गावाकडच्या मित्राचा फोन वाजला. सकाळी वर्तमानपत्रं वगैरे वाचत असताना हमखास त्याचा फोन येतो, तेव्हा मी तो टाळत नाही. कारण त्या प्रत्येक वेळी त्याच्या बोलण्यातील एक संवेदनशील जाणीव आपल्याला विचार करायला लावते. आजही, मी फोन उचलून हॅलो म्हणालो, आणि फारशी प्रस्तावना न करता त्याने थेट विचारलं, “आजच्या तू नोंद घेतलेल्या सर्वात महत्वाच्या बातम्या कोणत्या?”... क्षणभर मी विचार करू लागलो. पत्रकाराच्या जगात, प्रत्येक बातमीच महत्वाची असते. कोणती बातमी लोकांपर्यंत पोहोचवायची किंवा कोणती बातमी उशिरा पोहोचली तरी चालेल याचेही काही आडाखे असतात. जॉर्ज ऑर्वेल नावाच्या एका प्रसिद्ध इंग्रजी कादंबरीकाराचं एक वाक्य मला आठवलं. ‘जी लोकांपर्यंत पोहोचू नये असे पत्रकारांव्यतिरिक्त अनेकांना वाटत असते, ती खरी बातमी!’... त्याच्या प्रश्नानंतर माझ्या मनात असा विचार आला, आणि आपण वाचलेल्या बातम्यांतील खरी बातमी कोणती असा प्रश्न उगीचच मला पडला. मग फार वेळ न घालवता तोच म्हणाला, “तिकडे जालन्यात ४०० कोटींचं घबाड इन्कम टॅक्सवाल्यांच्या हाती लागलंय... त्या नोटांचे गठ्ठे मोजणारी माणसं पाहून क्षणभर मला भोवळच आली रे... एखाद्या घरात एवढा पैसा, एवढे दागदागिने, हिरे मोती, करोडोंची मालमत्ता सापडते तरी आपण आपला देश मध्यमवर्गीयांचा, गरीबांचा आहे असं म्हणतो. झेंडा मिळाला तरी घर नाही म्हणत सरकारलाच दोष देतो!...”
या मित्राने बोलणे सुरू केले, की श्रोत्याची भूमिका बजावणे मला पसंत असते. मी ऐकत होतो, आणि त्याच वेळी त्याच्या बोलण्यातली तळमळही अनुभवत होतो. आज देशात कित्येकांच्या डोक्यावर सावलीपुरते छप्परही नाही म्हणून अनेक नेते ओरडताहेत, आणि त्याच वेळी एखाद्याच ठिकाणी, कोट्यवधींच्या बेहिशेबी संपत्तीची लयलूट सुरू आहे. केवळ पैशाची ऊब अनुभवत काही कुटुंबे जगत आहेत...
मला पुन्हा तो जॉर्ज ऑर्वेल आठवला. कितीतरी वर्षांपूर्वीच्या आपल्या अँनिमल फार्म नावाच्या कादंबरीतील प्राण्यांचा संवाद आज जगातील विषमतेचे प्रतीक म्हणून मानला जातो. “सारे प्राणी समान असतात, पण काही प्राणी अधिक समान असतात”, अशा अर्थाचे ते वाक्य लगेचच डोळ्यासमोर आले, आणि मी मित्राच्या म्हणण्याला केवळ हुंकारून सहमती दिली.
तेवढ्यावर तो थांबला नाही. त्याचा पुढचा प्रश्न तयारच होता. “आता दुसरी एखादी, मनाला भिडलेली बातमी सांग...”
आता मात्र त्याचं बोलणं केवळ ऐकायचं नाही असं मी ठरवलं, आणि समोरच्या वर्तमानपत्राची पानं पालटली. अलीकडे कोणत्याही वर्तमानपत्रात नेहमीच, खून, बलात्कार, भ्रष्टाचार, अत्याचाराच्या बातम्यांचे रकाने दिसतातच. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही या बातम्यांचा एवढा सुळसुळाट दिसतो, की त्या वाचताना मन आणि नजरही सरावल्यासारखीच होते.
मी समोरच्या वर्तमानपत्राचं एक पान अंदाजाने उघडलं, आणि बहुधा त्याला अपेक्षित ठरेल अशीच एक बातमी मला समोर दिसली. ही बातमी विलक्षण अस्वस्थ करणारी आहे.
