आतुर

Submitted by केजो on 14 August, 2023 - 18:49

आज-काल फक्त तुझाच विचार असतो मनात. कधी एकदा तुला भेटतेय असं झालंय. तुझ्या नुसत्या आठवणींनीही अंगावर काटा फुलून येतो. स्वतःशीच मी हसू लागते आणि आजूबाजूच्यांना मला चिडवण्याचं जणू निमित्तच मिळतं. तू आलास की हे करू, ते करू असं मी वर्षभर ठरवत राहते. तू आलास की, तुझ्याबरोबर लांबवर बाईकवर भटकायला जायचंय. माहितीये की, तुझ्याबरोबर बाईकवर भटकायचं स्वप्न पूर्ण होणार नाहीये. तरीही वेडं मन अजूनही आशा ठेवून आहे. बाईक नाही तरी निदान लॉन्ग ड्राईव्हवर जाऊया, आणि गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून जगाची पर्वा न करता दोघंच डोळ्यात डोळे घालून हरवून जाऊया. तू माझ्याबरोबर असलास ना की, वाफाळणारा टपरीवरचा चहा सुद्धा अगदी अमृततुल्य होऊन जातो.

महिने, आठवडे करत काही दिवस येऊन ठेपलेत. तुझ्या येण्याची चाहूल जरी लागली नं तरीही मला आपसूकच कळेल. तुझ्याआधीच तुझा गंध जीवाला वेडापिसा करेल. आणि मग ती आतुरता माझ्या रंध्र-रंधातून पाझरू लागेल. तुला जाणवतेय का रे माझी तगमग?

तू येशील नं तेव्हा मी जगाचा शिरस्ता पाळून दुरूनच तुझ्याकडे पापणी लववत बघत राहीन. पण मला माझाच भरवसा नाहीये. तू समोर आलास की, मी धावत धावत येऊन तुला घट्ट मिठीत घेईन पण तूही दुष्ट आहेस,काही कळायच्या आधीच कदाचित तू माझ्या मिठीतुन हळूच निसटून जाशील. तू भेटलास की नुसता भासच होता, ह्या विचारांनी मग अजूनच जीवाची काहिली होईल. पण त्या पुसटत्या भेटीनी तू पुन्हा पुन्हा येऊन मला चिंब चिंब भिजवणारा आहेस, ह्याची मला खात्री पटवशील. ये रे लवकर, नको आता ताटकळत ठेवूस.

- पावसाची आतुरतेने वाट बघणारी पक्की मुंबईकर!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults