माझी अमेरिका डायरी - थँक्स गिव्हींग!

Submitted by छन्दिफन्दि on 26 November, 2023 - 00:42

परवा शाळेमध्ये एक सहकारी प्लेट भरून घेऊन आली आणि म्हणाली, “त्या XYZ हॉल मध्ये स्टाफसाठी लंच आहे, तू पण घेऊन ये. “
मी नुकतीच substitute टीचिंग ( बदली शिक्षिका ) ची नोकरी सुरु केली होती त्यामुळे मला शाळेच्या रोजच्या ई-मेल येत नाहीत.
“दिवाळीची उशिराची पार्टी की थँक्स गिव्हिंगची पार्टी ? “ माझा प्रश्न.
आपली दिवाळी होते आणि इकडे वीकेंड्सना दिवाळी पार्टी चालू असतात तेव्हा साधारण मध्येच थँक्स गिव्हिंगची पण सुट्टी येते. गेल्या आठवड्यात १ ली ते पाचवी मधील साठ-सत्तर मुलांना टर्की बनवायला (कागदाची हो! ) मदत करून झाली आहे.

२०१५ ला इकडे आल्यावर थँक्स गिव्हिंग आणि ब्लॅक फ्रायडे विषयी बराच ऐकायला मिळालेल. माझ्या पहिलीत असणाऱ्याच्या शाळेत जंगी थँक्स गिव्हिंग पार्टी होती. पालकांनी वेगवेगळे पदार्थ वाटून घेतले होते. चिकन, टर्की, मॅश पोटॅटो, अँपल-पंपकीन पाय, कापलेली,आणि बरच काही काही होत. सगळी मुलं पिसांचे मुकुट, मास्क / कपडे घालून एका रांगेत उभी राहिली आणि छान गाणी म्हंटली. मग त्यांच्या कॅफेटेरियात सगळ्या आयांनी (हो इकडेही ९० टक्के आयाच शाळेत सक्रिय असतात) मुलांना जेवण वाढले. आणि पहिलीची मुलं, पालक, आणि शिक्षिका सगळ्यांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला. त्या निमित्ताने आम्हालाही इकडची घरगुती चव चाखायला मिळाली.
आमच्या मजल्यावर (कधी नव्हे ते ) शेजारणीकडून Pie (पाय) भाजल्याचा गोड सुवास दरवळला.
--
IMG_20151118_104853667_HDR~2.jpg
--

--

IMG_20151118_110812949_HDR~2.jpg

बहुतेक सगळ्या शाळांमध्ये थँक्स गिव्हिंगसाठी आठवडाभराची सुट्टी असते. आजी-आजोबा, मुलं-नातवंड, भावंडं एकत्र जमतात. त्यावेळी अर्थातच जंगी मेजवानीचा बेत असतो. मुख्य मेनू साधारण ब्रेडचे सारण भरून भाजलेली टर्की ( ही थँक्स गिव्हिंग जेवणाची नायिका असते ), क्रानबेरी sauce, मॅश पोटॅटो, स्क्वाश (भोपळ्याच्या जवळ जाणारी भाजी), ग्रीन बीन्स (फरसबी), मका, पंपकीन किंवा पेकन पाय असा असतो. ही अखंड गोठवलेले टर्की साधारण १२ पाऊंड(५ किलो ) ते २० पाऊंड (९ किलो) एव्हढी वजनदार असते. ती खालच्या फ्रिजमध्ये ३-४ दिवस ठेवली की मऊ शिजविण्यायोग्य होते. प्रत्येक घराची / कुटुंबाची टर्की बनविण्याची स्पेशल पारंपरिक कृती असू शकते जशा आपल्याकडे घराघरात वेगवेगळ्या पद्धतीने करंज्या बनवतात तसच काहीस.
जेवणाच्या टेबलावरील आणि घरातील सजावटीसाठी केशरी, मातकट, पिवळट, कुसुंबी रंग वापरले जातात जे फॉलमध्ये पानांचे रंग आढळतात.
जेवण सुरु करण्याआधी सगळ्यांनी जेवणाच्या टेबलाभोवती बसून, प्रत्येकाने आपण कशासाठी थँकफुल (आभारी) आहोत ते सांगायचे, आणि शेवटी भरभरून चांगले आयुष्य दिल्याबद्दल देवाचे आभार मानायचे आणि प्रार्थना म्हणायची अशी एक पारंपरिक प्रथा अजूनही बऱ्याच कुटुंबातून पाळली जाते.

pumpkin-1768857_640.jpg

---

thanksgiving-dinner-7600226_640.jpg

---

हा दिवस सामान्यतः जवळच्या कुटुंबीयांनी एकत्र यायचं, जेवणाचा फक्कड बेत करायचा, दिवस मजेत गप्पा-गोष्टीत घालवायचा, TV वरील अमेरिकन फ़ुटबाँल मॅच बघायची, असा निवांत घालवायचा. अलीकडच्या काळात कुटुंबियांऐवजी अगदी जवळच्या मित्र-मैत्रिणी बरोबर थँक्स गिव्हींग साजरा करायची पद्धत सुरु झालीय त्यामुळे Friendsgiving हा शब्दही प्रचलित होतोय.

