रॉकी और राणी की कायकी प्रेमकहाणी

Submitted by अस्मिता. on 30 September, 2023 - 10:27

रॉकी और राणी

काही तुकडे चांगले आहेत, पण 'क्या करू ओं लेडीज मैहूं आदतसे मजबूर' या नेमाने मधेमधे केजोने डिझायनर कपड्यांचे ठिगळ जोडले आहे. त्याने ही गोधडी शेवटी 'न्यूयॉर्कमध्ये भीक मागताना पांघरावी जशी'- अशी बटबटीतच झाली आहे. यांना पेट्रियार्की विरोधात बोलायचा आव आणून फक्त लक्ष वेधून घ्यायचं असतं. ते कुठल्याही बाजूने नसतात. 'खरा भाव व उगा खळबळ ' यातला फरक आजकालच्या प्रेक्षकांना कळतो.

पापाजीची 'याददाश्त' गेलेली असल्याने ते लेकीएवढ्या कुठल्याही बाईचे मुके घेतात. ती बाईही 'ठीक आहे नं , लग्नाकार्यात कमीजास्त चालायचंच' म्हणते. Proud लेकरंबायको विसरून हे तेवढं लक्षात रहातं. धरमपाजीबा 'एकनिष्ठ' आहेत , ते पूर्ण सिनेमात एकच शब्द वारंवार बोलत रहातात. 'जामिनी-जामिनी' करत आयुष्यभर सुस्कारे सोडतात. हे नाव बंगाली असल्याने मूळ 'यामिनी'(रात्र) असावं, एवढ्या सुंदर नावाचा 'गुलाबजाम' केला आहे. जांबंबोरं न खाताच तोंड आंबट पडतं.

एक तेवढं शबाना आझमीचं काम मनापासून आवडलं. ती असलेले सगळेच प्रसंग खरेखुरे वाटलेत. बाकी कुणातच कसलंच कन्विक्शन दिसलं नाही. सगळे नमुने यांच्याच घरात हे तर डेली-सोप प्रेरित वाटलं. रिबेल-वाग्दत्त सूनबाई आलिया येऊन चाळीस वर्षांपासूनची अडलेली क्रांती चार दिवसांत करते. मग तिच्या सासूबाई एकदम बोलतबोलत 'कांटो सें खिंच के ये आंचल तोड के बंधन बांधी पायल' ही कृती गाऊन दाखवीत करतात. 'दिल की उडान' भरायला सासूबाईंची ना असते, म्हणून यांना स्वतःची सून यायची वाट बघावी लागते. कधीकधी असं होतं बऱ्याच घरात, पण इथं पाच मिनिटांत एक क्रांती घडवून आणतात. क्रांतीचा हा वेग अचंबित करणारा आहे.

आलिया मुलाखती घेत असते म्हणे, पण एकुण एकच मुलाखत घेतली आहे. त्यातही तिचं पात्र कसं आहे हे दाखवण्यासाठी ते तेवढं रचलं आहे असं वाटतं. सतत साड्या घालून फिरते व पदराने महाल झाडते, कामानिमित्त म्हणावं तर दुसरीकडे सुद्धा साड्या हे काळाप्रमाणे मला काही पटणेबल वाटत नाही. आजकालच्या स्त्रियांना सगळ्या प्रकारचे पेहराव आवडतात. स्त्रिया अविवाहित असताना, आपल्याच घरी कुठलाही समारंभ नसताना, मध्यरात्री साडी आणि बिकिनी ब्लाऊज घालतीलच असं नाही. कपडेपट कितीही सुंदर असला तरी कथानक असे असल्याने 'जरी का शृंगारले मढे' या ओळींचा प्रत्यय येत रहातो.

रणवीरचा घर/महाल/रंधावा हाऊस का जे काय आहे ते इतकं मोठं आहे -इतकं मोठं आहे- इतकं मोठं आहे- इतकं मोठं आहे- आता इन्फिनिटीपर्यंत मोजा. एवढंही फेकू नये माणसानं, प्रेक्षकांनी आईच्या मायेने पदराखाली घ्यावं तर काल्पनिक पदरही फाटायचा. एवढं मोठं घर फक्त 'धनलक्ष्मी लड्डू ' विकून झाले आहे. फक्त लाडू विकून एवढं श्रीमंत व्हायला दिल्लीतल्या प्रत्येकाने अन्नपाणी सोडून गेले तीस वर्षे फक्त यांचे धनलक्ष्मी लाडूच खाल्ले असावेत असं वाटलं. इथं मात्र कन्विक्शन दिसलं. Wink गंमत म्हणजे पूर्ण विश्वात पसरलेल्या महालात एकही नोकर नाही.

