झाड !! (भाग ३ )
झाड !! (भाग ३ )
ट्रिंग ट्रिंग … सायकलच्या आवाजाने त्या दोघा तरुणांनी मागे वळून पहिले , सोळा -सतरा वर्षांची एक अतिशय देखणी मुलगी सायकलवरून त्या दोघांच्या मधून वाऱ्याच्या वेगाने पुढे निघून गेली .
“आई -शप्पथ !.. ….बघितलंस का ऋषा ? “ ती मुलगी गेली त्या दिशेने पहात हात छातीवर ठेवत , “ती पाहतच बाला , कलीजा खलास झाला !..असे म्हणून त्याने धुंद नजरेने हृषीकेश कडे पहिले पण तो शेजारी नव्हताच , हृषीकेश त्याला पुढे एका झाडाच्या बुंध्याशी वाकून काही निरीक्षण करताना दिसला , लांब लांब ढांगा टाकूत पवन त्याच्याजवळ पोहोचला , “काय रे काय करतोयस त्या झाडाच्या बुंध्याशी ?”
“काही नाही रे , तु हो पुढे , मी येतोच “ हृषीकेश झाडाच्या बुंध्याभोवती गोल फिरत म्हणाला ,पवन त्याच्याकडे नवलाने बघत थांबला , थोडा कानोसा घेऊन झाल्यावर ऋषिकेश ने आटोपते घेतले , “ चल .. “आणि दोघे मग सुमतीबाईंच्या खाणावळी च्या दिशेने निघाले . ते दोघे खानावळीत पोहोचले तेव्हा नेहेमीप्रमाणेच तिथे भरपूर गर्दी होती , या दोघांना दाराशी थांबलेले बघून सुमती बाई लगबगीने पुढे झाल्या , “या कि रे आत , गर्दी वर जाऊ नका , ती नेहेमी असतीच , मागल्या अंगांनी या , माजघरात पानं वाढते तुम्हा दोघांना , या ss “
ते दोघे माजघरात गेले , सुमती बाई आपल्यावर एवढ्या मेहेरबान का आहेत हे या दोघांनाही कळेना , तितक्यात मघाची सायकल सुंदरी हातात दोन रिकामी ताटं घेऊन आली आणि त्यांच्यापुढे पाट आणि ताटं मांडून मग पाणी आणायला पुन्हा आत गेली . सुमतीबाई जातीने त्यांच्या पुढ्यात बसून त्यांना वाढायला लागल्या , “खा रे पोरांनो , तुमच्या कँटीन वर कसं निबर आणि बिन चवीचं जेवण असतंय ठाऊक आहे मला “
ते दोघे काहीच न बोलता जेऊ लागले ,पण तेवढ्यात पवन ला शंका आली ,
“काकू याचे एक्सट्रा पैसे नाही ना लावणार तुम्ही ? “
यावर सुमतीबाई तोंडावर हात ठेवून जोरात हसल्या , “नाही बा !.. उद्या माझी मुलगी बी तुमच्याच कॉलेज ला शिकायला यायची तेव्हा दोस्ती करून ठेवते एवढंच “
“ हा मग ठीक आहे , काय नाव आहे तिचं ?” पवन ने तेवढ्यात सावध पणे विचारलं
“ आता आली नव्हती का ? सुगंधा ? तीच .. आता अकरावीला ऍडमिशन घेईल पुढच्या वर्षी , माझी बी दहावी झाली आहे , चांगल्या मार्काने पास झाली होती मी , पुढं कॉलेजात पण जायची ईच्छा होती , पण मग आईची खानावळ पुढे चालवायला लागली आणि शिक्षण तुटलं , म्हणून सुगंधा ला मी शिकवणार खूप .. “सुमतीबाईंनी असे म्हटल्यावर पवन ने मान डोलावली .
