झाड !! (भाग ६ )

Submitted by Sujata Siddha on 22 August, 2023 - 09:32

https://www.maayboli.com/node/83916

झाड !! (भाग ६ )

भुऱ्या च्या घरून बाहेर पडल्यावर गुरुजी हृषीकेश ला घेऊन गावाबाहेर असलेल्या काळभैरवाच्या मंदिरात गेले , आणि एक लाल -पिवळ्या रंगाचा धागा , काही कवड्या आणि पिवळी मोहरी अशा काही वस्तू पुजाऱ्यांच्या हातात दिल्या , ,पुजाऱ्यांनी त्या देवाजवळ ठेऊन त्यावर मंत्रोच्चार सुरु केला .
“ हे भैरवनाथाचं मोठं जागृत मंदिर आहे , भैरवनाथ म्हणजे दुष्ट शक्तींचा कर्दनकाळ , भोलेनाथांचा उग्र अवतार !.,चल ,त्यांचं होतंय तोवर थोडा वेळ मंदिराच्या आवारात बसू या “ असं म्हणून गुरुजी खाली उतरून आले आणि हिरवळीवर बसले ,मंदिर पूर्ण काळ्या घडीव दगडांनी बांधलेले आणि भव्य होते , मंदिराचा परिसरही अतिशय नयनरम्य होता , गुरुजींनी सोबत आणलेली छोटीशी बॅग उघडली आणि त्यातले सँडविचेस आणि थर्मास मध्ये आणलेली कॉफी हृषीकेश ला देऊ केली तेव्हा ,त्याला त्यांचे फार कौतुक वाटले , “खाता खाता त्याने प्रश्न विचारला , “आत्ता तुम्ही त्या वस्तू देवाच्या ईथे ठेवल्या. निर्जीव मूर्तीजवळ त्या वस्तू ठेऊन काय साध्य होणार आहे ? ही अंधश्रद्धा नव्हे का गुरुजी ? “
“ मुळीच नाही . एखादी गोष्ट आपण जेव्हा करतो त्या मागचा कार्य कारण भाव जर आपल्याला माहिती असेल तर ती अंध नव्हे डोळस श्रद्धा झाली .”
“कशी ?”
“मला एक सांग काल तु आला होतास तेव्हा कोणत्या अवस्थेत होतास ? “
“खूप भ्यालो होतो मी , मला सुटका हवी होती “
“मग तसं होतं तर आत्ता तु ईथे माझ्याबरोबर कसा ?”
“ तुम्ही मला म्हणालात देवाजवळ डोकं टेकवून ये म्हणून आत गेलो आणि मतपरिवर्तन झालं “
“मग तु अंध श्रद्ध आहेस असं मी म्हणू शकतो का ? “
“नाही ,मी तुमच्यावर विश्वास ठेऊन आलोय , कारण तुम्ही मला दिसता , देव कुठे दिसतो ?”
“ फक्त मी दिसतो या विश्वसाने तुझं मत परिवर्तन झालं ? तुला एक प्रश्न विचारण्याव्यतिरिक्त मी असं काय केलं ज्यामुळे तु आज घरी ,सुरक्षित ठिकाणी जायचं सोडून माझ्याबरोबर इथे आलायस ?” यावर हृषीकेश निरुत्तर झाला “हे बघ तुला थोडक्यात सांगतो , मॅटर आणि Energy ही विश्वाची दोन उत्पत्ती स्थाने आहेत , कधी आपण मॅटर वर काम करतो कधी एनर्जी वर , आणि जेव्हा एनर्जी वर काम करतो तेव्हा ती दिसत नाही तिला फील करावं लागतं ,एनर्जी म्हणजे काय ? तर फीलिंग्ज ,म्हणजेच भावना. हे equation लक्षात ठेव “Emotion = Energy + Motion या मंदिरात जी एनर्जी आहे तिला फील केलंस ,त्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवलास तर ती तुझं काम करेल कारण एनर्जी वेव्ज या मनाच्या तरंगानुसार सतत बदलत असतात , तू जेवढा मनाने खंबीर तेवढी एनर्जी स्ट्रॉग . तु इंजिनिअरिंग चा विद्यार्थी आहेस तरी मी तुला एक बेसिक प्रश्न विचरतो , मला एक सांग तु मोबाईल चार्ज करतोस म्हणजे काय करतोस ? “
“चार्जर कनेक्ट करतो इलेक्ट्रिसिटी पॉईंट ला “
“बरोब्बर , आता तो चार्जर काय काम करतो ?”
