काही गोष्टी बदलत नाही म्हणतात ना ते खरे आहे. आता हेच बघा उन्हामुळे तापून पाण्याचे बाष्प होते. त्याचे ढगात रुपांतर होते. कुठेतरी कसातरी कमी दाबाचा पट्टा वगैरे तयार होतो आणि मग पाऊस पडतो. हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यासाठी कोण कुठे काय खणतो ते माहित नाही पण तो तयार होत असतो. थोडक्यात काय पाऊस पडणे ही एक सरळ साधी नैसर्गिक प्रक्रिया आहे. दवाखान्यात उगाचच चेकअपसाठी अॅडमिशन घ्यावी इतकं हे रटाळ प्रकरण आहे. कचरा सडून त्याची माती होण ही जशी नैसर्गिक प्रक्रिया आहे तसेच पाऊस पडणे ही देखील नैसर्गिक प्रक्रिया आहे पण मराठी साहित्यात अगदी एकोणवीसाव्या शतकापासून ते आजपर्यंत आईनंतर सर्वात जास्त कौतुक कुणाचे झाले असेल तर ते पावसाचे आहे. प्रियकर, प्रेयसी प्रेमात पडतात एकमेकांचे भरभरुन कौतुक करतात, त्यावर कविता होतात मग एक दिवस अचानक तू पावसाळ्यातली तर मी उन्हाळ्यातला असे म्हणून वेगळे होतात. मग तू बेदर्दी, बेवफा, सोडून गेलास दुःखाच्या वाटेवर, कधीतरी नडेल तुला वगैरे कविता लिहिणं सुरु होतं. पावसाच्या बाबतीत असे होत नाही. पावसाइतकं बेभरवशाचे कुणी नाही. नको तेंव्हा नको तेवढा बरसतो आणि हवा तेंव्हा येत नाही. याच वर्षी बघा ना मे महिण्यात नको तितका बरसला आणि जून ठणठणीत कोरडा गेला. अशा पावसावर कविता करणाऱ्या कवय़ित्रीला विचारायला हवे तुझी कामवाली अशी वागली तर तू तिच्यावर कविता करशील का. नाही ना मग पावसाचेच का कौतुक. पाऊस यायच्या आधीपासूनच पावसाचे कवित्व ग्रीष्माचे चटके, चातक पक्षी वगैरे स्वरुपात सुरु असतं तेही एसी गाडीत बसून विडियो काढणे चालू असते. पाऊस पडल्यावर तर विचारायलाच नको. पाऊस येऊन, शेतकऱ्याला पेरणी करुन पिक वर यायला साधारण आठवडा तरी लागतो. इथे तर पाऊस येऊन अर्धा तास जरी झाला नाही तरी कवितांचे पिक यायला लागते. पाऊस येऊन मातीचा सुगंध पसरायला वेळ लागेल पण कविता लगेच पसरतात.
बालकवींचा काळ वेगळा होता हो, तेंव्हा खरच होते हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे आता आहे का. नाही पण कुणी व्हाटसअॅप बंदूकधाऱी घराच्या खिडकीची काच न उघडता बाहेरचा पाऊस बघतो. घरात बायकोला भज्यांची ऑर्डर देतो. स्वयंपाकघरात त्याची बायको कांदे चिरत रडत असते आणि नवऱ्याला शिव्या घालत असते. हा बुवा व्हाटसअॅपवर ज्ञान देत असतो
श्रावणमासी हर्षमानसी
हिरवळ दाटे चहूकडे
क्षणात येती सरसर शिरवे
क्षणात फिरुनी उन पडे
ओ साहेब, थांबा जरा सध्या जेष्ठ महिना सुरु आहे अजून श्रावण यायला वेळ आहे. चहूकडे म्हणजे नक्की कुठे हो. तुमच्या खिडकीतून समोरच्याची बाल्कनी दिसते, एका बाजूला गटार आहे तर दुसऱ्या बाजूला रस्ता. तुम्हाला यात नक्की कुठे हिरवळ दिसली. समोरच्याच्या बाल्कनीत तुम्हाला काही दिसत असेल त्याला जर का तुम्ही हिरवळ म्हणत असाल तर तो तुमच्या जोखमीचा प्रश्न आहे. क्षणात उन पडे, असे लिहिणाऱ्याला विचारावेसे वाटते उन्हाची तिरिप जाईल येवढी जागा तरी तुम्ही दोन बिल्डिंगच्या मधे ठेवता का. उगाचच क्षणात फिरुन उन पडे.