जया बच्चनला पंजाबी लाऊड खडूस बाई साकारता येत नाही. ती अजिबात पंजाबी वाटत नाही, फक्त खडूस वाटते. का गं, पडद्यामागे तर जमतं तुला, आताच का अंगात आलं मग. हा अभिनयही टिकटॉक वरचा खडूस बाईचा कायिक अभिनय वाटतो. ही भूमिका किरण खेरला खूप सूट झाली असती. अमिताभचा KANK मधला 'डेफिनेटली चंदिगढ' हा चावट डायलॉग आठवू नका. Wink

रणवीर सिंगची एनर्जी सुपरफिशियल वाटते, एरवी हीच एनर्जी अशाच रोलमधेही जेनुईन वाटायची. आलिया तर 'बघाच मी असं काही करेन की तुमचे डोळेच दीपतील' याच आत्मविश्वासाने वावरते. तिच्या आईबाबाचा अभिनय व नृत्य बरे आहे. पण मूळ संहितेपासून सुटेसुटे वाटत रहाते. एखादी स्वतंत्र क्लिप जोडल्यासारखी वाटते. जसं रणवीर सासूसोबत ब्रा-खरेदीला जातो व सासऱ्यांकडून कथक शिकतो हे चांगले आहे. पण हे सगळेच एकदम गूगली मारून उथळ होतात, डोळे मिचकवतात, अतिशय पांचट जोक्स मारतात म्हणून पॅकेज म्हणून अशा सीन्सना हवा तो आदर मिळत नाही. एरव्ही पांचट बोलणारा माणूस कधीमधी तात्विक बोलला तर आपणही विश्वास ठेवणार नाही, तसं!

रणवीरचा बाबा मख्ख-डेलीसोप बाबा आहे. जो साक्षात्कार झाल्यासारखा एकदम कुटुंबवत्सल होतो. बहिणही आजीला फडंफडं काहीतरी बोलते. आजी एक सेकंद गोरीमोरी होते, धरमपाजीबा 'घरं तोडू नकोस रे लेकरा' म्हणत- अगम्य हातवारे करत 'भगवंताला प्यारे' होतात. पूर्ण वेळ नातू आणि होणारी नातसून 'ऐका पाजीबा-ऐका पाजीबा' करत होते. तेव्हा अवाक्षरही बोलले नाहीत हे. एकदम मरूनच जातात, तेव्हा 'अंत्यदर्शन तरी घेऊ द्या माझ्या एक्सचं' म्हणत वैकुंठाला शबाना आझमी आसवं गाळत येते, इतके भारीभारी कपडे की लेक आणि सूनेला धरून न्यावं लागतं हिला. आपल्याला वाटतं अती दुःखाने तोल जाईल म्हणून धरलेय.

मग पाजीबा गेल्यावर तर जया आजीला सगळे 'याचीच वाट बघत होतो, आता दाखवतोच तुला इंगा' खेळतात. आता कुणीच नाही आपल्याला कळल्यामुळे व पिक्चर संपत आल्यामुळे तिलाही उपरती होते. मग लग्न होतं, 'इतक्या वेळ कशाला मांडव चढवला होता बे' असं प्रेक्षकांना वाटून सिनेमा संपतो.

(अवांतर - यामिनी-जामिनी नाव ऐकून,
या राका शशिशोभना गतघना सा यामिनी यामिनी
या सौन्दर्यगुणान्विता पतिरता सा कामिनी कामिनी ।
या गोविन्दरसप्रमोदमधुरा सा माधुरी माधुरी
या लोकद्वयसाधनी तनुभृतां सा चातुरी चातुरी ॥

मला ह्या सुरेख सुभाषिताचा 'सा यामिनी यामिनी' हा तुकडा आठवला, मग मी संपूर्ण ओळी शोधल्या. Happy )

©अस्मिता

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पापाजीची 'याददाश्त' गेलेली असल्याने ते लेकीएवढ्या कुठल्याही बाईचे मुके घेतात. >>>> चांगली आयडिया आहे. Lol

सतत साड्या घालून फिरते व पदराने महाल झाडते, >>> Lol

प्रेक्षकांनी आईच्या मायेने पदराखाली घ्यावं तर काल्पनिक पदरही फाटायचा. एवढं मोठं घर फक्त 'धनलक्ष्मी ' विकून झाले आहे. फक्त लाडू विकून एवढं श्रीमंत व्हायला दिल्लीतल्या प्रत्येकाने अन्नपाणी सोडून गेले तीस वर्षे फक्त यांचे धनलक्ष्मी लाडूच खाल्ले असावेत असं वाटलं. >>> सुपरलोल आहे हे.
बाकीचे परीक्षण अगदी नेमकं. रसग्रहण कसं असावं , ते ही खुसखुशीत याच वस्तुपाठच आहे.

