इज्जत

Submitted by बिपिनसांगळे on 26 November, 2023 - 10:59

इज्जत
------------------------------------------------------------------------------------------------------

सकाळचे दहा वाजलेले. दिवसाचं रहाटगाडगं फिरायला लागलेलं. चोहीकडे माणसंच माणसं. सगळ्याच प्रकारची . भिन्नलिंगी ! लोकांची धावपळ, रस्त्यावरची गर्दी वाढू लागलेली. वाहनांची घाई, ब्रेक्सचे आणि हॉर्नचे कर्कश्श आवाज वातावरण व्यापून उरलेले. थोडी मोकळी हवा असल्याने सकाळ मात्र प्रसन्न होती.

त्या सगळ्या धबडग्यातून तो निवांत चालला होता. त्याचाही धंद्याचा टाईम होता.

सावळा रंग. रेखीव चेहरा. अंगावर झिरझिरीत पण हलक्यातली साडी. फ्लोरोसंट पोपटी रंगाची आणि काळा ब्लाऊज. खाली हिल्सचे सॅंडल्स. वर केसांचा मागे बांधलेला; पण खोटा असल्याचं कळणारा अंबाडा. कपाळावर लावलेली भली मोठी लाल टिकली. तशाच रंगात भडक रंगवलेले ओठ. डोळ्यांना भसाभस फासलेलं काजळ. खांद्याला झगमगीत चंदेरी पर्स. ठुमकत चालणं.

पण त्या चालण्यातला , चेहऱ्यातला पुरुषीपणा न लपणारा. कटिभागावर नजर गेली तर तो स्त्रीचा नाही हे जाणवून देणारा बांधा .

तो एक तृतीयपंथी होता.

तो एका दुकानात शिरला. आत व्हॅनिलाच्या वासाच्या उदबत्तीचा सुवास दरवळत होता. नोकर देवांच्या फोटोची पूजा करत होता. त्यानेही तिकडे बघून हात जोडले. मग त्याने त्यांच्या विशिष्ट पद्धतीने कडक टाळ्या वाजवल्या. नुसत्या बसलेल्या ढेरपोट्या दुकानदाराने गल्ल्यात वेगळ्या ठेवलेल्या नाण्यांच्या वाटीतून एक नाणं काढलं व त्याला दिलं. त्याने ते घेतलं नाही.
तो घोगरट आवाजात म्हणाला,” ए शेठ, मै क्या भिकारी लगताय क्या रे? रख तेरेकुच. मेरी हाय मत ले!”
त्यावर शेठजीने नाराजीने त्याला एक दहाची नोट काढून दिली.

कधी पैसे मिळायचे तर कधी नाही. कधी माल मिळायचा तर कधी भीक. लोक भीक दिल्यासारखे पैसे काढून द्यायचे. त्यावेळी त्याला काळीज कुरतडल्यासारखं वाटायचं. त्याला वाटायचं की आपण पैसे मागत असलो तरी आपण भिकारी नाही. छक्का असलो तरी आपल्यालाही इज्जत आहे ...

तो पुढे चालू लागला. लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने पहात. काहीजण तुच्छतेने, टवाळ तरुण पोरं घाणेरड्या नजरेने. लहान मुलांना त्याचं वेगळेपण विस्मयकारक वाटत असे. बायका पाहून न पाहिल्यासारखं करीत. त्या बायकांच्या नजरेत आश्चर्य असे, दयाही अन भयही.

तो एका पान टपरीवर गेला . पुढेच चकाचक , शंकराची पितळी मूर्ती होती. तिच्यापुढे लावलेल्या धूपकांडीचा जाडसर धूर वेटोळत फिरत होता. बाजूला सिगरेटींचा धूर ! सिगरेटी फुंकणारी पोरं बाजूला सरकली. टपरीवाला त्याला ‘आगे जा’ म्हणाला. तशी त्याने त्याची साडी गुडघ्यापर्यंत वर केली. वॅक्सिंग केल्याचं कळणारे त्याचे पाय उघडे पडले . ती धंद्याची गरज होती.

“ देता के नही? क्या करू और उपर?” तो म्हणाला.

त्यावर तिथे थांबलेल्या एका दांडगट पोराने याची साडी धरली आणि याला म्हणाला “ चल , ले उपर. दिखा तेरा टिकटॉक ! “

त्यावर काळुंद्रा , डोक्याला चपचपीत तेल लावलेला टपरीवाला व बाकीची पोरं फिदीफिदी हसली.
त्यावर हा म्हणाला, “ ए, इज्जतसे बात करनेका ! “
“ इज्जत ? और तेरी ? “ दांडगट उपहासाने म्हणाला, " पावली कम साला ! "
त्यावर याने रागाने त्या मवाल्याचा हात धरला व झिडकारला.याची ताकद पाहून तो दांडगटही जरा गप्प झाला. याने त्या टपरीवाल्याच्या तोंडावर टाळ्या वाजवल्या व घाणेरड्या, त्यांच्या ठेवणीतल्या शिव्या देत तो तिथून निघाला. टपरीवाला गप्प बसला. त्याच्या जागी दुसरं कोणी असतं तर टपरीवाल्याने धरून हाणलं असतं.
तरी जाताना तो एक डायलॉग मारूनच पुढे निघाला , " धूप कायको लगाता बे ? धूप लगाके रूप नही आता !”
त्या विनोदावर पुन्हा बाकीची पोरं फिदीफिदी हसली. टपरीवाल्याच्या अवताराकडे पहात.

