भेट -भाग ७ (अंतिम)

Submitted by केजो on 3 November, 2023 - 00:27

बाहेर पडताच त्यांना जाणवलं की, घरी सगळे काळजी करत असतील. एक-दोन मेसेजेसही येऊन गेले होते. मित्रांबरोबर आहे, उशीर होईल, झोपून जा, असे मेसेजेस करून टाकले. तेव्हा कुठे थोडं हायसं वाटलं. एव्हाना छान गार वारा सुटला होता. आकाशात टिपूर चांदणं पडलं होतं. एकमेकांशी काहीही न बोलता ते पुन्हा पाषाणच्या दिशेने चालू लागले. एव्हाना तिकडची गर्दी अगदीच तुरळक झाली होती. वाऱ्याने तिची ओढणी पुन्हा-पुन्हा त्याच्या दिशेनी झेपावत होती. तरीही ना ती ओढणी सावरत होती, ना तो... त्याच्या बाईकच्या जवळ पोचताच इशारा मिळाल्यासारखा अचानक पाऊस सुरु झाला. पाऊस येताच तो आडोशाला झाडाखाली धावत गेला. तर ती जगाची पर्वा न करता हात आकाशाकडे उंचावून त्या जलधारांनी तृप्त होत चिंब भिजत राहिली. तिचं पावसात भिजण्याचं वेड त्याला पुरेपूर माहिती होतं. तोही मूकपणे तिचं बालपण पुन्हा अनुभवत राहिला. थोड्याच वेळात, वळिवाचा पाऊस जसा अचानक आला तसाच अचानक थांबलाही.
पाऊस थांबल्यावर तिला जगाचं भान आलं. तो शेजारी ना दिसल्याने एकदम कावरं बावरं होऊन नजर त्याचा शोध घेऊ लागली. झाडाखाली आडोशाला त्याला बघून, ती अगदी खळखळून हसली. थोड्या वेळापूर्वी आलेलं मळभ केव्हाच दूर झालं होतं. कान पकडत तोही बाहेर आला.
"मला नाही आवडत अजूनही पावसात भिजायला! तू भिज, थंडीत कुडकुड आणि उद्या छान शिंका देत बस!"
"बरं बुआ, मी आहेच वेडी. पाऊस आला आणि मी भिजले नाही तर तो येण्याचंच थांबवेल असं वाटतं मला." आणि पुन्हा एकदा तिच्या मनमोकळं हसण्याचा सडा पडला.
थोड्या अंतरावर असणाऱ्या चहाच्या टपरीतून आल्याच्या चहाचा सुगंध मातीच्या सुगंधाशी चढाओढ करू लागला. तशी त्यांची पावलं आपसूकच त्या दिशेने वळली. असं मनसोक्त भिजायचं आणि टपरीवरच्या चहाचे घुटके घेत ऊब आणायची, हे तिचं ठरलेलंच! ह्या आधी कितीतरी वेळा असं पावसात भिजल्यानंतर ती हमखास जगजीतची तिची आवडती गझल ऐकायची, त्याचीच तिला आठवण झाली.
कभी यूँ भी तो हो
ये बादल ऐसा टूट के बरसे
मेरे दिल की तरह मिलने को
तुम्हारा दिल भी तरसे
तुम निकलो घर से
कभी यूँ भी तो हो...

