नारायणाय इति समर्पयामि ||

Submitted by प्रज्ञा९ on 5 August, 2023 - 04:54

डिअर विष्णू,

खूप दिवसांपासून तुझ्याशी बोलावंसं वाटत होतं, रोज मनातल्या मनात बोलत असले तरीही वाटत होतं. कारण तू आपल्यातल्या मध्यस्थाला घेऊन गेलास त्याला आता ३ वर्षं होतील. तशी आपली ओळख मी लहान असताना, चार सर्वसामान्यांच्या घरी जशी होते तशीच झाली. म्हणजे भक्त प्रल्हाद, राम-कृष्णावतार वगैरे... पण खरी ओळख उशीरा झाली. बाबांनी करून दिली म्हणूनच झाली. एरवी तू आवर्जून तुझ्या अस्तित्वाची मला जाणीव करून द्यावीस इतकं पुण्य किंवा रावण-हिरण्यकश्यपू वगैरे कॅटेगरीतलं पापसुद्धा, मी केलं नव्हतं.
१७-१८ वर्षांपूर्वी त्यांनी मलाच संथा द्यायला सांगून तुझी सहस्रनामावली शिकून घेतली. म्हणजे मी काही त्यातली तज्ज्ञ नव्हे, पण गीता येते म्हणून हेही प्रयत्न करून मग बाबांना मी उच्चार दुरुस्त करून दिले. मग त्यांचा विष्णूसहस्रनामाचा प्रवास सुरू झाला. रोज १२ वेळा, आणि मग एके दिवशी लक्ष सहस्रनामाचा संकल्प केला म्हणून त्या दिवसापासून रिकामा क्षण = नाम असं सुरू झालं. त्याची रीतसर नोंद होऊ लागली त्यांच्या पुस्तकात. मुळात त्यांना समजून घ्यायला आम्हाला उशीरच झाला कारण त्यांच्या अबोल आणि गंभीर स्वभावामुळे कनेक्ट व्हायलाच वेळ लागला. पण ते खरेखुरे बापमाणूस आहेत हे अलिकडच्या १२-१५ वर्षांत प्रकर्षाने जाणवत गेलं. ह्ट्टी होतेच ते, माणूस म्हणून मर्यादा आणि दोषही होते. ते त्या त्या वेळी त्रासदायकही झालेच. पण आता नाम सुरू झाल्यावर त्यांच्यातले बदल आम्हाला फार जाणवायला लागले. असे बदल एका रात्रीत होतच नाहीत. म्हणून ते कळायला वेळ लागतो. सतत पडणार्‍या बारीक संततधारेने शिळाही भेदली जाते म्हणतात. तसं काहीतरी होत गेलं. काय ते सांगता येणार नाही. कधीकधी मी किरकोळ गोष्टींनी सुद्धा वैतागे, ते शांतपणे माझी समजूत काढत. "तुमचं बरंय, थेट विष्णू तुमचं ऐकतो. माझं नाहिये ना पण तसं" असं मी म्हणत असे. मग, "तूही त्याचं नाव घे. कसंही घे, पण न चुकता रोज घे. रोज म्हणजे रोज घे. शरण जा. शरण म्हण्जे संपूर्ण शरण. तान्ही असताना तुझी माऊ भूक लागली की रडायची आणि तुझ्याशिवाय कोणीही तिला शांत करू शकत नाही असं व्हायचं ना? तिच्या रडण्यात जी व्याकुळता होती ती तुझ्या नामात येऊ दे. मग बघ, तुझं मन राखायला त्याला काहीतरी करावंच लागेल!!' साधेच शब्द, पण त्याच्या मागे हळूहळू जो वाढता विश्वास मला जाणवत गेला त्याने मलाही काहीतरी आधार वाटायला लागला. मग, गेल्या अधिक महिन्याच्या काही दिवस आधी मी रोज नाम वाचायची प्रॅक्टीस करायला लागले म्हणजे अधिकापर्यंत मी नीट वाचू शकेन... मग अधिकात रोज म्हणून बाबांना सरप्राईज देईन... मनात मांडे तर खूप खाल्ले. लॉकडाऊनमधे परवानग्या काढून आई-बाबा कोल्हापुरात आले. येताना तिन्ही जावयांसाठी अधिकाची वाणं पण होती हे नंतर समजलं. ते गेल्यावर वर्षभराने सवडीने आईने दिल्यावर. असो.

