मन सुद्ध तुझं...!

Submitted by sanjana25 on 23 August, 2023 - 16:56

"मन सुद्ध तुझं गोस्त हाये...."

संध्याकाळचे साडे सहा वाजले असतील... निकिता ऑफिस मधून निघाली. नवीन जॉब, त्यात नवीन लोकं, नवीन मित्र मैत्रिणी, सगळं स्ट्रेसफूल होतं. सहाजिक आहे- निकिता सारख्या लाजऱ्या बुजऱ्या मुलीसाठी कोणतीही नवीन गोष्ट म्हणजे मोठं चॅलेंज! ऑफिस घरापासनं बऱ्यापैकी लांब होतं. थोडंसं चालून मग शेअर रिक्षाने ती घरी जात असे. आज ती भराभर पावलं टाकत आपल्याच तंद्रीत चालत होती. आकाशात मस्त रंगांची उधळण चालली होती. गुलाबी निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढरे ढग सुंदर दिसत होते. फोटो काढायचा मोह काही तिला आवरला नाही.

साधारण पाच मिनिटं पुढे गेल्यावर क्रॉस करताना तिला रस्त्याच्या मधोमध काहीतरी हालचाल जाणवली. काळ्या पांढऱ्या रंगाचं काहीतरी.....नीट जवळ जाऊन बघते तर काय... मांजरीचं छोटूसं पिल्लू ! मांजरी म्हणजे निकिताचा अगदीच जिव्हाळ्याचा विषय! बिल्डिंग मधल्या मांजरी तिच्या घरी पडीक असायच्या. तशी मुळातच निकिता खूप प्रेमळ होती. माणसं असो वा प्राणी, तिला पटकन सगळ्यांचा लळा लागायचा.

आता रस्त्यात हे पिल्लू दिसल्यावर त्याला तिथेच सोडून कसं जायचं? काय करावं काही सुचेना. वेड्यासारखी त्या पिल्लाकडे एकटक पाहत उभी होती. शेवटी रुमाल उघडून तिने अलगद ते पिल्लू हातात घेतलं. हजारो गाड्या भर वेगात जाणाऱ्या रस्त्यावर हे पिल्लू आपल्याला दिसलं म्हणून ठीक, नाहीतर त्या पिल्लाचं काय झालं असतं, ह्या नुसत्या विचाराने ती थरथरली. तिने पिल्लाकडे पाहिलं. किती नाजूक... भेदरलेल्या डोळ्यांनी लुकलुक बघत होतं. आता ह्या इवल्याश्या छोट्या दोस्तासाठी सुरक्षित जागा शोधण्याची मोहीम सुरू झाली.

बरंच अंतर चालून सुद्धा अशी जागा सापडली नाही. थोडं पुढे गेल्यावर एक बंद फॅक्टरी दिसली. ती जागा खूप शांत होती. फूटपाथच्या एका साईडला हळूच निकिताने ते पिल्लू खाली ठेवलं. एकदा प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवून, ती परत जायला निघाली. “आपण निघून गेल्यावर ह्या पिल्लाचं काय होईल?” ही चिंता तिच्या चेहऱ्यावर पसरलेली. भटक्या कुत्र्यानी किंवा मोठ्या प्राण्यांनी किंवा कावळ्यांनी त्यावर हल्ला केला तर? नाही नाही. इथे सोडून जाणं योग्य नव्हतं. आता शेवटचा मार्ग. ह्या निष्पाप जीवाला घरी घेऊन जाणे. खरंतर त्या क्षणी दुसरं काहीच सुचत नव्हतं.

तिने पुन्हा पिल्लाला उचलून चालायला सुरुवात केली. ह्या सगळ्या गडबडीत ती खूप दमलेली. शेअर रिक्षाची लाईन बरीच मोठी होती. ते पिल्लू केविलवाण्या नजरेने इथे तिथे बघत मध्येच थरथरत होतं. रिक्षामध्ये नेमकी मधली जागा निकिताला मिळाली. एका बाजूला कॉलेजला असलेल्या वयाची मुलगी. दुसऱ्या बाजूला एक काकू. ती कॉलेज कुमारिका पूर्ण रस्ताभर फोन वर तिच्या बॉयफ्रेंड सोबत जोरजोरात भांडत होती. देव जाणे काय झालेलं! तिची कटकट ऐकून निकिताचं डोकं दुखायला लागलं. दुसऱ्या बाजूला मान फिरवली तर आपल्या शेजारी बसलेल्या काकू आपल्याकडे सारखं बघत आहेत हे तिला जाणवलं.

“हे पिल्लू तुझं आहे का ग? गोड आहे.” काकूंनी प्रश्न केला.

“नाही”... निकिताने हळूच म्हटलं.

“तुला कुठे सापडलं का हे?”

“हो” -----निकिता पुटपुटली.

“मग आता कुठे घेऊन जात आहेस ते पिल्लू ?”

असा प्रश्न येताच निकिताने सर्व हकिकत सांगितली. दोघी रिक्षातून उतरल्या.

“मी माझ्या घरी घेऊन जाऊ हे पिल्लू? माझ्या घरी ऑलरेडी 4 मांजरी आहेत. मी नीट सांभाळेन.”

काकूंचं हे वाक्य ऐकून निकिता चमकली. अनोळखी व्यक्ती, अशी स्वत: काहीच संबंध नसताना हे पिल्लू घेऊन जायला तयार का होईल? निकिताच्या मनात शंका येत होती.

