शतदा प्रेम करावे..........

Submitted by sarika choudhari on 25 January, 2024 - 07:05

" या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.. . " हे गीत जगण्यावर प्रेम करायला शिकवतं. पण आजच्या युगातील चित्र पाहील तर उलटच दिसेल लोक " या मरणावर या मृत्युवर शतदा प्रेम करावे. .” असेच गाणे गाताना दिसतात. माणूस जगण्यापेक्षा मरणाला जवळ करत आहे. थेाडं काही मनासारखं झाल नाही की दे जीव.जसा काही जीव बाजारातच मिळतो. आपली मानसिक स्थिती इतकी कमजोर झाली आहे की, कोणी अरे म्हणायाची देर आपण लगेच आपला मौल्यावान जीव द्यायला तयारच असतो. मनुष्य जन्म एकदाच मिळतो पण तो सार्थकी न लावता आपण आपलं जगण वाया घालवत आहे. जीव द्यायचाच झाला तर देशासाठी द्या. आपलं जीवन एखाद्या चांगल्या कामासाठी खर्च करा. तुमच्या जिवनाच तुमच्यासाठी मोल नाही . पण निदान तुमच्या जीवनाचा दुसऱ्याला उपयोग होऊ शकतो याचा कधी तरी विचार करा.
कितीजणं कर्जबाजारी झाले म्हणून, परिक्षेत मार्कस कमी पडले म्हणून, कोणी रागवलं म्हणून असे आणि किती कारणावरुन आत्महत्या करतात . त्यांना सांगावस वाटत की पैसाच सर्व काही नाही किंवा मार्कस ही सर्व काही नाही. दहावीला कीती गुण मिळाले हे फक्त मार्कलिस्ट पुरत मर्यादीत आहे. दोन दिवस लोक विचाारतात मार्क्स किती मिळाले. मग विसरुन जातात. पण आपण आपल्या आई वडीलांचा विचार न करता जीव देऊन मोकळ होतो. आपल्या मागे आपल्या कुटुंबाचं काय होत याचा विचारही आपण करत नाही. तसचं शेतकरी आत्महत्या करतात. पण त्यांच्या मागे त्यांच कुंटुंबाचे काय हाल होतात याचा विचार करत नाही. त्यांच्या मागे घर चालवते ती त्यांची बायको..तिला नसेल का कर्जाची, कुंटुंबाची चिंता. घरी गरीबी आहे. शेती केली तर निसर्ग साथ देत नाही , कर्जाचं डोंगर उभा आहे पण अश्या सर्व परिस्थीशी लढते ती शेतकऱ्याची बायको. नवरा नसेल पण आपल्या कुंटुंबाला वाऱ्यावर न सोडता सर्वाची काळजी घेते. याला म्हणतात जगणं.
परिस्थीतीला घाबरुन हात टेकणारी बरीच उदाहरण आपण पहातो. आता हेच पहा मी टयुशन घ्यायची तेव्हा एक चुणचुणीत व हुशार मुलगा माझ्या कडे स्कॉलरशिपच्या टयुशन साठी आला. त्याची आई पहायला खुप सुंदर तशीच स्वभावाने पण चांगली. एक दोनदा तो मुलगा शाळेतून घरी न जाता माझ्याकडेच आला .
त्याला कारण विचारले तर तो म्हणाला " मला तुमच्याकडेच आवडत."
त्याला एक दोनदा समजावल ." बाबारे , घरी आई वडील वाट पाहत असतील. "
तर तो मुलगा म्हणाला "प्लिज, थोडा वेळ थांबु द्या ना तुमच्याकडे."
परिक्षा झाली पण तो मुलगा रिझल्ट घेऊन आलाच नाही. काही दिवसानंतर त्याच्याच बिल्डींगमधील एक ओळखीच्या बाई दिसल्या.त्यांना विचाारले असता त्या म्हणाल्या तो तर आता मामा कडे असतो. त्यांच्या आईने आत्महत्या केली. हे ऐकुन मी जागीचं थिजले . एवढं छान कुंटुंब आणि एका क्षणात उध्वस्त झालं.त्याच्या आईने मुलाला बाहेर खेळायला पाठवून राहत्या घरी गळफास लावुन घेतला. पती चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे त्यांच्या आईनी जीवन याात्रा संपवली. पण मागे आपल्या मुलाला एकट सोडून ती माऊली गेली. आई गेली , बाबा तुरूंगात गेले आणि मुलगा गावी मामा कडे गेला. या घटनेनंतर तो खुप घाबरला होता. तो घरी जायला का तयार नसायचा ते आज कळत होतं. घरी सतत भांडण होत होती आई वडीलांची. त्यालाच तो घाबरला असावा. एखादया निरागस व हसऱ्या चेहऱ्या मागे दु: ख असु शकत याची आपल्याला कल्पनाही नसते. त्या मुलांचे आयुष्य , हुशारी सर्व वाया गेलं.
आता दुसरी घटना पहा. घरी अठराविश्व दरिद्रय, तीन बहीणी एक भाऊ. पुष्पा घरी मोठी असल्या कारणाने हुशार असून ही शिकता आलं नाही. पण व्यवाहारात ती हुशार असल्यामुळे सर्व निभावल. शेतात मजुरी करून बहीणीचं लग्न केलं. भावाला शिकवल शिक्षक केलं. मग स्वत: लग्न केल. पण सासरी ही तेच दारीद्रय पण हार मानणारी ती पुष्पा कोणती. शेतात मजुरी करून मातीच्या घराचं पक्क मकान केल. दोन मुल एक मुलगी त्यांचही शिक्षण केल. आता सर्व सुरळीत चालु होतं. मुलही मोठी झाली.तरीही तीची मेहनत सुरुच. एक दिवस शेतात कापूस वेचाायला गेली आणि साप चावला. पण तीने न घाबरता लगेच पायाला कापड बांधुन घेतल जेणे करून विष वर चढणार नाही. जवळपास तीन शेतं तीने धावत धावत पार केली. आपल्या सारखा तर तिथेच गर्भगळीत झाला असता. पण विष अंगात पसरलच. धावल्यामुळे ते जास्त पसरल. महीनाभर तीची मृत्यु सोबत लढाई सुरु होती. अखेर ती जिंकली. उपचारा दरम्यान‍ झालेल्य खर्चात तिनी जमवलेल सर्व कीडूकमिडुक संपल. पण ती परत जिद्दीने उभी आहे.कुठुन एंवढ धैर्य आल असांव. एखादी असती तर गरीबीला कंटाळुन जीव दिला असता. पण ती जगली आपल्या माणसांसाठी.
मग विचार करा आपल्या कडे सर्वकाही आहे. आपल्याला सर्व सहज‍ मिळत त्यामुळे संघर्ष कशाला म्हणतात हे ही माहित नाही. पण आपण मात्र परिक्षा देण्यापूर्वीच हरतो. ते म्हणतात ना टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही. कोणत्या ही मोठया व्यक्तीच नाव घ्या त्यांना आलेल अपयश हेच त्यांच्या यशाच कारण ठरल आहे. डॉ अब्दुल कलाम यांनी अथक परिश्रम करुन विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगले. जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी त्यांची निवड झाली. डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. स्टीव्ह जॉब्ज यांनी आपल्या अंपगत्वावर मात करून जगात आपल नाव केल. आपण मात्र शरिराने नाही तर मनाने अंपग झालो आहोत. सारख रडत असतो. माझ्या जवळ हे नाही माझ्या जवळ ते नाही.. थोड काही झालं की लगेच जीव द्यायला तयार. खरचं जीवन एवढं स्वस्त झाल आहे का. जगण्याचा आनंद घ्या . स्वत: साठी जगा, आपल्या जन्मदात्यासाठी जगा. कधीतरी दुसऱ्यासाठी जगुन बघा. आपल जीवन आपल्यालाच अनमोल वाटेल. बाबा आमटे , अभय बंग याच्याकडून जीवनाचा आदर्श घ्या. आपण त्यांच्या एवढं नाही पण त्यांच्या सारख बनायाचा प्रयत्न तरी करा. कधीही जीवन संपवण्याचा विचार मनात आला की रस्त्याच्या कडेला असणारे गरीब जीव बघा. जे उन्हा पावसात त्या रस्त्यावर राहतात. कुत्र्यापेक्षाही खराब त्यांच जीवन आहे. पण तरीही ते नेहमी खुश दिसतात. त्यांच्या कडे बघितल तर तुमच्या लक्षात येईल आपण कीती सुखी आहोत. आणि हेही लक्षात ठेवा संघर्ष त्यालाच करावा लागतो ज्यात क्षमता असते. जगतात तर किंडा, मुंगी ही..आणि मरतात ही.
आपण असं काहीतरी करावं की आपल्या जगण्याचा इतरानाही अभिमान वाटावा.

Group content visibility: 
Use group defaults

लेखामधून तुमची कळकळ पोहोचली. पण जशी प्रत्येकाची शरीराची प्रतिकार शक्ती /सुदृढ असणे वेगवेगळे असते तसेच मनाचेही. त्यातही भोवती माणसे असूनही वाटणारे एकटेपण, झालेली कोंडी या सगळ्यात 'तो क्षण' टाळणे सगळ्यांना जमतेच असे नाही. थकलेले, आजारी मन हे वेगळेच प्रकरण असते. एखाद्या आजाराच्या निर्मुलनासाठी जसे प्रयत्न केले जातात तसे सुइसाईड प्रिवेंशनसाठी प्रयत्न करणे फार गरजेचे आहे.
माणसाचा मेंदू हा फार गुंतागुंतीचा आहे . त्यामुळे एका आजारावर औषध घेताना त्याचा मेंदूवर विपरित प्रभाव आणि त्यातून सुईसायडल थॉट्स असेही होवू शकते. इथे अमेरीकेत काही प्रकारच्या औषधांसोबत साईड इफेक्ट्सच्या यादीत 'सुईसायडल थॉट्स' असे लिहिलेले असते.
सध्याची परीस्थिती

>>>>>>सध्याची परीस्थिती
बाप रे!!! माझे डॉक्टर आग्रह करत होते मला. म्हटलं नाही.
काही डॉक्टरांना, उगाच गिनीपिग्ज हवे असतात. औषध कंपन्यांकडुन कमिशन मिळतं.

