कारण कथा

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 19 October, 2023 - 01:53

कारण .....
दारावरची बेल वाजली आणि अर्धवट झोपेत असणारे भाऊ सवयीप्रमाणे उठले. आज त्यांच्या हातापायात त्राण नव्हत. दाराबाहेर लटकत असणाऱ्या पिशवीतून दुधाची पिशवी आणि वर्तमानपत्र त्यांनी हातात घेतलं आणि दार बंद करून सोफ्यावर ते तसेच पडून राहिले. सहज म्हणून त्यांची नजर वर्तमान पत्राच्या पहिल्या पानावर गेली. अपेक्षेप्रमाणे एका कोपऱ्यात छोटीशी बातमी आलीच होती “ निहार सावंत या तरुणाची झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या” भाऊना ती बातमी वाचायची नव्हतीच. स्वत:च्या मुलाच्या आत्महत्येची बातमी एका बापाला वाचावीशी वाटेल ? भाऊंची नजर सहज समोर असणाऱ्या एका फोटोकडे गेली. समोरच्या भिंतीवर त्यांची पत्नी, भाऊ स्वत: आणि निहार यांचा हसतमुख फोटो. मागच्या वर्षी हृधयविकाराने पत्नी गेली आणि या वर्षी आपला तीस वर्षाचा मुलगा. आता भाऊ एकटेच राहिले होते. पत्नीच वय तस फार काही नव्हत. भाऊ त्रेसष्ट. पत्नी त्यांच्या पेक्षा चार वर्षांनी लहान म्हणजे अवघ एकोणसाठ वय. हे काही मरण्याचे वय आहे.? पण तरीही हा धक्का भाऊनि सहन केला. पण निहार ? एकोणतीस पूर्ण आणि तिसाव चालू . त्याच्या लग्नाचे बघणे सुरु होते. आणि हे अचानक ...
टेबलवर पडलेल्या नोटांच्या पुडक्याकडे भाऊनी बघितले. दहा हजार रुपये. काल आपल्यासाठीच आणले त्याने. किती साधा मुलगा होता निहार. आणि तरीही त्याने अशा रीतीने आयुष्य संपवावं ? आत्महत्या ? का ? काय कारण?
काल सकाळी भाऊ नेहमीप्रमाणे उठले. योगासेन केली. त्यांनी घड्याळात बघितले, सात वाजलेच आहेत. आता इतक्यात निहार उठेल. निहार उठला कि चहा टाकायचा असा विचार त्यांनी केला. आणि भाऊ वर्तमान पत्र वाचत बसले. पण बराच वेळ झाला तरी निहार उठला नव्हता. खर तर निहार कधीच वेळाने उठत नाही. घरी स्वयपाक करून तो ऑफिसला जातो. पत्नी गेल्यावर त्यालाच तर सगळ कराव लागतय. मग आज उशीर का ? तब्बेत तर बरी असेल ना? भाऊ काळजीन उठले. खोलीचा दरवाजा नेहमीप्रमाणे नुसता पुढेच केला होता. भाऊनि “ निहार, निहार” हाक मारली. पण तरीही निहारचा कोणताच प्रतिसाद नाही. भाऊनि जवळ जाऊन त्याला हलवले पण तरीही निहार गप्प होता. बराच वेळ भाऊ त्याला हाक मारीत होते आणि निहार काहीच बोलत नव्हता. मग मात्र भाऊना शंका आली, त्यांनी आपला हात त्याच्या नाकाजवळ नेला आणि त्यांच्या काळजाच पाणी झाल. सहज त्यांची नजर शेजारच्या बाटलीकडे गेली. झोपेच्या गोळ्यांची बाटली होती ती. म्हणजे निहार ने या गोळ्या खाऊन..अरे पण का? विचार करायलाही त्यांना वेळ नव्हता. काहीतरी लगेच गडबड करायला पाहिजे. भाऊ घाई घाईने बाहेर आले. एका मित्राला फोन केला. मित्रही लगेच आला. डॉक्टर, हॉस्पिटल, पोलीस सगळी गडबड सुरु झाली. एका टेबलवर लिहून ठेवलेली चिठ्ठी सुद्धा सापडली “ माझ्या आत्महत्येला कुणाला जबाबदार धरू नका” डेड बॉडी हातात यायला संध्याकाळ झाली. आणि मग आपल्या मुलाच प्रेत त्यांनी सरणावर बघितल. भाऊना प्रश्न होता . निहारने आत्महत्या का केली ?

