झाड !! (अंतिम भाग )

Submitted by Sujata Siddha on 23 August, 2023 - 02:16

https://www.maayboli.com/node/83916

झाड !! (अंतिम भाग )

कर्रर्रर्रर्र ...कच !.. गाडीला एक करकचून ब्रेक लागला तशी हृषीकेश ला जाग आली , एक क्षणभर आपण कुठे आहोत हे त्याला आठवेना , काही सेकंद गेल्यावर हळूहळू त्याच्या मेंदूतील संवेदना जाग्या झाल्या आणि आपण बस मधून कुंजीर वाडीला निघालो होतो हे त्याला आठवले . बस मध्येच थांबली होती , त्याने आजूबाजूला पहिले ,दाट काळोख आणि रातकिड्यांची किरकिर एक सारखी ऐकू येत होती . कंडक्टर झोपलेला होता , बस ड्रॉयव्हर जागेवर नव्हता . बस का थांबलीय हे पाहायला तो खाली उतरला ,मोबाईलचा टॉर्च मारत त्याने अंदाज घेतला तसा त्याला धक्का बसला , बस एका जंगलात थांबली होती ! .. पुन्हा वर जाऊन त्याने गाढ झोपलेल्या कंडक्टर ला गदगदा हलवले , “अहो उठा !.. बस कुठे येऊन थांबली आहे बघा , ड्रॉयव्हर पण जागेवर नाही , उठा !.. “
दचकून उठलेल्या कंडक्टर ने ताबडतोब खाली उतरून खात्री करून घेतली , तसे त्याच्या तोंडचे पाणी पळाले , हे काय भलतंच अशा चेहेऱ्याने तो आजूबाजूचे निरीक्षण करू लागला , हृषीकेश हि आधाराला म्हणून त्याच्या शेजारी येऊन उभा राहिला , अचानक एक मोठ्याने ओरड्लेला आवाज ऐकू आला ,तो ड्रायव्हरचा आवाज होता , त्या आवाजासरशी कंडक्टर आणि तो आवाजाच्या दिशेने पळू लागले , अंधार आणि आजूबाजूला वेढलेली झाडी त्यामुळे वाट काढताना फार जिकिरीचे होत होते , टॉर्च च्या उजेडात कसे बसे दोघे रस्ता कापत होते , बरेच अंतर चालून गेल्यानंतर एके ठिकाणी ड्रॉयव्हरचा वेडा वाकडा पडलेला देह त्यांना दिसला , हे काही तरी विपरीत आहे हे जाणवून भ्यायलेला कंडक्टर आरडा -ओरडा करत वाट फुटेल तिकडे पळू लागला , थोड्याच वेळात तो ही दिसेनासा झाला
घाबरून एका जागी खिळून उभा राहिलेला हृषीकेश आता एकटाच राहिला . राहून राहून त्याला आपल्या कृतीचा आता पश्चात्ताप होत होता . तितक्यात पाला पाचोळा वाजल्याची चाहूल लागली , कोणीतरी त्याच्यापर्यंत येत होते , जवळ येणाऱ्या प्रत्येक पावलाबरोबर हृषीकेश च्या पोटात गोळा उठत होता , थोड्याच वेळात एक व्यक्ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली .हृषीकेश ने टॉर्च मारून पाहिले , तो भुऱ्या होता !..
“चला .. “ पापण्यांची उघडझापही न करता, भारावलेल्या जड आवाजात तो म्हणाला आणि हृषीकेश येतोय की नाही हे वळूनही न बघता तो चालू लागला . हृषीकेश ही त्याच्या मागे चालू लागला , पुढे काय वाढून ठेवले आहे याची त्याला कल्पना येत नव्हती . साधारण एक किलोमीटर अजून आत गेल्यावर एके ठिकाणी भुऱ्या यांत्रिक पणे थांबला . ती एक पडकी भिंत होती आणि त्याला लागूनच एक मोठा पेटारा ठेवला होता . पेटाऱ्यापुढे एक विटांनी केलेला चौकोन होता ज्यात आत्ता धडधडीत अग्नी पेटलेला होता . त्याच्याच पलीकडे चार पाच मानवी कवट्यांमधून काही काही सामग्री ठेवलेली , त्यात मध्यभागी हाडे , कवड्या आणि काही काळ्या गुंजा यांच्या साहाय्याने एक यंत्र काढलेलं होतं .
“चला !. मागं योक तलाव हाये त्यात डुबकी मारून हिथं वल्या अंगानं बसाय सांगितलं हाय तुम्हास्नी “
