डायरीतलं पान - १. आम्ही परीक्षा देतो

Submitted by नवदुर्गा on 19 January, 2024 - 02:45

काय आहे ना, उगाच नमनाला घडाभर तेल नको म्हणून मी थेट विषयाला हात घालणार आहे. तसंही, नंतर अधूनमधून विषयांतर होईलच. मग जरा अजून पुढे गेलं की विषयांतरातून 'मूळ विषय शोधा' हेही होणारच आहे. मग आतापासून कशाला वेळ असा वाया घालवू?
तर, मुद्दा असा, की माझा हा डूआयडी आहे असं तुम्हाला वाटलं तर वाटू द्या. पण मला खरी ओळख इथे देऊ नका ही विनंती. माझ्या कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ नयेत यासाठी.

पुढे, थेट गोष्ट अशी, की मी एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवते. इथे मला रोज भारीपैकी अनुभव येतात. जगावेगळे नाहीतच, पण मांडावेसे वाटतात. आणि ते एक शिक्षक म्हणून, एक हितचिंतक म्हणून आणि कधीकाळची आणि काही कारणाने आताही स्वतःला विद्यार्थिनीच मानते (अप्रेझलसाठी दर सेमिस्टरला एनपीटेलचे कोर्सेस आणि अभ्यास-परीक्षा असतात म्हणून) त्याही दृष्टीकोनातून इथे सांगणार आहे.
तर, मोरया!!

**********
स्थळः प्रॅक्टिकल लॅब. संगणक विभाग.
पात्रयोजना : मी, संगणक विभागाचे तिसर्‍या वर्षाचे विद्यार्थी.
वेळ : परीक्षा जवळ आल्यामुळे/ प्रत्यक्ष चालू असल्यामुळे आणीबाणीचीच

अबकड : मॅडम, फोल्डर सेव्ह कसं करू? उबंटूवर कधी काम नाही केलंय.
मी: (आश्चर्याचा धक्का कमी झाल्यावर) तू थर्ड इअरचा ना? मग मागच्या वर्षी कशी केलीस लॅब ? आपण सगळीच प्रॅक्टिकल्स उबंटूवर घेतली आहेत. नियम आहे विद्यापिठाचा तसा.

भयाण शांतता.
मी प्रोसिजर सांगते. मुलं करतात. वेळ निभली म्हणून उभयपक्षी निश्वास! परीक्षेच्या वेळी फोल्डर करेपर्यंत प्रगती झालेली असते. कसंबसं प्रॉब्लेम स्टेटमेंट सोडवता येतं. मग परीक्षेचा म्हणून बॅक अप घेताना ते फोल्डर कुठे शोधायचं असा पुढचा प्रश्न मी सोडवते. कारण तेव्हा वातावरण तापलेलं असतं. आरडाओरडा करणं योग्य नसतं. मुलं कायमच हरवलेली, हुकलेली असतात! १०% मुलं लक्ष देऊन प्रॅक्टिकल करतात. बाकीची नुसती येऊन बसतात. आजकाल गिटहबवरून कुठलाही कोड मिळतो या भरवशावर स्वतः निष्क्रिय झालेली तरुणाई बघितली की पोटात तुटतं...
मग सुरू होते तोंडी परीक्षा. हिंदी, मराठी, इंग्लिश अशी ज्या जमेल त्या भाषेत!
परीक्षकः कुठला आहे प्रोग्राम?
अबकडः ...... (हे तरी सांगता येतं!)
पः काय करतात यात?
अबकडः .... (हेपण जमतंय की!)
पः ... (अजून काही सोपे प्रश्न)
अबकडः ... (जमेल तशी खिंड लढवतोय/ लढवतेय).
मी: (मनात- हे मी क्लास आणि लॅबमधे शिकवताना घसा बसेपर्यंत घोटून घेतल होतं... Sad काय उपयोग! का लक्ष देत नाहीत पोरं!! मी हताश. मीच कशाला, ज्यांनी ज्यांनी म्हणून मनापासून शिकवलेलं असतं ते सगळेच हताश, हतबल. काहीच झेपत नाहे म्हणून मुलं निर्विकार. "हे असंच असतं. अगदी चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजात गेलात तरी हेच! असा विचार मनात करून परीक्षकसुद्धा निर्विकार. )

२-३ दिवसांनी -
अ : मॅडम, माझं बॅक राहील का? (म्हणजे बॅकलॉग लागेल का.)
मी: ते कसं सांगणार? रिझल्ट आला की कळेल ना.
अ : नाही ते काये ना, जरा प्रॉब्लेम झाल्ता. घरी थोडे इशूज आहेत...
मी: बाकी सब्जेक्ट्स ना पण प्रॉब्लेम आला का?
अ: (गप)
मी. मग याच सब्जेक्टला का? (ही सबजेक्ट खरंच अवघड अस्तो हेच एकमेव कारण मला माहितेय. बाकी सब मोहमाया)
रिझल्ट लागतो. बाळ्या काठावर पास असतो.

