लंडन भटकंतीचा एक दिवस....
मला जरी सेंट्रल लंडन मध्ये तासन् तास पायी फिरायला आवडत असलं तरी लहान मुलांना काही त्यात फार मजा वाटत नाही. त्यांच्यासाठी असलेलं एकमेव आकर्षण म्हणजे झू. लंडनचं प्राणी संग्रहालय प्राण्यांवर संशोधन करण्याच्या उद्देशाने अंदाजे २०० वर्षांपूर्वी स्थापन झालेलं जगातील पहिलं प्राणीसंग्रहालय आहे. हे खुपच मोठं आहे आणि आत मध्ये फिरताना आपण इतक्या भर शहरात आहोत असं वाटतच नाही. एखाद्या खऱ्या जंगलातच फिरतोय असंच वाटत राहतं . झू मधले प्राणी बघणं मला फार आवडत नसलं तरी ते प्राणी बघताना होणारा मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद तरी आपल्याला पाहता येईल म्हणून एका शनिवारी आम्ही सगळ्यांनी झू बघायला जाण्याचा कार्यक्रम नक्की केला. काढली तिकीट आणि आलो बघून झू असं इथे शक्य नाही. खुप गर्दी होऊन प्राणी बिचकू नयेत म्हणुन एका वेळी जास्त लोकांना आत सोडत नाहीत, आधी बुकिंग करून, टाईम स्लॉट रिझर्व्ह करूनच जावं लागतं झू बघायला.
लंडन मध्ये फिरण्याची खरी मजा ट्यूब, बस आणि पायी फिरण्यातच आहे. पावला पावला वर इतिहास कसोशीने जतन केलेलं पण तरी ही आधुनिक असणारं लंडन पायी पालथं घालताना खूप मस्त वाटत. किंवा चार चार लेव्हल खाली असलेल्या ट्यूब मधून जाताना दीडेकशे वर्षापूर्वी ही त्यांच्या कडे असलेल्या अभियांत्रिकी कौशल्याला प्रत्येक वेळी मनोमन सलाम केला जातोच. लंडनची ट्यूब जगातलं आठवं आश्चर्यच वाटते मला. प्रत्येक ठिकाणी असलेले दिशा फलक फॉलो करत कोणालाही न विचारता लाईनी बदलत आपण जेव्हा इच्छित स्थळी पोचतो तेव्हा तर त्यांचं फारच कौतुक वाटत आपल्या भारतीय मनाला.
त्या दिवशी मात्र आमच्या बरोबर लहान मुलं ही असल्याने आम्ही उबरने जायचं असं ठरवलं होत . परंतु नेमकाच त्याच दिवशी इथे असलेल्या तीन रेल्वेपैकी एका रेल्वे चा संप ( इथे ही खूप होतात बर्का संप बिंप) घोषित केला गेला आणि सगळचं त्रांगड होऊन बसलं. रेल्वेच्या संपामुळे उबर काही मिळाली नाही . वाट बघण्यात खुप वेळ गेला. शेवटी अर्थ्या वाटे पर्यंत बसने आणि नंतर भुयारी रेल्वेने जायचं ठरलं जे माझ्या पथ्यावरच पडलं. जी बस आम्हाला ट्यूब स्टेशन पर्यंत घेऊन जाणार होती ती अर्ध्या वाटेतच टर्मिनेट केली. आपल्याकडे कसं सहासष्ट नंबर आज फोर्ट मार्केट पर्यंतच जाईल असं सांगितलं की बॅलार्ड पिअरवाले लटकले तसचं झालं आमचं ही. उरलेली अर्धी वाट थोडी चालत थोडी दुसऱ्या बसने अशी पार करून आमची नौका अखेर ट्यूब स्टेशन पर्यंत पोचली.
ही ट्यूब आम्हाला डायरेक्ट झू जवळ घेऊन जाणार होती. सगळा मार्ग भुयारी होता आणि रूट वर सगळी प्रसिद्ध स्टेशनं होती म्हणून मी जरा जास्तच खुश होते. “आज कोणाचं बरं वाईट तर घडल नाहीये ना राजघराण्यात “.:G
असं वाटावं इतक्या शांत आणि चिडीचूप असलेल्या ट्यूबच्या डब्याला आमच्या मुलांच्या गप्पा गोष्टी, खेळणं, रडणं ह्या सगळ्यामुळे चांगलचं गालबोट लागलं होतं. पण सहप्रवासी ही मुलांच्या गमती जमतींचा आनंद घेत त्यांना दाद देत होते.
