची काहीतरी कलकल चाललेली असायची.
रस्त्याचं एक टोक गावात जात होतं अन् दुसरं गावाबाहेरच्या तलावाकडे. त्याने तलावाचा रस्ता पकडला. थोडं पुढे आल्यावर ह्या रस्त्याला दुतर्फा चिंचेची दाट झाडं होती. पण सावली मिळवणं हे काही त्याचं कारण नव्हतं ही दिशा पकडण्याचं.. ‘आज होऊन जाऊ देत.. एकदाचा सोक्षमोक्ष.. ही रोजची कटकट आता नाही सहन होत. आता नाही जायचं त्या घरात..’ मान खाली घालून, हात मागे बांधून तो चालत होता.
‘काय कमी करतो मी ह्या घरात? रोजची देवपूजा.. बाजारहाट.. जे असेल ते खाऊन ऑफिसला जातो.. घरात सकाळी जमतील ती काम.. सकाळी लवकर उठणं तिला झेपत नाही म्हणून मीच मुलांना उठवणं, स्टोव्ह पेटवून त्यांच आंघोळीच पाणी तापवण वैगेरे करतो. मुलंही निमुटपणे उठून आपलं आपलं आवरतात अन् शाळेकरता तयार होतात.
तिन्ही मुलं तशी गुणी अन् समजूतदार आहेत. घरात आईबापांची वादावादी चालू असते तेव्हा निमूटपणे आपापली कामं करत असतात. कित्येकदा आई रागाने पांघरूण घेऊन झोपून आहे, दिसलं तर स्वयंपाकाचही बघतात. तशी लहानच तर आहेत.
सकाळी सगळ्यांचा चहा मीच ठेवतो.. वाटतं, जाऊदे.. तिला दिवसभर घरकाम पुरतं.. पण नाही! कितीही केलं तरी ही काहीतरी खुसपट काढतेच.. अन् मग येऊंन जाऊन गाडी पैशांवर येते..’ तो चालतच होता. मागून काहीतरी आवाज आल्यासारखं वाटला .. पण तो तसाच चालत राहिला खाली मान घालून.. आज परत फिरणं नाही.. संपवायचं सगळं आज.
तो काय.. अन् त्याच्या आजूबाजूचे काय.. सगळेच लोकं तर सारखेच मध्यम वर्गातले होते. सगळेच कारकुनी करत होते.. त्याच्या सारखीच. ‘..पण बाजूच्या घरांमधून कधी एवढा कडकडाट नाही ऐकू येत.. नाही म्हंटल तरी हीचं शिक्षण आडवं येतच. तेव्हा ऐकलं नाही आमच्या आईने.. त्याचे परिणाम भोगतोय आता. तेव्हा घरच्यांच ऐकलं.. वाटलं होतं, ते म्हणतात तसं शहरात राहिली तर जाईल तिचा खेडवळपणा..
सगळेच लोकं कसाबसा महिना निभावतात.. सगळा पगार तर मीही हिच्याच हातात देतो.. पण चार दिवस गेले की हीची कटकट चालू.. पैसे संपले म्हणून.. बरं.., ती कुठे खर्च करत असेल तर सालं तेही नाही.. खर्च झाले असं सांगून बचतच करते.. अडीअडचणीला कामी येतात तेच तिचे पैसे.. पण म्हणून काय झालं? अडचण किती सोसायची सतत? कधी आजचं जगणं माहीतच नाही. सतत उद्याची चिंता! जास्तीचे पैसे आणू कुठून मी.. तरी कटकट नको म्हणून घेतो कधी इथून तिथून.. उधारीवर.. माणसाला जरा तरी शांती पाहिजे.. पण तेही अंगावर येतच. अन् एक खड्डा भरायला दूसरा खणावा लागतो.’
रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. आता मागून येणाऱ्या हाका वाढल्या. त्यानं थंबकून वळून बघितलं. छोटी आवाज देत होती, ‘बाबा.. बाबा..’ ती धावत येत होती. तो क्षणभर थांबला. छोटीची दया आली. भर उन्हाची धावते आहे.. पण तिच्याकडे दुर्लक्ष करून तो परत चालायला लागला. ‘धावेल धावेल.. अन् दमली की जाईल परत. सांभाळेल तीची आई. अजून बरच लांब जायचं आहे..’ दाट झाडांमुळे उन्हाची तलखी जरा कमी जाणवत होती.
‘वाटतं कधीतरी छोटीने काही हट्ट केला तर पुरवावा.. मागून मागून काय मागते ती? कधीतरी एखादा नवीन फ्रॉक.. एखादे कानातले डूल.. एखादी बाहुली.. तेही कधीतरीच.. पण नाही पुरवता येत साला तिचा बारकासा हट्ट. घरात लगेच आकांड तांडव सुरू होतं.. चार पैसे खर्च केले म्हणून.. असं दात कोरून कुठे पोट भरतं का..? होईल सगळं ठीक.. बाकीच्या लोकांचं होतंच नं..? एवढं पै पै करून काय होणार आहे..? सालं.. जरा कधीतरी पोरांची.. आपली हौसमौज नको?’
मागून छोटीच्या हाका वाढल्या होत्या.. त्यानं परत थांबून मागे वळून बघितलं. छोटीला धाप लागली होती. तो थांबल्याचं दिसल्यावर छोटीही थांबली जरा दम घ्यायला. त्याने लांबूनच हात उगारला, तिला परत पाठवायला. ती घाबरल्या सारखी दिसली. ‘जाईल परत ती..’ तो परत चालायला लागला, त्याने ठरवलेल्या दिशेनेच.
मुलांच्या हौसे मौजे वरून त्याला आठवलं, ‘तरुणपणी किती वेगळे होतो आपण.. ते चोरून केलेलं हॉटेलिंग.. कॉलेज ला दांडया मारून सिनेमे बघणं..’ त्याच्या चेहऱ्यावर जरा मऊ रेषा उमटल्या. ‘लग्न झाल्यावर संगळ्यांचच हे सगळंच संपत असेल.. पण बायकोला जरा तरी इतर कशाची आवड हवी की नको..? पण हिला तर ना कधी वाचायला आवडत.. ना कधी फुकट मिळणारी रेडिओ वरची गाणी मनापासून ऐकत.. सदा न् कदा आपलं चेहरा पाडून गरीबडं आयुष्य जगायच अन् उद्याची चिंता करत रहायच.. जरा जगण्यात बदल नाही की पोरांच्या कलाने घेणं नाही.. ’
त्याने किंचित थबकून मागे वळून बघितलं. छोटी तेवढंच अंतर ठेवून त्याच्या मागे येत होती. तो थांबल्यावर तीही तशीच उभी राहिली. घाबरून. तो मिनिटभर तिच्याकडे बघत उभा राहिला. तीही तशीच उभी राहिली, जवळ गेलं तर मार पडेल की काय असं वाटून...
तो परत चालायला लागला. पण आता त्याच्या चालण्याचा वेग मंदावला होता. मागून छोटीच्या चालण्याचा आवाज येत होता. अंतर राखूनच. त्याने कधीच मुलांना मारलं नव्हतं. काही चुकलं त्यांच, तरी तो थोडं दुर्लक्ष करायचा तिकडे. कधीतरीच रागवायचा थोडं.. पण पोरं पण काही खूप मोठे गुन्हे करत नव्हती. थोडा हुडपणा चलायचाच वयाप्रमाणे.. त्यांची आई मात्र संतापायची त्यांच्यावर. त्याने जरा मध्ये पडायचा प्रयत्न केलाच तर आगीत तेल ओतल्यासारखं व्हायचं. त्यांना रागावणं सोडून मग तिचा रोख नेहमीप्रमाणे त्याच्यावर यायचा.