तो तिथून निघाला ; पण दुखावल्या मनाने... का आपल्याशी असं वागतात लोक ?

पुढे तो एका मिठाईच्या दुकानात शिरला. त्याने टाळ्या वाजवल्या . मालक त्याच्याकडे पहातच राहिला. हा आपल्या दुकानात पहिल्यांदाच आलाय , त्यानं लगेच ओळखलं . तशी त्याची नजर याच्या अंगावरून वळवळत सारीकडे फिरली . याला आता अशा गोष्टींची सवय झाली होती. याने त्या आंबटशौकीन मालकाकडे नजर रोखून पाहिलं. तशी त्याने नजर वळवली. गल्ल्यात हात घातला व एक शंभराची नोट दिली.

एकदम शंभराची नोट दिसल्याने त्याचे डोळे चमकले. ती नोट त्याने काळजीपूर्वक ब्लाउजच्या आत ठेवली.

“ वापस आयेगा ना? आना जरूर,” एका वेगळ्या अपेक्षेने मालक म्हणाला. त्या हलवायाला स्वतःच्या घरातली मिठाई आवडत नसावी !...त्याने ती नोट उगा दिली नव्हती . पैसा पैसा करणाऱ्या त्या जाड्याने ती नोट दिली तेव्हा त्याच्या डोक्यात त्याचा पुढचा हिशोब , पुढची वसुली होतीच. तो त्या ढेरपोट्या, प्रौढ मालकाकडे पहातच राहिला. काय करावं ते न सुचून त्याने पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवल्या आणि तो तिथून निघाला .

वाटेत एक वडापावची गाडी लागली. खमंग वास सुटला होता . सकाळचा चहा- बटर सोडलं तर त्याच्या पोटात काही नव्हतं . पोटात कावळे कोकलत होते . काहीतरी करून तो खड्डा भरायला पाहिजे होता . त्याने ऐटीत दोन वडापाव घेतले, ते खाल्ले. पुढे चहाच्या टपरीवर एक कटिंग चहा घेतला. चहा देणारी बाई होती. नशीब ! तिने याला हसून कप हातात दिला . तिने काही अनमान केला नाही की वेगळी वागणूक दिली नाही . कदाचित ती स्वतः स्त्री असावी म्हणून ? ... पण त्याला बर वाटलं .

चहाला आलं आणि वेलचीचा मस्त वास येत होता . त्याने तो चहा मिटक्या मारत प्यायला . त्याने तिला “ बरकत आयेगी ! “ म्हणून दुवा दिली .

तो निघताना एक भिकारी तिथे आला . त्याला हसून चहा देणारी ती चहावाली त्या भिकाऱ्याला ओरडली . हाकललंच तिने त्याला . त्याला आता त्या बाईचं आश्चर्य वाटलं. त्याने मागे वळून त्या भिकाऱ्याकडे पाहिलं तेव्हा त्याला वाईट वाटलं.

आसल भिकारी , चायपण देऊ नका त्याला . पर जनावरासारखं हाकलू तरी नका त्याला . साला ! भिकाऱ्याला इज्जत नाय अन आपल्यालाबी ! हे जग प्रत्येकाला एक माणूस म्हणून का वागवत नाय ?
आणि मग त्याला वाटलं , आपण स्वतःला त्या भिकाऱ्यापेक्षा भारी समजतो , मग आपलं तरी चूक हाय का बराबर ? तो विचारात पडला .

तो एका टपरीवर गेला व त्याने गुटखा मागितला . टपरीवाल्याने खाली लपवलेल्या पिशवीतून त्याची पुडी काढून दिली. कारण त्याच्यावर म्हणे बंदी होती. म्हणून रेटपण जास्त . ब्लॅकमध्ये .

रस्त्यावर पचापच थुंकत, मुखरसाच्या लाल पिचकाऱ्या टाकत तो पुढे निघाला. रस्ता लाल करत . त्याचं थुंकणं असं होतं की जणू तो दांभिक समाजावरच थुंकत पुढे चाललाय. तुच्छतेने , बेदरकारपणे .

वाटेत त्याला समोरून बुलेटवर फटफट आवाज करत येणारा, त्याच्याच गावातला शंकरअण्णा दिसला. तसा तो चमकला. याला त्याच्या नजरेस पडायचं नव्हतं . नजर चुकवून तो भरभर चालू लागला . जसा गाववाला गेला, तो पुन्हा निवांत चालू लागला .