“ AC म्हणजे AC (alternating current) तो DC (direct current) मध्ये कन्व्हर्ट करतो “
“करेक्ट , मग आत्ता मी तेच केले ,या वस्तू आत देऊन त्या चार्ज करून घेतल्या , कशाने तर मंत्रांनी , या वस्तू मी अभिमंत्रित म्हणजे भारीत करून घेतल्या , यामध्ये मोबाईल च्या जागी या वस्तू आहेत असं समज , ईलेक्ट्रीसिटी म्हणजे भैरवनाथांकडून येणारा आशीर्वाद आणि चार्जर म्हणजे ते मंत्र जे त्या पुजाऱ्यांनी ठराविक संख्येने म्हटले . आता झाले असेल त्यांचे मंत्र म्हणून ,चल वस्तू घेऊन निघू आपण “
वाटेतून येताना गुरुजींनी हृषीकेश ला पुढचे तीन दिवस ,”अजितेश ‘ वरच रहायला बोलावले आणि हृषीकेश ने ते मान्य केले , हॉस्टेल वर गेल्यानंतर त्याने बॅग भरली , बाबांना फोन करून सांगितलं की तो पुढच्या आठवड्यात येणार आहे आणि रेक्टर ला सांगून तो निघाला . दुपारी गुरुजींकडेच जेवण झालं , सुमती ने सुगंधा बरोबर त्याचा डबा पाठवला होता , त्याचे जेवण झाले , गुरुजी सकाळी त्याला ब्रेकफास्ट करतानाही दिसले नाहीत आणि दुपारी जेवतानाही दिसले नाहीत . पण उपास वैगेरे असेल असा विचार करून तो गप्प बसला . नाही म्हणायला सुगंधा ला पाहून त्याला’ पवन ‘ची आठवण आली , गेल्यापासून पवनचे दोन -तीन वेळा फोन आले होते पण हृषीकेश ने त्याला उत्तर दिले नव्हते . आता लगेच त्याने पवन ला फोन लावला ,थोड्या गप्पा मारून मग काही तरी जुजबी कारण सांगून एक आठवड्याने गावी जाईन असे सांगून फोन ठेऊन दिला . गुरुजींच्या देवघरातच उजव्या बाजूला एक छोटी खोली होती , बहुधा त्यांच्या साधनेची खोली असावी , दुपारी आल्यापासून ते तिथेच होते , हृषीकेश चे जेवण झाल्यानंतर त्याने थोडा वेळ वाचन वैगेरे केले , मोबाईल वर थोडा टाइम पास झाला , मग चक्क त्याने ताणून दिली . संध्याकाळी एक लांबवर चक्कर मारून परत येत असताना बंगल्यात कोणी तरी आलेले दिसले , तो भुऱ्या होता , गुरुजी बहुधा अजूनही त्यांच्या खोलीत होते , म्हणून भुऱ्या पायऱ्यांवर त्यांची वाट पाहत बसला होता .
हृषीकेश बंगल्यापर्यंत पोहोचताच तो उठून उभा राहिला , “अरे चल की आत “
“ न्हाई मी इथंच बरा हाये , दादा गुरुजीस्नी एक सांगावा धाडायचा होता , अघोर उज्जिन ला च होता महिनाभऱ्यापूर्वी ‘कालमुख कापालिक’ सादना करताना त्येची एक चूक झाली अन त्यातच त्यो ग्येला . काल ध्येनात त्याचा आत्मा बोलत होता, त्याला आता नवीन ध्येह पाहिजे आहे ” निरोप सांगून भुऱ्या गेला. त्यातले हृषीकेश ला काही कळले नाही . रात्री सुगंधा डबा घेऊन आली ,तिच्याशी बोलत बोलत त्याने जेवण उरकले , तिच्याकडून कळलं की गुरुजी जेवतच नाहीत ,ही ही माहिती त्याच्यासाठी अनोखी होती ? अन्न ग्रहण करत नाहीत ?काही सुद्धा नाहीत ? Imposible … गुरुजी नक्की आहेत कोण ? किती गूढ आहे हे सगळं ..
