।। 'हिंग' पुराण - अध्याय तिसरा ।। (अंतिम)

Submitted by संजय भावे on 5 August, 2023 - 11:32

"तडका तो सब लगाते हैं... "

'उमंग' नामक महिलेची नवीन सुनबाई 'निक्की' आपली सासू आणि तिच्या मैत्रिणीसाठी पाणी घेऊन येताना एंड टेबलला अडखळल्याने तिच्या हातातील ट्रे वरच्या ग्लासेस मधलं थोडंसं पाणी तिच्या सासूच्या अंगावर सांडतं.
ह्या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली 'उमंग'ची मैत्रीण स्वयंपाक करता करता आपल्या बंगाली मैत्रिणीला "उमंगने पाणी मागितले तर तिच्या नव्या सुनबाईने ग्लास मधले पाणी तिच्या तोंडावर फेकले" अशी फोडणी देऊन तो प्रसंग कथन करते.
हि बंगालन, आपल्या मैत्रिणीला फोन करून त्याच प्रसंगाला अजून फोडणी देऊन "उमंगच्या 'डेंजरस' सुनेने तिने पाणी मागितले तर पाण्याची बादली आणून तिच्या डोक्यावर ओतली " असे सांगते.
बंगालन कडून अशी माहिती मिळालेली महिला आणखीन एका महिलेला फोन करून "उमंगने पाणी मागितले तर तिच्या सुनेने तिचे तोंड 'फिश टॅंक' मध्ये बुडवले" अशी अधिकची फोडणी देऊन तिला तो प्रसंग तिला कथन करते. शेवटी,

"तडका तो सब लगाते हैं...
पर असली तडका सिर्फ कॅच हिंग से लगता हैं!
शुद्ध और जानदार खुशबुवाला...
अब इंडिया लगाएगा कॅच हिंग का तडका!
हंड्रेड पर्सेंट इंडियन वुमन का मॅच, सिर्फ कॅच."

असे म्हणत पडद्यावर अवतरणाऱ्या विद्या बालनने केलेली 'कॅच' हिंगाची सात-आठ वर्षांपूर्वीची जाहिरात आठवते का?
एखाद्या अतिशय साधारण प्रसंगाला आपल्या कल्पनाविलासाची फोडणी देत, "बात का बतंगड़" बनवून कर्णोपकर्णी प्रसारित करण्याच्या काही* महिलांच्या सार्वत्रिक स्वभाव वैशिष्ट्याचा खुबीने वापर करून गॉसिप्स आणि पाककलेची सांगड घालत 'तडका' अर्थात खमंग फोडणीत हिंगाचे असलेले अनन्यसाधारण महत्व ह्या जाहिरातीतून मोठ्या कल्पकतेने विशद केले होते!
(* इथे 'पॉलिटिकल करेक्टनेस' हा मुद्दा विचारात घेऊन काही हा शब्द वापरल्याचे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच 😀)

असो, हिंगाचा भारतातला इतिहास, आशिया, आफ्रिका, युरोप आणि दक्षिण अमेरिका खंडात झालेला हिंगाचा प्रसार, वापर आणि काही चमत्कारिक उपयोगांबद्दलची थोडी माहिती आपण पहिल्या दोन अध्यायांत बघितली आता हिंगाचे रासायनिक आणि औषधी गुणधर्म, त्याचे औषधी उपयोग आणि स्वदेशी उत्पादनासाठीचे प्रयत्न ह्यांची थोडी माहिती बघूयात.

आयुर्वेद आणि युनानी वैद्यक:

आयुर्वेद:

आयुर्वेदाला हिंगाची ओळख फार पूर्वीच झाली असल्याचे 'बृहत्रयी' म्हणून ओळखले जाणाऱ्या तिन प्राचीन ग्रंथांमधील त्याच्या तब्बल १९० संदर्भांवरून स्पष्ट होते. शल्य, शालाक्य, कायचिकित्सा, भूतचिकित्सा, कौमारभृत्य, अगदतंत्र, रसायन आणि वाजीकरण ह्या आयुर्वेदाच्या अष्टांगांतील काढा, चूर्ण, वटी, गुटिका, वर्ती, लेप, लेह, तैल, घृत, अंजन, धुमपान आणि धुपणा अशा विविध औषधी उपचारांत 'हिंगु'चे (हिंग) चरक संहितेत ७२, सुश्रुत संहितेत ५६ आणि अष्टांग हृदयात ६२ संदर्भ सापडतात, त्यावरुन हिंगावर विपुल संशोधन / अभ्यास झाल्याचेही सहज लक्षात येते.