******************
स्थळः लॅब मधे, अशीच एक ओरल परीक्षा.
वेळ : आणीबाणीची
पात्र : तशीच.

पः हं, सांग असेम्बलर डायरेक्टिव म्हणजे काय?
अ: (आं? हे काय असतं? क्लीन बोल्ड!) सर असेम्बलर डायरेक्टिव्ह म्हणजे..(आणि थापा सुरू)
हे असेम्ब्लर डायरेक्टिव्ह पहिल्या युनिटच्या १-२र्‍या प्रॅक्टिकलमधेच सांगितलेलं असतं, कारण त्याशिवाय कमांड्स सुरूच होत नसतात. त्यामुळे कोड समजायला हवा तर हे बेसिक ज्ञान हवंच. मग तेव्हा काय झोपला होतास का रे बाळ्या???
अशी २०० मुलं त्या २ दिवसांत सहन करायची असतात! (मॅडम, उडवा लवकर घेऊन.. कुठे खेळत बसताय अवघड कायकाय विचारून! - शिपाई. हे परमज्ञानी असतात.) आम्ही विद्यापिठाला "नातिचरामि|" चं वचन देऊन बसलेलो असतो. शिवाय विद्यापिठात रिपोर्ट द्यावाच लागतो. २ दिवस सकाळी ९ ते संध्याकाळी ५ यात सगळा कार्यक्रम संपला की आमचेच मेंदू बधीर होतात. का? कारण "आम्ही परीक्षा देतो!"

*******************
स्थळ : लेखी परीक्षेचा हॉल.
वेळः सकाळी किंवा दुपारी, जेव्हा पेपर असेल तेव्हाची.
पात्र: तीच सगळी.

मी : "आन्सरशीटवर "इन्फर्मेशन" कॉलममध्ये काय काय लिहायचंय सांगते, नीट ऐका.
तारीखः आजची. विषयः तुमचा जो पेपर आहे तो. मिडिअम ऑफ आन्सरः इंग्लिश" (हे लिहायला निम्मी मुलं विसरतात. मग सुपरवायझर म्हणून मी सही करताना प्रत्येक पोरापाशी माझा खोळंबा) पण आता खरा गेम. "पेपर कोडः क्वेश्चन पेपर वर इथे जो कोड लिहिलाय (मी पेपर उंच करून तो कोड नीट दाखवते) तो लिहा. संपूर्ण लिहा, ब्रॅकेटसकट." मुलं अर्धी हरवतात. लिहित नाहीत. सहीच्या वेळी पुन्हा खोळंबा. "कॉलेज कोडः**** "
मी नीट सांगते. मुलं नीट दुर्लक्ष करतात. पुन्हा खोळंबा.
"सीट नंबर स्वतःचा, याच वर्षीचा नीट लिहा. फिगर्स आणि वर्ड्स, दोन्ही नीट लिहा."
हे जमतं कारण शेवटी मार्क्स याच नंबरने मिळतात ना! बाकी सब मोहमाया.

मग यथावकाश एखादी चिठी सापडणे, हाता-पायावर लिवलेलं काहीबाही, खाणाखुणा वगैरे... मग पेपर काढून घेऊन एक्झाम सेक्शनला मुलांना पाठवून देणे वगैरे कार्यक्रम एखाद्या तरी वर्गात घडतोच.

पुरवण्यांचे दोरे नीट टो़क जुळवून साधी पण पक्की गाठ मारणे हे बेसिक स्किल आहे याचा विसर पडतो मुलांना. दोन टोकं जुळवायची आणि एक गोलाकार करून त्यातून ती टोकं एकसारखेपणाने ओढून पक्की गाठ मारायची यात न समजण्यासारखं किंवा कथीण काय आहे हे मला अजूनही समजलेलं नाही. हे मी शाळेत इfunction at() { [native code] }ता ५वीत शिकले होते.