मला अजून एक मजेशीर वाटलेला सोहळा म्हणजे टर्की pardoning, व्हाईट हाऊस मध्ये शंभरहून अधिक वर्षे ही रीत पाळली जातेय. अमेरिकेच्या अध्यक्षांना दरवर्षी छान गुबगुबीत टर्की भेट म्हणून दिल्या जातात आणि अध्यक्ष त्यांना जाहीर रित्या मुक्त करतात म्हणजे त्यांची स्वयंपाकघराकडे होणारी वाटचाल रोखून त्याऐवजी त्यांना जीवनदान देतात. पण म्हणजे फक्त त्याच टर्कींना हे जीवनदान मिळते बाकी समस्त टर्की जमात देशवासीयांची थँक्स गिव्हिंगची मेजवानी यशस्वी होण्यासाठी जुंपलेली असते.
थँक्स गिव्हिंग हा मुळात युरोपातून आलेला धार्मिक सण आहे त्यामुळे देवाचे आभार मानायला चर्चमध्ये प्रार्थना आयोजित केल्या जातात. तसेच गिव्हिंग म्हणजे दानधर्म म्हणून बऱ्याच संस्था, चर्च गरिबांसाठी मोफत जेवण किंवा शिधा वाटपही करतात. सर्व कर्मचाऱ्यांनाही आपापल्या कुटुम्बियांबरोबर हा दिवस साजरा करण्यासाठी त्या दिवशी (बहुतांशी ) संस्था, ऑफीस, दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट बंद असतात.
थँक्स गिव्हिंग हा सण खूप पूर्वीपासून युरोपात सुगीचा सण म्हणून साजरा होत असे. चांगलं पीक आलं, अन्न-पाणी मिळालं म्हणून त्या परमेश्वराचे आभार मानायचा हा तो दिवस. म्हणूनच ह्या दिवशी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करणे हाही एक महत्वाचा भाग असे.
अमेरिकेत जेव्हा पहिल्या बोटीतून, मे-फ्लॉवर मधून, लोक इकडे आले तेव्हा त्यांच्या कडे खायला अन्न नव्हते त्यावेळी इकडच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांनी म्हणजे आताच्या नेटिव्ह अमेरिकन लोकांनी त्यांना अन्न दिले आणि त्यांना जगविले. ह्या पिलग्रिम लोकांनी शेती करून त्याचे पहिले पीक आले तेव्हा नेटिव्ह अमेरिकन लोकांचे आभार मानायला त्यांना मेजवानी दिली तो अमेरिकेत साजरा झालेला पहिला थँक्स गिव्हिंग. आधी त्यासाठी कोणताही ठराविक दिवस नव्हता पण १८६३ ला त्यावेळचे अध्यक्ष अब्राहाम लिंकन ह्यांनी नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी थँक्स गिविंग दिवस साजरा होईल ही घोषणा केली. आणि तेव्हा पासून हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जाऊ लागला. त्याची आठवण म्हणून आजही मे-फ्लावर, पिलग्रिम (बोटीतुन आलेले प्रवासी ), आणि नेटिव्ह अमेरिकन ह्या संदर्भातील गाणी, नाटके, नाटुकली मुलं शाळेत, चर्चमध्ये सादर करतात.
थँक्स गिविंगला ख्रिसमस ट्री आणि दिवे लावून पुढे येणाऱ्या हॉलिडे सिझनची नांदी केली जाते. इकडे थँक्स गिव्हिंग ते ख्रिसमस हा कालावधी हॉलिडे सिझन म्हणून मानला जातो.