सगळा मार्ग भुयारी असल्याने बाहेर अंधारच होता, काही बघता येत नव्हतं तरी ही गप्पा मारत, फोटो काढत प्रवास कधी संपला ते कळल नाही. आमची उतरण्याची वेळ झाली. माईंड युअर गॅप चा पाढा वाचत लहान मुलाच्या बग्गी सकट आम्ही प्लॅटफॉर्मवर आलो. आता जमिनीवर येण्यासाठी आम्हाला दोन खुप उंच सरकते जिना चढायचे होते. गर्दी खुप होती. तरी ही लोकांचं त्या जिन्यावर वैगरे ही अगदी मजेत फोटो काढणं सुरू होत. कारण लंडन जरी आर्थिक आणि व्यावसायिक शहर म्हणून प्रसिद्ध असलं तरी टुरिस्ट लोकांमध्ये ही ते लोकप्रिय आहेच. आणि लंडन ट्यूब प्रवास हा “ टू डू व्हेन इन लंडन “ लिस्टमध्ये वरच्या क्रमांकावर आहे. हिंदी गाण्यात ही लंडन दाखवलं की ट्यूब बरेच वेळा दिसते.
मी जिन्यावर पाऊल ठेवलं पण माझ्याच पुढे कोणीतरी एकच नवखी व्यक्ती डावीकडे उभी होती आणि त्यामुळे सगळा जिना ब्लॉक झाला होता. त्या व्यक्तीच्या मागच्या सर्व माणसांच्या चेहऱ्यावर तीन सेकंद खोळंबा झाला म्हणून “ कोण कुठले येतात हल्ली ट्यूब मध्ये आणि जिना ब्लॉक करून आमचा अमूल्य वेळ फुकट घालवतात “ अश्या तऱ्हेचे भाव दिसत होते. लंडन ट्यूब च्या सरकत्या जिन्यावर उजवीकडे उभ राहून त्या जिन्याच्या सरकत्या पायऱ्या ही धावत धावत चढणाऱ्या लोकांसाठी डावी बाजू मोकळी ठेवायचा इथला अलिखित नियम आहे. चुकीच्या साइडला उभं राहणाऱ्याच्या पाठीला दिसत नाही ते बरंच आहे कारण त्याला मागची माणसं भयंकर लूक्स देत असतात. मी तर डावरी असल्याने डाव्या हाताने कठडा धरला तरच मला कॉन्फिडन्स वाटतो. म्हणून आधी डावीकडे आणि मग चपळाईने उजवीकडे अशी कसरत मला करावी लागते. असो.
सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रत्येक शहराचे आपले आपले असे अलिखित नियम असतात आणि ते अगदी काटेकोरपणे पाळले जातातच. मुम्बई लोकल ट्रेन चे ही असे अनेक नियम आहेत जसे की मधल्या स्टेशनवर उतरणाऱ्या व्यक्तीची सीट “ कुठे उतरणार? कुठे उतरणार ?” असं विचारून आपण बुक करू शकतो. मग ती सीट आपल्यालाच मिळते. ओळखीच्या चेहऱ्याची सीट आपण नुसत्या नेत्र पल्लवी ने ही बुक करू शकतो. किंवा पुढच्या स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांनी दाराच्या कोणत्या भागात उभ राहायचं हे ही अगदी ठरलेलं असत. एखादा नवखा कोणी चुकीच्या ठिकाणी उभा असेल तर त्याचा उद्धार होतोच. असो.
स्टेशनच्या बाहेर ही खूप गर्दी होती. त्यातून वाट काढत, मुलाबाळांना सांभाळत जेव्हा आम्ही त्या प्रसिद्ध झू च्या गेटवर पोचलो तेव्हा तिथला जबडा वासलेल्या अक्राळविक्राळ वाघाचा फोटो बघून बरोबर असलेल्या एका छोट्या मुलीने “ मी नाही येणार आत, मला वाघोबाची भीती वाटते, मी इथेच बसते “ असं म्हणून तिथेच बसकण मारली आणि मोठ्याने गळा ही काढला. तिची समजूत काढून कशी बशी तिला राजी केलं आणि आम्ही आत पाऊल टाकल तेव्हा झू बंद व्हायला फारच थोडा वेळ शिल्लक होता.