एकूणच, परीक्षा ही साधी सरळ परीक्षा न रहाता आमचीही सत्त्वपरीक्षाच ठरते. इतकं करून, ६०% च्या वर मारकं मिळालेली पोरंही कॅम्पस ड्राईव्ह ला डिसक्वालिफाय होतात आणि मग निराश होऊन शून्यात बघत असतात. जेव्हा आम्ही "टेक्निकल सेमिनार द्या.... कामापुरतं तरी बिनचूक इंग्रजीतून सेमिनार द्या.... नीट स्वतः वेळ देऊन स्लाईड्स तयार करा... प्रत्येक मुद्द्यासाठी 'असं का?' याचं नीट उत्तर तुमच्याकडे तयार ठेवा. नुसतं गुगलत बसू नका... स्वतः कष्ट करा, उत्तरं मिळवा.." असं कानीकपाळी ओरडलो तरी "चलता है यार...चिल मार!! ती बाई/ तो सर फक्त ओरडायचाच पैसा घेते/ घेतो" असं आपसांत बोलतात (दुर्दैवाने ते आम्हाला ऐकू येतं आणि सुदैवाने आम्ही दुर्लक्ष करतो!!) आणि तशाच अ‍ॅटिट्यूडने वागतात तेव्हा संताप होतो.

असो. इतकं असूनही आम्ही पुन्हा नव्याने, दरवर्षी आवडीचे विषय घेऊन क्लासवर जायला तयार होतो. लेक्चरच्या मधल्या रिकाम्या वेळात मनापासून अभ्यास करतो. नोट्स काढतो. स्लाईड्स तयार करतो. गूगल, चॅटजिपीटी वगैरे आम्हीपण वापरतो. पण शेवटी आपलं नॉलेज महत्त्वाचं हे अंतिम सत्य आम्हाला माहितेय. बाकीचे सगळे सपोर्ट्स आहेत, मुख्य सिस्टिम नाही. मुख्य सिस्टिम आपण माणसं आहोत हे खरं.
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावयः | असं म्हटलं गेलंय. कितीही त्रास वाटला तरी याच कामात आनंद मिळतो. तो जो त्रास असतो तोही याच कामात होतो तेव्हा सहन होतो, इतर कामातला होईल असं वाटत नाही. जे काय असेल ते इथे असो असं वाटतं म्हणून मी काम करते. परीक्षेचा मस्त रिझल्ट घेऊन, प्लेसमेंटचे पेढे घेऊन वगैरे मुलं येतात तेव्हा जे वाटतं ते फार मस्त असतं.
"मॅडम तुम्ही तेव्हा रागावलात म्हणून मी रडले होते, पण तुमचं पटलं. मी तसाच अभ्यास केला आणि बघा ना मस्त ग्रेड्स आल्या" असं एखादी बाळी म्हणाली की सार्थक झालंय असं वाटतं.
याचिसाठी केला होता अट्टाहास...

मग मी सज्ज होते पुन्हा नवीन पान लिहिण्यासाठी!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या कॉलेज मधे बहुतेक शिक्षक हे निव्वळ माठ असतात. अक्कल शून्य, मुलांना शिकवण्याची लायकी नाही. एखादा विषय आवडून देण्याची क्षमता नाही. मुलांच्या मानसिक अवस्थांची जाण नाही. आम्हाला कॉलेज मधे असे शिक्षक होते त्यामुळे कायम सगळ्या विषयांत अरुची निर्माण झाली. माझ्या अनेक मित्रांचे असेच आहे आणि ते आता कंपन्यांचे डायरेक्टर वगैरे झालेले आहेत.

मात्र कॉलेज नंतर काही शिक्षक असे लाभले की त्यांनी माझे पूर्ण टर्न अराउंड केले.

त्यामुळे शिक्षक भारी असेल तरच विषय आवडतो आणि गती निर्माण होते. शिक्षक होणे हे काही अक्वायर्ड स्किल नाही असे माझे मत आहे. कदाचित तो गुण घेऊनच जन्माला यावे लागते.

मला खात्री आहे की तुमच्या वर्गात १०० टक्के मुलं पेंगत असणार.

मुलांना विचारता: असेम्बलर डायरेक्टिव म्हणजे काय?

एक उदाहरण देतो.

मघाशी मी ज्या शिक्षकांचे उदाहरण दिले त्यापैकी एक म्हणजे मला C शिकवणारे समीर पांडा सर.

पहिल्याच दिवशी त्यांनी ६ तासांचा क्लास घेतला.

सगळी मुळे चिडीचूप. स्तब्ध. त्यांच्यासमोर एक नवीनच अद्भुत काहीतरी तरंगत होते.

सुरुवात अशी :

( विद्यार्थी हे ऑलरेडी इंजिनिअरिंग डिग्री झालेले विद्यार्थी होते. )

सर लैपटॉपवर (प्रोजेक्टर सुरू)

१. हेलो वर्ल्ड प्रोग्राम C वरती. लिनक्स वर कमांड लाइन वरून vi vim वापरून फाइल उघडणे.