“ निहार, हि स्टेटमेट कालच तयार करून मी मेल करायला सांगितली होती. हि माहिती ताबडतोब देण्याबाबत हेडऑफिसन वैयक्तिक मला फोन केला होता. या बाबत मी स्पष्ट सूचना देऊन सुद्धा काल या कामाला सुरवात सुद्धा न करता तुम्ही चक्क बाहेर गेला होतात.? काय इतक काम होत तुम्हाला?” देशपांडे चा आवाज चढला होता आणि निहार खाली मान घालून ते सगळ ऐकत होता. साहेबांनी योग्य त्या सूचना दिल्या होत्या. काल दुपारी तीन वाजताच त्यांनी सांगितल होत, पाच वाजेपर्यंत सगळ तयार ठेऊन लगेच मेल करा. ते नसले तरी फडणीस साहेबांच्या मेल आयडीतून पाठवा. पण निहारने हे काम केल नव्हत. पण निहारचा सुद्धा काल नाईलाजच होता . साहेबांना खर कारण सांगण त्याला योग्य वाटलं नाही आणि त्यामुळे तो गप्प उभा राहिला
“ अहो, मी काय विचारतोय तुम्हाला? तुम्ही बोलत का नाही ? मी तुम्हाला इतकही सांगितल होत, बावीस तारखेला म्हणजे आज साहेबांच्या बरोबर रात्री मिटिंग आहे मुंबईला. दोन वाजता मी शाखेतून बाहेर पडेन. पाच वाजता माझ विमान आहे. पण इतक गांभीर्यान सांगून सुद्धा तुम्ही काहीच मनावर घेतलं नाही आणि बेदरकारपणे निघून गेला ?आणि आता कारण सुद्धा सांगत नाही”
“ सर, माझ थोड वैयक्तिक कारण ..”
“ वैयक्तिक कारण ? अहो मी माझी बायको पोर विसरून रात्रंदिवस इथ मरतोय आणि तुम्ही वैयक्तिक कारण सांगताय ? आणि काय होत वैयक्तिक कारण तुमच ? देशपांडेनी उपरोधान विचारल. निहार पुन्हा गप्पच. देशपांडे नि रागाने बेल दाबली. आणि शिपायाकडून फडणीसना बोलावल.
“ फडणीस, हि स्टेटमेंटस काल तयार ठेवायला सांगितली होती, तुम्हाला सुद्धा याची कल्पना होती. काल निहार तुम्हाला सांगून गेला होता?”
“ होय. काल तीन वाजता त्यांनी मला सांगितल एक अर्जंट काम आहे.. मी त्यांना विचारल सुद्धा. साहेबांनी एक काम सांगितल आहे याची आठवण सुद्धा करून दिली. पण तासाभरात येणार आहे आणि आल्यावर उशिरा बसून सगळ काम करतो अस त्यांनी सांगितल. मला वाटलं त्यांच्या वडिलांची तब्बेत बरी नसेल. म्हणून मी त्यांना परवानगी दिली” फडणीसनि एका दमात सगळ सांगितल. देशपांडे नि आवाज थोडा मवाळ करून विचारल
“ तुमच्या वडिलांची तब्बेत बरी नाही का निहार ? म्हणून गेला होतात का ?” खर तर हो अस म्हटल्यावर विषय मिटला असता पण खोट बोलण त्याला कधी जमल नाही.
“ वडिलांची तब्बेत बरी आहे”
“ मग तुम्हाला काही झाल होत का ?
“ नाही. मी पण बरा आहे”
“ अहो, मग काय वैयक्तिक कारण असू शकत? तुम्ही बरे आहात, वडील बरे आहेत. मग झाल काय नेमक ? तासाभराच कन्सेशन तुम्ही का घेतलत हा प्रश्न हे काम झाल असत तर मी विचारल सुद्धा नसता . पण तुम्ही तास म्हणता आणि गायब होता. आणि माझा साहेब माझा अपमान करतोय. हे मी खपवून घ्यायचं. Shame on you nihar देशपांडेचा हळू आलेला आवाज पुन्हा चढला. देशपांडे फाड फाड निहारला बोलत होते आणि निहार शांतपणे सगळ ऐकून घेत होता. निहारचा शांतपणा बघून देशपांडेचा आवाज अधिकच चडत होता. केबिनच्या बाहेर सुद्धा सगळ ऐकू येत होत. संतापाने त्याचं अंग थरथरत होत. काल रात्री साहेबांनी घरी फोन करून केलेला अपमान त्यांच्या आधीच जिव्हारी लागला होता आणि त्यात हे निहारच नुसत गप्प बसण. पण आपलच बिपी वाढून आपल्याला त्रास होतोय हे त्यांचा लक्षात आल आणि त्यांनी स्वत:ला सावरल.
“ निहार, मी आता कंपनीच्या हेड ऑफिसला फोन करून तुमची बदली दुसरीकडे करू शकतो. या क्षणाला. पण मला हा विषय वाढवायचा नाही. आत्ता अकरा वाजलेत घड्याळात. कोणत्याही परीस्थितीत एक वाजेपर्यंत मला स्टेटमेटस पूर्ण करून द्या. मी दोन वाजता बाहेर पडेन. फडणीस त्यांना तुम्ही मदत करा. नो एक्सक्यूज. चलो क्विक.

देशपांडे घाई घाईने विमानतळातून बाहेर पडले. त्यांचा ड्रायव्हर गाडी घेऊन तिथे हजरच होता ड्रायव्हरला त्यांनी फास्ट गाडी मारायला सांगितले. काल घडलेला सगळा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर जशाच्या तसा उभा राहिला. आज सकाळी फडणीसचा फोन आला निहारने काल रात्री झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. तेव्हा पासून देशपांडे बेचैन होते. तोच तोच विचार करून त्यांची बेचैनि अधिकच वाढत होती. कधी एकदा त्यांना ऑफिसला जातोय अस झाल होत. त्यांना उगीचच वाटत होत आपण बोललो म्हणून निहारने आत्महत्या केली. हा विचार मनात यायचा आणि अधिकच घाबरायचे. पण त्यांनी तो विचार झटकून टाकला. कस शक्य आहे? एवढ्या मोठ्या कंपनीच्या सगळ्यात मोठ्या शाखेचा व्याप सांभाळायचा म्हणजे या गोष्टी होणारच ना ?म्हणून काय कुणी आत्महत्या करत का ? मला सुद्धा माझा साहेब बोलतो म्हणून काय आयुष्य संपवायचं ? निहार हा सिन्सिअर स्टाफ आहे. आहे ? होता. पण तरीसुद्धा थोडा हळवा होता का ? अलीकडे तर त्याने आत्मविश्वास गमावलाय अस वाटत होत. पण आम्हह्त्या. छे. तसा मुलगा नव्हता तो. मग काय कारण. ?

