एल-निनो : ढासळते आरोग्य आणि संभाव्य धोके

Submitted by कुमार१ on 15 September, 2023 - 01:02

यंदाच्या जून महिन्यापासून एल-निनो या वातावरणीय बदलाचे अनेक परिणाम दिसून येत आहेत. त्यामध्ये जगाच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी, दुष्काळ किंवा तापमानवाढ होताना दिसते. अद्यापही एल-निनोचा हा प्रभाव टिकून आहे. वातावरणातील या महत्त्वाच्या बदलाचे आपल्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहेत आणि अजूनही होऊ शकतील. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली असून त्यांनी या संदर्भात एक विस्तृत अहवाल प्रकाशित केलेला आहे (https://cdn.who.int/media/docs/default-source/2021-dha-docs/phsa-el-nino...).
त्यातील काही ठळक मुद्द्यांची नोंद या लेखात घेतो.

EL NINO jpeg rev.jpg

वातावरणातील या अनिष्ट परिणामामुळे आरोग्यावर परिणाम का होतात हे प्रथम समजून घेऊ. एल निनोच्या प्रभावामुळे मूलतः आरोग्य-संबंधित खालील गोष्टी घडतात :
1. अन्न तुटवडा
2. मोठ्या लोकसंख्येचे स्थलांतर. यातून अनेक साथींच्या रोगांना आमंत्रण मिळते.
3. खूप वाढलेल्या तापमानामुळे डासांसारखे रोगवाहक वाढतात आणि ते जगभरात सर्वदूर पसरतात
4. हवेचा आरोग्य दर्जाही ढासळतो; आगी लागण्याचे प्रमाण वाढते.

वरील सर्व घटकांमुळे एकंदरीत समाजाचे आरोग्यमान ढासळते आणि आरोग्यसेवाही अपुऱ्या पडू लागतात. यातून खालील आजारांचा सामाजिक प्रादुर्भाव बऱ्यापैकी वाढू शकतो :
1. कुपोषण
2. कॉलरा आणि इतर हगवणीचे आजार

3. टायफाईड, शिगेलोसिस, हिपटायटिस-A& E
4. मलेरिया : या आजाराचे प्रत्यक्ष जंतू आणि वाहक डास या दोघांमध्येही बेसुमार वाढ होऊ शकते. जगात जिथे हा आजार पाचवीलाच पुजलेला असतो तिथे तर त्यात वाढ होतेच, परंतु त्याचबरोबर जगाच्या ज्या भागांमध्ये एरवी हा आजार नसतो, तिथेही तो उद्भवतो.

5. Arboviral आजार : 5. Arboviral आजार : यामध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाचा प्रामुख्याने समावेश आहे. सध्याच्या घडीला डेंग्यू 129 देशांमध्ये फोफावलेला आहे; समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर असलेल्या प्रदेशांमध्ये त्याचा धोका अधिक राहतो.

6. Hantaviral आजार : : हे आजार उंदरांच्या मार्फत पसरतात. उंदरांच्या थेट चावण्यातून किंवा त्यांच्या लघवी किंवा विष्ठेशी मानवी संपर्क आल्यास हे आजार होतात. अतिवृष्टीच्या प्रदेशांमध्ये हा धोका वाढतो.

7. गोवर आणि मेनिंजायटीस. संबंधित लसीकरणात येणाऱ्या अडथळ्यांमुळे देखील या आजारांची वाढ होते.
8. विविध प्रकारच्या अन्नातून होणाऱ्या विषबाधा देखील वाढतात. यामध्ये समुद्री अन्नाचाही समावेश आहे.
सागरी पृष्ठभाग तापमानवाढ >>> समुद्री जीवांमध्ये सूक्ष्मजंतूंची वाढ>> विविध विषांची निर्मिती >> यातील काही विषे ही विशिष्ट माशांमध्ये (शेल) पसरतात तर अन्य काही वायुरूप होऊन हवेतही मिसळतात. >> परिणामी माणसाला अन्नातून व हवेतून विषबाधा होते.

9. श्वसनाचे आजार : हे विशेषतः तान्ही मुले आणि वृद्धांमध्ये वाढण्याची शक्यता राहते.
10. ढासळत्या राहणीमानामुळे मानसिक आजार आणि लैंगिक अत्याचारांमध्ये पण वाढ होऊ शकते.

वरील संभाव्य धोके लक्षात घेता जगातील सर्वच देशांनी आपापल्या आरोग्य सेवा आणि यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे.

हा लेख नागरिकांची आरोग्यदक्षता वाढावी या उद्देशाने लिहिलेला असून त्यात कोणालाही घाबरवण्याचा हेतू नाही.
*******************************************************************************************************************************
चित्र जालावरून साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय, असं वाटतं.
रविवार ५ ऑक्टोबरच्या मटा संवाद मध्ये डॉ. प्रतीक कड या हवामान संशोधकांचा 'राज्याचे पाऊसमान बदललेय' हा अभ्यासपूर्ण लेख आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बदलत्या मॉन्सूनमुळे शेती, जीवनमान, पायाभूत सुविधा आणि राज्याच्या आर्थिक व्यवस्थेवर खोल परिणाम झाले आहेत व यापुढे त्याची तीव्रता वाढणार आहे.
. .
+
सातत्याने विषम हवामान राहिल्यास आरोग्यावर होणारे प्रतिकूल परिणाम देखील अधिक प्रमाणात दिसत आहेत.

सर पावसाळा लांबल्याने शहरी जीवनशैली असलेल्यांमधे ड जीवन्सत्वाचा अभाव जाणवेल का ?
माझ्यासहीत बर्‍याच जणांना हा त्रास या वर्षी होतोय.

छान लेख सर.
माझ्या पाहण्यात २५ ते ४० पर्यंतच्या (बैठ्या जीवनशैलीवाल्या) नात्यातल्या आणि ओळखीच्या लोकांचा समावेश आहे. या लेखानुसार उन्हाळा संपताना डी जीवनसत्व तयार झालेले असते हे बोलकं आहे. आपल्याकडे मे महिना बाहेर पडताच आले नाही. ज्या डॉक्टरांकडे ट्रीटमेण्ट चालू आहे तिथेही त्यांच्या बोलण्यात या वर्षी डी जीवनसत्वाचा अभाव असलेले रूग्ण जास्त आहेत असा उल्लेख होता.

Pages