२. साधा हेलो वर्ल्ड प्रोग्राम टाइप करणे. (सरांचे टच टाइपिंग बघून विद्यार्थ्यांचे डोळे फिरतात)

३. तो कम्पाइल करणे. आणि रन करणे.

४. मग एखाद्या विद्यार्थ्याला विचारणे की बाबा काय झाले नेमके?

५. विद्यार्थी काहीतरी टेंप्लेट आंसर देतो. सर मिशिकिल हसतात.

६. मग सर म्हणतात. आपण आता थेट प्रोग्राम पासून सुरू करू. आधी ओव्हऑल आयडिया देतो की काय झाले नेमके.

७. मग सर थेट टोकन म्हणजे काय इथेच हात घालतात. मग प्रोग्राम म्हणजे काय, ही फाइल काय आहे, मेन काय आहे. असेच का? त्याचा रिटर्न टाइप काय आहे, मग स्ट्रिंग, प्रिंट्फ ही फंक्शन. हे फंक्शन कुठे डिफाइन केले आहे. ते std lib मधली एक फाइल काढून उघडून दाखवतात. वरती हेडर काय आहे आणि तो तिथे कसा आला, ती फाइल कुठे आहे, ते कसे काय चालले हे सांगतात. एक डिड तास यात निघून जातो. मुलं मंत्र मुग्ध.

८. मग आता gcc च्या खोलात जाऊन एकेक स्टेज कशी execute करावी हे शिकवतात. त्यात प्रीप्रोसेसर नंतर काय होते. मग असेंबलर नंतर काय होते. हे प्रत्यक्ष दाखवतात. म्हणजे ते ते आउटपुट जीसीसी ने काढून दाखवतात. तिहून ऑब्जेक्ट कोड पर्यंत येतात. त्यात मग मेन फंक्शन पासून उरलेले सगळे सिस्टम कॉल्स उघडून एसेंबली इन्स्ट्रक्टशन दाखवतात.

९. मग लिंकर, मग नंतर executable कशी तयार झाली हे प्रत्यक्ष दाखवतात.

१०. executable फाइलच्या आत काय असेल हे उघडून दाखवतात.

११. मग OS आता ती कशी रन करणार हे नीट समजावून सांगतात. त्यानंतर पाळी येते की OS तिचे सिस्टम कॉल कशी करते. ते कोणत्या स्पेस मधे होते. त्यासाठी प्रोसेसरचा कोणता मोड ऑन होतो हे सांगतात. असेंबली कोड कसा असतो तो कसा रन होतो हे नीट समजावून देतात.

१२. तिथून मग ती अक्षरे स्क्रीनवर कशी उमटतात ते दाखवायला device drivers, आणि त्यांच्या मार्फत हे सगळे कसे स्क्रीन पाशी येऊन थांबते हे उघडून दाखवतात.

१३. या सगळ्यात ५ ६ तास कधी गेले ते कळत नाही.

शेवटी म्हणतात : हा तुमचा हेलो वर्ल्ड प्रोग्राम.

आता उद्यापासून एकदम बेसिक पासून सुरू.

दुसऱ्या दिवशी सर आधी बायनरी सिस्टम शिकवतात. म्हणजे signed integer वगैरे काय या भानगडी.

शेवटी २s कॉम्प्लिमेंट वगैरे या गोष्टी नंतर लॉजिकल ऑपरेशन वगैरे यात तीन चार दिवस गेले.

मग सर पहिला खरा प्रोग्राम सुरू करतात.

त्यात एवढेच असते:

char a = -65;
printf("%c", a);

आता मग सर सगळ्या गमती उलगडायला सुरू करतात. एकेक गोष्ट एकदम बारीक बारीक.

यात १० दिवस जातात. गाडी अजून नुसती पहिल्याच स्टेज ला असते. परंतु आता डेटा टाइप म्हणजे कीस झाड की पत्ती असे असते.

मग हळू हळू गाडी एकेक मोठे विषय कब्जात घ्यायला सुरू करते.

सहा महिन्यांच्या शेवटी विद्यार्थी SFTP सारखे लहान प्रोटोकॉल स्वतः लिहीतील एवढे पारंगत झालेले असतात.

या लेखिका प्रोग्राम खडूने फळ्यावर लिहून देणाऱ्या अतिथोर शिक्षकांपैकी नसतील अशी आशा आहे.

असतील तर यांना आधी स्टुडंट व्हावे लागेल.