तो बायकांच्या चालीने चालत असला तरी त्याचं चालणं लपत नव्हतं. त्याचं सावळं शरीर नाजूक नव्हतं. तो चांगला भरलेला होता . त्यामध्ये स्त्रियांचा नाजूकपणा अर्थातच नव्हता. तो चालत राहिला. टपऱ्यांवर, अड्ड्यांवर, दुकानांमध्ये. लोकांची कुचेष्टा , घाणेरडे टोमणे , घाणेरड्या नजरा झेलत.

एके ठिकाणी मवाली पोरांनी त्याची छेड काढली . तशा याने त्यांना घाणेरड्या शिव्या दिल्या . त्यावर त्या पोरांनी याला खूप मारलं . याने प्रतिकार केला पण काही चाललं नाही. ते सात-आठ जण होते. त्यात याची साडी फाटली. अंगाला मुका मार लागला. तसे काही बघे मध्ये पडले. त्यांनी त्याला सोडवलं .

तो मानहानी झाल्यासारखा चालू लागला . हरल्यासारखा . त्याला वाटलं, तो एक कुत्रा आहे. गल्ली चुकलेला , एकाट . दुसऱ्या कुत्र्यांच्या हद्दीत घुसल्यासारखा. मग त्या कुत्र्याला त्या गल्लीतली कुत्री जशी घेरतात तसं ! ...एक घाणेरडं , मळकट कुत्रं खरोखरी त्याच्या अंगावर धावून आलं . तोंड विचकत भुंकू लागलं. त्याने कसंबसं त्याला हाकललं. नशीब . त्यांची गॅंग नव्हती . एकटा पडलेल्या माणसाला भटकी कुत्रीही घेरतात ... अन… ते गेलं तसा त्याने सुस्कारा सोडला .

वाटेत त्याला एक तृतीय पंथीयांची दुसरी टोळी आडवी आली. ते सगळे याच्याकडे मारक्या नजरेने पाहत निघून गेले त्याला वाटलं , आपलेच जर आपल्याला समजून घेणार नसतील तर मग सारंच अवघड आहे .
ऊन वाढलं होतं . तेही चटके देतच होतं .

तो असाच चालत राहिला. दिशाहीन.

संध्याकाळ झाली. वातावरणात पुन्हा लगबग होती . सकाळचा निवांतपणा आता हरवला होता, दिवसाचा स्वच्छ प्रकाश हरवल्यासारखा. आकाशात उगा चुकार ढग जमले होते. उदासीचा संध्याराग आळवत .

त्याच्यापुढे एक तरुण बाई चालली होती. तिच्या खांद्यावर गोंडस बाळ होतं. ते आईच्या लयीत हलणाऱ्या अबोलीच्या गजऱ्याकडे पहात होतं. त्याला बाळाची गंमत वाटली. त्याने त्या बाळाला हात दाखवला. ते निरागस हसलं. यालाही आनंद झाला. याने तोंडाने आआ असा आवाज काढून त्या बाळाचं पुन्हा लक्ष वेधून घेतलं. त्याच्या आईला ते कळलं. तिने मान वळवून आश्चर्याने, रागाने त्याच्याकडे पाहिलं. आणि बाळाला आणखीच कवटाळत ती भरभर चालू लागली.

तेव्हा त्याला वाईट वाटलं. अगदी मनापासून. तो चालत राहिला. दमून एका फुटपाथवर बसला. त्याच्या मनातून ते बाळ जाईना. त्या निरागस बाळासाठी तो फक्त एक माणूस होता… समाजाला नकोसा वाटणारा अन पाहिजेही असणारा एक तृतीयपंथी नाही. म्हणून त्या बाळाची शुध्द नजर त्याला आठवत राहिली. त्याला वाटलं , सगळे असेच निष्पाप काळजाचे असते तर ? … पण ही XXXX दुनियादारी चालली नसती ना .

त्याला पुन्हा वाईट वाटलं. अंगावरचे ते कपडे फेकून द्यावेसे वाटले. त्याला खूप चीड आली. स्वतःची, परिस्थितीची.

काय ही आपली बदतर जिंदगी ! ... का जगूच नये ? ...

त्याने वैतागून डोकं खाजवलं. उघडी पडलेली पाठ उगा खाजवली . डोक्यात विचार तुंबले की तो असाच इथेतिथे खाजवत राही . त्याला तो एक चाळाच लागला होता . त्याने सरळ ब्लाउजमध्ये हात घातला आणि कराकरा खाजवून घेतलं . आणि हात वेडेवाकडे करत विचित्र आळस दिला.

सूर्याची किरणं तिरकी होत गायब झाली. अंधार पडला, वाढू लागला. आता मघाचे चुकार ढग आणि मोकळं आकाश दोन्ही एकच झालं होतं .

तो जिथे बसला होता अजून तिथेच होता. त्या रस्त्याला, त्या फुटपाथला काहीच गर्दी नव्हती. वर्दळ नव्हती. माणसांची आणि गाड्यांचीसुद्धा. तो एक मुख्य रस्त्यापासून आत वळलेला रस्ता होता. फक्त घरं असलेला, दुकानं नसलेला. खूप लांबवर जाऊन तो दुसऱ्या मुख्य रस्त्याला मिळत होता. रस्त्याला दिवे असले तरी अंधुक प्रकाशाचा.