(फेसबुकवर परीक्षणं वगैरे लिहीताना अँगल वगैरे लिहीलं कि भारदस्तपणा येतो. त्यावर प्रतिसाद सुद्धा कॅमेरा काय मारलाय असे असतात. हा अँगल कुठला, कॅमेरा कुठे लावलेला असतो हे समजत नाही). Proud

हा के हजारी धागा होणार आहे. लिहून ठेवा.
हे काय मीच लिहीले की.

धन्यवाद आचार्य, खरं 'शिवधनुष्य' केजोने पेललं आहे, म्हणून माबोकरही आस्थेने प्रतिसाद देतात. Wink Lol

बाकीचे परीक्षण अगदी नेमकं. रसग्रहण कसं असावं , ते ही खुसखुशीत याच वस्तुपाठच आहे.
>>> मनापासून आभार. Happy
कुठलीही तयारी न करता लिहितेय आजकाल, त्यामुळे कुणी कौतुक केलं की कानकोंडं व्हायला होतं. कृतज्ञ Happy

कुठलीही तयारी न करता लिहितेय आजकाल >> एक्स टेम्पोच लिहून होतं. नाही तर दोन दोन वर्षे पूर्ण होत नाहीत लेख . Lol

करण जोहर ने एक कन्फ्युज्ड नायक नायिकांची फौज आणली पडद्यावर.
यांना घोडे झाले तरी प्रेम आणि मैत्री यातला फरक कळत नसतो. सुंदर हिरविनी एकावरच मरत असतात आणि मग त्यातल्या एकीला कळतं कि हा आपल्याला दोस्त समजतो. अरे घोड्या, तुला मैत्रीण तरी मिळाली. दुष्काळी प्रदेशातून आलेल्यांचा विचार केलास कधी ?

फिल्ममेकरची नाळ प्रेक्षकाशी जोडलेली असायला हवी. इथे नायक हिरविनींची शेती करतो आणि आम्ही फटफट्या काढून रस्तोनरस्ते तुडवत रानोमाळ फिरत बसतो. ते काही नाही, रोजच्या ठरलेल्या वेळेला गाडीचा आवाज आला कि जिथे अपेक्षा नाही तिथे मात्र चाळीच्या बाहेर भांडी घासायला चाळीतल्या माधुरी, ऐश्वर्या, करीना येऊ लागायच्या.

करनच्या या असल्या फिल्मी आयुष्याबद्दलच्या भावना कधीच नेमक्या शब्दात मांडता आल्या नाहीत. एक तर या महाशयाने सात आठ हजार स्रीन्स बुक करून गल्ल्यावर डल्ला मारून पळून जायची पद्धत आणली ( टू बी प्रिसाईज- सलमान हे जनक आहेत) आणि सगळीकडे पॉझिटिव्ह रिव्ह्यूजचा भडीमार ओतल्याने आपले असले मत मांडायची हिंमत व्हायची नाही. या अ त्याचाराला वाचा फोडणारा व्हिडीओ सापडला. नक्की बघा. सगळ्या भावना नेमक्या मांडल्या आहेत.

If Karan Johar Directed Your Life

आलियाच्या साड्या, त्या पेक्षाही ब्लाउजेस नक्की बघा. एकदम जबरदस्त डिझायनिन्ग आहे. मनीश मलहोत्रा आहे मला वाट्ते.

पिक्चर मध्ये अधून मधू न जुनी गाणी पेरली आहेत ते आमच्या सारख्या नॉस्टाल जिया फ्रीक्स ना मस्त वाट्ते. सारेगामा रे डिओ ची प्रॉडक्ट प्लेसमेंट आहे.

खॅला होबे क्षण मस्त आहे. ह्या फ्रेजला भारतात एक वेगळेच वजन आहे. नक्की बघा. आलियाच्या वाढदि वशी र णवीर तिला घेउन जातो ते ठिकाण व एकंदरीत क्षण मस्त आहे. असे मला कोणी विश केले तर नक्की आवडेल. वॉट झुमका गाणे मस्त आहे.