“ निहार अस काही करल अस वाटलं नव्हत. त्याला काही अडचणी होत्या का रे ?” देशपांडे अजून आलेले नसल्याने मित्र आपापसात कुजबुजत होते.
“ नाही रे. कसल्या आल्यात अडचणी ? पगार तसा बरा आहे आपल्याला. त्याच्या घरी तर दोघेच आहेत. तो आणि त्याचे वडील. कितीस लागणार आहे दोघांना. त्यात वडिलांची पेन्शन असेलच ना ? आर्थिक अडचणी असतील अस वाटत नाही”
“ लग्नासाठी मुली सुद्धा बघत होता तो. तस वय वाढत होत त्याच.”
“ त्यात आपली लग्न झाली आहेत. त्यामुळे पुन्हा थोड फ्रस्टेशन पण येत असेल”
“ नाही रे. तीस म्हणजे काही फार नाही. अलीकडे नाहीतरी मुलांची लग्ने उशीरच होतात ना?
“पण त्याच्या वडिलांची मात्र दया येते रे. काल बघितलस ना किती हताश झाले होते. मागच्या वर्षी निहारची आई गेली आणि यावर्षी हे अस झाल. निहारन निदान आयुष्य संपवायच्या आधी आपल्या वडिलांचा चेहरा तरी डोळ्यापुढे आणायचा. काय एकेक गोष्टी घडतात ना?
“ पण काय रे, ज्या दिवशी देशपांडे बोलला ना, त्याच रात्री निहार गेला ना ? या देशपांड्या मुळे तर त्याने केले नसेल ना ? कुणीतरी दबक्या आवाजात विचारल आणि त्याच वेळी देशपांडे आत आले. शेवटच वाक्य देशपांडेनी ऐकल तर नसेल ना या भीतीमुळे सगळे एकदम गप्पा बसले आणि आपापल्या कामाला लागले.

देशपांडे तडक आपल्या केबिन मध्ये गेले. कुणीतरी त्यांच्या टेबल वर पेपर ठेवलाच होता. निहार सावंतची आत्महत्या. देशपांडेनी फडणीस ना बोलावून घेतलं. फडणीस ताबडतोब आत आले.
“ काय हो फडणीस, हे निहार ने अस काय केल?” .
“ काही कळत नाही बुवा.” देशपांडेनि आपल्या टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास ओठाला लावला. स्वत:ला स्थिर केला आणि विचारल
“ अलीकडे अपसेट असायचा का हो जरा ?” देशपांडे नि स्वत: मुळे काही झाल नाही याचा अंदाज घेतला. आणि फडणीसच्या ते लक्षात आल.
“ नाही हो तसा फ्रेश होता तो. काम तर मन लाऊन करायचा” देशपांडेनी आवंढा गिळला.
“ आर्थिक अडचणी तर नाहीत ना ?”
“ वाटत नाही. पगारही बरा होता त्याचा” देशपांडे ना त्यांच कुतूहल गप्प बसू देत नव्हत. त्यांनी सरळ विषयाला हात घालायचं ठरवल.
“ तुम्ही गेला होतात का त्याच्या घरी वडिलांना भेटायला? त्यान काही चिठी बीठी”
“ आम्ही डायरेक्ट स्मशानातच गेलो होतो. चिठीच काहीच कळल नाही” वास्तविक माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये हे निहारने लिहून ठेवल होत आणि फडणीसना ते माहित होत. पण देशपांडेना घाबरवण्यात फडणीसना त्याही परीस्थित मजा येत होती. “ फार बोलतो सगळ्यांना. जरा घाबरू दे याला पण. आता तरी शांत येईल “ फडणीस देशपांडेचा सूड उगवत होते आणि देशपांडे घाबरत होते. त्यांना मनोमन वाटू लागल आपण बोलल्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली. आता पोलीस चौकशी चालू होईल. सगळ सहन केल पाहिजे. देशपांडे विचार करीत बसून राहिले आणि मध्येच त्यांनी फडणीसना विचारले
“ का हो फडणीस, ज्या दिवशी मी स्टेटमेट्स करायला सांगितली म्हणजे एकवीस तारखेला. एकवीस ना ? हो एकवीस कि. तो तासाभरात जाऊन येतो म्हणून निहार गेला कुठेतरी. कुठे गेला असेल हो ? मला तर सगळ गूढच वाटतय.” देशपांडे स्वत:शी बोलतायत कि त्यांच्याशी हे त्यांना कळलच नाही आणि ते देशपांडेच्या कडे बघत बसून राहिले.