आयुर्वेदानुसार हिंग हे 'कटुस्कन्ध' (तीव्र / तिखट चवीचे), वात आणि कफाचे संतुलन करणारे, पित्तवर्धक, 'दीपनेय' (भूक वाढवणारे आणि पाचक), 'श्वासहर' (दमा आणि श्वसनरोग निवारक), संजनास्थापक (चेतना सुस्थापित करणारे, मज्जा /चेतासंस्थेचे कार्य सुधारणारे), रक्त आणि मूत्रदोष निवारक, वीर्यवर्धक, स्नायुंवरील ताण शिथिल करणारे आहे.

अर्भकावस्थेपासून वार्धक्यापर्यंच्या मानवी जीवनातील सर्वच टप्प्यांवर उद्भवणाऱ्या अनेक व्याधींना अटकाव करण्याची क्षमता आणि पचन, श्वसन, मज्जासंस्था, प्रसूति, मासिक पाळी संबंधित समस्या / आजारांवर अत्यंत प्रभावी औषध असणाऱ्या हिंगाला आयुर्वेदात 'रक्षोघ्न द्रव्य' असेही संबोधिले आहे.

साध्या सर्दी-खोकल्यापासून अनेक गंभीर आजारांवरील उपचारांसाठी तयार करण्यात येणाऱ्या असंख्य औषधांमध्ये वापर होणाऱ्या, आणि महिलांसाठी वरदान असल्याचे सांगतानाच आयुर्वेदात बहुगुणी हिंगाचे काही दुष्परिणाम / धोकेही वर्णिले आहेत.

 • गर्भपात होण्याची शक्यता असल्याने गर्भवती महिलांनी (आणि स्तनपान देणाऱ्या मातांनी) हिंगयुक्त औषधांचे सेवन टाळावे.
 • हिंगाच्या अतिरिक्त सेवनाने ओठांना सूज येणे, मळमळणे, वांती किंवा पित्तदोष होऊ शकतो.
 • हिंगाची ऍलर्जी असलेल्या व्यक्तीने (अशा व्यक्तींचे प्रमाण खूपच कमी आहे) हिंगयुक्त मलम किंवा तेलाच्या स्वरूपात त्वचेवर लावल्यास पुरळ / लाल चट्टे उठण्याची शक्यता असते.

युनानी वैद्यक:

अरबांनी अनुभवसिद्धता व गूढवादावर विसंबून असलेले प्राचीन ग्रीक वैद्यक आत्मसात करून त्यात गणित, भौतिकी, रसायनशास्त्र, भूगोल आणि वनस्पति विज्ञानाचा अंतर्भाव केला आणि मुळच्या ग्रीक वैद्यकातील विखुरलेल्या ज्ञानाचे वर्गीकरण करून त्यातलया विकृति विज्ञानात नवीन रोगवर्णनांचा आणि उपरुग्ण वैद्यकाचा समावेश करून ते अद्ययावत केले. अशा रीतीने उत्तरोत्तर प्रगत झालेलया ग्रीको-अरब वैद्यकाला त्यांनी 'युनानी वैद्यक' असे नाव दिले.

आठव्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षांत, बगदादचा खलिफा हारुन-अल्-रशीद ह्याच्या शासनकाळात (इ. स. ७८६ - ८०९) भारतातील काही आयुर्वेद तज्ज्ञांनी बगदादला भेट दिली होती तेव्हापासून आयुर्वेद आणि युनानी वैद्यकात मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय ज्ञानाची परस्पर देवाण-घेवाण झाली. आपल्याकडील वैद्यांनी आयुर्वेदिक औषध निर्मितीत त्यांच्या ज्ञानाचा उपयोग केला, तर युनानी हकीमांनी चरक, सुश्रुत, वाग्भट वगैरे आयुर्वेदिक ग्रंथांतील माहितीचा उपयोग केला व पुढे त्या ग्रंथांची अरबी आणि फारसी मध्ये भाषांतरेही झाली ज्याच्या परिणामी नव्याने तयार होणाऱ्या युनानी औषधांमध्ये हिंगाला अधिक मानाचे स्थान मिळाले.