त्यातच त्यांना कोविड झाला. मग स्टेप-बाय-स्टेप ते सिरिअस होत गेले. मग, बरं वाटतंय तर परवा डिस्चार्ज करू इथवर आलं. पण ठरल्या दिवसाच्या एक दिवस आधीच त्यांना डिस्चार्ज मिळाला. माणसाच्या जन्मातून मिळाला. तू नेलंस त्यांना. त्यांचं माझं त्याआधी एक आठवडा बोलणं झालं होतं, त्याआधी ९ महिने भेट झाली होती. अ‍ॅडमिट होताना मुद्दाम मला फोन करून "अ‍ॅडमिट होतोय आता, पण ६०००० वेळा सहस्रनाम झालंय, अजून ४०००० शिल्लक आहेत. ते पूर्ण करून घेईल तोच.." असं म्हणून आलेला हुंदका त्यांनी आवरला होता. फार विश्वासाने त्यांनी हे मला सांगितलं होतं. तुलाच काय घाई झाली तुलाच ठाऊक. खरं तर, स्वतःची पंचहत्तरी शांत आणि लग्नाचा ५० वा वाढदिवस छान छोटेखानी धार्मिक विधी + गेटटुगेदर असं त्यांनी आणि आम्ही ठरवलं होतं. ८-१० महिने तू घाई केलीस. हो, मी हेच म्हणणार की तूच घाई केलीस. कारण ते खूप सकारात्मक होते शेवटपर्यंत. बोलतही होते. तुलाच घाई झाली. तुला त्यांंना स्वतःकडे बोलवून नाम ऐकायची हौस आली असणार, दुसरं काय!
तुला माहितेय का, दहाव्या दिवशी ते झटकन पिंड घेऊन मोकळे झाले! कोविडमुळे असं ठरलं होतं, की गुरूजी सगळे विधी काकाकडून करून घेतील, आणि मग आम्ही नमस्कारापुरतं जाऊन येऊ. नशिबाने ताईच्या घरापासून ५ मिनिटांवर घाट होता. पण गंमत बघ, आम्ही तिथे पोचायच्या आत सगळं निपटलं होतं. सगळ्यांचे नमस्कार झाल्यावर काकानेच सांगितलं, की शामू मोकळा झाला, शांतपणे घरी आलो आम्ही. म्हणजे, "आईची काळजी घेऊ, अमुकतमुक करू..." काही ऐकायची गरज त्यांना वाटली नाही. तू सगळं सांभाळशील इतका त्यांना विश्वास वाटला असणार. इतकं सहजी कसं कोणी विलग होऊ शकतं? मी रोज म्हणायचे, की कसे इतके मुक्त होऊ शकलात? आमची, आईची काळजी नाही वाटली? बरं ते झालं, पण निदान एखाद वेळी स्वप्नात तरी याल.. तेही नाही!!"
तूच सांभाळत होतास ना सगळं? खरं सांगू? तटस्थपणे विचार केला तेव्हा झालं हेही बरंच म्हणायचं अशी आमची समजूत पटली. त्यांंचा न्युमोनिआ खूप पसरला होता. बरे झाले असतेच तरी बरेच दिवस ऑक्सिजन सपोर्टशिवाय जमलं नसतं. तीही सोय आम्ही करून ठेवली होती, पण तू सोडवलंस त्यांना. कारण नंतर आम्ही जवळच्या नात्यात अनेकांचे पोस्ट-कोविड गुंते ऐकले आणि "बाबा सुटले" हे अगदी खोलवर जाणवलं. ते तुला पूर्ण शरण गेले आणि तूच सांभाळलंस सगळं.