मग थँक्स गिव्हिंगच्या पुढचा दिवस म्हणजे ब्लॅक फ्रायडे. निव्वळ खरेदीचा दिवस! ह्या दिवशी खऱ्या अर्थाने ख्रिसमस खरेदीला सुरुवात होते.
थोड्या शोधाअंती काही गमतीशीर गोष्टी कळल्या. १९५१-५२ मध्ये पहिल्यांदा ब्लॅक फ्रायडे ही संज्ञा वापरली गेली. तेव्हा बरेच कामगार चार दिवस सलग सुट्टी मिळावी म्हणून थँक्स गिव्हिंगच्या दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी, आजारपानांची सुट्टी(सिक लिव्ह) घ्यायला लागले. तर १९६१ दरम्याने थँक्स गिव्हिंगच्या दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी, ख्रिसमस खरेदीसाठी बाहेर पडलेल्या जमावाने गोंधळ घालायला सुरुवात केली त्याला उद्देशून फिलाडेल्फिया पोलिसांनी त्याला ब्लॅक फ्रायडे संबोधले. हळू हळू ती व्याख्या पसरत गेली. १९८० च्या दरम्याने काही व्यापाऱ्यांनी एरव्ही मालाला विशेष उठाव नसतो त्यामुळे धंदा बुडीत असतो पर्यायाने सगळे हिशेब तोट्याचे म्हणजेच लाल रंगात असतात, पण ह्या ख्रिसमस खरेदीला सुरुवात झाली की अगदी छोट्या छोट्या किरकोळ विक्रेत्यांनाही फायदा होऊ लागतो, धंदा तेजीत चालतो, आणि हे फायद्याचे हिशेब काळ्या शाईत लिहीले जातात म्हणून तो दिवस म्हणजे ब्लॅक फ्राय डे असा एक धागा पकडला. .
ह्या दिवशी सगळी मोठी मोठी दुकानं सकाळी म्हणजे खर तर पहाटे पाच-सहालाच सुरु होतात. त्या दिवशीचे असे खास सेल असतात. जसे पहिले ५० किंवा शंभर TV अमुक तमुक किमतीला ( अगदी अर्ध्याहून कमी किमतीत ). मग काही हौशी मंडळी रात्रभर त्या दुकान बाहेर तळ ठोकून बसतात कारण पहिला प्रवेश मिळावा. मेसी, बॉडीवर्क्स, सेफोरा ह्यांच्या बाहेर तुफान मोठ्या रंग लागल्याचं बातम्यांमध्ये ऐकल्याचं आठवतय.

सुरुवातीला माझा ह्या सेलवर अजिबात विश्वास नव्हता. वाटायचं, किमती वाढवून लावत असतील आणि त्या दिवशी कमी केल्याचं उगाच नाटक. पण नंतर कळत गेलं कि इकडे सेलला त्या किमती खरच कमी असतात, दुसऱ्या दिवशी जाल तर तीच वस्तू मूळ किमतीला म्हणजे महागात पडते.
व्यवस्थित ज्या हव्या त्या वस्तू थोडं थांबून थँक्स गिव्हिंगला घेतल्या तर खरंच खूप बचत होते. पण म्हणून इम्पल्सिव्ह शॉपर्स (मराठी पर्यायी शब्द नाही ) स्वस्तात मिळत म्हणून भरमसाठ वस्तू घेत सुटतात. आणि मग अशांची नंतर काही दिवसात वस्तू परत करायची अजून मोठी रांग लागलेली असते.
एक विनोद प्रचलित आहे. एक म्हणतो मी ह्या वर्षी हे हे घेऊन येव्हढे पैसे वाचवले, दुसरा म्हणतो मी तेव्हढे, तिसरा म्हणतो मी घरीच राहून सगळेच पैसे वाचवले.

पहिले १-२ वर्ष ही ब्लॅक फ्रायडेची गंमत अनुभवली, मग नंतर कधी कधी घरी राहून सगळेच पैसे वाचवले. आता कोविडनंतर सगळंच बदललय. आठवडाभर आधीपासूनच हे सेल सुरु होतात. बरेच लोकं ऑनलाईन वस्तू घेतात. त्यामुळे पूर्वी येणाऱ्या दुकान बाहेरच्या रांगा, गर्दी ह्या बातम्या नाहीशा झाल्यात आजकाल.

पण तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची आहे आणि घाई न करता तुम्ही जर आरामात एखादी वस्तू घ्यायला जाल तर सगळ्या चांगल्या डीलच्या वस्तू संपून गेलेल्या असतात. स्वानुभवाचे बोल आहेत.
हा लेख खर तर कालच लिहायचा होता पण चार तास पायाचे तुकडे पडेपर्यंत चालून हाती फक्त एक जॅकेट (तेही स्वतः साठी नाही ) लागलं ते घेऊन घरी परतयला रात्रीचे अकरा वाजलेल. मला हव्या असणाऱ्या वस्तू सेल सुरु होण्याआधीच संपल्याचे त्या गोड सेल्स गर्लने अजूनच गोड हसत सांगितल. ह्या पुढे परत कधी ह्या ब्लॅक फ्रायडेच्या सेलला जायचं नाही हा निश्चय करतच घरी आले. पण आधीच्या दोन-चार वर्षीही अशीच प्रतिज्ञा करून झालीये त्यामुळे आता सराव झालाय त्याचाही!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाय भाजल्याचा गोड सुवास Lol >>> हे नुसत वाक्य वाचताना मला पण "बाप रे" अस होऊन गेल.
दुरुस्त केल.
धन्यवाद किल्ली!