पुढच्या काळात अरबांनी आशिया, आफ्रिका आणि युरोपात इस्लाम बरोबरच युनानी वैद्यक आणि युनानी औषधांचाही प्रचार आणि प्रसार केला. ते जिथे जात तिथे त्यांच्याबरोबर युनानी हकिमही असत. ऑटोमन साम्राज्यात ह्या प्रसाराची व्याप्ती युरोपात अजून विस्तारली. सध्याच्या काळात रसायनांपेक्षा नैसर्गिक औषधांच्या वापराकडे लोकांचा वाढता कल असल्यामुळे इजिप्त, इराक, इराण, सीरिया, अफगाणिस्तान, चीन, भारत, कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, फिनलंड, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, कोरिया, जपान, सौदी अरेबिया, स्वीडन, स्वित्झर्लंड, टर्की, इंग्लंड आणि अमेरिका आदी देशांमध्ये ऍलोपॅथीला पर्याय म्हणून आयुर्वेद आणि युनानी वैद्यकाची लोकप्रियता वाढत असून त्यावर एतद्देशीय संशोधन आणि औषध निर्मितीही होत असल्याने खाण्याव्यतिरिक्त आयुर्वेदिक आणि युनानी औषधे तयार करण्यासाठी होणारा हिंगाचा वापरही वाढत आहे.

हिंगाचे देशी-विदेशी घरगुती औषधी उपयोग:

भारतात प्राचीन काळापासून (ऐच्छिक) गर्भपात घडवून आणण्यासाठी पांढऱ्या मोहरीची भुकटी आणि हिंग शिरकामध्ये (व्हिनेगर) मिसळून खाऊ घालणे, पोटदुखी आणि पोट फुगणे अशा समस्यांवर पाण्यात हिंग मिसळून लहान बाळांच्या बेंबीला चोळणे तसेच हिंग विरघळवलेल्या गरम पाण्यात भिजवलेली कापडाची पट्टी मोठ्या माणसांच्या पोटावर ठेवणे, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि वात दोष कमी करण्यासाठी खडीसाखर आणि हिंग एकत्र करून खाणे किंवा हिंग घालून ताक प्राशन करणे असे अनेक घरच्याघरी करण्यासारखे पारंपारिक देशी किंवा गावठी उपाय केले जातात. अशा घरगुती उपचारांना आपण 'आजीबाईचा बटवा' म्हणूनही ओळखतो, पण परदेशातील आजीबाईंच्या बटव्यातही हिंगाला स्थान असल्याचे खाली दिलेली यादी वाचून लक्षात येईल.

 • अफगाणिस्तानमध्ये फेफरे येणे, भावनिक उन्माद, डांग्या खोकला आणि अल्सरवर उपचार म्हणून हिंगाचा काढा प्राशन केला जातो आणि अफूची नशा उतरवण्यासाठी उतारा म्हणून एखाद्या व्यक्तीने जेवढ्या प्रमाणात अफूचे सेवन केले असेल तेवढ्याच प्रमाणात हिंग खायला देतात.
 • चीन आणि नेपाळमध्ये हिंगाचा काढा कृमिनाशक / जंतनाशक औषध म्हणून प्राशन केला जातो.
 • इजिप्तमध्ये ह्या वनस्पतीच्या वाळलेल्या मुळांचा काढा पोटरी किंवा मांडीत आलेला गोळा आणि पाठीत भरलेली उसण घालवण्यासाठी, लघवीचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि जंतनाशक, वेदनाशामक औषध म्हणून प्राशन केला जातो.
 • मलेशियामध्ये स्त्रियांची मासिक पाळी अनियमित झाल्यास त्यावर उपाय म्हणून हिंग चावून खायला देतात.
 • मोरोक्कोमध्ये अपस्मारावरील औषध म्हणून हिंगाचा वापर होतो.
 • सौदी अरेबियामध्ये हिंग डांग्या खोकला, दमा आणि ब्राँकायटिस साठीचे औषध म्हणून वापरला जातो.
 • ब्राझीलमध्ये ह्या वनस्पतीच्या वाळलेल्या पानांचा आणि देठाचा काढा पुरुष कामोत्तेजक पेय म्हणून प्राशन करतात आणि हिंगाची भुकटी अन्नपदार्थांत मसाला म्हणून वापरतात.
 • केनिया, टांझानिया आणि मोझांबिक अशा पूर्व आफ्रिकेतील देशांत हिंगाचा काढा मासिक पाळी नियमित होण्यासाठी, कफ नाशक, कृमिनाशक, कामोत्तेजक पेय आणि मेंदू व मज्जातंतूंसाठी उत्तेजक म्हणून प्राशन केला जातो.