त्यामुळे झू चा नकाशा बघून त्यातले मुलांच्या ओळखीचे प्राणी तेवढेच बघू या अस ठरवलं. प्रथम दर्शनीच माकडं दिसल्याने मुलं खुश झाली आणि त्यांची भीती ही पळून गेली. वाघ तर झाडावरच झोपला होता, आराम करत होता आणि त्याचं थोडसं तोंड तेवढंच दिसत होतं त्यामुळे तो भीतीदायक तर सोडाच थोडा केविलवाणाच दिसत होता. शेळ्या, बकऱ्या, मेंढ्या कोंबड्या असे पाळीव प्राणी असलेल्या एरियात मुलांना आत सोडत होते. त्यामुळे त्यांच्या मागे धावणे, त्यांच्या अंगावरून हात फिरवणे, चारा भरवणे, शेपट्या ओढणे हे लहान मुलांनी खुप एंजॉय केलं.
साधारण गुजराथ ची प्रतिकृती केलेल्या एका भागात भारतीय गिर सिंह आहेत. एवढी भारताची दखल घेतलेली बघून बरं वाटलं पण इतकं काही छान जमलं नाहीये ते म्हणून थोडं वाईट ही वाटलं. सिंह मात्र खुप छान बघायला मिळाले. आणि आम्ही असतानाच दोन सिंहांनी मोठी गर्जना ही केली. सारा आसमंत त्या आवाजाने हादरून गेला. नंतर फुलपाखरे , अनेक पक्षी, उंट, हत्ती वगैरे बघत बघत एका कृत्रिम तलावात चालू असणारा पेंग्विन शो पाहीपर्यंत वेळ संपतच आली झू ची , त्यामुळे आवरतं घेऊन येताना केला तसाच द्राविडी प्राणायाम करत दमून भागून घरी पोचलो.
अश्या तऱ्हने दिवस खुप मजेत गेला. उबरने गेलो असतो तर ट्यूब च्या प्रवासाला आणि त्या आनंदाला मुकलो असतो. सार्वजनिक वहानातून प्रवास केल्यामुळे माणसं बघायला मिळाली , लंडन मध्ये फिरण्याचा फील अनुभवता आला. शेवटी हॅप्पीनेस इज
अलाँग द पाथ अँड नॉट इन द डेस्टिनेशन हेच खरं.
हेमा वेलणकर
छान वर्णन.
छान वर्णन.
(सरकत्या जिन्याची डावी बाजू मोकळी ठेवण्याचं आणि जे तशी ठेवत नाहीत त्यांच्या मागच्यांनी खोळंबा झाल्यामुळे त्रासिक लुक दिल्याचं वर्णन 'अपूर्वाई'मध्ये वाचल्याचं आठवलं. )
झूवरून आठवलं. म्हैसूरला झूमधे असेच प्राणी बघत हिंडत होतो. पिंजऱ्यात असलेले वाघसिंह बघून भीती अशी वाटतच नाही. पण अचानक एका सिंहाने गर्जना केली. ती ऐकून अंगावर काटा आला अक्षरशः आणि जाणीव झाली की जंगलाच्या राजासमोर उभे आहोत
अरे मस्त! पब्लिक ट्रान्झिट
अरे मस्त! पब्लिक ट्रान्झिट फारच आवडतो.
हे हॅपिनेस अलोंग पाथ वगैरे सगळं बरोबरच आहे पण मी आजूबाजूच्या लोकांचा जीव मेटाकुटीला आणला असता लवकर पोहोचायच्या रणधुमाळीत.
शेवटी अंबरनाथ फास्ट पाच नंबरला दिसली तर ठाण्याला समोर दोन नंबरची रिकामी डोंबिवली स्लो सोडून गर्दीत पूल ओलांडून लोंबकळत फास्ट गाडीने पाच मिनिटं वाचवली की जीवाला शांती प्रकार डीएनएत एम्बेडेड आहे!
मस्त अनुभव आणि तसेच लिखाण!
मस्त अनुभव आणि तसेच लिखाण!
