उनाडलं मन... एक नवी सुरवात.

Submitted by deepak_pawar on 16 January, 2024 - 23:13

कविता लिहायच्या, आपणच खर्च करून कवितासंग्रह काढायचा आणि पुस्तकाच्या दुकानात पुस्तक विकायला ठेवा म्हणून विचारायला गेलं तर “कवितेची पुस्तक कुणी घेत नाहीत म्हणून,” उत्तर मिळणार, मग आपली पुस्तकं आपणच लोकपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करायचा. काही जण विकत घेतातही काही अशीच ज्यांना आपण पुस्तक देतो ते तरी वाचतात की नाही हा प्रश्न? जर लोकं आपल्या कविता वाचणार नसतील तर का लिहायच्या कविता? हा प्रश्न बरेच दिवस डोक्यात घोळत होता, त्यापेक्षा आपण गद्य लेखन केलेलं बरं. गद्य लेखन जरा बऱ्यापैकी जमायला लागलं, लोकांना आवडत ही होतं. पण कविता काही माझी पाठ सोडत नव्हती, आणि एके दिवशी डोक्यात विचार आला आपण कविता लिहितो त्यापेक्षा गीतकार म्हणून प्रयत्न करायला काय हरकत आहे. पण सुरवात कशी करायची? मी कविता लिहीत होतो आणि कुसुमाकर मासिका साठी पाठवत होतो, कधी मायबोली वर लिहीत होतो. पण कधी कोणत्या कार्यक्रमाला न गेल्यामुळे माझ्या फारशा ओळखी होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे कुणी मार्गदर्शन करणारं ही नव्हतं म्हणून गूगल आणि यूट्यूब वरून थोडीफार माहिती मिळवली, गूगल वरून काही डायरेक्टर, प्रोड्यूसरचे ईमेल आयडी मिळवून बऱ्यापैकी असणाऱ्या भावगीत प्रकारच्या रचना पाठवून देत होतो. पण कुणाकडून ही काही उत्तर येत नव्हतं, तरीसुद्धा कुठून कुठून नंबर शोधून कविता पाठवतच होतो. हळूहळू प्रतिसाद मिळू लागला पण कुणाला “सैराट” सारखं गाणं हवं असायच तर कुणाला “ओ शेठ” काही मंडळी अजूनही सैराट मध्ये अडकून होती. पण एक गोष्ट कळली की लोकांना जसं हवं तसंच लिहायला हवं,त्याप्रमाणे ते सांगतील तसं लिहायला लागलो. कुणाला आवडत होतं आपण हे गाणं करायचं आहे म्हणून काहीजण सांगायचे ही, पण पुढं काहीच घडत नव्हतं. आता पर्यंत कळून चुकलेलं आपल्याला वाटलं होतं त्यापेक्षा कितीतरी अवघड आहे या क्षेत्रात सुरवात करणं, पण तरीसुद्धा प्रयत्न सोडले नाहीत आणि आता एक गाणं तयार झालं. ही जरी छोटीशी सुरवात असली तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, आणि जरी मी माझ्या कवितांना न्याय देऊ शकलो नाही तरी, गाण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते करायचे म्हणून हा लेखनप्रपंच.
एकदा गाणं नक्की ऐका आणि कसं वाटलं ते कळवा ही नम्र विनंती.

दीपक पवार.
https://youtu.be/J_D0qT8TrzI?si=QcqoYl0WReU218Y6

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बऱ्याच जिद्दीने /मेहनतीने काम करत आहात.
गाणं ऐकलं छान झालं आहे.
सध्या अशा गाण्यांचे मार्केटही आहे. (चांगले असणे आणि त्याचे मार्केट असणे दोन्ही महत्वाचे आहे. मार्केट तयार करणे ही पुढची स्टेप.)

पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा.

नविन सुरुवात मस्त झालीयं.. छान गीत आणि सादरीकरणही उत्तम..!
पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा दिपक तुम्हांला..!!

गाणं एकदम भारी झालय. मस्त म्युझिक दिलय तुम्ही. अगदी फ्रेश वार्‍याची झुळुक.
बरेच दिवस दिसला नाहीत तुम्ही. खूप मेहनत करा आणि यशस्वी व्हा. मेहनतीबरोबर, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही छक्केपंजे ओळखण्याचे, योग्य लोकांचीच संगत धरण्याचे, लोकांचे ईगो सांभाळण्याचे स्किल्स लागतात - त्यावरही जरुर विचार करा. अनेकदा भावनेच्या पोटी आपण 'लुझर्स' ना वेळ देत बसतो जे की व्यावसायिक गणितात फेल करते. तेवढे टाळा.
माफ करा सल्ला आवडला नसल्यास विसरुन जा. पण द्यावासा वाटला कारण तुम्ही आवर्जुन माझ्या धाग्यांवर प्रतिसाद देता. यु आर व्हेरी काईंड.

रूपालीजी, किल्ली जी,सामो जी, Sparkle ji सर्वांचे मनःपूर्वक आभार.
हरचंद पालव आपण नेहमीच माझ्या पोस्टला प्रतिसाद देता त्याबद्दल मनःपूर्वक आभार.
सामो मॅडम आपण केलेल्या मार्गदर्शना बद्दल मनःपूर्वक धन्यवाद. खरं तर मला मायबोली करांकडून नेहमीच मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळालं आहे. जेव्हा एखादी कविता किंवा कथा पोस्ट करायची असते तेव्हा प्रथम मी मायबोलीवर पोस्ट करतो. आणि इथून आलेले प्रतिसाद पाहूनच दुसऱ्या ठिकाणी पोस्ट करतो. त्यामुळे खर तर मायबोलीकरांचे मनःपूर्वक आभार.

लंपनजी, स्मिता२०१०जी, अस्मिताजी, स्वाती_आंबोळेजी, स्वाती२जी, सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.