... देशभर ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा गाजावाजा सुरू असताना, स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे उलटून गेलेली असतानाही, तामिळनाडूमधील अनेक जिल्ह्यांतील दलित सरपंचांना त्यांच्या ग्रामपंचायत कार्यालयांत खुर्चीवर बसण्याची परवानगी नाही. गावाचा मुखिया असलेल्या या नेत्याला ग्रामपंचायतीच्या कार्यालयातही कोपऱ्यात कुठेतरी बसावे लागते, आणि आपण दलित आहोत, याचे भान ठेवूनच इतरांशी वागावे लागते.
सोमवारी घराघरावर तिरंगा लहरणार आहे. सरकारी कार्यालयांवरही राष्ट्रध्वज फडकणार आहे. उभा देश तिरंग्याला अभिमानाने सलामी देईल. या ग्रामपंचायतींमधील दलित सरपंचांना मात्र, तिरंगा फडकावण्याची गावाची अनुमती नाही. या ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या नावाचे फलक कार्यालयात झळकतात, पण दलित असल्यामुळे, त्या फलकावर अन्य सदस्यांच्या बरोबरीने त्याचे नाव नसते. सरपंचासाठी असलेल्या खास आसनावर बसण्याची त्याला परवानगी नाही, आणि पंचायत कार्यालयाच्या किल्ल्यादेखील त्याच्या हाती दिल्या जात नाहीत... आरक्षणामुळे सरपंचपदाचा हक्क प्राप्त झालेल्या या दलित नेत्याच्या शेजारी बसावे लागू नये, म्हणून उपसरपंचासारखे सदस्य स्वतंत्र कार्यालयांत बसतात, आणि सरकारी अधिकारीदेखील त्यांच्यापासून अंतर राखूनच वावरतात... या नेत्याला अन्य सदस्यांपेक्षा वेगळे मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही. असे काही झालेच, तर त्याला मारहाणही होते...
दलित सरपंच असलेली व्यक्ती महिला असेल, तर काय होत असेल, याची कल्पना न करणेच बरे!
ही बातमी मी फोनवरून मित्राला वाचून दाखविली. पलीकडून एक दीर्घ सुस्कारा कानावर पडला.
लहानपणी शाळेत म्हटलेल्या व पाठ झालेल्या प्रतिज्ञेतील, ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’, हे वाक्य उद्विग्नपणे उच्चारून मित्राने फोन बंद केला...
ता.क.: एक वर्षापूर्वी याच दिवशीची ही नोंद! आता जग बदललं असेल?
व्यथित करणारे वास्तव
व्यथित करणारे वास्तव
एक वर्ष सोडा, एका तपानन्तर देखील ह्यात फरक पडेल असे वाटत नाही. तामिळनाडू हे एक प्रातिनिधिक उदाहरण झाले. जिथे 'हर घर तिरंगा' फडकला , तिरंगी रोषणाई केली म्हणजे आपण स्वातंत्रयचे गोडवे गाण्यास मोकळे झालो अशी मानसिकता असेल तिथे आणखी काय अपेक्षा ठेवावी?
<< आता जग बदललं असेल? >>
<< आता जग बदललं असेल? >>
------ पिण्याच्या पाण्याच्या नळाला हात लावला म्हणून संपूर्ण टाकीला गोमुत्राने धुण्याची घटना २०२२ मधे घडली आहे.
https://timesofindia.indiatimes.com/city/mysuru/tank-purified-with-cow-u...
लग्नामधे घोड्यावर बसला किंवा समोरुन जातांना नमस्कार केला नाही म्हणून दलित व्यक्तीला मारहाण या व अशा प्रकारच्या घटना अधून मधून वाचायला मिळतात.
हजारो वर्षांच्या अन्यायामुळे दलित समाजाचे एव्हढे " कंडिशनींग " झाले आहे कि राष्ट्रपती पदावरिल व्यक्तीला पण देव्हार्यांत जाण्याचे मानसिक धाडस होत नाही , मग सामान्यांची काय कथा? " मलाच बाहेरुन दर्शन घ्यायचे होते.." असे स्पष्टीकरण राष्ट्रपती देतात.
https://newschecker.in/fact-check/image-of-president-droupadi-murmu-at-j...
या विळख्यातून दलितांना स्वत:ची सुटका करवून घ्यायची असेल तर शिक्षण घेणे आणि वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणे या दोन गोष्टीच त्यांची सोडवणूक करु शकतात.
वरच्या घटना दुःखद आहेत. माणसा
वरच्या घटना दुःखद आहेत. माणसा माणसात असा भेद योग्य नाही.
पण सर्व भारतीय बांधव कसे होवू शकतील.
सर्व भारतीय माझे बांधव आहेत हे चूक च आहे.