Aatmapamphlet - मराठी चित्रपट मार्केंटींगमध्ये कमी पडतात का? आणि का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 October, 2023 - 11:52

मराठी चित्रपट मार्केंटींगमध्ये कमी पडतात का? आणि का?

Aatmapamphlet नावाचा मराठी चित्रपट गेल्या शुक्रवारी रिलीज झाला. मला आज हे नाव कानावर पडले.

चित्रपटाचे कौतुकच वाचले, त्यामुळे ट्रेलर बघितला. पुन्हा एकदा लहान मुलांची लव्हस्टोरी. विषयात नावीन्य नाही. पण सादरीकरणात असावे. तसेच लव्हस्टोरीपलीकडे काहीतरी असावे असे वाटते. एखादा डार्क ह्युमर वगैरे. कारण जातीभेद देखील दाखवला आहे त्यात. चित्रपट लोकांपर्यंत वेळीच पोहोचला असता तर नक्कीच चर्चा झाली असती असे मटेरीअल एकंदरीत वाटले.
IMDb अगदी ९/१० दाखवले आहे, टाईम्स ऑफ ईंडिया ४/५ स्टार दाखवत आहे.
ट्रेलर ईथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=oSEWI7V5CRQ

हा सुद्ध परेश मोकाशी चित्रपट आहे. या आधी वाळवी पाहिला होता. चांगला चित्रपट आहे हे कानावर पडताच कोण सोबत आहे हे न बघता एकटाच रात्रीचा शो बघून आलेलो. आवडलेला. त्यावर धागाही काढलेला. जेणेकरून जास्तीत जास्त लोकं बघतील.

पण या वरच्या Aatmapamphlet चित्रपटाबद्दल गूगल करताना अजून काही बातम्या नजरेस पडल्या त्या अश्या की काही ठिकाणी पब्लिक नसल्याने याचे शो रद्द करावे लागले. कधी मराठी चित्रपटांना जास्त शो नाही म्हणून ओरडा असतो, तर ईथे आहे तोच शो चार माणसे बघून रद्द होत आहे.

काय आहे हे? यांना मार्केटींग करता येत नाही का? की मार्केटींगचे महत्व समजत नाही का? की बजेट प्रॉब्लेम असतो? पण व्यवसाय म्हटले की त्यावर तोडगा काढावाच लागणार ना? सोशल मिडिया मध्ये जरी प्रभावी मार्केटींग केली तरी जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पिक्चर पोहोचवता नाही येऊ शकत का? आपण मायबोलीवर मराठी चित्रपट कसा वाटला धागा काढतो. मी स्वतः मायबोलीवर कित्येक मराठी चित्रपटांबद्दल स्वतंत्र धागे काढले आहेत, जे हिंदीबाबत केले नाही. ही जी एक मातृभाषेतील कलाकृतींबद्दल आत्मियता असते ती आपल्या सर्वातच कमी जास्त प्रमाणात असते. याचा फायदा घेऊन मराठी चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे ईतके कठीण आहे का? कारण आपल्याला कितीही वाटले की मराठी चित्रपटांना प्रोत्साहन द्यावे तरी आपणही चार लोकांना तेव्हाच सांगणार जेव्हा तो आपल्यापर्यंत पोहोचणार. जो ट्रेलर बनवला आहे तो आपल्यापर्यंत पोहोचायला हवा ना, की आपणच जाऊन शोधायचा. नक्कीच काहीतरी चुकतेय.. चर्चा अपेक्षित.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो आलाय झी 5 वर नक्की बघा आणि आपल्या टीनेजर मुलांनाही दाखवा त्याहून लहान मुलांना दाखवायलाही हरकत नाही, फक्त चित्रपट पाहताना त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची तयारी ठेवा.

बघितला आज. आवडला. शेवट भरकटलाय असं वाटलं. थोडा आधीच संपवायला हवा होता असं वाटलं.
कुणाला लाल सिंग चढ्ढाची आठवण नाही झाली का हा पिक्चर बघताना?

लालसिंग चड्डामध्ये तरुणपणीचा शाहरुख दाखवला आहे एवढ्या चक्कर मध्ये पूर्ण पिक्चर बघितला होता. नको पुन्हा ती आठवण..
आत्मा पॅम्प्लेट पुन्हा बघायचा आहे.. पण मी बघितला तर घरचे सुद्धा बघणार.. त्यांना झेपेल का ही शंका आहे.