पण या गोंधळात मी रागवले, रुसले आणि नाम घ्यायचं बंद केलं. मग नकोच वाटलं. असेच २ महिने गेले. काहीतरी मिसिंग आहे असं वाटायला लागलं. मग गीताजयंतीला मी पुन्हा सुरुवात केली. अजिबात न चुकता म्हणायचं असं ठरलं, जमत होतं.. पण एकदा अगदी विसरलेच. दुसरे दिवशी आठवलं आणि दोनदा म्हटलं. नामाचा काऊंट बरोबर आला, छान वाटलं. मग २-३ महिन्यांनी असंच झालं. या वेळी रुखरुख वाटली. तुला शरण जायचं म्हणजे काय ते कळायला लागलं. "मी नाम म्हणते" इथून "तूच करून घे.. घेशील ना?" अशा आर्जवापर्यंतचा प्रवास एव्हाना लक्षात आला होता. तो करायचा हे नक्की झालं. आता जर वीकेंडच्या वेगळ्या रूटीनमधे विसरले तर तू झोपायच्या आधी डोळयासमोरच उभा रहातोस, मी नाम घेतलं की मगच बरं वाटतं. खरं म्हणजे हे थोडं मेकॅनिकली चाललंय का असं वाटतं मलाही, पण तुझ्यापर्यंत काहीतरी पोचतंय हे समजतं मला. माझ्या कंट्रोलमधे नसलेल्या अनेक छोट्याछोट्या गोष्टी मनासारख्या होतात तेव्हा तू सांभाळतोयस असं वाटत रहातं. काही दिवसांपूर्वी युरेका मोमेंट आला!! मी अजूनतरी इतकी समर्पित वगैरे नाही आणि सामान्य मुलीसाठी तुलाही इतका निवांत वेळ नाही तरी तू माझ्याकडून हे करून घेतोस याचं नवल वाटे मला, त्याचं उत्तर मिळालं. "तू शरण जा, ठामपणे ठरव. तुझ्यासाठी त्याला काहीतरी करावंच लागेल" हे शब्द, मी सिग्नल सुटायची वाट बघताना कानाशी आले.. बाबा असंच म्हणायचे ना? ते समर्पित होते, आणि त्यांचा शब्द तू राखत होतास!! भक्तांचा मान तू राखतोस हे माहिती होतं, पण त्यासाठी तू मला असं सांभाळशील हे स्वप्नातही नाही आलं माझ्या! केवळ बाबांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी नाम घेत राहिले, ते घ्यायचं राहिलं तर मिसिंग वाटण्याइतकं ते आवडयला लागलंय.. आणि हे सगळं तुझ्यापर्यंत पोचलंय हा तो युरेका मोमेंट!!

या अधिकात त्यांचं लक्ष नाम पूर्ण झालं असतं. आधीच अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास, तू त्याचा अधिपती आणि त्यात यंदा श्रावण अधिक आहे.. काय आनंद झाला असता त्यांना!! पण तू जरा घाईच केलीस. मला खात्री आहे, त्यांचा संकल्प म्हणजे वज्रलेप असे त्यामुळे तुलाच समोर बसवून ते "ऐक आता, अजून लक्ष पूर्ण झाले नाहियेत. ते झाल्याशिवाय मी उठणार नाहिये" असं म्हणाले असतील ते तुला. गेल्या अधिकातल्या संकष्टीला त्यांना जाऊन ४ दिवस झाले होते, गणपतीबाप्पांच्या पंगतीला गेले ते. मी वर्षभर मोदक सोडले होते. यथावकाश पुन्हा सुरू केले वर्षश्राद्धानंतर. कालच्या अधिकातल्या संकष्टीला मी मोदक घडवले. त्यांची आठवण काढून नैवेद्य ठेवला. ते आहेतच आमच्यात. मीच कधीतरी असं काहीतरी बोलते/ वागते की मग जाणवत रहातं, की हे अस्संच बाबा करायचे.

तुझ्यावरचा माझा राग-रुसवा आता गेलाय. रांगत्या बाळकृष्णाच्या मूर्तीरूपाने तू देवघरात आहेस आणि माझं म्हणणं तुझ्यापर्यंत पोचतं याची खात्री आहे. आणि सांगू का ? आता इतकी सवय झाली आहे ना, की समजा तू लक्षही दिलं नाहीस ना माझ्याकडे, तरी मी काही तुला सोडणार नाही हे नक्की. बाकी तशी मी खूप प्रॅक्टिकल, खत्रूड मुलगी आहे. न पटणार्‍या गोष्टी मी शक्यतो करतच नाही हे तुलाही माहितेय. फक्त, पटणार्‍या गोष्टी करताना मात्र, 'कायेन-वाचा-मनसा-इंद्रियै: वा-बुद्ध्या-आत्मना-वा- प्रकृतिस्वभावात, करोमि यद्यद् सकलं परस्मै.. नारायणाय इति समर्पयामि || हेच असलं पाहिजे हे आता मला समजलंय.