कभी यूँ भी तो हो
तन्हाई हो, दिल हो
बूँदें हों, बरसात हो
और तुम आओ
कभी यूँ भी तो हो...
आणि आज स्वप्नवत ते सगळंच होत होतं. स्वतःच्या हाताला चिमटा घेऊन तिनं वास्तवात पाऊल ठेवलं. इथून पुढे काय? जे काही मनात होतं ते बोलून तर मोकळे झालो. त्यानी काही बोलावं अशी अजिबात अपेक्षा नव्हती. खरं तर तो सगळं ऐकून घेईल आणि माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच असं नव्हतं, तुझाच गैरसमज झालाय, माझ्या गळ्यात पडू नकोस, असं काहीतरी ऐकून घेण्याची तयारी होती तिची. पुर्वीसारखंच, अजून कोणाकडून तरी ती त्याच्या कशी मागे पडलीये, हेही भविष्यात ऐकायला मिळेल असंही एकदा वाटून गेलं होतं. आणि आता ते दुःख झेलण्याची तयारी नसल्यानी उगाच मनाची समजून काढलेली की असं काही नव्हतंच! त्या गावची मी नव्हेच! एकदा वाटलं होतं, मनातलं सगळं बोलण्याची आपली हिम्मतच होणार नाही. उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारून साडेसातपर्यंत आपण घरीही पोहोचले असू, असे काय अन काय विचार येऊन गेले होते त्याला भेटायच्या आधी. पण तो असं काही बोलेल ह्याची जराही जाणीव नव्हती तिला.
टपरीवर स्टोव्हजवळ उभं राहून ती पातेल्यातला चहा उकळताना बघत होती. स्टोव्हच्या धगीनी थंडी हळहळू कमी होत होती की मनातल्या विचारांच्या कल्लोळानी? त्याचीही अवस्था विचित्र होती. चिंब भिजलेल्या तिच्याकडे मन भरून बघत बसावं की वेल्हाळ मन आवरून चहाकडे नजर फिरवावी?
चहावाल्यानीच मग मौन तोडलं, "अहो तुम्ही दोघांनी कितीही वेळ चहाकडे बघितलं ना तरी त्याला उकळायला जेवढा वेळ लागणार आहे, तेवढा लागणारच, काय? थोडी सबुरी करा..."
खरंय, सबुरी तर करावीच लागणार. दोघंही कसनुसं हसून शेजारच्या बाकड्यावर टेकले. तिनं उगाच केस झटकले, ओढणी अंगभर लपेटून घेतली. त्याची नजर आपल्याकडेच आहे हे जाणवताच तिच्या अंगभर शहारा फुलला. तेवढ्यात चहा आला. गरम गरम ग्लास हातात घेऊन हळूच फुंकर मारत तिनं चहाचा पहिला घोट घेतला. त्या घोटानी तिला चांगलीच तरारी आली. मग त्याच्याकडे वळून तिनं बोलायला सुरुवात केली...
"खरं तर तू काही बोलावंस अशी माझी अजिबात अपेक्षा नव्हती. पण आज मनातलं सगळं खरं खरं बोलायचं ठरवलंय म्हणून मनापासून सांगते, खूप खूप छान वाटलं. षोडश वर्षीय तरुणीसारखं मन अगदी पिसासारखं हलकं झालंय. पण आता इथून पुढे काय? आपापल्या जबाबदाऱ्या, संसार ह्या सगळ्याला विसरून तर नाही चालणार ना? आपलं मन मोकळं होणं खूप गरजेचं होतं. मनातल्या व्हॉट इफची उत्सुकता संपवायची होती. निदान मला तरी एकदा प्रत्यक्ष भेटून सगळं बोलण्याची नितांत गरज वाटत होती. आणि आता जाणवतंय की तुलाही तसंच वाटत होतं, पण पुढाकार घेणार कोण? मूग गिळून बसण्यात साहेबांचा इगो सुखावतो नं. पण माझी ह्याउप्पर काहीच अपेक्षा नाहीये. माझ्या नवऱ्यावर माझं जीवापाड प्रेम आहे, माझ्या मुलांना एक सुरक्षित संपूर्ण कुटुंब मिळालंच पाहिजे, ह्याचीही पूर्ण जाणीव आहे.”
"अगं हो, किती पटापटा बोलतेस! जरा थांब, चहा संपव तो गार व्हायच्या आधी. मलाही परिस्थितीची जाणीव आहे, म्हणूनच तर ह्या आधी कधी ह्या भावनांचा उच्चारही केला नाही ना मी. ह्यापुढे काहीही नाही. आपली आहे ती निखळ मैत्री टिकवून ठेवायची. जे आहे ते आहे, त्याला नाकारण्यात काहीच अर्थ नाही. आपण इतकी वर्ष प्रयत्न केले, पण ते निष्फळच ठरले ना. आतापर्यन्त एकमेकांना सावरत आलोय तसं सावरत राहायचं. ही वाट खूप निसरडी आहे. स्त्री-पुरुष हे नातंच इतकं गुंतागुंतीचं आहे की ते कोणाला समजावणं-कोणी समजून घेणं हे अशक्यच आहे. आपलं नातं आपल्याला माहिती आहे, हे पुरेसं आहे ना?"
"खरंय तुझं. आपलं नातं ह्यापुढे जाणं शक्य नाही. जे आहे तेच छान जपूया. ह्यापुढे कधी चॅट करताना ते कोणीही वाचलं तरी आक्षेपार्ह्य वाटणार नाही, ह्याची काळजी घेऊया. म्हणजे डिलीट करण्याची गरजच वाटणार नाही. तसं काही बोलतच नाही म्हणा आपण, पण चोराच्या मनात चांदणं म्हणून डिलीट करत होतो. आता तेही नाही करायचं. आपल्या मुलांना ते वाचून, आपली मैत्री बघून लाज/तिरस्कार तर नाही वाटणार ना ह्याचा विचार केला पाहिजे."
"इतिहासात असायचा तसा तहनामा करून सतराशे साठ कलमे पाठ करून घेणार आहेस का आता? हे नाही करायचं, ते नाही करायचं... ऐकून घे, जे होणं शक्य नाही त्या कशालाच मी हो म्हणणार नाहीये! एवढा विश्वास तर ठेव माझ्यावर. माझंही माझ्या बायकोवर, मुलीवर प्रचंड प्रेम आहे. सानियाला मला गमवायचं नाहीये, जसं मी माझ्या मुलाला गमावलंय. ह्या जन्मात काळाने मात केलीये, मी पुढच्या जन्मी मला वेळेत अक्कल यावी ह्यासाठी प्रार्थना करीन. आणि तू अशीच राहा, नेहमी भांडतेस तशीच हक्कानी भांडत राहा. जगाच्या पाठीवर कुठेही असलीस तरीही तुझं माझ्या आयुष्यात असणं, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. तुला ते नजर अंदाज मधलं गाणं आठवतंय का? इक आधी कहानी थी, जो मिल के सुनानी थी... त्यात तो म्हणतो ना, तुम कभी मेरे थे, बस ये भी गवारा है.. तसंच!"