तो समोर पाहत होता. मध्येच तो फुटपाथवर मागे सरकला. मागच्या भिंतीला टेकून बसला. तसं बसल्यावर त्याला बरं वाटलं. अंगातला ताण कमी झाला आणि विचारांचं ओझंही कमी झाल्यासारखं वाटलं. पण भिंत खडबडीत होती. त्याच्या आयुष्यासारखीच ! ती टोचू लागली तसा तो तिथेच लवंडला. वर असलेल्या पिंपळाच्या फांद्या पहात. वाऱ्याच्या झुळकेने हलत असलेल्या पानांकडे पहात. मध्येच पानं हलली की वर चंद्र दिसत होता. किती शांत वाटत होतं जिवाला. पण … सकाळच्या माराचं अंग दुखत होतं. शरीराची ठसठस जास्त होती की मनाची ? ते सांगणं अवघड होतं .

आयुष्यही इतकं शांत असतं तर किती बरं झालं असतं, त्याला वाटलं. तो आठवणींमध्ये हरवला. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं . त्याला भूक लागली होती. पण त्याला खाण्याचीही इच्छा होईना. वरची झाडाची पानं हलत होती . कधी चंद्र दाखवत तर कधी झाकत . सुखदुःखाच्या सावल्यांसारखी. त्याला गावाकडची याद आली. आणि मग सारीच दुःखे त्याच्यासमोर फेर धरून नाचायला लागली .

परत गावाकडे जावं का ? त्याला वाटत राहिलं . पण गावाकडे काय तोंडाने जायचं ? ... अन करायचं काय ? काय खायचं ? ... साली ही पोटाची आग ! ... ती विझवावीच लागते . का ती कायमची विझवावी ? कायमचीच ! ...

अंधार होता सारा ! रात्रीने स्वतःमध्ये गडद अंधार भरला होता अन आयुष्यानेही .

फुटपाथवरून एक मुलगी येत होती. तिने याला झोपलेलं पाहिलं , म्हणून ती फुटपाथवरून खाली रस्त्यावर उतरली. तो कोण आहे हे तिला लक्षात आलं नव्हतं . अंधारात तिला तो एखादा भिकारी वाटला होता . संथ गतीने चालत राहिली त्याने तिची दखल घेतली नाही. तो त्याच्याच विचारांमध्ये अडकला होता. ती पुढे गेली. वाऱ्याची झुळूक आली तसे त्याने डोळे मिटले.

आधी त्याला ब्रेक घासल्याचा कचकच आवाज आला आणि त्या मुलीचा किंचाळण्याचा आवाज आला. त्याने डोळे उघडले. तिच्याजवळ एक मारुती व्हॅन थांबली होती. एक दांडगट खाली उतरून त्या मुलीशी झटापट करत होता. तिच्या पाठीवरची सॅक खाली पडली होती. ती मुलगी फार मोठी नसावी . नुकतीच तारुण्यात पाय ठेवलेली अशी .

आतमध्ये ड्रायव्हरच्या जागेवर एकजण होता. दोघेही गुंड होते. प्यायलेले होते. दांडगट ! टपोरी असले तरी दोघांचे कपडे मात्र टकाटक होते . पायात भारी ,भडक, रंगीत इंपोर्टेड शूज . वरनं दिसायला तर साले एक नंबर जंटलमन होते. त्यांचा वेष पाहून जनावरांनी चांगले कपडे घातले आहेत , असं वाटत होतं .

ते त्या मुलीला जबरदस्तीने गाडीत कोंबत होते. पळवून नेण्यासाठी. त्यांचा इरादा चांगला नव्हता, हे तर अगदी स्पष्ट होतं. कमी प्रकाशाचा, निर्जन रस्ता त्यांनी त्यांच्या कामासाठी निवडला होता. डोक्यात नशा अन वासना यांचं कॉकटेल झालेलं असलं तरी एवढं डोकं चालत होतं साल्यांचं !

तो ते पहात होता. तो उठून बसला होता. पण तो ते दृश्य नुसताच बघत होता . सुन्नपणे! त्याला काही करावसं वाटत नव्हतं. साऱ्या संवेदना षंढ झाल्यासारख्या .

तेवढ्यात ती मुलगी ओरडली, “ सोड सोड मला – वाचवा ! “

तिने आजूबाजूला पाहिलं. रस्ता पूर्ण रिकामा होता. आणि तिला तो दिसला. आता फक्त तोच होता.
तिने अपेक्षेने त्याच्याकडे पाहिलं.ती पुन्हा त्याच्या दिशेने हात करून ओरडली. पुढच्या अघटिताच्या चाहुलीने , केविलवाणी.