घोगऱ्या आणि जड आवाजात भुऱ्या बोलत होता .
“मी असे काहीही करणार नाही भुऱ्या , आत्ता लाथेने हे सगळं उडवून देतो मी थांब “… चिडलेल्या हृषीकेश ने असे म्हणताच , भुऱ्या च्या डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या झाल्या ,आणि उभ्या जागेवरूनच एक हात लांब करून त्याने हृषीकेशचे मानगूट पकडले आणि मागच्या तलावात बुचकाळून त्या यंत्रापुढे बसवले .बर्फासारख्या गार पाण्याने हृषीकेशचे स्नायू आखडून तो लाकडासारखा ताठ झाला ,त्याला तिथेच बसवून भुऱ्याने तोंडाने काही मंत्र पुटपुटत मघापासून तडफडणाऱ्या एका कोंबड्याला पिशवीतून बाहेर काढले ,क्षणात त्याची मान मुरगाळून त्याचे मुंडके त्याने त्या भगभगत्या ज्वाळांवर टाकले तसा अतिशय उग्र आणि घाणेरडा दर्प सगळीकडे पसरला , कोंबड्याच्या त्या मान नसलेल्या देहातून उडणाऱ्या रक्ताच्या चिळकांडीतले रक्त ओंजळीत घेऊन त्याने हृषीकेश च्या अंगावर शिंपडले , हे बघून हृषीकेशला भोवळ आली आणि त्याचवेळी तो बंद लाकडी पेटारा करकर करत उघडला .बेशुद्ध पडलेल्या हृषीकेशचे केस आणि दोन्ही पायांचे अंगठे भूऱ्याने मग लाल दोऱ्याने बांधून टाकले , एक सुपारी त्याच्या पाठीवरच्या मणक्यांवर फिरवून , मग त्याचे तोंड उघडून ती सुपारी त्याच्या तोंडात घातली ,त्याच्या सर्वांगाला चंदन आणि स्मशानातल्या भस्माचा लगदा चोळला ,एवढे झाल्यावर हृषीकेश ला उचलून त्याने त्या पेटाऱ्यात टाकले , आणि दोन -तीन छिद्र हवा येण्यापुरती सोडून झाकण बंद करून टाकले , त्यानंतर सगळा पसारा आवरून तो तिथून निघून गेला . काही सेकंदातच तिथे भयाण शांतता पसरली ,थोड्या वेळापूर्वी तिथे काही अघटित घडले असेल याचा मागमूसही राहिला नाही …
मध्यरात्र उलटून गेली होती , सर्वत्र चिडीचूप होते , पुन्हा एकदा हलक्या पावलांचा आवाज येऊ लागला .कोणीतरी अलगद चालत त्या पेटाऱ्याजवळ आले ,आणि त्याचे दार उघडले , पेटारा करकर आवाज करीत उघडला आणि भ्यायलेल्या हृषीकेश ने वर पाहीले (होय तो एव्हाना शुद्धीवर आला होता ) ते गुरुजी होते !.. त्यांनी हात देऊन हृषिकेश ला बाहेर काढले ,त्याचे दोन्ही अंगठे सोडवले , सुपारी तोंडातून काढून टाकली ,थरथरत असलेल्या त्याला हाताला धरून मग खालच्या तलावाकडे नेले आणि स्वच्छ अंग धुण्यास खुणावले . त्याने कसे बसे ते बर्फासारखे गार पाणी अंगावर घेतले , मघा विझलेल्या यज्ञाची राख अजून गरम होती , थोडी ऊब यावी याकरता त्याने दोन्ही हात त्याभोवती धरले , ते पाहून गुरुजींनी त्याला हाताला धरले आणि ते म्हणाले “ताबडतोब निघूया ,वेळ फार थोडा आहे. त्याच वेळी कसा कोण जाणे भुऱ्या तिथे प्रकट झाला , वाट अडवत ,चिडलेल्या स्वरात त्याने हृषीकेश ला विचारले , “पेटाऱ्यातुन बाह्येर कसं आला तुम्ही ?” आणि उभ्या जागीच घुबडासारखी मान पूर्णपणे गोल फिरवून त्याने गुरुजींकडे बघत विचारले , “आनी हे दुसरं बुजगावन हिथं कसं आलं ? हि जागा भारलेली हाय , साद्या मानसास्नी दिसत न्हाय . तुम्ही हिथं आलाच कसं ? “ गुरुजी काहीच उत्तर न देता शांतपणे उभे राहिले .