हिंगाचे रासायनिक गुणधर्म आणि शास्त्रीय संशोधन:

हिंगात असलेल्या गंधकाच्या संयुगांमुळे त्याला उग्र वास आणि कडवट-तिखट चव असते. हिंगामध्ये सुमारे ४० ते ६० टक्के असेरेसिनोटेनॉल आणि फेरुलिक ऍसिडयुक्त राळ, २५ टक्के डिंक, १० टक्के बाष्पशील अर्कयुक्त तेल आणि राख अशी संयुगे असतात.

हिंगाच्या विश्लेषणानुसार त्यात (प्रति १०० ग्रॅम) ६७.८ टक्के कर्बोदके, १६ टक्के आर्द्रता, ४ टक्के प्रथिने, १.१ टक्के चरबी, ७ टक्के खनिजे आणि ४.१ टक्के फायबर असते आणि त्यातील खनिज आणि जीवनसत्वांमध्ये फॉस्फरस, लोह, कॅरोटीन, रिबोफ्लेविन आणि नियासिन बरोबरच कॅल्शियमही असते.

वैज्ञानिक पातळीवर शुद्ध स्वरूपातल्या हिंगाचा अभ्यास तसा मर्यादित असला तरी प्रयोगशाळांमध्ये प्राण्यांवर आणि परीक्षानलिकेमध्ये (टेस्ट-ट्युब) झालेल्या शास्त्रीय संशोधनात्मक प्रयोगांमधून त्याचे आरोग्याच्या दृष्टीने खालील प्रमाणे फायदे होऊ शकतात असे अनुमान काढले गेले आहे.

 • हिंग हे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असून त्यातील पाचक गुणधर्मामुळे त्याचे मानवी आरोग्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात.
 • हिंगात बुरशीनाशक आणि प्रतिजैविक गुणधर्म असून त्वचा, उती आणि श्वसनमार्गाशी संबंधित रोगांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या स्ट्रेप्टोकोकस (Streptococcus) बॅक्टेरियाच्या निर्मूलनासाठी त्याचा वापर होऊ शकतो.
 • हिंग रक्तवाहिन्या शिथिल करून रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकते.
 • हिंग स्तन आणि यकृताच्या कर्करोगासह अन्य काही प्रकारच्या कर्करोगाच्या पेशींची वाढ आणि प्रसार थांबविण्यात मदत करू शकते.
 • अनेक प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांतून असे आढळून आले की हिंग मेंदूतील मज्जातंतूंचे नुकसान आणि स्मरणशक्ती कमी होण्यापासून संरक्षण करण्यास सहाय्य्यभुत ठरू शकते.
 • हिंगाचा श्वसन संस्थेतील स्नायूंवर आरामदायक प्रभाव पडत असल्याने ते अस्थमाच्या उपचारांसाठी आणि दम्याची लक्षणे कमी करण्यासाठी सहाय्य्यभुत ठरू शकते.
 • उंदरांवरील एका अभ्यासात असे आढळून आले की हिंगामुळे रक्तातील साखरेची पातळी (Fasting blood sugar level) कमी होऊ शकते.

स्वदेशी हिंगोत्पादनाचा प्रयत्न :

▲ हिमाचल प्रदेशातील 'शीत वाळवंट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाहौल-स्पिती येथिल पडीक जमिनीवर करण्यात आलेली प्रायोगिक हिंग लागवड.

'वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ' (Council of Scientific and Industrial Research - CSIR) ह्या केंद्र सरकारच्या संशोधन संस्थेशी संलग्न असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजी, पालमपूर' (Institute of Himalayan Bioresource Technology, Palampur - IHBT) ह्या संस्थेने २०१८ च्या ऑक्टोबर ते डिसेंबर ह्या काळात इराण मधून दोन टप्प्यांत 'फेरुला असाफोटीडा' ह्या वनस्पतीच्या सहा वाणांचे बियाणे आयात करून 'नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, नवी दिल्ली' (National Bureau of Plant Genetic Resources, New Delhi -NBPGR) ह्या संस्थेच्या देखरेखीखाली भारतात प्रथमच हिंगाची व्यावसायिक लागवड करण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले.

अडथळे आणि आव्हाने :

मध्य आशियातील हिंगोत्पादक देशांमध्ये फेरुला असाफोइटिडाच्या बियाण्याची खरेदी विक्री आणि हस्तांतरणावर कठोर निर्बंध व निर्यातीवर बंदी असल्यामुळे आणि त्याची तस्करी रोखण्याकडेही बारकाईने लक्ष पुरवले जात असल्याने मुळात हे बियाणे मिळवणेच फार कठीण काम होते, पण उच्चस्तरीय राजनैतिक पातळीवरून केल्या गेलेल्या प्रयत्नातून भारताला इराणकडून ते मिळवण्यात यश आले.

अर्थात बियाणे मिळाले हि फक्त ह्या प्रयोगाची पहिली पायरी होती, त्या बियांपासून रोपनिर्मिती करणे खूपच आव्हानात्मक कार्य होते. भिन्न हवामानात किंवा प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत एखाद्या वनस्पतीच्या बिया सुप्तावस्थेत जाणे ही सर्वसामान्य बाब असली तरी फेरुला असाफोटीडाच्या बियांमध्ये अशा सुप्तावस्थेचे प्रमाण खूपच जास्त असल्याने हिमाचल प्रदेशच्या लाहौल-स्पीति जिल्ह्यातील रिब्लिंग (Ribling) येथील 'सेंटर फॉर हाय अल्टीट्युड बायोलॉजी' (Centre for High Altitude Biology - CeHAB) ह्या प्रयोगशाळेत जेव्हा ह्या बियांपासून रोपनिर्मितीच्या प्रयोगाला सुरुवात झाली त्यावेळी सुरुवातीला शंभरातल्या केवळ दोनच बीजांचे अंकुरण होत होते.

पुढची सुमारे दोन वर्षे 'इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजी, पालमपूर' ह्या संस्थेचे संचालक डॉ. संजय कुमार आणि वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक कुमार ह्या दोघांच्या अथक परिश्रमांचे फलस्वरूप म्हणून बीजांकुरणाचे प्रमाण शंभरपैकी दोन वरून साठ पर्यंत वाढवण्यात यश मिळाले आणि १८ ऑक्टोबर २०२० रोजी हिमाचल प्रदेशातील 'शीत वाळवंट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाहौल-स्पीति जिल्ह्यातील समुद्रसपाटीपासून सुमारे अकरा हजार फूट उंचीवर असलेल्या 'क्वारिंग' (Kwaring) ह्या खेडेगावात डॉ. संजय कुमार ह्यांच्या शुभहस्ते पहिले रोपटे लावून हिंगाच्या प्रत्यक्ष जमिनीवरील प्रायोगिक लागवडीच्या प्रयोगाला सुरुवात झाली.

▲ फेरुला असाफोटीडाचे बियाणे, रिब्लिंग येथील प्रयोगशाळेत नियंत्रित वातावरणात यशस्वीरीत्या केले गेलेले बिजांकूरण / रोप निर्मिती आणि हिंगाचे पहिले रोपटे लावताना 'इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजी, पालमपूर' ह्या संस्थेचे संचालक डॉ. संजय कुमार.

क्वारिंग येथे पहिल्या टप्प्यात आठशे रोपांची लागवड केल्यावर IHBT द्वारे ह्या प्रयोगाची व्याप्ती वाढवताना हिमाचल प्रदेशातील 'लाहौल आणि स्पीती, मंडी, कुलू, किन्नौर आणि चंबा', उत्तराखंड मधील 'चमोली', लडाख मधल्या 'रणबीरपूर आणि लेह', व जम्मू आणि काश्मीर मधल्या 'किश्तवाड, दोडा आणि राजौरी' ह्या जिल्ह्यांमध्ये हिंगाची प्रायोगिक तत्वावर लागवड करण्यात आली आहे.