दुसऱ्या दिवशीची सकाळ , हृषीकेश ला जाग आली तेव्हा सूर्यकिरणाचे कवडसे साऱ्या घरभर पसरले होते , एक वेगळंच चैतन्य सर्वत्र पसरलेलं दिसत होतं , देवघरातून घंटेचा किणकिणता निनाद येत होता , म्हणजे गुरुजींची पूजा आटोपत आली होती , पटापट आवरून , अंघोळ करून हृषीकेश त्यांच्या शेजारी येऊन बसला , त्यांची प्रार्थना चालू होती . प्रार्थना आटोपून दोघे बाहेर आले , तेव्हा हृषीकेश ने भूऱ्याचा निरोप त्यांना आठवला तसा सांगितला . यावर गुरुजी विचारमग्न होत म्हणाले ,” “उद्या दुपारनंतर अमावस्या लागते आणि परवा सकाळी समाप्ती , म्हणजे तसा अघोर कडे रात्रीचा फार वेळ उरत नाही , तो ज्या काही हालचाली करेल ते आज संध्याकाळ नंतर सुरु करेल ते ही भुऱ्या च्या मदतीने . “
“ भुऱ्या ? पण भुऱ्या त्याला का मदत करेल ? तो तर आपला माणूस आहे ना ?”
“भुऱ्या कोणाचाच नाही , जिथे त्याला फायदा असेल तो तिथला . त्यामुळे त्याच्यावर जास्त विसंबून राहू नकोस ,
.त्याला नवीन देह हवा आहे याचा अर्थ कळतोय ना तुला ? त्याचे पुढचे लक्ष्य तु आहेस . मी आसपास नसताना कुणीही तुला काहीही निरोप दिला , कुठेही बोलावलं तरी जायचं नाही .लक्षात ठेव तुला खूप अलर्ट राहिलं पाहिजे “
हृषीकेश एकदम शहारला त्यावर गुरुजी त्याला म्हणाले , “ घाबरू नकोस , भगवंतासमोर आपण दोघेही बसलो आहोत , त्याला स्मरून सांगतो माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी तुला काहीही होऊ देणार नाही .अजूनही तुला शंका असेल तर मी तुझ्यासाठी स्पेशल गाडी ची व्यवस्था करतो तु तुझ्या घरी जाऊ शकतोस ,पण जो काही निर्णय घ्यायचा आहे तो संध्याकाळच्या आत घे , कारण नंतर सगळेच अवघड होऊन बसेल “
“गुरुजी माझा निर्णय मी कालच सांगितला तुम्हाला , मी आता मागे हटणार नाहीये , तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे “ “छान !.. एवढा निश्चयी स्वभाव पाहिजे म्हणजे मग यश आपल्या पायाशी लोळण घेत येतं . चला तयारीला लागूयात “ असं म्हणून दिवसभर गुरुजी त्यांच्या साधनेच्या खोली मध्ये काहीतरी वाचन करत बसले होते , आस पास विविध हस्तलिखिते आणि पोथ्या पसरल्या होत्या ,दुपारी सुगंधा डबा घेऊन आली , त्यात मुगाच्या डाळीची साजूक तूप घातलेली खिचडी आणि केळीचं शिकरण हे पाहून हृषीकेश ने प्रश्नार्थक चेहेरा केला तेव्हा तिने आत बसलेल्या गुरुजींकडे बोट दाखवले. त्यांनी हलका आहार घ्यायला सांगितलाय आज तुला . जेवण झाल्यावर ती निघून गेली .
उतरती उन्ह बागेत सगळ्या फुलझाडांवर सोनेरी पांघरून घातल्यासारखी पसरली होती , हृषीकेश गुलाबांच्या रोपांजवळ काही तरी खटपट करत बसला होता , “शुक शुक !.. “ आवाजाच्या दिशेने त्याने वळून पाहिले ,सुगंधा त्याला बोलावत होती , महद आश्चर्याने त्याने तिच्याकडे पहिले कारण मघाशीच ती गेली होती ,आत्ता लगेच परत कशी येईल ? तिचे भिरभिरते डोळेही त्याला नवीन होते , तो उठून तिच्याजवळ जायला निघणार तोच गुरुजींनी आतून त्याला जोरात आवाज दिला , त्याबरोबर हृषीकेश पळतच आत गेला , “ईकडे ये “ गुरूजींनी त्याला जवळ बोलावून त्याच्या हातावर एक पंचरंगी धागा बांधला .