त्यांचा थंडपणा पाहून तो आणखीनच थयथयाट करू लागला त्यासरशी संबंध आसमंत थरथरू लागला ,वारा नसतानाही आजूबाजूची झाडे वेगाने हलू लागली , हृषीकेश ओरडू लागला , त्याबरोबर गुरुजीं त्याच्या कानात कुजबुजले ,” हा भुऱ्या नाही , त्याच्या देहातून अघोर बोलतोय , न घाबरता मी सांगतो तेवढे करायचे “ आणि त्यांनी त्याच्या मुठीत एक पुडी ठेवली , “हि घट्ट धरून ठेव “ त्याचवेळी भस्माने त्याच्या भोवती रिंगण काढत ते उद्गारले, याच्यातुन काहीही झाले तरी बाहेर यायचे नाही . हे तुझे सुरक्षा कवच आहे . त्यांचे ईतके बोलून होते आहे तोवर भुऱ्याचा नाच थांबला आणि त्याने पुन्हा त्याच कर्कश स्वरात गुरुजींना विचारले “माझ्या मार्गातून बाहेर पडायला काय घेशील ? “
“ हा मुलगा “ गुरुजी स्तब्ध उभे राहून उत्तरले त्याबरोबर संतापाने स्वतः:ची मान आणि डोळे गरगर फिरवत भुऱ्या
पुन्हा थयथयाट करू लागला , “ बऱ्या बोलाने इथून चालता हो , नाहीतर मुंडकं पिरगाळून जागीच खलास करून टाकीन “
“ तु माझं काहीही वाकडं करू शकत नाहीस .”
“ एवढी मस्ती ? मग बघच आता तु SSSSSS “भेसूर आरोळी ठोकत भुऱ्या गुरुजींच्या अंगावर झेपावला , गुरुजींने आपला एक हात वर उचलला , त्यातून ठिणग्या पडत असल्याचा भास होत होता . त्या हाताला एक रक्तचंदनाची माळ गुंडाळलेली दिसत होती , भुऱ्या झटका बसल्या सारखा मागे सरकला, आणि तिथूनच चवताळलेल्या नजरेने गुरुजींकडे पाहू लागला .काही मिनिटे शांततेत गेली आणि पुढच्या क्षणाला एका कर्णकर्कश वाद्याचा आवाज वातावरणात ऐकू येऊ लागला , क्षणाक्षणाला वाढत जाणाऱ्या आवाजाची तीव्रता मानवी कानांना सहन करण्यापलीकडची होती , दोन्ही हात कानावर गच्च दाबत गुरुजींनी हृषीकेश कडे पहिले तर तो डोके धरून खाली कोसळण्याच्या बेतात होता . तो जर खाली कोसळला तर रिंगणाबाहेर जाईल आणि मग सर्व व्यर्थ .
.गुरुजींनी स्वतःला कसे बसे सावरले आणि त्या वाद्याच्या कर्णकर्कश आवाजात स्वतः:चा खणखणीत आवाज मिसळून गजाननाचे स्मरण करून तेवढ्याच तीव्रतेने त्यांनी ‘तांत्रिक भैरव कवच पाठ सुरु केला , हातात असलेल्या पिवळ्या मोहरा चारही दिशांना उधळत ते भैरवनाथांना आवाहन करू लागले .”ओम , सहस्त्रारे महाचक्र कर्पूर धवल गुरु : …. ”त्याबरोबर ब्रेक लागल्यासारखा वाद्यांचा आवाज बंद पडून तिथे गुरुजींचा आवाज घुमू लागला तसा भुऱ्या आणखी आरडा ओरडा करू लागला , वर आकाशात उंच उडून खाली झेपावू लागला , त्याच्या डोळ्यांच्या जागी फक्त पांढरी बुब्बुळं दिसू लागली पण गुरुजींच्या आवाजात आणि पठणात काहीही बदल झाला नाही , ते तेवढ्याच तीव्र स्वरात आवर्तने करू लागले ,आता भुऱ्या काकुळतीला आला , मोठ्याने रडू लागला , पाया पडू लागला , सहाव्या आवर्तनाला थांबवा असे विनवू लागला , सातव्या आवर्तनाला त्याच्या करूण आर्त किंकाळ्यांनी आसमंत दुमदुमला ,आणि अकराव्या आवर्तनाच्या शेवटच्या “वाद्यं वाद्यप्रिय: पातु भैरवो नित्यसम्पदा .. “ ला त्याच्या देहाच्या असंख्य ठिकऱ्या उडाल्या, त्याबरोबर एक प्रचंड मोठा हिरव्या- काळ्या रंगाचा लोट आकाशात झेपावला आणि बघता बघता दिसेनासा झाला , त्याच वेळी पहाट झाली आणि जणू ते जंगल कुठल्या तरी अमानवी पाशातून मुक्त झाल्यासारखे पक्षांच्या किलबिलाटाने दुमदुमून गेले . हृषीकेश गुरुजींकडे बघून क्षीण हसला . त्याला शारीरिक काहीही वेदना झाल्या नसल्या तरी मानसिक थकवा खूप होता . “ अजून एक महत्वाचे काम राहिले आहे , शिवानंद ला मुक्त करायचे आहे , अघोराने त्याला त्या झाडाच्या बुंध्यात बंदिस्त करून ठेवले आहे . चल अजून उजाडतं आहे तोच करून घेऊ ,एकदा का तिथून वर्दळ सुरू झाली की मग अशक्य होईल .