श्रावणमासी डोके दुखसी
गटार वाहे चहूकडे
क्षणात येती सरसर लोंढे
ट्रॅफिक जॅम रोज घडे
इंदिरा संतांची माफी मागून म्हणावेसे वाटते
नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी ।
सोड पिच्छा ट्रॅफिक रोज सकाळी संध्याकाळी
सर्वच जेष्ठात श्रावणाची कविता लिहतात असे नाही काहींना जेष्ठ आषाढ याचे भान असते पण तरी पावसाचा अंदाज चुकतो असे मला वाटते. शाळेत असताना शिकलेली मर्ढेकरांची कविता आठवते
आला आषाढ श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातक चोचीने
प्यावा वर्षा ऋतू तरी
या कवितेसोबत चातक चोचीने वर्षा ऋतू प्यावा असे कवी का म्हणतात हा प्रश्न देखील आठवतो. शेव म्हटली की पापडी आणि रस म्हटला की मलाई तसे आहे ते. दरवर्षी मुंबईत जुलै महिन्याच्या शेवटल्या आठवड्यात मग तो आषाढ असो, श्रावण असो का फाल्गुन असो इतका पाऊस पडतो की चातक चोचीने काय देवमाशाचा आ फाडून जरी पाऊस पिला ना तरी कमी आहे. दरवर्षी असे पाउस पिणारे प्राणी, पक्षी कुर्ला, विठ्ठलवाडी अशा काही भागात आणून बसवावे आणि सांगावे पी किती पाऊस प्यायचा तो. असा पाऊस पिला तर निदान लोकल तरी बंद होणार नाहीत.
पावसासोबत श्रावण महिण्याचे खूप कौतुक आहे. शाळेत असताना या महिन्यात भरपूर सणवार म्हणून भरपूर सुट्ट्या अशी मजा असायची. आता तेही उरले नाही. श्रावण सोमवार काय इकडे दक्षिणेत तर राखी, जन्माष्टमी कशाची सुट्टी मिळत नाही. पाऊस, ट्रॅफिक आणि ऑफिस हे आणि हेच आयुष्य असते तेंव्हा श्रावण महिन्याचे कौतुक कसे करणार. कविंचे मात्र तसे नाही. एका कवितेत कवितेतली प्रेयसी म्हणते
आषाढात आहे अजुनी मी श्रावण नाही आला.
येईल सखा परतूनी तोच श्रावण माझा
बाई त्या पावसावर विश्वास ठेवून तुझ्या प्रियकराच्या येण्याला श्रावणाची उपमा देऊ नको. मुळात तो श्रावणच बेभरवशाचा आहे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुन उन पडे असे स्वतः बालकवीने सांगून ठेवले आहे. त्या पावसाचे काही सांगता येत नाही. तो आषाढ आणि भाद्रपदात तर धो धो बरसतो पण कधी कधी अगदी मार्गशीष आणि पौषात देखील बरसतो पण श्रावण मात्र संपूर्ण कोरडा जातो. त्या प्रेयसीला सांगावेसे वाटते बाई ग पाण्या पावसाचे दिवस आहेत. तो तुझा प्रियकर छत्री विसरला असेल किंवा गाडी सुटली असेल किंवा रस्ते बंद असतील. धीर धर येईल तो त्याला उगाचच आषाढ श्रावणात तोलू नको. साधी सरळ पांढरपेशी व्यक्ती उगाच पाऊस पाण्याचे बाहेर जात नाही तो काही शांताबाईंच्या कवितेला सजना आहे का
वादलवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो ।
भिरभिर वाऱ्यात, पावसाच्या माऱ्यात,
सजनानं होडीला पान्यात लोटलंय् ।।
शांताबाईंच्या काळात कदाचित समुद्रकिनाऱ्यावर लाइफ गार्ड नसतील किंवा हल्ली हवामान खात्याकडून जशा धोक्याच्या सूचना मिळतात तशा मिळत नसतील. तसेही ते Disaster Management act किंवा NDRF या आताच्या गोष्टी आहेत आधी असे काही होते की नाही माहित नाही. सजनीने तरी त्या सजनाला थांबवायला हवे ना तिला तर संभाव्य धोक्याची पूर्ण कल्पना होती. तिही तसे करीत नाही, कविता लिहायची होती ना मग त्यासाठी सजनाचा जीव धोक्यात गेला तरी चालेल.