“ हे काय ?”
“ हा माझा CCTV कॅमेरा आहे असं समज , हातातून सध्या तरी काढू नकोस, आणि मघाशी तुला जी बोलावत होती ती सुगंधा नव्हती , पट्कन कुठेही जाऊ नकोस ,लक्षात ठेव ‘अजितेश ‘च्या बाहेर तु सुरक्षित नाहीयेस , एकदा उद्याची अमावस्या उलटली की मगच तुझा धोका टळणार आहे . “
हृषीकेश मुकाट पणे आत गेला .आता या बंगलीच्या एवढंच काय पण खोलीच्याही बाहेर यायचे नाही असे त्याने मनोमन ठरवले . गुरुजी पुन्हा एकदा त्यांच्या साधनेच्या खोली मध्ये जाऊन बसले . कंटाळा येऊन तो बेड वर पडून राहिला , आत्ताशी संध्याकाळचे सहा वैगेरे वाजले असतील , पडून पडून ही कंटाळा आला होता , भूक लागली होती , किती वेळ असे निष्क्रिय रहायचे ? तरीही तो तसाच पडून राहिला ,दुसरे काही करण्याची ईच्छाही होत नव्हती , काही वेळाने सर्वत्र काळोख दिसू लागला , रातकिड्यांची किरकिर सुरू झाली ,आणि अचानक हृषीकेश च्या मनाची चलबिचल सुरू झाली . चित्र -विचित्र , विचार मनात डोकावू लागले . का पडलोय मी ईथे असा बांधून घातल्यासारखा ? कोण हे गुरुजी ? दोन दिवसांपूर्वी मी यांना ओळखत तरी होतो का ? आणि आता त्यांच्या प्रत्येक शब्दाबर हुकूम मी चाललोय . का? माझा आणि त्यांचा काय संबंध ? आजपर्यंत बाबांनी पण मला कधी कसली ऑर्डर सोडली नाही , हे कोण सांगणारे ? इथे जाऊ नकोस तिथे जाऊ नकोस ? शा !.. वैताग आहे , मी असं किती काळ पडून राहायचं ? कुठलं झाड आणि कसलं काय सगळे माझ्याच मनाचे खेळ आहेत . उगाच काहीतरी फालतू पणा चाललाय . दिसत तर काही नाही . आणि ईतकी माझी काळजी आहे तर स्वतः कशाला आत जाऊन बसलेत? थांबायचं ना माझ्याजवळ ? “ काळोख उत्तरोत्तर वाढत चालला तसा हृषीकेश चा अस्वस्थपणा वाढत गेला ,अखेर तो ताड्कन उठला , सॅक उचलली ,हातातला धागा ताडताड तोडून तो बाहेर पडला . भिंतीच्या कडेला लावलेली सायकल काढून त्यावर टांग टाकली आणि सायकल जोरात दामटत तो बस स्टँड कडे निघाला , मिळेल त्या बसने घरी जायचे असे त्याने ठरवले .गावात जरा लाईट होती , आणि गजबज देखील होती , बस स्टॅन्ड पाशी आल्यावर त्याला बरे वाटले , तितक्यात बस देखील आली , तोंडाने शीळ घालत हृषीकेश बस मध्ये चढला , बस पूर्ण रिकामी होती ,ऐसपैस बसत त्याने कुंजीरवाडी पर्यंतचे तिकीट मागितले , तासाभराने कुंजीरवाडीला पोहोचू , तिथून पुढे बस मिळाली तर ठीक नाहीतर सरळ प्रायव्हेट गाडी करून घरी जायचे असे त्याने ठरवले . खूप मोकळे मोकळे वाटत होते त्याला , घरी जायच्या विचारांनी तो आणखी निवांत झाला आणि गार हवेने थोड्याच वेळात त्याला डुलकी लागली .

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users