आज पाहिला. सुरुवातीला जरा रेंगाळला वाटला अर्धा तास.पण धमाल आहे.बरेच गंभीर विषय खुसखुशीत प्रकारे मांडलेत.
शेवट आवडला.

आवडला हा पिक्चर. मेंढुरपाकच्या सीनला प्रचंड हसू आलं. एकदम खुसखुशीत narration आणि मजेशीर संवाद आहेत. Narration चा टोन जमलाय अगदी Lol लहान मुलांचा सगळा ग्रूप धमाल आहे आणि त्यांची कामंही छान झाली आहेत. मजा आली.

काही काही चित्रपट फक्त अवॉर्ड जिंकण्याच्या उद्देशाने बनवलेले असतात, असं कळलं. प्रेक्षकांनी बघितला काय , न बघितला काय, त्यांना काही देणंघेणं नसतं.

एकदम खुसखुशीत narration आणि मजेशीर संवाद आहेत. Narration चा टोन जमलाय अगदी Lol लहान मुलांचा सगळा ग्रूप धमाल आहे आणि त्यांची कामंही छान झाली आहेत >> +१ "भावांनो" ज्या प्रकारे नि प्रसांगांना वापरले आहे ते कहर आहेत. क्लास बिल्ड करत नेले आहे.

‘ती काय दिसते! काय चालते! तिच्यासारखा डबा तर कुणीच खात नसेल!’ >> हे रत्न आहे एकदम . तिथून लक्षात येते कि चौफेर लक्ष ठेवायला हवे. बॅकग्राउंड ला पण भलतीच धमाल सुरू असते मधे मधे.

मेंढुरपाक म्हणजे 'मेंढरं तयार करणे' असं आहे ना ते? आंधळेपणाने कुणाच्या तरी मागे जाणारी माणसं अशा अर्थाने.

ऋन्मेष, शाहरुखला जरा बाजूला ठेवून बाकीचा लालसिंग चढ्ढा आठवत असेल तर बघ Lol भारताच्या अलीकडच्या इतिहासात घडलेल्या घटनांची नायकाच्या आयुष्याशी घातलेली सांगड, यावरून मला तो आठवला.

‘ती काय दिसते! काय चालते! तिच्यासारखा डबा तर कुणीच खात नसेल!’ >> हे रत्न आहे एकदम . तिथून लक्षात येते कि चौफेर लक्ष ठेवायला हवे. बॅकग्राउंड ला पण भलतीच धमाल सुरू असते मधे मधे
>>> +१

इतिहासात घडलेल्या घटनांची नायकाच्या आयुष्याशी घातलेली सांगड
>>>>

लालासिंग मध्ये ही सांगड मला कुठेच जमलेली दिसली नाही.. त्यामुळे हे साम्य लक्षात आले नाही.
या चित्रपटात.. येस.. जाणवले.. कदाचित मी सुद्धा ९० किड मराठी मिडीयम असल्याने जास्तच..

मी परवाच्या शनिवारी बघितला. छानच आहे. लेख न व विनोद एकदम लै भारी. सुरुवातीलाच मुसोलीनी व हिट लर च्या फोटोला मागून दगड धोंडे. फारच भारी. शाळेतील मुलांचे प्रेम हा ट्रोप आता मरा ठी सिनेमात एकदम स्थिरावला आहे. प्रत्येकाला भावण्यासारखी च बाब आहे ती.
एकदा लव्हस्टोरी फिट झाल्यावर पुढचे काश्मीर मिसाइल हे सर्व बोअर आहे. तिथेच कट करायला हवे होते. दिग्दर्शकाच्या महत्वाकांक्षा एकदम
वाढल्या वाट्ते. तो पार्ट कट करुन लगेच अरायवल बघायला घ्या.

सॉलिड जमून आलाय. भावांनो फारच भारी. छोटा बोऱ्या गोड आहे. कॉईनवाला सार्वजनिक फोन उर्फ PCO, दूध पिणारा गणपती, बॉम्बस्फोट, त्यादिवशी लवकर सोडलेली शाळा, स्टीलचे शाळेचे डबे, हे सर्व रिलेट करता आले. त्याकाळी बॉलपेनपेक्षा शाईचे पेन जास्त प्रचलित होते का? नक्की आठवत नाही. परत एकदा पाहणार नीट. वेगळाच चित्रपट आहे.