आता मात्र तो आवाज जणू त्याच्या आत्म्यापर्यंत पोचला. जणू तो आवाज त्याच्या धाकट्या बहिणीचा होता. त्याच्या गावाकडच्या लाडक्या, छोट्या बहिणीची त्याला एकदमच याद आली . मग मात्र तो लगबगीने उठला. त्यांच्याकडे पळत गेला. जवळ जाऊन किंचित थबकला.तसा आतलाही खाली उतरला. तो हसत हसत त्याच्या साथीदाराला म्हणाला,” बंट्या , तू हिला घे. मी ह्याला घेतो -छक्क्याला ! मजा येईल ! “

तसा तो चवताळला. तो गरजला.” XXX छक्का आसल तुझा बाप ! मी तर मरद हाय !”

दुसरा विचित्र हसत ओरडला,” ही बघ छक्क्याची अवलाद ! म्हणे मरद !”

तो पहिल्याच्या अंगावर गेला. त्याचा हात हिसडला. याच्या अंगात चांगलीच ताकद होती. पहिला धडपडत जाऊन खाली रस्त्यावर आडवाच झाला. याची ताकद अन आवेश पाहून दुसरा जरा गडबडला पण तरी याच्या अंगावर आला.

पोरगी बाजूला होऊन ते पहात होती. तिला तिथून पळून जायचं होतं ; पण तिची सॅक त्या तिघांच्या मध्ये अडकली होती .

दुसऱ्याशी झटापट करताना याची साडी सुटली. त्याचा वरचा भाग उघडा पडला. याने दुसऱ्याला उचलून आपटलं. पुन्हा पहिला याला झटला. त्याने याच्या साडीलाच हात घातला . त्याने जोरात हिसडा दिला तशी ती हलकी साडी टराटरा फाटली .

सकाळच्या मर्दांनी थोडी फाडली होती आणि आता या मर्दांनी तर अख्खीच ! वा रे मर्दानगी ! काही झालं की स्त्रियांना विवस्त्र करायचं , ही यांच्या मर्दानगीची सीमा ! त्याने तिरमिरीत स्वतःच ती साडी सोडली आणि भिरकावून दिली. जणू त्याने त्याचा तो अवतारच भिरकावून दिला होता. नकोसा !

वर ब्लाउज अन खाली परकर अशा वेषात तो उभा ठाकला. तसा दुसऱ्याने व्हॅनमधून कोयता काढला.

तो कोयता उगारून ह्याच्या अंगावर आला. ह्याने प्रसंगावधान राखून खाली पडलेली एक झाडाची फांदी उचलली. त्या गुंडाने केलेला वार चुकवला व त्याला एक तडाखा दिला. कोयता खणखणत खाली पडला. त्याने फांदीने त्या दोघांना मारायची सुरुवात केली. एकदा ह्याला एकदा त्याला . तो त्वेषाने फटके मारतच होता. त्याचं डोकंच फिरलं होतं. जणू तो सगळ्या पुरुषजातीवर सूड उगवत होता. XXXX पुरुषांकडून जे जे सोसलंय त्याची जणू तो परतफेड करत होता आता . हातात हत्यार म्हणून त्यांची भाईगिरी ! … त्यांच्याकडे हत्यार म्हणून ते पुरुष !

त्यांचं हत्यार बाजूला पडलं, तिथेच ते अर्धे झाले होते. त्यात त्यांनी भरपूर मार खाल्ला होता. त्यांना त्यांची हार कळली. तसे ते दोघे व्हॅनमध्ये बसून पळाले .

एका छक्क्याकडून त्यांनी स्वतःच्या इज्जतीचा फालुदा करून घेतला होता .

लांब जाणाऱ्या गाडीकडे पाहून तो ओरडला,” XXX मरद हाय मी! छक्का नाय!” त्याच्या त्या ओरडण्यात त्याचं सारं दुःख एकवटलेलं होतं.” आया-बहिणींची अब्रू लुटता साल्यांनो ! छक्क्यांची अवलाद तर तुमी हाय !” ... आणखी रागाने तो पुढे म्हणाला ,” मला हिजडा म्हणतीये साली ! ही दुनियाच हिजडा हाय. माझ्यासारखी खोटी ! पर मी मनाने तर खोटा नाय. “

आता त्याने त्या घाबरलेल्या , रडणाऱ्या पोरीकडे पाहिलं. ती एक गरीब घरातली, तरुण , अगदी साधी पोरगी होती. सर्वसाधारण दिसणारी. अंगानेही कृश . तिच्या अंगावर कपडेही अगदीच साधे होते. एक अगदी स्वस्तातला बदामी रंगाचा टॉप तिने घातलेला होता. वर एक कळकटलेला पांढरा स्कार्फ.

त्याने तिची सॅक उचलली, तिला दिली.

तो म्हणाला,” ताई ,तू घाबरू नगं. अन हितं थांबूबी नगं. रिक्षा धर अन जा घरला. कोन व्हते ते ? “

“माहित नाही “, ती म्हणाली. आणि ती अंग चोरून चालायला लागली. रडतच. तसा तो तिच्याबरोबर चालायला लागला. ती पुन्हा बिचकली . उगा आकसली .