“तुम्ही खरंच विचारत आहात?” निकिताने विचारलं.

“अगं मांजरी सांभाळण्याचा मला चांगलाच अनुभव आहे. आमच्या घरी सगळ्यांना मांजरी आवडतात. आमचे हे आवडीने करतात सगळं.” असं म्हणत काकू मोबाईल मधले फोटो दाखवायला लागल्या.

हे ऐकून आणि फोटो बघून निकिता विचारात पडली. मांजरी आवडत असल्या, तरी फूल टाईम मांजर घरात पाळण्याचा तिला काहीच अनुभव नव्हता. अधे मध्ये बिल्डिंग मधल्या मांजरी यायच्या, पण थोड्या वेळेपुरतंच. आणि परत घरचे मांजर पाळायला तयार होतील की नाही हे टेंशन होतंच की! निकितापेक्षा त्या काकूंनीच त्या छोट्या पिल्लाची काळजी जास्त चांगल्या प्रकारे घेतली असती ह्यात काहीच वाद नाही. पण काहीही झालं, तरी काकू अनोळखी! असं कसं पिल्लू देऊन टाकायचं? भलेही त्या पिल्लाचा आणि निकिताचा सहवास फक्त गेल्या तासाभराचा का असेना....निकिता फार हळवी होती. सहज कोणाच्या हातात पिल्लू दिलं नसतं, पण काकू चांगल्या वाटत होत्या. मुळात त्यांच्या डोळ्यांत पिल्लाविषयी सहानुभूती स्पष्ट दिसत होती. निकिताने पिल्लू देण्याचा निर्णय घेतला.

“तुम्ही नीट काळजी घ्याल ना काकू?” निकिताचे डोळे थोडेसे पाणावले.

“हो बाळा. आम्ही एवढ्या मांजरी सांभाळतो. त्यात अजून एका मेंबरची भर! आम्हाला आनंदच होईल.” असं म्हणत काकूंनी त्यांचा नंबर आणि घरचा पत्ता दिला. तुला हवं तेव्हा ह्याला भेटायला बिनधास्त ये, असं देखील म्हणाल्या.
निकिताने पिल्लू त्यांच्या हातात दिलं. एवढा वेळ शांत असलेलं पिल्लू हलकेच म्याव म्याव असं ओरडलं. जणू निकिताला धन्यवाद म्हणालं. वाचवल्याबद्दल....

काकू जायला निघाल्या. निकिता बराच वेळ त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तिथेच उभी होती.
दुसऱ्या दिवशी “पिल्लू छान रमले आहे घरात” हे सांगायला त्यांनी आठवणीने फोन केला. हे ऐकून निकिताच्या जीवात जीव आला. अधे मध्ये निकिता फोन करून विचारपूस करायची.
मग काही महिन्यांनी काकूंचं Whatsapp स्टेटस बघितलं. त्यात बऱ्याच मांजरी होत्या. एक चेहरा ओळखीचा वाटत होता! निकिताने लगेच त्यांना विचारलं. तर तो बोका “तेच निकिताने वाचवलेलं पिल्लू” असल्याचं त्यांनी सांगितलं. ते पिल्लू आता थोडंसं मोठं झालेलं. तब्येत सुधारलेली वाटत होती.

आपल्या हातून चांगलं काहीतरी घडलं, ह्याचं निकिताला खूप समाधान वाटत होतं. “प्रत्येक गोष्ट पैशात मोजता येऊ शकत नाही” हे आज तिला चांगलंच जाणवत होतं. तिने देवाचे आभार मानले. जणू देवानेच त्यादिवशी निकिताला, त्या पिल्लाला वाचवण्यासाठी पाठवलं. त्या काकूंबद्दल सुद्धा तिला खूप आदर वाटत होता. अशा रस्त्यात भेटलेल्या अनोळखी मुलीकडून स्वत:हून एक जबाबदारी उचलणं, ह्यासाठी खरंच मोठं मन असावं लागतं.
ते पिल्लू चांगल्या घरात गेल्याच्या आनंदाने निकिताचा चेहरा आज पुन्हा उजळला....!

*****************************************************************************
हा प्रसंग खरा असून, निकिता माझी जिवलग मैत्रीण आहे. हा प्रसंग निकिताकडून ऐकत असताना, तिच्याबद्दल आणि त्या काकूंबद्दल खूप अभिमान वाटला.
अजून एक, मला गोष्ट लिहिण्याचा काहीच अनुभव नाही....पहिलीच वेळ आहे, त्यामुळे सांभाळून घ्या! काही चुकलं असेल तर हक्काने सांगा. मी पुढच्यावेळी लक्षात ठेवेन.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आवडली गोष्ट
एवढ्या घाईच्या आणि तणावपूर्ण जगात अशा छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी घडतात तेंव्हा माणुसकी जीवंत आहे ह्याच समाधान वाटत.
छान लिहीली आहे
पुढील लेखनासाठी शुभेच्छा

कथाबीज जरी तुमच्या ओळखीचे असले तरी कथा तुम्ही सराईत असल्यासारखी फुलवली आहे, इतर बारकावे आणि वातावरणनिर्मिती छान जमलीय

पुढच्य लेखनाला शुभेच्छा

प्रसंग डोळ्यापुढे उभे राहतात आणि त्यात आपण गुंततो हे विशेष आहे त्यामुळे पहिलीच कथा आहे असे वाटत नाही. पु ले खू खू शु.