सध्याच्या कवींनी तरी सद्य परिस्थितीचे भान ठेवून कविता लिहायला हव्या. पण नाही पावसाचे कौतुक करण्यात तेही मागे राहत नाही. प्रथमा, द्वितिया, तृतिया अशा विभक्ती शिकल्याशिवाय जसे संस्कृत येत नाही तसे पावसावर कविता केल्याशिवाय तुमचे कवित्व सिद्ध होत नाही असा नियम आहे की काय अशी शंका येते. आताचे कवी सौमित्र म्हणतात
त्याला पाऊस आवडत नाही, तिला पाऊस आवडतो
बर मग… बरं मग. काय सांगायचे काय आहे. हे काय घटस्फोटाचा खटला चालावायचे न्यायालय आहे का तिला काय आवडते आणि त्याला काय आवडते याचा पाढा वाचायला. तसेही कोणी तिला पाऊस आवडत नाही मला आवडतो म्हणून घटस्फोट घेत नाही. पाढा वाचायचाच असेल तर हे कवी अशी कविता करीत नाही
तिला आवडतो बटाटा
मला आवडते वांगं
ती सोलते कांदा
मी सोलतो रताळं
लिहितो का कुणी असे. मग त्या पावसाचे एवढे कौतुक का. हाच कवी दुसऱ्या एका प्रसिद्ध कवितेत म्हणतो
मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
का बाबा तू काय रेनकोट आहे, की छत्री आहे की कांद्याची भजी आहेत मला तरी पाऊस म्हटले की या तीनच गोष्टींची आठवण येते. त्याच कवितेत हाच कवी पुढे जाऊन म्हणतो
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
बाई अशा कवींचे अजिबात ऐकू नको त्यांचे व्यवहारज्ञान शून्य असते. अशी जर तू वागली तर उगाच सर्दी होईल, ताप येईल मग नवऱ्याची वाट खिडकीत बघता येणार नाही तर पॅरासिटामॉल घेऊन, नाक शिंकरत, अंथरुणात पांघरुण घेऊन नवऱ्याची वाट बघावी लागेल. त्या बिचाऱ्या नवऱ्याला घरी आल्यावर तुझ्यासाठी आणि स्वतःसाठी चहा करावा लागेल.
पाऊस म्हणजे प्रेम हे समीकरण तर असे घट्ट बसले आहे की अगदी शाळकरी पोरगा देखील तू मला पावसात भिजलेले चॉकलेट दिले असले काही तरी लिहून जातो. माझा काही वर्षे हाच भ्रम होता की प्रेम फक्त पावसाळ्यातच होते. पावसाळ्यात गुंतवणुक करायची बाकींच्या ऋतूत मग व्याज खायचे. एकापेक्षा एक रोमंटिक पावसाळी कविता आहेत. मंगेश पाडगावकर म्हणतात
भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची ।
धुंद वादळाची होती रात्र पावसाची ।।
दोन माणसाची भेट व्हायला खरच पावसाची गरज आहे का? डोळ्यासमोर कसे चित्र उभे राहते. रात्रीचा अंधार आहे, पाऊस येतोय, ढग गडगडताय, विजा कडकडताय, तरीही कुणीतरी तुमची आतुरतेने वाट बघत उभी आहे. अशा शब्दांनी माणूस स्वतःला विसरला नाही असे होईलच कसे. पाडगावकर दुसऱ्या एका कवितेत म्हणतात
जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी ।
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी ।
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा ।।
श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा
पाडगावकरांच्या शब्दांनी आणि ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या चालीने अशी मोहिनी घातली की विज्ञान विसरायला होते. साधी गोष्ट आहे मुळात घन निळा असेल तर कधीत बरसत नाही तो काळा असेल तरच बरसतो. इतका विचार कसा करणार. अशा कविता ऐकून मला सतत वाटत होते की पावसात कुणीतरी राधा आपली वाट बघत उभी आहे. येणाऱ्या पावसाळ्यात आपल्याला कुणीतरी भेटणार, ती आपल्या छत्रीत येणार, दोघांचेही ओलेचिंब कपडे घासणार, तिच्या ओल्या चिंब केसाना ती झटका देणार त्यातले तुषार अंगावार पडणार. नुसत्या कल्पनेने मन घायाळ होत होते. मी जोषात येत असे. आता कुणीतरी भेटणार अशी आशा मनात बाळगून कोसळणाऱ्या भर पावसात मी उगाचच छत्री घेऊन फिरुन येत असे. कुणी भेटलं नाही हो. अशा वेळेला रस्त्यावरची कुत्री सुद्धा भुंकत नाहीत ऐरवी त्रास देणाऱ्या त्या कुत्र्यांना देखील पावसात तुमच्या मागे धावायचा कंटाळा येतो. कुणी भेटणार या खोट्या आशेवर कितीतरी छत्र्या फाटल्या, वाऱ्याने उडाल्या. हे सारं खोटं आहे, कवीकल्पना आहे, त्या पावसाइतक्याच बेभरवशाच्या आहे हे कळायला कितीतरी पावसाळे जावे लागले. पावसाचे महत्वच तसे आहे. खरतर कुसुमाग्रजांना फणा (ओळखलत का सर मला) ही कविता पावसाविरुद्धच लिहायची होती पण पावसाची शक्ती म्हणून त्यांनी पूराविरुद्ध लिहिली. पाऊस असल्याशिवाय पूर यायला आपण काय हिमालयात राहतो का? तिथे ग्लेशियर फुटुन पूर येऊ शकतो आपल्याकडे नाही हे आपण समजून घ्यायला हवे.
मला पावसाळी कविता आवडत नाही असे नाही अगदी लहानपासून ते आजपर्यंत मला आवडणारी कविता म्हणजे
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का. आता शाळेभोवती म्हणण्याएवजी ऑफिसभोवती म्हणावे लागेल. हल्लीच्या वर्क फ्रॉम होम मुळे तो पर्याय देखील उरला नाही.
पाऊस हा वाईट असतो, किंवा त्यावरील साहित्य असू नये असे काही नाही. या ज्या कविता आहेत आणि ते कवी आहेत हे सारे महान आहेत. इतक्या सुंदर रचना करुन ठेवल्या आहेत म्हणूनच त्या आजही आपल्या सर्वांच्या लक्षात आहेत. आमची समस्या ही आहे की आम्ही पडलो विनोदी लिहिणारे. आम्हा विनोदी लिहिणाऱ्यांचा एक भ्रम असतो आम्हाला साऱ्यातले सारे समजते म्हणून आम्ही साऱ्यावरच टिका करीत असतो. आपल्याला जे समजते ते फार थोडे असते हे समजेपर्यंत खूप उशीर होऊन गेला असतो. आयुष्य जर जगायचे असेल तर भिजता आले पाहिजे आणि त्या भिजण्यासाठी पाऊसच हवा असे काही नाही ते एक रुपक आहे, निमित्त आहे, या साऱ्या शब्दांच्या पलीकडल्या गोष्टी आहेत हे समजण्यासाठी कितीतरी पावसाळे जाऊ द्यावे लागतात. तेंव्हा कुठे त्या पावसाच्या कविता उलगडायला लागतात, उमगतात. परंतु पावसाळे उलटून गेल्याशिवाय ते होत नाही हेही तितकेच खरे आहे.
कसलं भारी लिहीलय!
कसलं भारी लिहीलय!
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
पावसावर कविता केल्याशिवाय तुमचे कवित्व सिद्ध होत नाही असा नियम आहे की काय अशी शंका येते >> अगदी अगदी!!
मस्त लिहिलंय. मला या महान
मस्त लिहिलंय. मला या महान कवींच्या महान कविता आवडतातच, आणि तितकच सुंदर चित्र डोळ्यासमोर उभं करतात आणि मनाला 'गारवा' देतात.
सैमित्र त्यामानाने अलिकडचा, त्याच्या आवाजातल ते " दरवर्षी अस वाट्त..." ऐकायला भारी आवडत.
पावसाळा आणि कविता म्हंटल की मला दुसरीतली मी आठवते. "आनंदाने नाचू या , रिमझिम पाऊस झेलू या ".