“ मी सोडतो तुला मेनरोडपर्यंत. मला घाबरू नगं. अगं, परिस्थितीनं हा धंदा करतोय, पैशासाठी -पोटासाठी ! मी तसा नाय गं . पुरुषच हाय मी खरा ! दुसरी लाईन भेटली नाय मला आन हा धंदा आलाय कर्माला !... नवखाच हाय मी .”

मगापासून तो पुरुषी, दमदार आवाजात बोलत होता. धंद्याच्या टायमाचा तो घोगरट आवाज आता गायब होता. त्या आवाजात सच्चेपणा होता आणि तो खरं बोलत होता . शहरात येऊन काहीच जमलं नाही तेव्हा त्याने हा खोटेपणाचा मार्ग स्वीकारला होता . एकाने त्याला ही धंद्याची लाईन दाखवली होती . त्याला आधी कसंतरी वाटलं होतं ; पण नाईलाजाने त्याने ते स्वीकारलं होतं . दिवसभरासाठी फक्त . रात्री तर तो पुरुष होताच . अन - इथे ओळखणारं कोणी नव्हतं . मायबाप नव्हते . मायने हे असलं विपरीत पाहिलं असतं तर तिने याला झोडूनच काढला असता .

ती त्याच्याकडे अविश्वासाने पाहत होती खरी,पण तिला थोडा धीर आला होता. तिला त्याची सोबत आधाराची वाटू लागली. घडलेल्या प्रसंगातून , बसलेल्या धक्क्यातून ती थोडी सावरली होती .ते दोघे भरभर चालत होते. पुढे एके ठिकाणी लाईटचा नक्षीदार खांब होता. त्याला चार चार दिवे होते. त्या भरपूर प्रकाशात तो विचित्र दिसत होता. एक तृतीयपंथी . पण पुरुषी. पूर्ण उघडं पडलेलं ब्लाउज . खाली परकर . त्यात तो विचित्र दिसत होता.

तिची नजर त्याच्याकडे गेली . त्याने ते पाहिलं तेव्हा तो संकोचला .

“ साडीच्या चिंध्या झाल्या साल्या. हं ! साडीच्या काय आयुष्याच्या चिंध्या झाल्यात ! ” तो उद्वेगाने स्वतःशीच म्हणाला. ती त्याचं दुःख पहात राहिली .

एक रिक्षा आली. त्याने हात केला. डामरट रिक्षावाल्याने त्याच्याकडे पाहिलं व तो निघून गेला. त्याला ही ब्याद नको होती.

तो म्हणाला,” मी हितच थांबतो. तुज्यावर लक्ष देतो. तू पुढं जाऊन रिक्षा पकड. मी हाय तर ह्ये साले थांबणार न्हायत.”

“रिक्षाने ?” ती एकदमच विचारात पडली.

त्याच्या ते लक्षात आलं.तो फूटपाथवर राहिलेली त्याची पर्स घेऊन आला. त्याने पर्समध्ये हात घातला. आत काही नव्हतंच तर देणार काय ? त्याने शेवटी स्वतःच्या ब्लाउजमध्ये हात घातला. हाताला आलेली,सकाळची शंभरची नोट काढली. ती नोट बघताना क्षणभर तो विचारात पडला. ती शेवटची नोट होती . ती गेल्यावर रात्री खायचे वांधे ठरलेले होते .

पण क्षणात त्याने ती नोट तिला दिली. ती संकोचली. तशी त्याने ती नोट तिच्या हातात कोंबली.

ती त्याच्याकडे पहात राहिली. डोळे पाण्याने डबडबले. कोण कुठला हा? आपल्याला मदत केली,आपली अब्रू वाचवली. त्यात हा तृतीयपंथीयांच्या वेशातला पुरुष! त्यात त्याचं हे असं चांगलं वागणं , तिला कशाची संगतीच लागत नव्हती.

तसा तो म्हणाला,” ताई जा आता. ती बघ पुढं रिक्षा.”

तिने त्याच्याकडे एकदा पाहिलं,” थँक्यू!” ती पुन्हा म्हणाली.

ती त्याच्याकडे पहात काही विचार करत राहिली. त्याचा अंगावर साडी नसलेला, ब्लाउजमधला उघडा अवतार दिसायला काहीतरी विचित्र वाटत होता. तिने आता पहिल्यांदाच त्याच्याकडे निरखून पाहिलं .

जरी तो पुरुष असला तरी ,पदर नसलेला त्याचा देह चांगला वाटत नव्हता . तिला ते बरं वाटलं नाही . तिच्या मनात स्त्रीसुलभ लज्जेची भावना निर्माण झाली . पटकन तिने तिचा मळका स्कार्फ काढून त्याला दिला. तो त्याने घेतला व अंगाभोवती गुंडाळला.

तिने पुढे जाऊन त्या रिक्षाला हात दाखवला . ती थांबली . जाताना ती परत म्हणाली ,” तू कसा आहेस, हे मला महत्त्वाचं नाही . तू माझी इज्जत वाचवलीस ही गोष्ट माझ्यासाठी मोठी आहे ! थँक्यू दादा !”