मृदुलान लिपस्टीकचा शेवटचा हात ओठावरून फिरवला, स्वत:च सौंदर्य तीन आरशात न्याहाळल. कुणीही आपल्या रूपावर लगेच भाळत हा अभिमान होता तिला. कॉलेज मध्ये असल्यापासून अनेक मुल तिच्या मागे पुढे करायची, पण मृदुलान कुणाला भाव दिला नव्हता. मृदुला केवळ दिसायला सुंदर होती अस नाही तर अभ्यासात सुद्धा हुशार होती. एम, बी. ए केल आणि ती एका कंपनीत नोकरीला सुद्धा लागली. पगारही चांगला मिळू लागला. आणि एका बँकेचे कर्ज घेऊन तिने एक फलंट विकत घेतला. आणि तिथे स्वत: राहू लागली. आई कोल्हापुरात राहत होती आणि मृदुला पुण्यात. नोकरीला लागल्यावरही तिथे सुद्धा तिच्या मागेपुढे करणारे बरेच होते. पण मृदुलान तिथे सुद्धा कुणाला जवळ केल नाही. सगळ्या गोष्टी जेवढ्यास तेवढ्या. जर कुणी जास्त जवळीक करू लागल तर त्याला फटकारण्या इतपत धाडस तिच्यात होत. बोलायला काहीशी फटकळ होती. तिची आई नेहमी तिच्या लग्नाची काळजी करायची. मृदुलाच्या प्रेमात बरेच जण होते तरीसुद्धा ती कुणाच्या प्रेमात नव्हती. आपल्या मैत्रिणीशी बोलताना ती म्हणायची “ प्रेमात पडले तर एकाच मुलाबरोबर डेटिंग करता येईल पण सध्या मी विवाह aap मध्ये नाव घातले आहे ना तर अनेक मुले बघता येतात. डेटिंगच आहे ते आणि मजा येते” पण याचा सुद्धा तिला कंटाळा आला होता. आणि म्हणून तिने ठरवले होते आता फक्त एक दोन मुले बघायची आणि पसंत करून टाकायचे.तिला नापसंत करण्याचा प्रश्नच नाही इतका आत्मविश्वास तिला होता. आजच चार वाजता तिला भेटायला मुलगा येणार होता आणि ती डेटिंग ला बाहेर जाणार होती. काय बऱ नाव त्याच? अलीकडे इतकी मुल बघितली आहेत. नावच लक्षात राहत नाहीत. ती स्वत:शीच हसली आणि त्याचवेळी दारावर बेल वाजली. घड्याळात चार वाजले होते. म्हणजे आला वाटत मुलगा. वेळेवर आला कि. मृदुलान दरवाजा उघडला आणि दारात स्मार्ट मुलगा उभा होता. त्याला बघताच मृदुला खुश झाली.
“ ये.” मृदुलान त्याच स्वागत केल. आणि आत बोलावल.
“ मी मृदुला” म्हणत तीन हात पुढ केला.
“ मी निहार सावंत” स्वत:ची ओळख करून देत निहारन थोडस दबकतच हात पुढे केला. निहार आपल्याला बघून भांबावलाय हे तीन ओळखल. स्वत:च्या सौंदर्याचा तिला गर्व वाटू लागला. थोडस स्थिर झाल्यावर ती म्हणाली
“ चल जाऊ या बाहेर ?”
“ बाहेर कशाला हो ? इथ आहेच कि. तुमची हरकत नसेल तर इथेच बसू या आपण”
“ शी . मला अहो कसल म्हणतोस. किती मोठ वाटत ते. मृदुलाच म्हण मला” तो कसबस “ हो म्हणाला.
“ आणि खर सांगू का तुला, आपण जितक मोकळेपणान बोलू तितक आपल्याला दोघांना निर्णय घ्यायला सोप पडेल. हो ना “
हो
“ तुझी जुजबी माहिती मला माहिती आहे. माझी सुद्धा तू पाहिली असशीलच. मला आई आहे.वडील नाहीत. आई कोल्हापुरात असते आणि मी इथ. मी थोडी बिनधास्त मुलगी आहे नोकरी करते. स्वत:चे निर्णय स्वत: घेते. आणि आयुष्य हे मजा मारण्यासाठी असते या गोष्टीवर माझा विश्वास आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यात जे फरक करतात त्यांच्याबाद्ल मला घृणा आहे. मी ड्रिंक घेते. ते बघ. ते काचेचे कपाट. तिकडे कोपर्यात. तो माझा बार आहे. पण मी आहारी जात नाही कशाच्या. दर शनिवारी दोन पेग. आणि किशोरची गाणी. स्वयपाक येतो मला. आणि येतो म्हणजे काय रे. आईने रट्टे मारून शिकवला. मी बाई ठेवली आहे. छान करते सगळा स्वयपाक. ती नाही आली कि ऑन लाईन मागवते. इतक सगळ असताना उगीच राबण्यात काय अर्थ आहे. आणि बाहेरच खाऊन माझ पोट बिघडत नाही.” इतक बोलून मृदुला हसली आणि निहार बोलायची वाट बघत बसली. पण निहारला काय बोलायचं ते कळत नव्हत.
“ बोल ना रे. तुझ काय ?”
“ काय सांगू? मला वडील आहेत. आमच पण एक घर आहे. पण ते जून आहे. मध्ये आम्ही काही खर्च करून थोडफार वाढवल. चांगल आहे. माझी नोकरी तर तुम्हाला .. तुला माहित आहेच”
“ पण बाकी लाईफ एजोय करतोस ?”
“ म्हणजे ? ड्रिंक्स मी घेत नाही. नॉन व्हेज खात नाही. सगळा स्वयपाक मी घरी करतो. आणि मी आणि वडील जेवतो. मला फार मित्र नाहीत. एकटाच असतो.”
“ पण एकट राहायला आवडत तुला ?”
“ तो विचारच करत नाही मी. हे वाटणीला आलेलं आयुष्य आहे.” मृदुलाच आणि त्याच काहीच पटत नव्हत. पण तरीसुद्धा निहार मृदुलाला आवडला होता. त्याचा साधेपणा, घाबरत बोलण सगळच. नाही तरी नवरा बायको दोघही स्मार्ट असून काय कारायचं आहे? उलट साधा नवरा असला तर जरा कंट्रोल मध्ये राहील. नाही तर दोघ मिळून ड्रिंक्स घ्यायचे म्हटलं तर संसाराचा पुरता बोऱ्या वाजेल. मृदुला गालातल्या गालात आपल्याच विचारावर हसली आणि निहारला वाटलं ती आपल्यालाच हसते आहे.
“ माझ आयुष्य साध आहे अगदी. तुम्हाला थोड विचित्र वाटलं असेल”
“ नाही रे. चल कॉफी प्यायला बाहेर जाऊ या. “
“ नको हो. तास भर निघून गेला. मी फोन सायलेंट वर ठेवला होता. बरेच फोन येऊन गेले, मला ऑफिस मध्ये अर्जंट काम आहे” निहार फोन दाखवत बोलला
“ गप रे. तुला कॉफी हाउस कुठे आहे माहित आहे का ? अगदी समोर. फक्त पाच सात मिनिट चालत. तेवढ्यान काहीच होत नाही”
“ ठीकाय चला “
“ आणि हे अहो जाहो बंद कर बघू आधी”
“ ठीक आहे चल.” मृदुला त्याच्या बरोबर बाहेर पडली. मनात कुठेतरी तिच्या निर्णय होत होता. निहार तिला दिसायलाच नव्हे तर स्वभावाने आवडला होता. ती त्याला खेटून चालत होती. तो आवडल्याचे संकेत देत होती. आणि निहार थोडा दूर दूर चालत होता. तो स्पर्श त्याच्यासाठी नवीन होता पण तरीही त्याला अशी सलगी करण योग्य वाटलं नाही. दोघही बोलत बोलत कॉफी हाउस जवळ आली. मृदुला त्याच्याकडे बघत होती कोणत्यातरी सिनेमाविषयी, नाटकाविषयी बोलत होती पण निहार फक्त ऐकत होता. त्याला ऑफिसला जाण्याची घाई झाली होती. देशपांडेचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर होता. फडणीस सारखे फोन करत होता.
मृदुलान बोलता बोलता त्याचा हात हातात घेतला आणि हळूच दाबला. आणि निहारने तो हात हातातून काढून घेतला. मग मात्र मृदुला चिडली
“ किती बावळट आहेस रे तू ? एक सुंदर मुलगी तुझा हात हातात घेते, हळुवार दाबते आणि तू तो सोडवून घेतोस. मी तुला काही सांगण्याचा प्रयन्त करते आहे. काहीच कस लक्षात येत नाही तुझ्या? तू काय हे आहेस का रे ? किती अरसिक आहेस तू ? एका मुलींचा तू अपमान करतोयस. हे शोभत तुला ?” मृदुला पटकन बोलून गेली. निहार खजील झाला. थोडावेळ कुणीच काही बोलल नाही. मृदुलाला वाटलं आपण उगीच त्याला बोललो पण आता बोलून झाल होत. निहारचा चेहरा पडला होता. मृदुला त्याला जाताना म्हणाली
“ मी उद्या कोल्हापूरला जाणार आहे. आपण तेवीस तारखेला बोलू” तिने डोळ्यांनच त्याची माफी मागितली आणि दोघांनी निरोप घेतला.