त्याने कधी तिला समजावून पहिलं.., कधी तिच्या आई बापुंची मदत घेतली.. पण परिणाम उलटच व्हायचा. ‘ती थोडी संतापी आहे पूर्वीपासून..’ हे तिच्या घरच्या लोकांच मत.. त्या संतापातच म्हणे तिने लहानपणी शाळा सोडली होती लवकर.. आधीच खेडेगाव.. ‘नाही शिकली तर काय फरक पडतो.. शेवटी पोरीची जात..!’ असं मानणारे लोकं.
लग्नाच्या वयाची झाली तशी स्थळ शोधायला लागले तिच्याकरिता. त्याच्या एका लांबच्या आत्याने सुचवलेलं हे स्थळ. लग्न तर अशी ओळखीतून.. नात्यातूनच जमायची. ‘खात्या पित्या घरची अन् घरकाम करणारी.. नाक डोळे जागच्या जागी..’ एवढी पात्रता पुरेशी होती त्याच्या आई-दादांच्या पिढीला. बाकी अजून काय बघायचं असतं..? वेळेवारी मुलांच लग्न करणं एवढंच त्यांना पुरेसं असायचं, मुलांचा संसार मार्गी लावायला..
तो आता थकला होता. जेवायच्या आधीच काहीतरी खुसपट निघालं होतं.. त्याच्या पोटात अन्नाचा कणंही नव्हता. डोकं बधिर झालं होतं. ‘पोरांनी तरी काही खाल्लं होतं का सकाळी..? खाल्ली होती बहुतेक फोडणीची पोळी.. त्याची देवपूजा चालू असतांना.. ’
त्याने परत मागे वळून बघितलं. तो थांबला म्हंटल्यावर छोटीही होती तिथेच उभी राहिली, भेदरलेली.. सशाच्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत... त्याला भरून आलं. जेमतेम सात वर्षांची पोर ती. घरात वादावादी सुरू झाली की एखादा कोपरा पकडते. तिची मोठी भावंड तरी बाहेर मित्रांमधे खेळूंन जीव रमवतात. पण ही पोरीची जात.. सारखी घराबाहेर पण नाही जात.
तो तसाच थांबून उभा राहिला. आता छोटीला थोडा धीर आला. ती हळूहळू चालत त्याच्याजवळ आली. आत्ता त्याचं तिच्या पावलांकडे लक्ष गेलं. तिच्या पायात चपला नव्हत्या. त्याच्या पोटात तुटलं. तो चार पावलं तिच्याकडे गेला. त्याला असं येतांना बघून छोटी धावतच त्याच्या कडे आली. त्याने दोन्ही हात पुढे करून तिला जवळ घेतलं. तिचे हात त्याच्या कंबरेभोवती पडले.
दोघं बराच वेळ तसेच उभे राहिले. मग तिच्या हातांमध्ये जरा ओढ जाणवली. ती परतीच्या दिशेने त्याला खेचत होती. तिचे डोळे भरून आले होते. तिचा हात घट्ट पकडून तो परतीच्या वाटेवर चालायला लागला.
******************
आई गं
आई गं
छान लिहिली आहे! आवडली.
छान लिहिली आहे! आवडली.
छानच आहे. नेमक्या शब्दात
छानच आहे. नेमक्या शब्दात लिहीलिये गोष्ट.
छान कथा!
छान कथा!
छान आहे कथा.एकदम जबरदस्त
छान आहे कथा.एकदम जबरदस्त रंगवायची लेखनशैली.
कथा आवडली. फार छान लिहिली आहे
कथा आवडली. फार छान लिहिली आहे
त्या बायकोला मानसोपचाराची गरज
धन्यवाद किल्ली, वावे, धनुडी,
धन्यवाद किल्ली, वावे, धनुडी, स्वाती अनु, मीरा सामो.