पोटभर जेऊन तृप्त होऊन ते दोघे हॉस्टेल वर परत आले . आज रविवार होता , त्यामुळे दुपारी एक झोप काढून संध्याकाळी गावात फेरफटका मारायला दोघे निघाले , वाटेत जाताना ऋषि परत त्या झाडाजवळ एका अनामिक प्रेरणेने थांबला आणि कानोसा घेऊ लागला .
“ऋषा तू सकाळी पण ईथे कुत्र्यासारखा गोल गोल फिरत काहीतरी हुंगत होतास , काय भानगड आहे सांगशील का?”
“ हुंगत नव्हतो यार .. , मला एक सांग या झाडाचा हा बुंधा तुला विचित्र नाही वाटत ? “
“म्हणजे ?”
“म्हणजे केविलवाणा ? “
“ झाडाचा बुंधा , केविलवाणा ? तो कसा काय बुवा ? माणूस केविलवाणा असू शकतो , प्राणी पक्षी केविलवाणे असू शकतात , पण झाड ? आणि ते पण बुंध्यापाशी ? “ पवन खो खो हसू लागला .
“सोड जाऊदे ,तुला नाही कळणार , त्यासाठी तसं संवेदनशील मन लागतं “ हृषीकेश मान हलवत म्हणाला .
“ हो आणि अश्राप पण असावं लागतं , पोरी नाही , दारू नाही , सुट्टा नाही ,मटणाचा रस्सा नाही , काहीsss काही नाही . ..कसं काय रे एवढं मिळमिळीत आयुष्य जगतोस तु ? “
“ तु असं जगून बघ म्हणजे तुला कळेल मिळमिळीत काय असतं हे आयुष्य का ते ? “
“ते जाऊ दे समोर बघ सुमतीबाईंची कन्या सुगंधा , आपल्याकडेच बघतीये “,
“बरं मग तु तिला बघ मी जरा त्या झाडाला बघतो , तुझं गुटुरगुं झालं की सांग “ असं म्हणून ऋषिकेश पुन्हा बुंध्याजवळ गेला आणि थांबून अंदाज घेऊ लागला त्याचा कयास खरा होता , त्या बुंध्यातून खरंच एक विलक्षण आर्त आवाज येत होता , पण आवाज कानांना ऐकू येत नव्हता तर त्याला फक्त तो जाणवत होता आणि त्यामुळे तो अस्वस्थ होत होता पण नक्की काय असावे ते कळत नव्हते . असे का होत असावे या विचारात तो हरवला . पुढे पुढे असे रोजच होऊ लागले ,तिथे आल्यावरच हे काय होते हे त्याला समजेना ,आणि झेपेना तसे तो त्या झाडाचा रस्ता टाळून तो दुसऱ्या वाटेने जाऊ लागला .
त्यानंतर काही महिन्यांनी दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या , सर्वजण आपापल्या घरी निघण्याची तयारी करू लागले , हृषीकेश आणि पवनही निघाले , पवन चे बाबा त्यांना घ्यायला घरून गाडी पाठवणार होते , पुढे रस्ता अरुंद होता , म्हणून ड्रॉयव्हरने त्या दोघांना बस स्टॅन्ड पाशीच बोलावले होते , आणि तो झाडाजवळून जाणारा एकमेव रस्ता होता त्याला पर्यायी रस्ता नव्हता . एव्हाना हृषीकेशही झाड प्रकरण विसरून गेला होता , घरी जायचे या आनंदात तो व पवन मोठ्याने गप्पा मारत चेष्टा मस्करी करत निघाले होते आणि त्या झाडापाशी येताच हृषीकेश एकदम थबकला ,त्यालाअशी तीव्रपणे जाणीव होऊ लागली की ते झाड त्याला पुढे जाण्यापासून रोखत आहे , पवन चेष्टा करेल म्हणून तो तसाच रेटून पुढे जायचा प्रयत्न करू लागला , पण त्या झाडाला ओलांडून पुढे जाणे त्याला अशक्य होऊ लागले ,अखेर पवन ला सांगून पोट दुखीचे निमित्त करून तो हॉस्टेल वर परत आला . मनातून त्याला फार वाईट वाटत होते , असे का होते आहे , हे आपल्या मनाचे खेळ आहेत ? की खरंच तिथे काही