घड्याळात सहा वाजले होते. निहारला ऑफिस मध्ये जायचे होते. देशपांडेनी सांगितलेले काम करायचे होते. पण त्याला तिकडे जायची इच्छा नव्हती. फडणीसचे फोन वारंवार येत होते. पण निहार ते घेत नव्हता. मघाशी मृदुलाशी बोलताना त्याने फोन सायलेंट केला होता आणि आता तर त्याने बंद करून टाकला. अस का म्हणाली मृदुला ? तू काय हे आहेस का ? हे म्हणजे काय? तिला काय म्हणायचे होते ? आणि आपल्याला बावळट म्हणाली. आपण बावळट आहोत? किती स्मार्ट आहोत आपण दिसायला. दारू पिण म्हणजे स्मार्ट. मला नाही आवडत दारू बिरू. पण स्वत:च्या हिंमतीवर आयुष्यात उभ राहाण याला स्मार्टनेस म्हणत नाहीत ? आई गेल्यावर घरची सगळी काम करून आपण ऑफिस आणि घर सांभाळतो आहोत. कधी ऑफिसला आपण उशीर केला नाही ना कधी भाऊंच्या कडे दुर्लक्ष केल. हे काय बावळटपणाच लक्षण आहे ? मृदुला दिसायला चांगली आहे. आवडली आपल्यला. पण इतकी स्मार्ट मुलगी आपल्या घरी सूट होईल का? राजरोस पणे ड्रिंक्स घेणारी, एका पुरुषाबरोबर खेटून चालणारी, पहिल्याच भेटीत त्याचा हात हातात घेणारी. भाऊंच कोण बघेल ? आपल जून घर तिला आवडेल ? निहारच्या मनात विचारांच्या मागून विचार येत होते. वाट दिसेल तिकडे तो चालत होता. आपण कुठे चाललो आहोत हे त्याला कळत नव्हते. बराच वेळ निघून गेला आणि मग त्याला घराची आठवण झाली.