Happiness is along the path
Happiness is along the path and not in the destination हेच खरं.>> मस्त लेख
फोर्ट मार्केट पर्यंतच जाईल वाले उदाहरण अगदी चपखल. त्यामुळे त्यातला भाव अगदी सहज पोहोचला
मस्त लेख.
मस्त लेख.
छान चित्रदर्शी वर्णन.
छान चित्रदर्शी वर्णन.
मस्त लिहिलंय ममो
मस्त लिहिलंय ममो
थोडे फोटो पाहिजेत आम्हाला.मग अजून चार चांद.
very interesting. After
very interesting. After reading, I felt that I am roaming in London.
छान लेख. फोटो मात्र हवे होते.
छान लेख. फोटो मात्र हवे होते.
शेवटी अंबरनाथ फास्ट पाच
शेवटी अंबरनाथ फास्ट पाच नंबरला दिसली तर ठाण्याला समोर दोन नंबरची रिकामी डोंबिवली स्लो सोडून गर्दीत पूल ओलांडून लोंबकळत फास्ट गाडीने पाच मिनिटं वाचवली की जीवाला शांती प्रकार डीएनएत एम्बेडेड आहे!>>>
अगदी
मस्त.. पण फोटो हवे होते..
मस्त.. पण फोटो हवे होते..
Happiness is along the path .. आणि प्लॅनिंग करण्यात सुद्धा.. फिरायचे भले एक दोन दिवस असले तरी आधीपासून जी हुरहूर असते ती खूप आनंददायी असते.
छानच लेख. पण मेट्रोचे वर्णन
छानच लेख. पण मेट्रोचे वर्णन जास्त व झूचे कमी असे झाले आहे. दुसरा भाग लिहा. व फोटो पण टाका. ब्रिटिश म्युझि अम नीट बघायला किती दिवस लाग तात? म्हणजे तसे प्लान करता येइल. सिंगा पूर झू मस्त आहे.
Happiness is along the path .
Happiness is along the path .. आणि प्लॅनिंग करण्यात सुद्धा.. >>> हे ही परफेक्ट
वावे, अमितव, देवकी, कविन,
वावे, अमितव, देवकी, कविन, लंपन, अंजू अनु, jayantshimpi, वर्णिता, ऋ, अमा ... धन्यवाद.
वावे, होय बऱ्याच जणांनी लिहिलं आहे डावी बाजू मोकळी ठेवण्याबाबत. सिंहाची गर्जना ऐकून सेम तू लिहिलं आहेस तसचं वाटल आम्हाला ही.
अमितव, मला ही होतीच फास्ट ट्रेन ची क्रेझ ,पण हल्ली जरा कमी झाली आहे वयामुळे म्हणायला हरकत नाही. गर्दीचा पूल चढण्या पेक्षा एक नंबरची ठाणा स्लो बरी वाटते vt ला जाताना. पण नवीन गावात नाही होतं कधी पोचतो आहोत अस कारण प्रवासात ही खुप बघायला मिळत.
फोर्ट मार्केट पर्यंतच जाईल वाले उदाहरण अगदी चपखल. त्यामुळे त्यातला भाव अगदी सहज पोहोचला Lol > कविन धन्यवाद.
फोटो आहेत पण सगळ्या फोटोत घरातली माणसं आहेत.
Happiness is along the path .. आणि प्लॅनिंग करण्यात सुद्धा.. फिरायचे भले एक दोन दिवस असले तरी आधीपासून जी हुरहूर असते ती खूप आनंददायी असते. >> ऋ परफेक्ट आहे हे, यात्रा कंपनी बरोबर गेलं की आपल्याला काही करायचं नसतं त्यामुळे ती मजा येत नाही.
पण मेट्रोचे वर्णन जास्त व झूचे कमी असे झाले आहे. दुसरा भाग लिहा. व फोटो पण टाका. ब्रिटिश म्युझि अम नीट बघायला किती दिवस लाग तात? म्हणजे तसे प्लान करता येइल. >> अगदीच बरोबर आहे अमा , आधी मी झू असच नाव दिलं होतं पण झू फारच कमी आहे ह्यात म्हणून बदललं. प्रवासाच्या गोंधळात झू मध्ये वेळ जास्त मिळाला च नाही पण तरी ही दिवस खुप मजेत गेला. प्रवास ही खुप एन्जॉय केला.