“पण गुरुजी इथे या निबिड अरण्यातून वाटचाल करत गावात पोहोचेपर्यतच दुपार होईल “
“पण आपल्याला चालत जायचे नाहीच आहे . “
“मग ? “
“Teleporting “.. असे म्हणत गुरुजींनी त्याचा हात धरला आणि त्याला डोळे मिटायला सांगितले , एक क्षणभराचा देखील कालावधी गेला नसेल तोच त्यांनी त्याला पुन्हा डोळे उघड म्हणून सांगितले . हृषीकेश ने डोळे उघडले आणि त्याला एकदम धक्का बसला , ते दोघे त्या झाडाच्या बुंध्याजवळ उभे होते . गुरुजींनी एव्हाना त्यांच्या पिशवीतून काही यंत्र सामुग्री काढली होती , भस्म काढले होते , सर्व सिद्धता झाल्यावर त्या बुंध्यावर एक हात ठेऊन दुसऱ्या हातातल्या माळेवर त्यांनी मंत्र जप सुरू केला , काही क्षणातच त्या बुंध्याला तडा गेला आणि त्यातून देखील एक पांढरा धुर हलके हलके वर आकाशाकडे जाताना दिसला , गुरुजी आणि हृषीकेश दोघेही वर बघू लागले तेव्हा त्या धुरातून एक साधारण वीस एकवीस वर्षाच्या मुलाची आकृती दिसू लागली , त्याने गुरुजींकडे बघून कृतज्ञतेने हात जोडले आणि मग हृषीकेश कडे बघून धन्यवाद या अर्थाने हात हलवला , गुरुजींनीही हात उंच करून त्याला आशीर्वाद दिला . काही क्षणातच ती आकृती विरळ होत नाहीशी झाली .
“गुरुजी मघाशी आपल्याला काळा धुराचा लोट जाताना दिसला , तो अघोर होता ना ? मुक्त झाला का तो पण ? आणि मग भूऱ्याचे काय झाले ?”
“ अघोर मुक्त नाही झाला त्याचा आत्मा शक्तिशाली आहे , पण भैरव पाठ म्हटल्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली . तो त्याने देवतेला दिलेला मान होता , आणि भूऱ्याचं म्हणशील तर तो आधीच गेला होता , त्याच्या मृत शरीरात अघोर ने प्रवेश केला होता . शिवानंद च्या तळमळणाऱ्या आत्म्याला मात्र पुढची गती मिळाली . आता तुला ईथे काही जाणवणार नाही अथवा काहीही त्रास होणार नाही . चला गाव जागा व्हायच्या आत निघूया “ गुरुजी पसारा आवरत म्हणाले . सर्व वस्तू गोळा करून गुरुजींच्या पिशवीत भरता भरता हृषीकेश ने विचारले .
“मघासारखे Teleporting ?“
यावर गुरुजी मोठ्याने हसत म्हणाले , “नाही नाही ..आपल्याला चैतूच्या बाईक वर जायचे आहे . त्याला काल येतानाच मी सांगून आलो होतो , बाईक बस स्टॅन्ड जवळ लावून ठेव मला लागेल म्हणून . चला “
सकाळच्या शुद्ध मोकळ्या हवेत , बाईक चालवताना हृषीकेश आता पूर्वीसारखा तरतरीत झाला होता , काल संध्याकाळ पासून जे विलक्षण नाट्य घडले होते त्यात गुरुजींकडे काही विलक्षण शक्ती आहेत याचा त्याला प्रत्यय आलाच होता पण त्यामागचे लॉजिक आणि शास्त्रीय कारण त्याला हवे होते .
“तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी घरी गेल्यावर देणार आहे हृषीकेश , अगदी सुगंधा ला तु आवडतोस की पवन हे देखील सांगेन . “ गुरुजी मिश्किल हसत म्हणाले आणि हृषीकेश ने पुन्हा एकदा चकीत होत बाईक फुल स्पीड ने ‘अजितेश ‘ कडे दामटली …