निहार घरी आला तेव्हा भाऊ आले नव्हते. आपणच चहा करून घ्यावा म्हणून तो किचन कडे वळला इतक्यात भाऊंची चाहूल लागली.
“ भाऊ, अहो कुठे गेला होतात?”
“ काही नाही रे. एका मित्राकडे गेलो होतो. तुला माहित आहे कि त्याची बायको आजारी असते. बिचारा अडचणीत आहे. आता सगळ्यांचीच वय झाली ना.”
“ भाऊ, चहा घेणार ना ? तुम्ही सुद्धा ?
“ हो हो. टाक थोडा” काही वेळ तसाच शांततेत गेला.
“ निहार, उद्या थोडे पैसे मिळतील का रे ?” भाऊनि संकोच करत विचारले. ते अधून मधून निहार कडून पैसे घ्यायचे. भाऊंची पेन्शन होती. पण निहारने ना त्याचा कधी विषय काढला ना कधी भाऊना पैसे कशाला पाहिजे म्हणून विचारले. वडिलांना हिशोब विचारणे हे त्याला योघ्य वाटत नव्हते.
“ किती हवेत भाऊ ?”
“ दहा हजार दे. फार नको”
“ पगार एक तारखेला होतो. तेव्हा चालतील का ?”
“ उद्या बघ ना जरा. त्या मित्राला द्यायचे आहेत”
“ ठीक आहे भाऊ. बघतो काही तरी”

देशपांडेच्या केबिन मधून फडणीस बाहेर आले. निहार एकवीसला कुठे गेला असेल हे कोड त्यांनाही होत पण तो बावीस तारखेला सुद्धा लवकरच बाहेर पडला होता. स्टेटमेंटस काम पूर्ण झाल, देशपांडे ऑफिसच्या बाहेर पडले आणि त्यान फडणीसांची परवानगी घेतली होती.
“ निहार, आज पुन्हा ?”
“ हो. नाही बर वाटत. मूड नाही. प्लीज. पाहिजे तर फुल डे रजा टाका. पण जाऊ दे मला” फडणीस हो नाही काहीच बोलायच्या आधी तो बाहेर पडला होता.
देशपांडेना म्हणतायत त्याप्रमाणे तो अलीकडे अपसेट असायचा का? पण आपणच इतके आपल्या कामात असतो दुसरा कसा आहे हे बघायला वेळच मिळत नाही आपल्याला. फडणीसनि तो विचार झटकला आणि कामाला लागले.

मृदुला ऑफिसला जायच्या घाईत होती. आज सकाळीच ती गावावरून परत आली होती. नेहमीपेक्षा जरा जास्तच खुश होती. निहारला भेटायचं आणि आपली संमती कळवायची हा विचार तिन पक्का केला होता. इतक्यात फोन वाजला. जवळच्या मैत्रिणीचा फोन म्हणून तिला तो टाळता आला नाही.
“ बोल. ऑफिसच्या गडबडीतच बर सुचत तुला फोन करायचं?”
“ मृदू, तो मुलगा तू परवा म्हणालीस तो. तुला आवडला म्हणालीस ते ? निहार ना ?
“ हो. निहार सावंत त्याच काय मग ? उद्या भेटणार आहे त्याला मी”
“ आता ते शक्य नाही मृदू. पेपर पाहिला नाहीस वाटत ? त्याने आत्महत्या केली काल
“ काय कस शक्य आहे ? आज त्याला भेटायचं ठरल होत. काय कारण ग ?
“ काही कळत नाही. पेपर बघून घे”
मृदुला साठी हा धक्का होता. कशान गेला असेल निहार ? किती चांगला होता तो स्वभावान? आणि आपल्याला आवडला सुद्धा होता. आणि हे अस अचानक ? आपण त्याला फारच बोललो. इतक बोलायचं? त्याला आपण तू “ हे” आहेस का म्हणालो. म्हणजे डायरेक्ट त्याच्या पुरुषार्थावरच बोललो. त्याला राग आला असेल. दु:खी झाला असेल ? हे तर नाही ना कारण ? परवा भेटला तेव्हा तो बावळट वाटला पण आत्महत्या करेल अस वाटलं नाही. माय गोड ! मग कालच्या दिवसात काय तरी झाल. पण काय कारण ?