आहे ? आपलं मन काहीतरी नवीन क्लृप्त्या काढतंय का , अभ्यास टाळण्यासाठी ? एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाला दाखवावे का ? बेड वर पडल्या पडल्या त्याचे विचारचक्र चालू झाले आणि त्या विचारातच त्याला झोप लागली . दुपारी जेवायला म्हणूनही तो उठला नाही. मध्यरात्री कधी तरी त्याला भुकेने जाग आली , पण आसपासचा मिट्ट काळोख बघून त्याने पुन्हा पांघरूण डोक्यावर घेतले ते थेट सकाळी पोटात आणि बाहेर दोन्हीकडे कावळे ओरडू लागले तेव्हाच तो उठला , काही मोजकी मुले सोडली तर बाकीची आपापल्या गावाला दिवाळी साजरी करायला गेलेली होती .त्यामुळे गजबज कमीच होती , अंघोळ वैगेरे आटपून तो खाली कँटीन मध्ये आला पण कँटीन बंद होते . आता १५ दिवस ते बंदच राहणार होते ,आपल्या लक्षात यायला हवं होतं , गावात चैतू शेठ ची मिसळ फेमस होती , हृषीकेश ने मग आपला मोर्चा तिकडे वळवला , दहाव्या मिनिटाला तो चैतूच्या हॉटेल मध्ये होता ,सकाळची वेळ असल्याने वर्दळ अजून सुरू झाली नव्हती ,हाफ प्लेट कांदा भजी , एक मिसळ -पाव आणि स्पेशल चहा अशी ऑर्डर देऊन तो आपल्या जागेवर येऊन बसला , ऑर्डर येईपर्यंत तो हॉटेल चे निरीक्षण करत बसला ,हॉटेल म्हणजे खरं तर चार-दोन बाकडे असलेली टपरीच होती ती ,आतल्या बाजूला किचन असल्याने तिथे एक कळकट्ट पडदा लावला होता , तिथून खमंग वास दरवळत होता , समोरच काचेच्या कपाटात गोडी शेव , जिलेबी , भेळ, पार्ले जी , असे काही खाण्याचे पदार्थ विक्रीला ठेवले होते तसेच गावकऱ्यांच्या सोयीसाठी बाहेरही दोन टेबल आणि बाकडे टाकले होते , गळ्यात चांदीच्या दोन -चार जाड जाड चेन घातलेला हॉटेलचा मालक चैत्या , तोंडाने भराभर ऑर्डर सोडत होता , मध्येच एका गिह्राईकाने बिलाचे पैसे दिले तसे त्याने ते गल्ल्यात टाकले आणि मग गल्ल्यात उदबत्ती फिरवून ,नमस्कार केला , मग परत खालच्या ड्रावर चा एक कप्पा उघडून तिथेही उदबत्ती फिरवली . ते पाहून हृषीकेश बसल्या जागेवरून किंचित तिरपा होऊन त्या खालच्या ड्रॉवर मध्ये काय आहे ते डोकावून पहाण्याचा प्रयत्न करू लागला , ती एक लाल रंगाची पुरचुंडी होती , आणि त्याच्यावर काही पांढऱ्या कवड्या ठेवल्या होत्या , तितक्यात हृषीकेश ची ऑर्डर घेऊन तिथला एक नोकर गोपाळ आला , “काय सायेब सुट्टीला घरी नाही गेलाव का ? समदं ह्ष्टील रिकामं झालंय की “ , “हो जायचंय ना “
“ कवा ? उगाच एकटं ऱ्हाऊ नगा दादा .,आपल्या मानसात जावा लवकर “
“ तु का एवढी घाई करतोयस पण ? काही प्रॉब्लेम आहे का तिथे एकटं राहिलं तर ? “
“ तसं काही भेन्यासारक न्हाई गड्या पन … “
“पण काय ?…”
सांगावे कि नाही या विचारात गोपाळ असतानाच चैत्याने त्याला जोरात आवाज देऊन नुकत्याच आलेल्या गिऱ्हाईकांची ऑर्डर घेण्यास सांगितले तसा तो लगबगीने तिथून निघून गेला . पोटात भूक खवळून लागलेली असल्याने हृषीकेश मिसळ पाव वर तुटून पडला , मिसळ चांगलीच झणझणीत होती , खाणं झाल्यावर तो बिल द्यायला चैत्या शेठ जवळ गेला.