ती रिक्षात बसली. रिक्षा निघाली तसं त्याने तिला हात हलवून निरोप दिला.तिच्या चेहऱ्यावर स्मित होतं.

आता त्याच्याही चेहऱ्यावर स्मित उमटलं . आणि त्याचा तो अवतार खोटा असला, तरी त्याचं ते हसू मात्र खरं होतं . अंतरातून आलेलं . त्याने तिचा स्कार्फ अंगाभोवती आणखीच आवळला . त्याला वाटलं, आपुन तर टेम्परवारी हिजडे आहोत, पर जे खरे असत्यान त्यांचं दुःख तर आपल्यापरास मोठं आसन . त्याला सकाळच्या हिजड्यांची गॅंग आठवली . सरळ हाय - आपण खोटे आहोत म्हणून ते आपल्याकडे रागीट नजरेने पाहत होते . मारण्याच्या विचारानेच .

तो चालत राहिला .

या जगात गरीबाची इज्जत नाय, दुर्बळाची नाय . आपण पुरुष असून या वेषामुळे आपली तर नायच नाय. पर उरात दुःख असलेला एक साधा माणूस तर समजावं ना मला या XX दुनियेनं . खरं तर सगळ्यांनाच माणूस समजावं . कापडं फाडून , साड्या फेडून नागवंच करायचं आसल तर या भेदभावाला करा ना XX हो .त्याला पाडा उघडं !

पुढे एक चौथरा होता . त्यावर अगदी छोटं देऊळ. समोरून एक माणूस येत होता.‘ देवा ’ म्ह्णून तो भक्तिभावाने पाया पडला . कुठला देव आहे हे जाणून न घेताच . पण तो देव नसून ती देवी होती . मरीआई ! गल्लत तर होतेच माणसाची . माणूस एखादा विचार करतो आणि तोच खरा मानून चालत असतो .

त्या मुलीचं शेवटचं वाक्य त्याने पुन्हा आठवलं. त्याला त्याची इज्जत वाढल्यासारखं वाटलं . त्या नव्या जाणिवेने त्याच्या जीवाला भारी वाटलं. मग तो शीळ घालत मजेत चालू लागला. त्याने अगदी झटकेबाजपणे तो स्कार्फ काढला व ऐटीत पुन्हा स्वतःला गुंडाळून घेतला . हवाही आनंदानेच तर लहरु लागली होती . बाकी अंधार तर होताच त्याच्या सोबतीला.
------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

काय अप्रतीम लिहीलयं ! तुमच्या कथेतुन वास्तव हे क्षणाक्षणाला जाणवते. कायम जिवंतपणा असतो त्यात. माणसांची मनं ओळखणे सोपे नसते.

तृतियपंथी लोकांची दया पण येते. मध्यंतरी पुणे महापालिकेने चांगला निर्णय घेतला. काही तृतियपंथी लोकांना नोकरीवर घेतले. या लोकांना खरच कष्टाच्या पैशाची गरज आहे. नाहीतरी लोक यांना घाबरुनच असतात, तेव्हा मग मोठमोठ्या कंपन्या, बँका यांनी सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीस ठेवावे. थोडे फार शिकलेले असतील तर कारकुनीची कामे द्यावीत. ड्रायव्हर म्हणून नेमावेत. बदल हा अशानेच होऊ शकेल.

बिपिनजी, खूप छान लिहिली आहे कथा..
तुमची निरिक्षण शक्ती अफाट..
दुर्बल घटकांविषयी तुम्हांला वाटणारी सहानुभूती तुमच्या कथेत नेहमीच दिसून येते.
पुलेशु..!

छान आहे कथा
जोगवा मधील उपेंद्र लिमये डोळ्यासामोरं आले.
दुर्दैवाने तृतीपंथीप्रमाणे एकंदरच LGBTQ बद्दल समाजात वेगळा दृष्टिकोन दिसतो. इथे बे एरिया मधे मात्र परस्थिती वेगळी आहे. सिंगापूर मध्येही तृतीपंथी बऱ्याच ठिकाणी काम करताना दिसायचे, मला वाटतं भारतातही हळू हळू चित्र बदलत आहे.

वाचकांचे पुन्हा आभार .
खूप उशीरा प्रतिक्रिया देण्यात काही मजा नाही ; पण हा दोष मी पत्करतो .

@वावे
----- तुम्ही अशा प्रकारच्या अल्पसंख्यांकांवर कथा लिहिता हे आवडतं.

तुम्हाला अशा कुठल्या कथा वाटल्या ?

@रश्मी

----- काय अप्रतीम लिहीलयं ! तुमच्या कथेतुन वास्तव हे क्षणाक्षणाला जाणवते. कायम जिवंतपणा असतो त्यात. माणसांची मनं ओळखणे सोपे नसते.