“ या सज्जन राव” बाळसाहेब भोसलेनि हाक मारली आणि निहार त्याच्या ऑफिस मध्ये गेला. ऑफिसमधून
“ काय रे, माझी चेष्टा करतोस”
“ अरे बाबा, तुझ्यापुढे आम्ही काय आहोत हे तुलाही माहित आहे. हुशार, सज्जन आणि आदर्श मुलगा. तुला बघूनच माझा बाप मला मारायचा. मला राग का यायचा माहित आहे ? मी मठ्ठ आहे म्हणून नाही तर तू इतका हुशार का म्हणून “ अस म्हणून बाळासाहेब हसले.
“ अरे बाबा ते शाळा कॉलेज मधल जाऊ दे. पण आता तू करोडपती बिल्डर आहेस आणि मी एका कंपनीत कारकून”
“ जाऊ दे रे. ते इतक काही विशेष नाही. बोल कस काय आज इकड वाट चुकला ?
“ वाट बीट नाही चुकलो. येतो कि सहज सुद्धा. पण आत्ता मात्र एक काम घेऊन आलोय”
“ बोल”
“ बाळ, एक तारखेपर्यत दहा हजार रुपये देशील मला ? थोडी जरुरी होती” बाळासाहेबांनी तिजोरी उघडली. दहा हजार रुपये दिले. आणि निहार ने त्यांना धन्यवाद दिले.
“ निहार, पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. पण त्याच नात्यांन विचारतो तुला मागेही तू अनेकदा माझ्याकडून पैसे मागितले होतेस आणि ते तू परतही केलेस. पण तरीही मित्र म्हणून विचारतो हे कशासाठी पैसे हवे आहेत तुला?”
“ अरे, भाऊंच्या एका मित्राची बायको सिरीयस असते. त्याला भाऊ मदत करत असतात”
“ कोण मित्र ?तू बघितलस त्याला ? निदान त्याच नाव ?
“ नाही. भाउंच्या मित्राला मी कशाला भेटायचं? आणि त्याच नाव मी का विचारायचं ?
“ पण भाऊ त्यांच्या पेन्शन मधून का हे पैसे देत नाहीत ? घर खर्च तू करतोस अस तू मागे म्हणाला होतास ?
“ तुला नेमक काय म्हणायचं ? निहारने रागाने विचारल.
“ हे बघ. मी तुला आधीच सांगितल मी मित्र म्हणून बोलतोय. त्यामुळे तू रागावू नकोस. तू जरी एक लाख रुपये मागितले असतेस तरी मी तुला ते दिले असते. ते सुद्धा बिनव्याजी. पण तू भोळा वाटतोस मला?”
“ स्वत:च्या वडिलांशी डांबरट पणाने वागायचे ?”
“ नाही वागायचं. पण वडिलांनी सुद्धा तसच वागायला पाहिजे”
“ बाळ .. “
“ थांब. मी तुला स्पष्टच सांगतो. ,..... बाळ पुढे बोलत होता आणि निहारच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. कधी राग, कधी आश्रू. त्याला काय बोलाव ते सुचत नव्हते. तो बाळासाहेबांचा निरोप घेऊन उठला. आणि मनाच्या विषन्न अवस्थेतच त्याने taxi ला हात केला.

निहारने आत्महत्या केली हे भाऊना पटत नव्हते. बराच वेळ सोफ्यावर ते तसेच विचार करत बसले होते. त्याने लिहून ठेवले होते “ माझ्या आत्महत्येला कुणाला जबाबदार धरू नका” पण हे जरी असले तरी कारण काय ? एक माणूस सुखासुखी आपले आयुष्य संपवेल ? पण निहार सुखी होता का ? ऑफिस मध्ये कामच प्रेशर होत त्याला. ऑफिस मधून आला कि कसा थकून बसायचा तो. लग्न जमत नव्हत. मुलींच्या अपेक्षा किती असतात आजकाल. त्यात त्याची आई नसल्याने घरच्या कामाचा लोड. भाऊंची नजर समोर पडलेल्या दहा हजार रुपयांच्या कडे गेली आणि ते चरकले. आपली सुद्धा पैशाची मागणी अधून मधून असायची. ते सुद्धा त्याच्यावर प्रेशर असाव का ? पण आपण मागितले कि तो द्यायचा कुरकुर न करता ? पण आपण तरी काय करणार होतो.? हे कारण नसणार. इतका तो लेचापेचा नव्हताच.
निहार काल रात्री काय लिहित होता. त्याला डायरी लिहायची सवय होती. त्यात त्याने काही लिहील असेल का ? भाऊ त्याच्या बेडरूम मध्ये गेले. कपाट उघडल आणि डायरी हातात घेतली. डायरीच शेवटच पान त्यांनी उघडल आणि ते वाचू लागले.