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहीता. आवडली.

शीर्षक खटकते.
भेट :- दीर्घकथा (भाग अमूक तमूक) असे असावे किंवा
भेट (दीर्घकथा ) - भाग अमूक तमूक.

वाट बघायला न लावता सलग भाग लिहिलेत त्याबद्दल धन्यवाद. संवादाचा फ्लो छान टिकून राहीला. कथा आवडली.
त्या अडनिड्या वयात डेट न करता बघितलेली एकतर्फी स्वप्नं, त्यांची मोडतोड-जखमा, व्हॉट इफ चा गुंता आणि क्लोझर शोघण्याची धडपड छान रंगवली आहे.

भारी.. एक नंबर...
सिनेमाची कथा होऊ शकते..
तो जास्त व्यक्त झाला नाही असे वाटले..

अरे बापरे, वीरू सिनेमाची कथा! खूप खूप धन्यवाद. तो थोडा मुखदुर्बळ दाखवलाय, म्हणून अव्यक्त राहिला
पण अजून बोलतं करता आलं असतं! नेक्स्ट अटेन्प्ट!

सर्वप्रथम सलग सगळे भाग दिल्या बद्दल धनयवाद
क्रमशः कथा असली की हल्ली वाचावी की नाही हा प्रश्न पडतो, पण तुमच्या लघु कथा ही वाचल्या आणि ह्या कथेचे भागही तुम्ही नियमित पोस्ट करत आलात
लेखन शैली तर अतिशय सुंदर आहे, एक दोन ठिकाणी typo असतील, पण ते साहजिकच दुर्लक्षित होतात.
कथेतील ती आणि तो खरच ओळखीचे वाटतात, त्यांच्या संभाषणातून तूम्ही त्यांचं व्यकतिमत्त्व ही रंगवलं. ४० ओलांडलेल्या वाचकांना बरेच संदर्भ जवळचे वाटतील. शाळेतील मॉनेटर ने नाव लिहण, लँड लाईन चे फोन कॉल, ऑरकुट, मग wahatsapp आणि reunion वैगरे प्रवास अगदी अनुभवतला असल्याने कथा अधिक जवळची वाटली.
५ व्या भागात ती च मनोगत संपल्यावर त्याच वागणं तुम्ही अतिशय सुंदर लिहलंय (पुरुष स्वभावाचा, वागण्याचा बराच अभ्यास वाटतो Wink ), त्यानं आधी हसण्यावारी उडवणं, मग बाजुला जाऊन सिगारेट चा कश छातीत घेऊन लगेच फेकण आणि चूळ भरून बाटलीतील पाण्याने तोंड धुणे हे इतकं परफेक्ट लिहलय, त्यातून त्याच्या मनात काय चाललंय हे त्याचं स्वगत वाचण्याआधी साधारण कल्पना देऊन जात.

त्या दोघांच एकमेकांसमोर व्यक्त होणं, मनातील गोष्टी मनमोकळे पणे पण एकमेकाला न दुखावता सांगणं आणि एकून घेणं, आणि मग ज्या गोष्टीला अंत नाही ती एका सुखद वळणावर सोडून देणं योग्य हे स्वीकारणं, हे एका वयानंतर (साधारण ५० शी कडे झुकल्यावर) साध्य होऊ शकत पण एन शालेय, कॉलेज च्याच काय पण गधे पंचविशीत सुद्धा जमण कठीण. ज्यांना जमलं त्यांनी आयुष्यभराची एक छान मैत्री मिळवली. हल्लीच्या पिढीला एवढी भावनिक गुंतागुंत नाही झेपत, फार पटकन पुढे जातात.

प्रतिसाद थोडा दीर्घ झालंय पण अशा छान कथेला तितकाच भरभरून प्रतिसाद तो बनता है...

टीप : जर कुणी ही कथा काय "ती सध्या काय करते" ची नक्कल आहे वैगरे कमेंट केल्या तर दुर्लक्षित करा, छान लिहिली आहे, पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा

मन्या मनःपूर्वक धन्यवाद!
वेळ काढून कथा वाचलीत, त्यावर इतकी मुद्देसूद प्रतिक्रीया दिल्याबद्दल ऋणी आहे.असाच लोभ राहू देत.
टायपो सापडले की, नक्की सुधारीन.

@केजो
विचारपूस विभागात पोस्ट केलेली कमेंट बघा
World is small Happy