न झुगारता येणा रे लग्न बंधन, नवरा बायको मुळातच कंपेटिबल नसणे व त्यामुळे होणा री विचित्र घुसमट व अश्या परिस्थितीत अचानक भेटले ला/ ली सोलमेट हे शबाना व धरमचे नाते एकदम रिलेटेबल आहे. अशी जोडपी बघितली आहेत. वेगळे मार्ग शोधले तर बाईच्या पदरी जमीर की शरमिंदगी येते. सो देअर.

जया भादुरीचे कॅरेक्टर इतके बिटर का झाले ते तिला एक दहा मिनिटाचे स्वगत द्यायला हवे होते तिची ही काही कारणे असतीलच. पण तिला फक्त एका पत्रात बंद करून टाकले आहे. फॅमिली मॅनेज्ड बिझनेसेस मध्ये जुन्या रेसेपी फॉर्मुलेशन्स फार फार निगुतीने जपले जातात हे मी बघितले आहे त्यामुळे ती रेसीपी शेअर करणे घरच्या ओरिजिनल व्यक्तिने - जिने तो पदार्थ डेव्हलप केला प्रत्यक्ष - त्याचे महत्व नक्की आहे ते बघताना अगदी अगदी झाले. कधी तरी तुम्हाला सर्व हक्क सोडावेच लागतात जीवनातले एक सत्य.

आम्ही त्या सूनबाईचे गाणे बघितले. नव्या जनरेशन ने बरीच गाणी त्या पिक्चर मध्येच ऐकली आहेत. मग परवा आम्ही गाइड सिनेमा बिग स्क्रीन वर बघायला गेलो होतो. एक अविस्मरणीय अनुभव. वन्स इन अ लाइफ टाइम व बकेट लिस्ट आयटम त्यात ते गाणे मूळ स्वरु पात ऐकल्यावर व बघितल्यावर लेक एकदम हरखली व तिला त्या गाण्याला वापरण्यातला सिग्निफिकन्स एकदम लक्षात आले. मूळ गाण्याची सर कश्यालाच ये णार नाही. मला कांटों से खींच के ये आंचल हे स्त्री जीवनाची फ्रीडम अ‍ॅन्थम वाट्ते एस्प ते सिनेमात ज्या ठिकाणी येते तिथे. लता बाईंचा आवाज थिएटर मध्ये फॉर्मा त असताना ऐकायला फारच भारी वाटते. अर्धे थिएटर बरोबरीने गात होते.

प्रत्येकीचा स्ट्रगल वेगळा व अनेक लेव्हल वर असू शकतो. एखादी जीवन पूर्ण रिडिझाइन करते एखादी डोक्यावरचा पदर झुगारून देते. व्हॉटेव्हर मीन्स टु इच ऑफ द लेडीज.

रणवीरचा कत्थक नाच मस्त मस्त आहे.

किती सुंदर सुभाषित!
थोडा अर्थही लिही ना, अस्मिता.

आणि परीक्षण ही फार छान.
मला आवडला तरी सिनेमा. सुंदर सेट्स, कपडे, काही काही पंचेस.
आलीय छान दिसते.
फक्त इतकी सुशिक्षित, स्मार्ट मुलगी रॉकी ला लगेच कशी काय पटते ते आपल्याला पटत नाही! Happy

धमाल आहे परीक्षण. मी 10 मिनिटाच्या पुढे पाहू शकले नाही
आता नेटाने प्रयत्न करणार Happy

आलिया छान दिसते, साड्या ब्लाऊज दागिने पण छान पण ती मला शाळकरी मुलगीच वाटत राहते. तिचे लग्न रणबीर कपूरशी झाल्यावर जरा annoying पण वाटू लागली आहे

Ranveer मला आवडतो पण यात लाऊड लाऊड म्हणजे आता कान आणि डोळे दोन्ही बंद करावे इतपत लाऊड वाटतो. त्याचा मित्र बरा होता. आणि ती आलिया काय त्याच्या कुठल्याही पांचट जोक वर मान वेळावून हसते (eye roll)

Dharam पाजी तर, बरे आहे म्हटले मेमोरि लॉस च्या नावाखाली मजा करणे चालू आहे . डायरेक्ट सेकंड बेस, अधेमधे काही नाही. काहीही च्या काय!