IHBT ने प्रशिक्षण देऊन हिंग लागवडीसाठी प्रोत्साहित केलेल्या लाहौल आणि स्पीती मधील शेतकऱ्यांचे अनुभव संमिश्र आहेत. त्यातल्या अनेकांनी लावलेल्या एकूण रोपांपैकी बहुतांश रोपे करपण्याचे, मरण्याचे, वाढ खुंटण्याचे प्रमाण चिंताजनक असले तरी ते पुन्हा जिद्दीने नवीन रोपे लावत आहेत हि गोष्ट नक्कीच आशादायक आहे. एकंदरीत भारताचे स्वदेशी हिंगोत्पादनाचे प्रयोग अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन प्रामाणिकपणे आणि चिकाटीने सुरु असले तरी त्यात यश मिळेल कि अपयश ह्याचे भाकीत करणे तूर्तास अवघड आहे. पूर्ण वाढ झालेल्या फेरुला असाफोटीडा ह्या वनस्पतीपासून हिंग मिळण्यास चार ते पाच वर्षांचा कालावधी लागतो, सद्यस्थितीत ऑक्टोबर २०२० मध्ये लावलेल्या पहिल्या बॅचला अजून तीन वर्षेही पूर्ण झाली नसल्याने निकाल हाती येण्यास अजून दोन वर्षे तरी वाट पाहावी लागणार आहे.

हिंग लागवडीचे हे प्रयोग यशस्वी झाल्यावरही देशाची गरज भागवण्याएवढी हिंगनिर्मिती होण्यास काही दशकांचा कालावधी लागणार असला तरी स्वदेशी हिंग लागवड यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांची आणि त्यांना तेवढ्याच तोलामोलाची साथ देणाऱ्या शेतकरी बांधवांची मेहनत लवकरच फळाला येऊन ह्या प्रयोगाला घवघवीत यश मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून हिंग पुराणाच्या ह्या तिसऱ्या आणि शेवटच्या अध्यायाची सांगता करतो.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

।। इति श्री 'हिंग' पुराण तृतीयोऽध्याय संपूर्ण ।।

।। इति श्री 'हिंग' पुराण समाप्त ।।

आधीचे भाग :

Group content visibility: 
Use group defaults

वा !
सुंदर, सचित्र आणि समृद्ध श्री 'हिंग' पुराण आवडले म्हणजे आवडलेच !!

पु ले शु

हिंग या विषयाला कुणी हिंग लावून विचारत नाही असे नाही हे या मालिकेला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे सिद्ध झाले. हिंग हा विषय किती महत्वाचा आहे, जिव्हाळ्याचा आहे हे समजलेच, पण अभ्यासपूर्ण , माहितीपूर्ण असल्यानेच तिन्ही भागांना वाचकांनी भरभरून प्रेम दिले हे दिसते.

खूप सुरेख झालंय हिंग पुराण!
सर्व भागांची सुरवात जाहिरात किंवा सिनेमातील दृश्याने करण्याची कल्पना आवडली!!
तीनही माहितीपूर्ण भाग वाचताना कुठे कंटाळा नाही आला आणि हिंग इतके गुणी असेल याची कल्पनापण कधी केली नव्हती!!!
>>अथक प्रयत्न करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांची आणि त्यांना तेवढ्याच तोलामोलाची साथ देणाऱ्या शेतकरी बांधवांची मेहनत लवकरच फळाला येऊन ह्या प्रयोगाला घवघवीत यश मिळो
+१ त्यांची मेहनत लवकरच फळाला येवो!

काय आब्यास!! काय आब्यास!!!!

<<ह्या बियांपासून रोपनिर्मितीच्या प्रयोगाला सुरुवात झाली त्यावेळी सुरुवातीला शंभरातल्या केवळ दोनच बीजांचे अंकुरण होत होते>>
मग थेट रोपेच नाही का मिळाली ? त्याचे उत्पादन लवकर सुरू झाले असते.

या हिंगाचे चित्ते होऊ नयेत ही सदिच्छा..