वास्तव म्हणजे या कथेतुन की इतरही कथांमधून ?
त्यात गंमत म्हणजे - आमचे गृहमंत्री म्हणतात की मला माणसे ओळखता येत नाहीत

@मन्या

----- तुमची प्रतिक्रिया आवडली
पण इथे भारतात यासाठी खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे

तुम्हाला अशा कुठल्या कथा वाटल्या ? चटकन आठवलेली एक म्हणजे समलैंगिक संबंध असणाऱ्या मुलींची.

अस्सल कथानक आहे.
अचूक निरीक्षण, वर्णने चपखल.
बिपीनजी, तुम्ही दिवाळी अंकात तुमचे लिखाण पाठवता का? अशा वेगवेगळ्या विषयांवर लिहीता येणं कौतुकास्पद आहे.
मराठीत नवीन लेखकांचे लिखाण वाचले जात नाही अशी ओरड आहे. तुमच्या सारख्यांना संधी मिळाली तर ती तक्रार दूर होईल.

मला रोज 15 ते 20 चौक लागतात. यातल्या निम्म्या ठिकाणी तृतीय पंथी असतात. सुरूवातीला त्यांना आपण रोजगार देऊ शकत नाही म्हणून मागितले तसे पैसे दिले.
पण रोजच या प्रत्येक चौकात जाताना येताना पैसे मागितले तर कसे शक्य आहे?
एक तर त्यांची अगतिकता समजत असल्याने पैसे न देण्याने अस्वस्थता वाटे. त्यातून चिडचीड व्हायची.
मग काही दिवसांनी हे बोगस लोक असतील, मुलंच असणार, ईझी मनी म्हणून करत असतील अशी समजूत करून घेतली. काही दिवसांनी लक्षात आलं कि फक्त हाताने नाही असा इशारा केला कि ते थांबत नाहीत. तेव्हा पासून हायसं वाटलं.
आता कथा वाचताना माझी शंका खरीच होती की काय असं वाटतंय. अशाने जे खरे असतील त्यांनाही लोक मदत करणार नाहीत.
अवघड आहे.

रघू
इतक्या सुंदर व अचूक प्रतिक्रियेबद्दल मी तुमचे किती आभार मानू ?

या लोकांना सिग्नलवर पाहिले आहे . टोळीच असते . आधी दिसत नसत . पण आता दिसतात . अजून एक म्हणजे ते स्थानिक नसतात . तर बाहेरून , इतर राज्यांतून येतात आणि पैसे कमवून परत जातात . ते खरे तसे नसतात . त्यात माज म्हणजे ते कारवाल्यांना पैसे मागतात . दुचाकी असेल तर नाही .
दांडगट असतात . पैसे दिले नाहीत तर शिव्याहि देतात

जे मूळ पाहिले आहेत , त्यांचा अगावपणा वेगळ्या प्रकारचा आहे / असायचा . पण ते चांगल्या माणसांना त्रास देत नसत . त्याच्या पद्धती वेगळ्या .
एके दुकानात मी गेलो असताना , तिथे एक गॅंग आलेली . दुकानदार मालकीण होती . त्यातल्या एकाने नवीन साथीला सांगितले . या ताईला त्रास द्यायचा नाही . ती जे देईल ते घ्यायचे . जर तो पुरुष असता तर अगदी वाजवून पैसे घेणार , वाजवून म्हणे अगदी टाळ्या वाजवून .

या लोकांबद्दल सहानुभूती वाटते . एका कार्यक्रमाला गेलो होतो . तिथे एक तरुणी आली होती . हॉल मधल्या सगळ्या बायका तिच्यापुढे , तिच्या फॅशनपुढे फिक्या होत्या नंतर तिची ओळख करून दिली तेव्हा कळलं की ती - तो आहे आणि एवढाच नाही तर तो LAW करतोय .

जे खोटे आहेत त्यांचा राग येतो . त्यांचं प्रमाण वाढलं आहे .
पण त्यातला एखादा चांगलाही असेल तर ? त्याची मजबुरी असेल पण त्याच्या मूळ चांगल्या भावना जागृत असतात . आणि खात्या पित्या घरची माणसे खालच्या पातळी वरचं वागतात . या भावनेतुन ही कथा लिहिली आहे . तो खरा तसा नाही , एखादा असं पोटासाठी करतो ते वेगळं आणि गँग बनवून संघटित धंदा करणं वेगळं हा माझा फोकस होता
पण काही लोक चुकीचे संदर्भ देतात बिचारे ! कळत नाही ...

असो
आधी रँडम लिहीत असे . पण आता विचारपूर्वक लिहितो म्हणून तर वाचक वाचतात .
स्वतःला थोर समजणारे साहित्यात कुठे हरवले ते समजलंच नाही . मी कमी लिहीतो , ,माझा संवाद कमी असेल पण काम चालू आहे . काही लोक सोशल मीडियावर खूप इंटरऍक्ट होतात , त्यामुळे त्यांना साहित्यातलं खूप कळतं असं वाटायला लागतं .

जरा अवांतर झालं . असो
तुमचे खूपच आभार