शबाना आझमी मला बंगाली वाटली नाही, maybe अजून थोडा वेळ movie पाहायला हिम्मत करायला हवी. तो पाहून बाकीचे लिहिते.
कमाल म्हणजे सगळीकडे याचे फक्त positive reviews आहेत.

सॉलिड परीक्षण.माझी फार चिडचिड झाली अर्धा तासच बघून.बंद केला.मुळात धर्मेंद्र ला इतकं ठरकी बघणं झेपलं नाही.त्यात आलिया सगळीकडे साड्या नेसते, पहिल्या क्षणात फेमिनिस्ट चांगला इंटरव्ह्यू घेऊन इम्प्रेस करणारी आलिया रणवीर च्या कमेंट्स ने एकदम मनात खुश होते.

अगदी अस्मिता..मलाही किरण खेरच डोळ्या समोर आली होती , कास्टिंग मधे प्रॉब्लेम वाटला !
ती क्षिती जोग सुद्धा अजिबात पंजाबी वाटत नाही, मोना सिंग/दिव्या दत्ता/अमृता सिंगला घ्यायचे बजेट नव्हते का ? या सगळ्या अस्सल पंजाबी आहेत आणि उत्तम अभिनय करतात !
मला शबानाही मुळीच फिट नाही वाटली, शर्मिला टागोर शोभली असती !
बरच आहे म्हणा , चांगल्या अभिनेत्रीं उथळ सिनेमात नाही दिसल्या ते !
In wedding scene , रानीच्या बंगाली कल्चरला कुठेही स्थान नाही लग्नात, टिपिकल कलिरे आणि ‘कुडमाई’ सगळे रंधावा फॅमिलीचे !
सिनेमा भर साडी नेसणारी रानी डिचिंग हर बंगाली वधूची साडी , सरेन्डर्ड टु लेहंगा and Patriarchy ! #टाळ्या
स्टुपिड सिनेमे बघायला प्रॉब्लेम नाही पण असे उथळ सिनेमे संदेश द्यायचा /उपदेश करायचा/समाज प्रबोधन करण्याचा दावा करतात ते हास्यास्पद वाटते, चिड येते खरं तर !

क्षिती जोग सुद्धा अजिबात पंजाबी वाटत नाही, >>>>
अगदी डीजे, गडबडीत लिहायचं विसरून गेले. दिव्या दत्ता पर्फेक्ट वाटली असती. तिला अशा वर्षानुवर्षे 'दबलेल्या' भूमिका जमतात. क्षिती जोग फक्त कावरीबावरी वाटते. दोन भावनांमधे फरक आहे, आता काय आपण सांगणार केजोला. Happy

सिनेमे संदेश द्यायचा /उपदेश करायचा/समाज प्रबोधन करण्याचा दावा करतात ते हास्यास्पद वाटते, चिड येते खरं तर !>>>>
मलाही समाज विघातकच वाटतं हे, कारण हवं तेव्हा गूगली मारतात. विचारांना काही कणाच नसतो मुळी. त्यापेक्षा उघडउघड उथळ रहा, ते निदान प्रामाणिक तरी असेल.

> आलियाच्या साड्या, त्या पेक्षाही ब्लाउजेस नक्की बघा.
माबोवर विवाहित गृहस्थही आहेत. कशाला उगाच कुटुंबात भांडणे लावताय ?

Proud
तरी बघायचा आहे हा पिक्चर नक्की.. पण तसाच मूड असताना. म्हणजे करायला काही नाही आणि रात्री झोपही येत नसताना...

अस्मिता, परिक्षण छान लिहिलं आहे. करण जोहरचे सिनेमे तसेही माझ्यासाठी बरदाश्त के बाहर असतात. त्यामुळे बघणार तर नाहीच, पण वाचायला मजा आली.

Lol हे एक पहिले ओव्हरऑल सुपरलोल

ती बाईही 'ठीक आहे नं , लग्नाकार्यात कमीजास्त चालायचंच' म्हणते. >>>
एवढं मोठं घर फक्त 'धनलक्ष्मी ' विकून झाले आहे. फक्त लाडू विकून एवढं श्रीमंत व्हायला दिल्लीतल्या प्रत्येकाने अन्नपाणी सोडून गेले तीस वर्षे फक्त यांचे धनलक्ष्मी लाडूच खाल्ले असावेत असं वाटलं >>>
फक्त खडूस वाटते. का गं, पडद्यामागे तर जमतं तुला, आताच का अंगात आलं मग. >>> Lol

