अग्निकुंड
धगधगत्या अग्निकुंडाशी तिचे जुनेच नाते |
होमकुंडातून जन्मली द्रौपदी
पेटती ज्वाला मानली जाते
अपमानाची मनी आग तिच्या
पेटती अखंड राहते|
धगधगत्या अग्निकुंडाशी तिचे जुनेच नाते |
असहाय्य सितामाता होती शत्रू दारी
होता रामही वनवासी जरी
पावित्र्य कसोटी फक्त सीतेची
अग्नि परीक्षा एकटी स्त्रीच देते |
धगधगत्या अग्निकुंडाशी तिचे जुनेच नाते |
परक्याची तू ठेव म्हणूनी
दावणी दुसऱ्या बांधली जाते
भोग संपवूनी गेला पती की
फुकाचे देवत्व, अन् सती तीच जाते |
धगधगत्या अग्निकुंडाशी तिचे जुनेच नाते |
चालती युद्धे संपत्ति अन् भूमीसाठी
गाजविती पराक्रमही ते हव्यासा पोटी
अपमान करण्या पराभूताचा
तिचाच वापर करीती जेते |
धगधगत्या अग्निकुंडाशी तिचे जुनेच नाते |
क्रूरकर्मी वासनांध पशू ते
अबला, मग कुठची माता, कुठची भगिनी असते
भोगवस्तू तिच, अन् पायदळीही तीच
उमलण्या आधीच ती जोहारी पडते |
धगधगत्या अग्निकुंडाशी तिचे जुनेच नाते |
मंगळावर गेले जग, तरी वड अजून तिथेच
आहे ती वकील डॉक्टर पोलिस..
कधी अप्राप्य कधी कुरूप कधी नकोशी
अॅसीड पेट्रोल काहीही, अजूनही बळी ती जाते|
धगधगत्या अग्निकुंडाशी तिचे जुनेच नाते |
****************
वास्तवदर्शी.मंगळावर गेले जग,
वास्तवदर्शी.
मंगळावर गेले जग, तरी वड अजून तिथेच +१
वास्तव मांडले आहे.
वास्तव मांडले आहे.
धगधगत्या अग्निकुंडाशी तिचे
धगधगत्या अग्निकुंडाशी तिचे जुनेच नाते |>> शब्दांतूनच दाहकता स्पष्ट होते. कविता उत्तमच..!
सुंदर धगधगते वास्तवकाव्य.
सुंदर धगधगते वास्तवकाव्य. पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद कुमार, उदय, रूपाली,
धन्यवाद कुमार, उदय, रूपाली, किशोर मुंढे.