आज बघितला हा चित्रपट Zee5 वर आणि खास याच्यासाठी थिएटरला गेलो नसल्याचे बरे वाटले!!
हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि एलिझाबेथ एकादशी आवडले होते त्यामुळे चित्रपटाकडून जास्तीच्या अपेक्षा होत्या पण भ्रमनिरास झाला.
सुरुवातीची काही मिनिटे त्या उच्च स्वरातले नरेशन अगदीच रसभंग करते आणि नंतरचे सगळे पण खुप ओढूनताणून वाटत राहते..... अधलीमधली काही चमकदार वाक्ये सोडली तर एकही प्रसंग भिडत असा नाही.
ना कुठली व्यक्तिरेखा नीट डेव्हलप होते ना त्या लव्हस्टोरीत जीव गुंततो.
बाकी ते जातीपाती आणि सर्वधर्मसमभाव वगैरेचे प्रसंग फारच बालिश वाटतात; म्हणजे ब्लॅक कॉमेडी वगैरेचा प्रयत्न असेल तर साफ फसलाय!! शेवट तर अगदीच अ आणि अ ची हद्द आहे .

कदाचित इथल्या कमेंट्सनी पण अपेक्षा वाढवून ठेवल्या असतील..... पण एकंदरीत नाही आवडला!!

मला तसा आवडला.सुरुवातीला 1 तास जरा बोअर झाला.सुरुवातीला मुलगी हात पकडते त्या सीन च्या आजूबाजूला प्रचंड प्रस्तावना आहे.पण ज्वलंत विषय ज्या हलके फुलकेपणी आणि तरीही अर्थ पोहचेल असे हाताळले आहेत ते आवडलं.

मत थोडेफार स्वरूप यांच्या सारखेच आहे. खूप जमून नाही आला असे वाटले..
सुरुवातीला 1 तास जरा बोअर झाला.सुरुवातीला मुलगी हात पकडते त्या सीन च्या आजूबाजूला प्रचंड प्रस्तावना आहे.---- +123456

स्वरुप च्या पूर्ण पोस्टी ला मम. इथल्या कमेन्ट्स बघून वाटत होते आपल्याला कसा अगदिच आवडला नाही. उठुन यावे वाटत होते मधूनच.

या चित्रपटाची शैलीच अशी आहे की कोणाला एखादा प्रसंग मार्मिक भाष्य करणारा वाटेल तर कोणाला तोच बालिश.
मी सुद्धा सुरुवातीला बोअर होतो की काय या भितीने धास्तावलेलो. निवेदनाच्या शैलीशी जुळवून घ्यायला वेळ लागलेला. तो हात पकडायच्या प्रसंगाच्या आसपास बरेच प्रस्तावना लांबलीय यालाही अनुमोदन. पण नंतर लव्हस्टोरी आणि त्याच्या आसपास येणारे प्रसंग आवडू लागले, रिलेट होऊ लागले, चित्रपटाच्या जातकुळीशी देखील जुळवून घेता आले. पण ओवरऑल मला आवडला तरी मी कोणाला बघा म्हणून सजेस्ट करायच्या भानगडीत पडलो नाही. म्हणूनच इथेही आवर्जून परीक्षण वगैरे लिहिले नाही. मराठी चित्रपट म्हणून सॉफ्ट कॉर्नर ठेवून चार कौतुकाचे शब्द जास्त जोडायचो आणि कोणाला अगदीच आवडला नाही तर तो येऊन शिव्या घालायचा. आधीच काय कमी पडतात मला ईथे ज्यात ही आणखी भर Happy

ते पहिले पणजीचे घर सोडणे कशाला आहे. असे वाट्ते व एकदा जोडी जम ल्यावर पुढचे मिसाइल वगिरे फारच बोअर आहे. शाळकरी लव्ह स्टोरी सेमच टेंप्लेट वापरलेली आहे जरा घासून.

एकदा जोडी जमल्यावर पुढचे मिसाइल वगिरे फारच बोअर आहे >> +१
पिक्चर आवडला, पण शेवट अ आणि अ मुळे नाही आवडला.