स्वाती२, पटले.
मला वाटते काही बाबतीत तो एक क्षण नसून एक मोठी प्रोसेस असते, अनेक असे क्षण त्यांनी आधी टाळलेले असतात. समस्या, परिस्थिती, कौटुंबिक संबंध खूप गुंतागुंतीचे असू शकतात, आपल्याला माध्यमातून किंवा ओळखीत, नात्यात जरी अशी घटना घडली तरी लोकांकडून मिळणारी माहिती अपुरी असू शकते.

वजन कमी करण्याच्या औषधांमध्येही हे सुसाईडल थॉट्स येण्याचे दुष्परिणाम असू शकतात हे माहीत नव्हते.

मनोविकारांवरील औषधांनी सुद्धा हे दुष्परिणाम होऊ शकतात काही केसेस मध्ये. अगदी नैराश्यावरील औषधांमध्येही.
याचे प्रमाण कमी असले तरी नगण्य नाही. डॉक याची सूचना देतात रुग्ण आणि केअर टेकरला, आणि असे विचार येऊ लागल्यास लगेच भेटा सांगतात. रुग्णाकडून योग्य जागरूकतेची अपेक्षा धरता येत नाही, घरातील लोकांचीही तेव्हा परीक्षा असते. त्यात आधीच कौटुंबिक समस्या आणि तणाव असेल तर घरचे ही मानसिक तणावात असतात, रुग्ण घरी काळजी घेणाऱ्यावर विश्वास ठेऊन असेलच असे नाही. अशा अनेक पेड्या असु शकतात.

>>मला वाटते काही बाबतीत तो एक क्षण नसून एक मोठी प्रोसेस असते, अनेक असे क्षण त्यांनी आधी टाळलेले असतात. >> सहमत! बर्‍याच केसेसमधे टोकावर जावून काही ना काही कारणाने परतणे हे अनेकदा घडलेले असते. पूर्वीचे अयशस्वी अटेंप्टस असतात तेव्हाही या सगळ्याच्या भोवती जो स्टिग्मा आहे /कायदेशीर अडचणी आहेत त्या कारणास्तव बरेचदा लोकांना सांगताना 'अचानक घडले' असे सांगणे होते.

https://youtu.be/tAKJH-TkJXQ?si=sn-XLMOezpd8g6WF

जगभरचं शहाणपण असू दे , डोक्यातल्या रसायनांचा तोल गेला की काही कामाला येत नाही .

अटेन्शन सिकिंग वाटेल तरी सांगते , परवा पाळीचा दुसरा दिवस असेल , पाऊण तास हमसून रडणं झालं त्यानंतर संध्याकाळपर्यंत डोकं ठणकत होतं . काल काही कारण नसताना अतिशय प्रसन्न मूड होता , काहीतरी वाचलेलं , ऐकलेलं आठवून सारखं हसू येत होतं , इतका चांगला मूड असण्याचं बाह्यतः काही खास कारण नव्हतं म्हणून ते लक्षात आलं नाहीतर चांगला मूड आपण क्वचित नोटीस करतो , चांगला मूड गृहीत धरला जातो .... आज पुन्हा 15 - 20 मिनिटं रडण्याचा कार्यक्रम ... दर महिन्याला पाळीच्या दिवसातच हा प्रकार होतो , 2 - 4 वेळा धो धो रडू , जीव जावा ही तीव्र इच्छा ..

बाकीचे 25 दिवस बऱ्यापैकी नॉर्मल असतं . अति झालं आणि हसू आलं असला प्रकार आहे . आपण अक्षरशः रसायनांवर चालणारं यंत्र आहोत हे ज्ञान काहीवेळा घाबरवतं , काहीवेळा रिलीफ वाटतो - नेमकं कारण मूड स्विंग्जचं माहीत असल्यामुळे . पूर्वी हेच 12 महिने पूर्ण 30 दिवस अखंड चालू असायचं ते आता अवघे 4 दिवस फार कमी प्रमाणात अनुभवाला येतं .

ज्यांना कोणाला हा त्रास सततचा आहे त्यांच्याबद्दल फार फार दया येते ..

ते पूर्वीपासून होतंच , आता कंट्रोलमध्ये आहे एवढंच . त्या विषयावर सगळं पूर्वीच्या धाग्यावर बोलून झालेलं आहे , पुन्हा नको . I'm fine . Don't worry .