अनेक वाचकांपर्यंत मूळ मुद्दा पोहोचलाय हे बघून मला बरं वाटलं. (मतभेद असले तरी काहीच हरकत नाही) पण लेखनातून "मी काय करते/ कशी आहे/ जजमेंटल आही की नाही...." वगैरे पेक्षा बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टी पोहोचल्या हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.

सगळ्यांचे आभार.

मला इंजिनियरिंग कॉलेजमधले शिक्षक जर कुठे दिसले तर मी ओळख सुद्धा दाखवत नाही इतके सगळे शिक्षक नालायक होते. त्यांच्या तोंडावर तुम्ही मुलांना शिकवणे बंद करा, स्वतः आधी ACE academy किंवा तत्सम संस्थामध्ये जाऊन शिक्षण घ्या असे ओरडून सांगावेसे वाटते.

असे शिक्षक कोणालाही कधी लाभू नयेत. सगळ्या विषयांची माती करून टाकतात.

आम्हाला फर्स्ट इयरपासून कोडिंग शिकवलं गेलं ते रॉय यांनी लिहिलंय अगदी त्याचप्रमाणे! (तेव्हा त्याला प्रोग्रामिंग असा शब्द होता)
त्यामुळे सुरुवातीपासून ते डोक्यात पक्कं बसलं. त्याबद्दल गोडी निर्माण झाली.
नंतर फार काही ग्रेट कोड्स लिहिले असं नव्हे. अभ्यासक्रमात होतं तेवढं केलं. पण काही काही असाइनमेंट्स खूप चॅलेंजिंग होत्या आणि त्या पूर्ण करताना खूप मजा आली होती इतकं आठवतं.
असो.

माझे गणिताचे शिक्षक कमाल कमाल कमाल होते. एम के आणि आचार्य - फर्ग्युसन कॉलेज. गणित या विषयाची, काय अफाट गोडी लावली त्यांनी. व १० वी च्या गुप्ते क्लासच्या गुप्ते मॅडम.

वाचकांपर्यंत मूळ मुद्दा पोहोचलाय हे बघून मला बरं वाटलं. (मतभेद असले तरी काहीच हरकत नाही) पण लेखनातून "मी काय करते/ कशी आहे/ जजमेंटल आही की नाही...." वगैरे पेक्षा बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टी पोहोचल्या हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.
फारच संयत प्रतिक्रिया दिली आहे तुम्ही.
Congratulations

ललिता प्रीती, आताच्या शिक्षकांना एकतर मुलांचे मित्र व्ह्यायची घाई झालेली असते किंवा पाट्या टाकायच्या असतात. त्या नादात ते शिक्षकाचे मूळ काम विसरतात. ते म्हणजे शिकवणे. विषयाची गोडी लावणे. आणि हे काम स्वतः भरपूर कष्ट घेतल्याशिवाय शक्य नाही. नुसता अभ्यासविषय समजून घेऊन नव्हे तर तो मुलांना कसा समजावावा हे देखील कठोर अभ्यास्यानेच शक्य होते. आणि त्याला जन्मजात गुण लागतात.

आता शिक्षकाने मुलांच्या ओबेसिटी आणि तत्सम गोष्टींवर का पोस्टी पाडाव्यात हे समजत नाही. तेही एक रायचस भूमिका घेऊन. जेव्हा हे शिक्षक मुलांना असेंबलर डिरेक्टिव म्हणजे काय हे सांगता येत नाही अशी तक्रार करतात तेव्हा त्याचे खांदे धरून त्याला गदगदा हलवून विचारावेसे वाटते

अरे xxx तू आयुष्यात कधी एखादे असेंब्लर डायरेक्टिव वापरून एखादा प्रोडक्शन ग्रेड कोड लिहिला आहेस का? कधी चुकून एखादा चाळीस पन्नास हजार लायनींचा किंवा त्याहून मोठा कोडबेस जो खऱ्या मल्टी प्लेटफॉर्मवर क्रॉस कम्पाइल होतो ते पाहिला तरी हाईस का आयुष्यात ? एखादा ओपन सोर्स प्रोजेक्ट स्वतः हाताळला तरी आहेस का?

तुझ्या पुस्तकात असे लिहिले आहे आणि तुला ते एक माहिती आहे म्हणून तू मला एक फॅक्चुअल प्रश्न विचारू शकत नाहीस. मी रट्टा मारून त्याचे उत्तर देऊ शकतो पण शेवटी ते फक्त माझे मॅमोइझेशन तपासणे झाले. मग तेच तपासायचे असेल तर मी विद्यार्थी म्हणून असंख्य बारीक सारीक गोष्टी सांगू शकतो ज्या माझ्या मेमरीच्या उत्तम क्षमतेचे अचाट दर्शन घडवू शकतात.

Pages