“किती झाले शेठ ?”
“ हाफ प्लेट कांदा भजी आणि मिसळ , आणि स्पेशल चहा , १२० रु .“ चैतुशेठ ने बिल पुढे सारत उत्तर दिलं ,
हृषीकेश ने बिल दिले आणि तो निघाला तेवढ्यात त्याला दिसले की , एक पांढरा शुभ्र कुर्ता पायजमा घातलेली , साधारण पन्नाशीची ,उंचीपुरी,सडपातळ व्यक्ती आत येत होती ,तेजस्वी चेहेरा ,मोठे डोळे , थोडे बारीक कापलेले ,काळे आणि करडे असे केस , चौकोनी चेहेरा , रुंद खांदे , गळ्यात लहान रूद्राक्ष आणि स्फटिकांची सोन्याच्या तारेत गुंफलेली लांबलचक माळ , कपाळावर अष्टगंधाचा नाम ओढलेला ,आत आले तेव्हा चंदनमिश्रित वासाची एक मंद झुळूक आली , हृषीकेश त्यांचे निरीक्षण करत तिथेच उभा राहिला तेवढ्यात चैतु शेठ चं तिकडे लक्ष गेलं आणि तो गल्ला ओलांडून चपळाईने त्या गृहस्थांकडे गेला , खाली वाकून आदराने त्यांना नमस्कार केला , “गुरूजी येणार होता तर सांगावा धाडायचा होता ना , गाडी पाठवली असती तुम्हाला घ्यायला ”
यावर ते गृहस्थ हसत म्हणाले “अरे असू दे चैतन्य , देशमुखांकडे आज पुजा होती , तिकडे जाऊन आलो ,म्हटलं जाता जाता तुझ्याकडे चक्कर मारावी , काय ठीक आहे ना सगळं ?”
“ तुमची कृपा असल्यावर कधी काई वंगाळ व्हईल का? या बसा ..” त्यांना अदबीने बसण्याची खूण करून चैत्याने आत जोरात हाळी दिली , “ए सुभन्या ..एक स्पेशल चहा आन , पट्कन “
मघाशी थांबलेला हृषीकेश आता निघाला होता , तो बाहेर जात असताना त्याच्या उजव्या बाजूने ते गृहस्थ आत येत होते , एक क्षणभर हृषीकेश ची आणि त्यांची नजरानजर झाली आणि त्याच्या कानाशी त्यांचा दमदार पण कुजबुजता आवाज आला , “काय झाड फारच त्रास देतंय ? “
प्रश्न ऐकून हृषीकेश हबकला ,त्यांना काहीच उत्तर न देता , पटकन सायकल जवळ गेला आणि त्याने जी सुसाट सायकल पळवली ते हॉस्टेल येईपर्यंत तो थांबलाच नाही . रूम मध्ये पोहोचल्याबरोबर त्याने बिछाना गाठला आणि पांघरूण घेऊन तो पडून राहिला .थोड्याच वेळात त्याला हुडहुडी भरून आली .
क्रमशः:
अरे वाह.. नवीन कथा !!!
अरे वाह.. नवीन कथा !!!
शेवटच्या परिच्छेदात धारपांचे समर्थ आठवले.
भागाच्या सुरुवातीला आधीच्या भागाची लिंक द्या.
पहिला भाग मला सापडला नाही.
मस्त!!!
मस्त!!!
@धनवन्ती,
पहिला आणि दुसरा भाग इथे मिळेल
https://www.maayboli.com/node/83913