बाहेर पाऊस पडत होता आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी छत्र्या घेऊन पावसात भिजायला गेलेल्या, हो आम्ही छत्र्या घेऊन भिजायला जायचो. म्हणजे एरव्ही डोक्यावर छत्री जी मधेच खाली करायची आणि थोडंसं भिजायचं.
तर सांगायचं मुद्दा हा की, त्यावेळी आईने मला घरात बसवून ठेवलेलं आणि "आनंदाने नाचू या , रिमझिम पाऊस झेलू या " ही कविता पाठ करून घेत होती. मैत्रिणीबरोबर भिजायला न मिळता कविता पाठ करत बसवल्यामुळे डोळ्यातून यमुना जमून बरसत होत्या, बाहेर पावसाच्या धारा, आणि तोंडाने "आनंदाने नाचू या , रिमझिम पाऊस झेलू या ".
मी कधीही विसरणार नाही.
पावसाळा आणि कविता ह्या शीर्षकामुळे हा लेख वाचला.
वाचताना मजा आली आणि वरचा प्रसंग दर पावसाळ्यात आठवतो तोही आठवला. आज तो लिहून काढला. धन्यवाद!
तुमचा लेख वाचताना पुलं च्या
तुमचा लेख वाचताना पुलं च्या असामीतला
"नभ मेघांनी आक्रमिले .." वगैरे न आठवता "छत्री दुरुस्तीला टाकली पाहिजे..." हा मध्यमवर्गीय विचार उत्कटतेने जाणवतो किंवा आठवतो.
खूप धन्यवाद सामो, हरचंद पालव,
खूप धन्यवाद सामो, हरचंद पालव, छन्दिफन्दि
@ छन्दिफन्दि तुमचा किस्सा मस्त आहे. तुम्हाला ती कविता आता कायम स्मरणात राहिल.
जितक्या कविता पाऊस या ऋतूवर आहेत तितक्या इतर ऋतूवर नाहीत तो आपल्या कडल्या वातावरणाचा परिणाम असावा. खूप उन तापल्यानंतर पाऊस आला की बरे वाटते. तसेच पाश्मिमात्त देशात खूप थंडीनंतर उन्हाळा आला की बर वाटत. तिकडे Summer चे कौतुक खूप आहे त्यांच्या साहित्यात ते दिसते.
हो, सगळ्यात जास्त पाऊस/वर्षा
हो, सगळ्यात जास्त पाऊस/वर्षा ऋतूवर आणि त्या खालोखाल वसंत ऋतूवर आहेत. बाकी हेमंत, शिशीर वगैरे मंडळींना फार कुणी विचारत नाही... एखाद - दुसरे अपवाद वगळता.
>>>>जितक्या कविता पाऊस या
>>>>जितक्या कविता पाऊस या ऋतूवर आहेत तितक्या इतर ऋतूवर नाहीत>>>>
हा ऋतू जगण्यामरण्याशी निगडीत आहे... चैतन्य ऋतू आहे. सृजन सोहळा आहे.
हा एक नसेल तर इतर ऋतू काय करतील ?
रोज पानगळ, रोज ग्रीष्म किती भयाण सगळं. इतर ऋतूत बहरत असेल प्रीत पण सगळ्याचा उगम या एका प्रक्रियेत आहे. पाऊस, पीकपाणी नसेल तर उपाशीपोटी कोण प्रेम करेल.
फक्त कवीतच नाही तर चराचरात चैतन्य जागतं . कवितेच्या रुपात कवी व्यक्त होतो इतर लोक वेगवेगळ्या पध्दतीने व्यक्त होतात.
धन्यवाद हरचंद पालव आणि
धन्यवाद हरचंद पालव आणि दत्तात्रय साळुंके
आपल्याकडली थंडी तशी सुखावह असते पण त्यावर तितक्या कविता होत नाही. कारण साधारणतः पावसाळ्यानंतर थंडी येते. त्यामुळे फार महत्तवाची राहत नाही. पावसाळा उन्हाळ्यानंतर येतो तो फरक प्रकर्षाने जाणवतो.
>>>>>>माझ्या सगळ्या मैत्रिणी
>>>>>>माझ्या सगळ्या मैत्रिणी छत्र्या घेऊन पावसात भिजायला गेलेल्या, हो आम्ही छत्र्या घेऊन भिजायला जायचो.