परत एकदा अबब !! एकदम रंजक आणि सविस्तर खुलासेवार माहिती !
तीनही भागात हिंगाच्या जाहिरातींचा नि मालिकेचा वापर आवडला.. यातील एकही जाहिरात पाहिलेली नाही ..!
तुम्ही कुठून? कशी काय? आणि का नि कसे काय इतके डिटेल्स जमवलेत हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
तुमच्या profession किंवा दैनंदिन जीवनातील हा भाग आहे का ?

जबरी झाली ही लेखमाला.
एका लग्नाची गोष्ट मध्ये मन्याचा temp सहकारी दुसऱ्या एका स्त्री सहकारीचा हात हातात घेऊन(आधीच घेतलेला असतो त्याचे वर्णन करत असतो बहुतेक ) चार्ली नं ? असे विचारतो (चार्ली हे परफुम असावे )त्यावर मन्या (प्रशांत दामले ) तोंड वाकडं करून , "हिंगाचा येतोय" असे म्हणतो .. हाहा Lol
जेवण सोडून इतकाच एक संदर्भ मला आठवत होता !! हाहा !

आणि अमुक तमुक नावाचे एक youtube चॅनेल आहे त्यातल्या पहिल्या भागात पण हिंग अफगाणिस्तानात बनतो /उगवतो वगैरे चर्चा झाल्याचे आठवतेय

आम्ही मुंबईतल्या मसजिद येथे वनदेवी/ वैदेही हिंग कंपनीचे ठोक व्यापाराचे छोटे दुकान आहे तिथून हिंग आणतो. त्यातही इराणी काडी हिंग हा आईच्या काळापासून आमच्या घरात ठरलेला ब्रँड आहे. काळसर लालसर रंगाच्या छोट्या ओबड धोबड चकत्या असतात. आईचे लोणचे ह्या हिंगाशिवाय व्हायचेच नाही. खूप महाग असायचा हा हिंग. पण तरीसुद्धा आई खूप मोठ्या प्रमाणात लोणचे करायची. आणि सगळ्यांना थोडे थोडे ( बरे चांगले) वाटायची .देवळातल्या सप्त्यात, कुणाच्या समाराधनेत तिची लोणच्याची बरणी हजर असायचीच.
काही बायका तर बरोबर एक बाटलीच घेऊन यायच्या आणि त्यात लोणचे भरून घ्यायच्या. तिला आंबा, लिंबवे अगदी निवडक लागत. आंब्याची करेल नावाची एक जात असायची. ते आंबे कोणी एक जण तिला आणून द्यायचा. ती दोनदा लोणचे घालायची. एकदा चैत्राच्या शेवटी आणि एकदा आषाढात. दोन्ही वेळचे आंबे वेगळे. कारण दोघांचा बहर वेगवेगळ्या काळात असायचा. एका वेळी ३५ किलो आंब्याचे लोणचे घालायची. लिंबेही धुळे जळगावहून एक शेजारी आणीत असत. नंतर नंतर खात्रीचे आंबे/ लिंबे आणून देणारी माणसे राहिली नाहीत. आईही थकली. शिवाय त्या बरण्या ज्याच्या त्याच्याकडे नेऊन पोचविण्याचे काम मोठ्या झालेल्या मुलांना आवडेनासे झाले. मग लोणचे फक्त घरातल्या माणसांपुरतेच बनू लागले. पुढे तेही थांबलेच.
आई गेली पण इराणी हिंग मात्र घरात रुळला तो रुळलाच.
हे आमच्या घरातले हिंग पुराण. थोडे अवांतर, थोडे समांतर.
लेखमाला आवडली हे वेगळे सांगायला नको.

मनिम्याऊ | देवकी | रघू आचार्य | आकाशानंद | धनवन्ती
प्रतिसादांसाठी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏

@ रघू आचार्य
तिनही भाग लांबीला थोडे जास्त असल्याने वाचताना कंटाळा येइल का अशी शंका होती, पण ते वाचकांना आवडल्याचे त्यांनी प्रतिसादांतुन कळवले ही माझ्यासाठी नक्कीच उत्साहवर्धक आणि आनंदाची गोष्ट आहे!