@सामो,
@सामो,
त्या बायकोला मानसोपचाराची गरज आहे. >> जिथे रोजच्या जगण्याला पुरेसा पैसा नसतो तिथे मानसोपचार मिळणं अवघड असतं.
>>>>>जिथे रोजच्या जगण्याला
>>>>>जिथे रोजच्या जगण्याला पुरेसा पैसा नसतो तिथे मानसोपचार मिळणं अवघड असतं.
होय! खरे आहे. दारिद्र्य हा फार मोठा शाप आहे.
सुंदर कथा
सुंदर कथा
कळवळलं छोटीचं अनवाणी फरफटणं
कळवळलं छोटीचं अनवाणी फरफटणं वाचून. अरेरे..
छान रंगवली आहे कथा.
कळवळलं छोटीचं अनवाणी फरफटणं
कळवळलं छोटीचं अनवाणी फरफटणं वाचून. अरेरे..
छान रंगवली आहे कथा.>>> +1
खूप छान झाली आहे कथा, सुखांत
खूप छान झाली आहे कथा, सुखांत झाला म्हणून बरं वाटल. छोटीसाठी.
छान कथा.. फार आवडली.. सगळा
छान कथा.. फार आवडली.. सगळा संसार डोळ्यासमोर आला. जोडीदाराची निवड चुकली की आयुष्य फसले!
सुंदर कथा.
सुंदर कथा.
फारच सुन्दर जमली आहे कथा.
फारच सुन्दर जमली आहे कथा.
छान आहे तरी कसं म्हणू? जीव
छान आहे तरी कसं म्हणू? जीव कळवळला दोघांची फरफट वाचून.
छान जमलीय कथा.
छान जमलीय कथा.
छान कथा, त्या मुलीला एकदम
छान कथा, त्या मुलीला एकदम जिवंत केलेत कथेतून. तिचे हावभाव एकदम पोचले तुमच्या लिखाणातून.
छान आहे कथा.एकदम जबरदस्त
छान आहे कथा.एकदम जबरदस्त रंगवायची लेखनशैली. >> हेच म्हणते
धन्यवाद स्पार्कल, प्राचीन,
धन्यवाद स्पार्कल, प्राचीन, मंजुताई, निर्मल, ऋन्मेष, माधव, मनिमोहर, किट्टूर, मानव, लंपन, वंदना.
पोटात तुटलं. डोळे भरून आले.
पोटात तुटलं. डोळे भरून आले.
मस्त चाललंय तरी माझी छोटी लेक अशीच प्रेमळ आहे. पिल्लु समोर दिसली
पोटात तुटलं. डोळे भरून आले.
पोटात तुटलं. डोळे भरून आले.
मस्त चाललंय तरी माझी छोटी लेक अशीच प्रेमळ आहे. पिल्लु समोर दिसली>>
@रसिया बालम, कथा एवढी भिडलेली बघून खरच छान वाटलं.
आवडली कथा, मायेचे पाश असेच
आवडली कथा, मायेचे पाश असेच तुटता तुटत नाहीत
खूप मनाला भिडणारं प्रसंग
खूप मनाला भिडणारं प्रसंग वर्णन!
वडील आणि कन्या नातं फार सुंदर असतं !!
कथा खरच हृदयस्पर्शी आहे.
कथा खरच हृदयस्पर्शी आहे. ती लहानगी किती वणवणली.
छान आहे तरी कसं म्हणू? जीव
छान आहे तरी कसं म्हणू? जीव कळवळला दोघांची फरफट वाचून.
>>>> +१
गरिबी हा शाप, कटकटी/कटकटा
गरिबी हा शाप, कटकटी/कटकटा जोडीदार त्याहून मोठा शाप.
कटकट्या जोडीदार बदलू शकतो.
कटकट्या जोडीदार बदलू शकतो. दारिद्र्य हात धुवुन पाठीमागे लागते.
Pages