गारा वेचायला छत्री उलटी धरायची
वेचायला छत्री उलटी धरायची
वेचायला छत्री उलटी धरायची Happy
नवीन Submitted by सामो on 21 August, 2023 - 08:37>>> मस्त
मुंबईला कुठल्या गारा??
अगं पुण्यात.
अगं पुण्यात. तुमच्या मुंबईला फक्त घाम घाम
नवरा मुंबईकर आहे तो पुण्याला आणि मी मुंबईला नावं ठेवतो.
अगं पुण्यात. तुमच्या मुंबईला
अगं पुण्यात. तुमच्या मुंबईला फक्त घाम घाम>>>
तेवढं मात्र खरं
बहुतेक कवी मुंबईत राहत असावेत
बहुतेक कवी मुंबईत राहत असावेत, त्यामुळे हिवाळ्यावर कविता नाही
हो कोकण आणि मुंबईत हिवाळा
हो कोकण आणि मुंबईत हिवाळा नाही. पण पुण्यातील कवींनी तरी लिहायला हवे ना. पुण्यात तर हिवाळा असतो.
हा हा.. मस्त लेख आहे !
हा हा.. मस्त लेख आहे !
तुमचे सारेच लेख छान असतात..
वर काही प्रतिसादात मुंबई पुणे दिसले म्हणून रहावले नाही. पावसात हिरव्यागार जागी जाऊन निसर्गसौंदर्याचा आनंद लुटणे महाराष्ट्रातील कुठल्याही शहरात अनुभवू शकतो. पण मरीनड्राईव्हच्या पावसाची मजा मुंबईतच
यावर वेगळा लेख होऊ शकतो.... फोटो आणि व्हिडिओ सह
मरीनड्राईव्हच्या पावसाची मजा
मरीनड्राईव्हच्या पावसाची मजा मुंबईतच Happy>> 100%
धन्यवाद ऋन्मेऽऽष
धन्यवाद ऋन्मेऽऽष
पावसाची मजा मरीनड्राईव्हवरच. तो पहिला पाऊस असेल तर अजून मस्त. नंतर नंतर मात्र मुंबईत पावसाचा कंटाळा येतो.
मरीनड्राईव्हवर दिवसाच्या/
मरीनड्राईव्हवर दिवसाच्या/ वर्षाच्या कोणत्याही वेळी छानच वाटते. मुंबईचा तन्मणी!..
ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत
ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत,
सौमित्रच्या आवाजातल कानात घुमत. मधे ह्याच्या खूप पोस्ट्स बघितल्या होत्या आणि सगळ्यांतून प्रेरणा घेत ट ला ट लावत एक शब्दचित्र रेखाटण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय...
ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं,
Ac पायी वीज मीटर आकाशाला भिडत
मन मात्र गावच्या बालपणात रमत
नाही AC नाही फॅन
एक झुला त्या आंब्याला बांध
वारा तो अवखळ कधी आंबे पाड,
तर कधी चिंचा चटक
चोखत चोखत झाडाला लटक
ऊन बिन काही नाही
गावाकडची आमची मस्त आमराई!
पावसळ्यात उगवणार्या कविन्च्या साहित्याला आमचही एक ठिगळ
छान लिहिलंय. मजा आली वाचायला
छान लिहिलंय. मजा आली वाचायला.
चालीने अशी मोहिनी घातली की विज्ञान विसरायला होते. >>> 'चि. आणि चि.सौ.का.' सिनेमातला एक आवडता डायलॉग आठवला.
ते दोघं कारमधून चाललेले असतात. ती गुणगुणत असते - 'जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पहाते'.
तो म्हणतो, भारताला अमुक हजार किमीचा समुद्रकिनारा आहे, जरा स्पेसिफिक लोकेशन सांगितलं पाहिजे. नाहीतर चुकामूक होईल.
असा मी असामी - छत्री दुरुस्तीला टाकली पाहिजे - हे सुद्धा आठवलं होतंच.
@छन्दिफन्दि कविता छान आहे.
@छन्दिफन्दि कविता छान आहे. कधी काळी मी देखील प्रयत्न केला होता. https://mitraho.wordpress.com/2014/09/25/seat/
@ललिता-प्रिती धन्यवाद Be specific मस्त आहे. Lol आता आठवला तो प्रसंग.