ही वरची वाक्ये फारच धमाल आहेत Happy

पिक्चर आत्तपर्यंत बघावासा वाटला नव्हता. पण आता बघतो, हा लेख बाजूला ठेवून Happy

बाय द वे, र.आ. यांच्या पोस्ट्सही भारी
यांना घोडे झाले तरी प्रेम आणि मैत्री यातला फरक कळत नसतो. सुंदर हिरविनी एकावरच मरत असतात आणि मग त्यातल्या एकीला कळतं कि हा आपल्याला दोस्त समजतो. >>> हे फार चपखल आहे Happy

आचार्य, प्रतिसाद Lol
लिंकही हहपुवा आहे. आत्ता बघितली. Lol
दुष्काळी प्रदेशातून आलेल्यांचा विचार केलास कधी ?>>> Lol
प्रेम आणि मैत्री >>>> Lol

कशाला उगाच कुटुंबात भांडणे लावताय ?
>>> आधी आशा काळे, आता आलिया Lol

मूळ गाण्याची सर कश्यालाच ये णार नाही. मला कांटों से खींच के ये आंचल हे स्त्री जीवनाची फ्रीडम अ‍ॅन्थम वाट्ते एस्प ते सिनेमात ज्या ठिकाणी येते तिथे ते सिनेमात ज्या ठिकाणी येते तिथे.
>>> हो, हे गाणं खरंच तसं आहे. पण मूळ कलाकृतीच्या उंचीला आपली अभिव्यक्तीही नेणं, हे ती संकल्पना वापरणाऱ्याचं कर्तव्य आहे. ते इथं साध्य झालेलं नाही, फक्त त्या अनुषंगाने प्रकट झालं आहे. Happy

आंबटगोड, लिहेन अर्थ. Happy
मनमोहन आणि अनु, भापो Happy

धन्यवाद अमा, विकु, अनु, मनमोहन, आंबटगोड, मृ, फारएन्ड , rr38 आणि ऋ. Happy

सॉलिड परीक्षण!! दोन दिवसात मीही पिक्चर बघितला.. कास्टिंग फारच चुकली आहे, फारच cliche आहे तरीही मला आवडला.. केजो ने असले पिक्चर बनवायला हवेतच नाहीतर रोजच रडगाण आहेच की Wink

अश्विनीमामी +१

जया बच्चन प्लेइंग जया बच्चन...

अशी एक मिम वाचली. Happy
त्याप्रमाणे...ती खत्रुड म्हातारी शोभते..पंजाबी नाही अजिबात. ( बिचारी ऐश्वर्या..असेही वाटून जाते!! Happy )

अस्मिता . माझी हा चित्रपट बघायची अजिबात इच्छा नव्हती. केवळ तु लिहीलेलं परिक्षण वाचून आता इच्छा होतेयं

छान फक्कड जमलाय.. चिरफाड का काय ते Lol

आजकाल पब्लिक खुळावलीय का?
मज अभागीने हा अर्धा सिनेमा PVR ला पाहिलेला . बाकी लोक एवढं समरस होऊन पाहत होते की मलाच वेडी असल्यासारखं वाटतं होतं.

Lol
पण मी म्हणतो किती त्या अपेक्षा केजो च्या चित्रपटाकडून
सगळी पात्रे अर्कचित्र असल्यासारखी आणि सर्व काही वर वरचे.
केजो वेगळ्या भारतात राहतो आणि तिथल्या स्टोरी दाखवतो असे वाटते
त्याच्या मुलाखती पाहिल्या की हा माणूस हुशार आहे हे लक्षात येते पण घोडं कुठं पेंड खातय देव जाणे.

हा माणूस हुशार आहे हे लक्षात येते
>>>>
हो. तो हुशार आहे. त्याला व्यवसाय बरोबर जमतो. म्हणून जे खपेल तेच चकाचक करून दाखवतो.
आणि तो स्टारकिड आहे. स्ट्रगल करून वर आला नाही. त्याचे अनुभवविश्र्वच वेगळे आहे तर तो मिडलक्लास लोकांना भिडणारे कसे दाखवणार. ती त्याची मर्यादाच असावी.

हा सिनेमा भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवल्या जाणाऱ्या सिनेमांच्या स्पर्धेत होता, हे वाचून अपार यातना झाल्या.

कश्मीर फाईल्स आणि केरला स्टोरीचा सुद्धा विचार झालेला हे वाचलेत तर यातना कमी होतील.

Pages