@ धनवन्ती
>>>मग थेट रोपेच नाही का मिळाली ? त्याचे उत्पादन लवकर सुरू झाले असते.>>>
चांगला प्रश्न!
फेरुला असाफोटिडा ही रानटी वनस्पती असल्याने तिची तयार रोपे आणुन लावल्यास ती इथल्या वातावरणात जगण्याची शक्यता जवळपास शुन्य होती हा पहिला मुद्दा, आणि हा प्रयोग व्यवसायिक लागवडीसाठी करायचा असल्याने आणुन आणुन अशी किती रोपे एका वेळी आणणार हा दुसरा मुद्दा! तसेच ह्या वनस्पतिच्या वाढीसाठी लागणारा चार ते पाच वर्षांचा कालावधी लक्षात घेता एका फेरित काही शे-हजार रोपे आयात करण्यापेक्षा काही पोत्यांतुन लाख-दोन लाख बिया आणणे हाच व्यवहार्य मार्ग होता.

मंजूताई | shraz | anjali_kool | हीरा
प्रतिसादांसाठी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏

@ anjali_kool
>>>तुमच्या profession किंवा दैनंदिन जीवनातील हा भाग आहे का ?>>>
तुमच्या प्रश्नाचे उत्तर हो आणि नाही असे दोन्ही आहे Happy
म्हणजे, मी हिंग उत्पादक किंवा विक्रेता वगैरे नसल्याने उत्तर 'नाही' असे आहे पण २०१९ मध्ये "हिंगाची, आयात - प्रक्रिया - निर्यात" अशा व्यवसायात उतरु पाहणाऱ्या एका स्टार्टअप साठी बिझनेस मॉड्यूल्स तयार करण्याच्या कामात 'व्यवसायाचा भाग' म्हणुन सहभागी झालो असताना हिंगा विषयी भरपूर तांत्रिक आणि अवांतर माहिती जमा झाली होती त्यामुळे 'हो' असेही आहे!
हिंगावर लेख वगैरे लिहीन असे कधी वाटले नव्हते पण गेल्या महिन्यात फोरम वरिल एका चर्चेत हिंगाचा विषय निघाला आणि त्यातुन ह्या 'हिंग पुराणाचे' बिज पेरले गेले.

@ हीरा
तुमच्या घरातले 'समांतर' हिंग पुराणही खुप आवडले 👍
बाकि पापड असोत कि लोणची त्यातले हिंगाचे स्थान अढळच!

काळसर लालसर रंगाच्या छोट्या ओबड धोबड चकत्या असतात. ..... हे एक नवीन ऐकले.
हीरा,नेहमीप्रमाणे सुरेख प्रतिसाद.करेल आंबा हा शब्द बऱ्याच वर्षांनी वाचला.

बहुतेक इंदूरमध्ये एक मऊ हिंग मिळतो.तो हाताने तुकडे करून(पिरगळून) स्वयंपाकात वापरतात.आमच्या इमारतीत एक इंदुरवाली वापरायची .असा हिंग असतो का?

लेखमाला अतिशय आवडली.
नेहमीच्या वापरातील ही वस्तू पण तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हती.
धन्यवाद.

उपाशी बोका | एस | वावे | झेलम | अनिंद्य
आपल्या उत्साहवर्धक प्रतिसादांसाठी मन:पुर्वक आभार 🙏

@ देवकी
>>>इंदूरमध्ये एक मऊ हिंग मिळतो.>>>
बाजारात स्प्फटिक, खडा, पावडर, द्रवस्वरुप (इसेंशीअल ऑईल) अशा विविध स्वरुपात हिंग मिळतो. गुजरात, राजस्थान अशा राज्यांमध्ये घाऊक प्रमाणात जेवण बनवणारे आचारी (महाराज) लोकं बांधानी हिंगापेक्षा शेंगदाणा किंवा ऑलिव्ह अशा दिर्घकाळ टिकणाऱ्या तेलात विरघळवलेल्या लाल हिंगाचा वापर करण्यास प्राधान्य देतात. तुम्ही म्हणताय तो मऊसर हिंग असाच तेलात विरघळवलेल्या 'हिंग लाल' मध्ये काही स्टार्चयुक्त पदार्थ मिसळून 'बांधानी' (Compounded) टाईप तयार केला जात असावा असे वाटते. (मैदा मिसळलेल्या हिंगाचा रंग काळसर दिसतो)