एक अख्खा दिवस तरी हवा. मी खुप आशेने गेले होते . कदाचित मला त्यांचं महत्व एवढं माहित नसेल म्हणून असेल पण एवढं अपील नाही झालं मला. त्या मानाने बँक ऑफ इंग्लंड च म्युझियम एवढं प्रसिद्ध नसून ही मी जास्त enjoy केलं. असो.
मस्त चित्रदर्शी वर्णन. पण
मस्त चित्रदर्शी वर्णन. पण फोटो हवे होते.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
शेवटी अंबरनाथ फास्ट पाच
शेवटी अंबरनाथ फास्ट पाच नंबरला दिसली तर ठाण्याला समोर दोन नंबरची रिकामी डोंबिवली स्लो सोडून गर्दीत पूल ओलांडून लोंबकळत फास्ट गाडीने पाच मिनिटं वाचवली की जीवाला शांती प्रकार डीएनएत एम्बेडेड आहे! >>> +१
हा प्रकार लंडन मध्ये पण केला आहे. स्लो वरुन पेडिंगटन ला येताना दोन नंबरची रिकामी गाडी सोडुन ५ नंबर वर भरलेली गाडी पकडुन आयुष्याची २ मिनिटे वाचवली होती. दरवाजे असल्याने लटकता आले न्हवते. पण बाहेरच्या देशात जाउन हाच प्रकार केल्याने आणि हाडाचा मुंबईकर असल्याने १२ वर्ष झाली तरी स्टेशन चे नाव, प्लॅटफ्रोम नंबर हे सगळे विसरले नाही. ह्या प्रवासात जो आनंद मिळाला होता तो राणीचा राजवाडा बघुन मिळला त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होता.
चांगल लिहले आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
अरे भारीच साहिल शहा
अरे भारीच साहिल शहा
लंडन ट्रिप लवकर केली पाहिजे आता.
छान लेख. फोटो हवे होते.
छान लेख. फोटो हवे होते.
ऋतुराज, साहिल शहा, अनिंद्य
ऋतुराज, साहिल शहा, अनिंद्य धन्यवाद.
साहिल शहा , मस्त लिहिलं आहे.
गाडी पकडुन आयुष्याची २ मिनिटे वाचवली होती. दरवाजे असल्याने लटकता आले न्हवते. पण बाहेरच्या देशात जाउन हाच प्रकार केल्याने आणि हाडाचा मुंबईकर असल्याने १२ वर्ष झाली तरी स्टेशन चे नाव, प्लॅटफ्रोम नंबर हे सगळे विसरले नाही. ह्या प्रवासात जो आनंद मिळाला होता तो राणीचा राजवाडा बघुन मिळला त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होता. >>
लंडन ट्रिप लवकर केली पाहिजे आता. >> अमितव, होऊ दे तुमच्या मनासारखं लवकरच.
मजा आली वाचताना ममो. फिरून
मजा आली वाचताना ममो. फिरून आल्यासारखं वाटलं.
धनुडी धन्यवाद
धनुडी धन्यवाद
मुलांना प्राणी आवडत असतील तर
मुलांना प्राणी आवडत असतील तर मिल्टन कींस जवळच्या वोबर्न सफारी पार्कला जरूर घेऊन जा.
चिमण धन्यवाद , सांगते मुलीला
चिमण धन्यवाद , सांगते मुलीला ह्याबद्दल.
माझा लंडन मधला आवडीचा
माझा लंडन मधला आवडीचा कार्यक्रम म्हणजे एखाद्या डबलडेकर बसच्या वरच्या मजल्यावर बसून मजेत एका टोकापासून दुसरीकडे आणि परत असा प्रवास करणे. प्रत्येक भेटीत जमत नाही पण जमेल तेंव्हा करतो.
Route 11: Fulham to Liverpool Street
Route 9: Aldwych to Hammersmith
इथे जायला मजा येते.
https://www.youtube.com/watch?v=QhCuoX7-kWQ
अजय, धन्यवाद. बघितली यू ट्यूब
अजय, धन्यवाद. बघितली यू ट्यूब लिंक ... छान आहे, जवळ जवळ सगळी मेन ठिकाणं दिसतायत ह्या रूट वर.
मी मुंबई मध्ये नवीन असताना शनिवारी ऑफिस सुटल की असाच बस प्रवास करत असे, खुप मजा यायची आणि पुष्कळ मुंबई ही पहाता यायची.