२२ एप्रिल
“अलीकडे काही दिवसात मला फारच नैराश्य आल्यासारखे झाले आहे. हे आयुष्य मला जड वाटू लागले आहे. मनात अनेक प्रश्न येतात पण त्या प्रश्नांची उत्तरे शोधूनही सापडणार नाहीत हे वास्तव माहितही आहे . तरीही मन मात्र पुन्हा पुन्हा त्याच प्रश्नांच्या पुढे घोळत आहे . देशपांडे इतका अपमान करून सुद्धा आपण नोकरी का करत असतो ? अजूनही आपले लग्न का ठरत नाही ?आपण बावळट आहोत का ? आपण हे आहोत का ? हे म्हणजे काय षंढ म्हणायचे होते तिला ? भाऊ अधून मधून आपल्याकडे पैसे का मागत असतात ? त्यांच्या पेन्शनचे पैसे कुठे जातात ? भाऊना आपण कधी का विचारत नाही ? आई अचानक का निघून गेली ? या प्रश्नाची उत्तरे फक्त एकाच शब्दात देता येतील “ नशीब”
आज बालासाहेबानि हे प्रश्न विचारले तेव्हा मला राग आला . केवळ भाऊना गरज होती म्हणून न बोलता मी त्याच्याकडून दहा हजार रुपये घेतले आणि निघून आलो.” भाऊ डायरी वाचत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते.
“ बाळासाहेबांनी सांगितले भाऊनि एक बाई ठेवली आहे. या बाईला एक मुलगा आहे. आणि भाऊ त्याचे वडील आहेत. तिची स्वत:ची मुलगी सुद्धा आहे. बाप कोण त्या मुलीचा माहित नाही. पण मुलगा भाउंचा आहे हे माहित आहे मला. या गोष्टीची कल्पना तुझ्या आईला सुद्धा असावी पण तुला काही त्रास नको म्हणून या गोष्टी सांगितल्या नसाव्यात. तिला भरपूर मन:स्ताप होत असणार” आपली आई मानसिक घुसमट होऊन गेली आहे अस बाळला वाटत. म्हणजे एका परीने भाऊनि आईचा खुन केला अस म्हणायचं का? बालासाहेब बोलत असताना मला कमालीचा राग आला होता. आपल्या वडिलांच्या बदल बोलताना या त्रयस्थ माणसाला लाज कशी वाटली नाही असे वाटले. पण तो बोलत होता.
“ हि बाई भाऊंच्या कडे पैसे मागते आणि भाऊ तिला देतात. कधी पेन्शन मधले तर कधी माझ्या पगारातले. म्हणजे बापाचे चोचले मुलगा पुरवतोय” हे तो बोलल्यावर मी अधिक संतापलो होतो. भाऊंच्या मित्राची बायको सिरीयस आहे म्हणून भाऊ पैसे मागतायत आणि हा त्यांच्यावर आरोप करतोय. मी त्याल विचारले
“ हे तुला कुणी सांगितले ? आणि तो निर्ल्लज पणे म्हणाला
“ मी रंगेल माणूस आहे हे माहित आहे तुला. त्या बाईच्या मुलीला फिरवतो आपण. चिकना माल आहे एकदम” हे तो दात विचकून म्हणाला. इतका निर्ल्लज माणूस भाऊंच्यावर आरोप करतोय. ? आणि हे मी ऐकून घेतोय. मी फार काही बोललो नाही. घरी आलो. भाऊना मी दहा हजार रुपये दिले. रात्री दोघे जेवलो. माझा त्यांच्यावर विश्वास आहे.
जेवताना भाऊ म्हणाले “ त्यांच्या झोपेच्या गोळ्या संपल्यात” भाऊ रात्री झोपेची गोळी घेतात. त्याशिवाय त्यांना झोप येत नाही. मी अंगावर शर्ट चढवला आणि केमिस्टच्या दुकानात गेलो.
अलीकडे मी माझा विश्वास गमावला आहे. माझा निर्णय पक्का आहे. एकाकी आयुष्य मात्र मला जड वाटू लागले आहे.

भाऊनि डायरीच शेवटच पान वाचल आणि ते मटकन खाली बसले. त्यांच्या डोळ्यातून पाणी घळघळा वाहत होत. आणि इतक्यात फोन वाजला
“ हलो भाऊ, मी प्रदीप बोलतोय. मी पेपरला वाचल. निहारच”
“ होय रे. फार वाईट वाटलं !!
“ बर ते जाऊ दे भाऊ. भाऊ, आज दहा हजार रुपये देताय ना ? आई विचारत होती” भाऊ फोनवर काहीच बोलत नव्हते. प्रदीप हलो हलो करत होता. आणि भाऊ सुन्नपणे कधी त्या डायरीच्या पानाकडे तर कधी दहा हजार रुपयाच्या पुडक्याकडे बघत होते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिली आहे. प्रत्येक कोनातून पझलचे तुकडे जुळलेले वाटताहेत तर दुसरा कोन दिसतो ही कल्पना आवडली. आत्महत्या का केली हे गौण आहे, तो पर्यंतचा प्रवास आवडला.

छान लिहिली आहे. प्रत्येक कोनातून पझलचे तुकडे जुळलेले वाटताहेत तर दुसरा कोन दिसतो ही कल्पना आवडली.
>>>>+१

भावनांची आंदोलने आणि त्यानुसार हेलकावे खाणारे मन खूप मनोवेधकपणे दाखवले आहे.

खूप हळवी कथा !

कुठल्यातरी हळव्या, कमकुवत क्षणी, मन असा दुर्दैवी निर्णय घेऊन मोकळं होतं.. अशा वेळेस मनाला सावरण्यासाठी साठी, second thought देण्यासाठी आप्तस्वकीय, मित्र, आधारगट, हवेतच....

Father's sins visited upon the sons अशी एक बायबलची‌ म्हण आहे. त्याची आठवण झाली.