तुझीच,
प्रज्ञा.

ता. क. - हे बर्‍यापैकी असंबद्ध झालंय कारण तुला पत्र लिहायचं म्हणजे खायचं काम नव्हे. आधी मुळात तुझ्याशी भांडू की नको हे ठरेना, म्हणून म्हटलं लिहायला घेऊ, पुढे तुला काय वाचायची इच्छा आहे तसं तू लिहून घेशील. त्यामुळे जे काही आहे ते तुझं तूच गोड मानून घे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख पत्र झालं आहे. माझी आईही कोव्हीडने गेल्यानं, तीही नामस्मरण करत असल्याने, आम्हीही विष्णू भक्त असल्याने आणि मीही प्रॅक्टिकल आणि खत्रुड मुलगी असल्याने फारच रिलेट झाले. Happy

४. भूत-भव्य-भवत्-प्रभु
भूत म्हणजे या सृष्टीत जन्मास आलेलें, भव्य म्हणजे जन्मास यावयाचे आणि भवत् म्हणजे या क्षणीं में जन्मत आहे ते. या तिहींचा जो स्वामी तो भूत-भव्य-भवत्- प्रभु होय. म्हणजेच विश्वप्रभु. विश्वांत या तिन्हींहून वेगळे दुसरें काय आहे ? परमेश्वर हा या विश्वाचा एक मात्र स्वामी आहे. त्याची उत्पत्ति स्थिति आणि गति यांचा म्हणजे समग्र जीवनाचाच तो स्वामी आहे. जीवन शब्दाने त्याची उत्पति-पूर्व स्थिति, उत्पन्न-स्थिति आणि मरणोत्तर गति सर्वांचा निर्देश होतो. थोडक्यांत म्हणजे परमेश्वर हा विश्वाचा म्हणजेच समग्र जीवनाचा स्वामी आहे. भूत-भव्य-भवत्-प्रभु या नामानें हाच आशय व्यक्त केला आहे.

6 भूतभृत्
परमेश्वर भूतकृत् म्हणजे भूतमात्राला निर्माण करणारा आहे इतकेंच नव्हे तर त्या निर्माण केलेल्या जीवाचें भरण, पोषण करणाराहि, भूतभृत् हि, तोच आहे. आई मुलाला जन्म देते आणि जन्मलेल्या तान्हुल्याला ती पाजते, त्याला ती भरवते त्याप्रमाणे परमेश्वर या विश्वाला जन्म देतो आणि त्याचे भरण-पोषणहि तोच करतो. तो विश्वंभर आहे.

https://satsangdhara.net/stotrani/vishnu/vishnu-01-05.htm

या साईटवर सहस्त्रनामांचे अर्थ आहेत . किचकट भाषा आहे किंचित म्हणून मी 10 - 15 च वाचली असतील , पुढे कधीतरी वाचू म्हणून रीड लेटर लिस्टित घालून ठेवलं आहे . पण कोणाला या प्रकारच्या वाचनात इंटरेस्ट असेल तर ही लिंक .

ओह ! कळवळून लिहिले आहे .. बऱ्याच गोष्टी रिलेट झाल्या! वाचताना डोळे झरतंच होते..
radhanisha लिंकसाठी thank you !

खरे तर कोविडचा उल्लेख आला तर टाळून पुढेच जाते. पण हे थांबून वाचले. सुरेख म्हणायला जीभ धजावत नाही. पण भिडले हे पत्र.

नवीन सर्व प्रतिसादांसाठी आभार.

खूप दिवसांनी नवीन काहीतरी लिहावंसं वाटलं. खरंतर टाळत होते, पण शेवटी लिहिल्याशिवाय झोप येत नाही असं झाल्यावर लिहिलं. माबोकर नेहमीच सांभाळून घेतात.. __/\__