समाप्त !..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे कथा
इतर भय कथांपेक्षा फार काही वेगळी नसली तरी उत्कंठावर्धक आहे, संपूर्ण कथा एकदम वाचायला मिळाली त्याबद्दल विशेष आभार.

सहमत..
पुढील कथेच्या प्रतिक्षेत

अप्रतीम !! आवडली कथा. उत्सुकता वाढत होती प्रत्येक शब्दागणिक. गुरुजींचे वर्णन छान केले आहे.

छान कथा
चांगली फुलवली
टिपिकल भयकथा जॉनर होती तरीही खिळवून ठेवणारी

भलतीच विनोदी (आणि अंधश्रद्धेला खतपाणी देणारी) कथा.
जाता जाता १ रहस्य सांगुनच टाकतो. त्या गुरुजींचे नाव बोकलत होते.

@ harshada , अज्ञानी , mi_anu , manya , धनवन्ती , एस , रश्मी. , आबा. , झकासराव , सामी : सकारात्मक प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !..तुमच्या प्रोत्साहनामुळे नवीन कथा लिहायला हुरूप मिळाला

@उपाशी बोका : सायन्स खूप कच्च दिसतंय , त्यातही भौतिक शास्त्राचं वारंही लागलेलं दिसत नाही .

मृत शरीरात अघोर ने प्रवेश...अश्या भंपक गोष्टींना तुम्ही सायन्स म्हणता? धन्य आहात. आणि भौतिक शात्राचं म्हणत असाल तर केशवकूल यांच्या कथा वाचत जा जरा.

खूप छान कथा आणि ओघवती लेखनशैली. कथा उगाच लांबवली नसल्याने वाचताना मज्जा आली. असेच लिहित रहा.

असामी : कथा आवडल्याबद्दल प्रथम मन:पुर्वक धन्यवाद !
सर्व प्रकारचे फीडबॅक समजून घ्या अशी विनंती. : नक्कीच infact निगेटिव्ह फीडबॅक चं स्वागत आहे पण त्या निगेटिव्ह फीडबॅकना काही सेन्स असावा एवढीच अपेक्षा . नाहीतरी 'मला खूप अक्कल आहे आणि समोरचा मूर्ख आहे 'या अशा प्रकारच्या पोकळ आणि बुद्धी न वापरता फक्त खवचट पणे दिलेल्या फीडबॅक ला काही अर्थ नसतो , म्हणून कधी कधी उत्तर द्यावं लागतं एवढंच . तसे आपण सगळे सामान्यच आहोत , पण तरीही कधी कधी लोकांना दुसऱ्याला खाली पडायची खुमखुमी येते तेव्हा मला एक शेर आठवतो , " हम नकटे , तुम नकटे , सभी नकटोंका मेला
उन मे था एक नाक वाला ,वो भी उनका चेला "