इथे वाचुन शेवट आवडणार नाही हे आधीच माहित होतं. त्यामुळे सगळाच चित्रपट आवडला शेवट जणू दिसलाच नाही मला किंवा हसण्यावारी नेला असेल. किंवा आवडला हे ठरवल्यावर तेवढ्यासाठी नाही आवडला कशाला म्हणायचं... तसाही तो फार कोणाला आवडलाच नाहीये. असा दिलदार प्रकार डोक्यात झाला असेल. Lol
अरे पणजीचे घर सोडण्यात मजा आहे की. भारदस्त चरित्राची सुरुवात आणि त्यात बरेच पंचेस मिळालेत.

अमित+१

मला तर खूपच आवडला आत्मपॅम्फ्लेट. ते नॅरेशनही काही ठिकाणी लांबले असले तरी प्रेक्षक म्हणून एकदा त्याचा वेग अचूकपणे पकडला की आपण बरोबर रोलर कोस्टर सारखं खाली-वर जातो. नुकताच बघितलेला हेन्री शुगरही असाच वाटला होता. नॅरेशन वेगवान असण्याने कथानक एकाग्रता कमी असलेल्या प्रेक्षकाला धरून ठेवते. त्यामुळे एक प्रयोग म्हणून टीमचं कौतुक वाटलं आणि जिथे मार्केट फेअर नाही तिथे कलाकृती नवीन धाटणीत सादर करणे याला हिंमत लागत असावी.

माझ्यामते 'सर्वधर्मसमभाव' ह्या कन्सेप्टला कल्पकतेचा डेड एन्ड आला आहे. 'अमर ‌अकबर ॲन्थनी' पासून- ते 'बॉम्बे'- ते मागच्या आठवड्यात आलेला विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' पर्यंत सगळे जॉन्रा+कथाप्रकार करून झालेले आहेत, तरीही हा सिनेमा मला रिफ्रेशिंग वाटला. कारण सगळ्या जातींच्या कंडिशनिंगवर वास्तववादी भाष्य करूनही सिनेमा कुठेही कडवट वा टोकदार झालेला नाही, त्याने प्रेक्षक म्हणून तो सहज स्विकारता येतो व प्रवचनाचं ओझं होत नाही.
घराण्याचा मूळ पुरुष 'स्त्री' असणं हेही आवडलंय, आईबाबा, शिक्षक आवडले. मित्र तर खूपच आवडले. भावांनोने तर शेवटी धमाल आणली आहे. सगळे मिळून मिसाईल उचलतात व सर्व शत्रू डोळ्यात पाणी आणतात ते गमतीदार व निरागस वाटलं. 'चाचा चौधरी' कॉमिक्स मध्ये जी धमाल आणि निरागसता असायची , ती खोटी वाटली तरी मजा यायची तसं काहीसं वाटलं. Happy

साधारण नव्वदच्या दशकातील बालपण असणाऱ्यांसाठी खूपच रिलेटेबल झाला आहे. अगदी राममंदिराची वीट- बाबरी मस्जिद असो , बर्फाचा गोळा, बेंचवर कर्कटकने खोडलेली नावं, शाळेत न्यायला येणाऱ्या बाई, इंग्रजी बोलण्याचे झटके मित्रांची उधारी ई .
पुन्हा बघेन.

लोकही,
शेवट असा का केला आहे त्यामागे लेखक दिग्दर्शक काही म्हणाले आहेत का? म्हणजे त्यांना नक्की काय दाखवायचे होते?
कारण अचाट किंवा काल्पनिक सुरुवात त्या मिसाईलपासून नाही तर दोघांचे पालक अगदी खुशी खुशी दोघांच्या लग्नाला तयार होतात ईथपासून झाली आहे. प्रत्यक्षात असे होत नाही. चित्रपट ज्या काळातला आहे त्या काळात तरी नाही. तरी ते तसे का दाखवले आहे?
त्यांचे असे चटकन जुळणे हा सकारात्मक शेवट होता की ही सुद्धा एक fantasy च जसे ते पुढे मिसाईल प्रकरण असे उपरोधाने दाखवायचे होते?
मला हा प्रश्न तेव्हा पासून पडलेला. पण स्पॉइलर नको म्हणून ओटीटी वर येत सर्वांनी बघायची वाट बघत होतो.

Pages