अंमली - भाग १२!

Submitted by अज्ञातवासी on 8 July, 2023 - 23:54

याआधीचा भाग -
https://www.maayboli.com/node/83669#new

तो आणि साक्षी काहीतरी काम करत बसले होते. साक्षी फोनवर काहीतरी टाईप करत होती.
"साक्षी."
तिचं लक्ष नव्हतं.
"साक्षी?"
"ओह, सॉरी सर..."
"...काय झालं?"
"कुठे काय?"
"तू सकाळपासून टेंस आहेस."
"नाही सर."
तो तिच्याकडे बघत राहिला...
"...ओके. इट्स माय बॉयफ्रेंड."
"आणि?"
"बडबड करतोय सकाळपासून, वैताग आलाय."
"अच्छा आणि काय बडबड करतोय."
"तेच तेच... पुन्हा पुन्हा शपथा घेतोय, आणाभाका घेतोय, वचन देतोय. अरे बस कर ना..."
तो हसला...
"प्रेम आहे त्याच्यावर?"
"हो. पण असच वागत राहिला तर सगळं तुटेन."
"आणि तू काय लिहितेय त्याला?"
"सुनावतेय त्याला. फालतूगिरी बंद कर, नाहीतर ब्लॉक करेन, आणि पोलिसात देईन."
"काय करतो?"
"मॅनेजर आहे."
"आणि तू त्याच्या प्रेमात का पडलीस?"
"सर?" साक्षी चक्रावली.
"जस्ट आस्किंग."
"उम्म खूप गोष्टी आहेत."
"मग त्या गोष्टींचा विचार करायचा, नातं तुटेल असं वाटताना. आपला इश्यू काय होतो, की समोरचा तुटत गेला ना, आपल्याला सगळं त्याचं वाईटच दिसत राहतं. मग सुरू होते घसरण... नात्यांची... सगळ्याची. कुठेतरी थांबायला हवं असतं, थांबवायला हवं असतं. तूही रागावशील, तो अजून तुटेल, तू अजून रागावशील, आणि सगळं संपेन."
"सर. एक विचारू?"
"हो विचार ना."
"लव गुरु होतात का पूर्वी? की रिलेशनशिप अडवाजर?"
तो जोरात हसला.
"मीही प्रेम केलंच ग कधीतरी कुणावर."
"यू मिन प्राजक्ता."
"अग ती तर माझा जीव आहे, पण त्याआधी कुणावर तरी जीव टाकला, जीव लावला, रामाच्या मंदिरात जाऊन लग्नाच्या आणाभाका घेतल्या, आणि नंतर सगळं बिघडलं. सगळं सगळं..."
"...काय झालं नेमकं सर."
"हेच झालं. एकदा घसरण सुरू झाली, की सगळं संपतं. साक्षी, ती आणि मी, अक्षरशः पूर्ण कॉलेजमध्ये फेमस होतो... अगदी टीचर्सलासुद्धा माहिती होतं. कॉलेज म्हणजे फक्त तिचा क्लास आणि माझा क्लास नाही हं. जेजे कॉलेज म्हणजे अख्खं गाव होतं, आणि अख्ख्या गावाला माहिती होतं..."
"...जाऊन विचारू का मी?" ती हसली.
"गप ग. पण तेच. एकदा नात्यात घसरण सुरू झाली, तर थांबत नाही. तर वेळीच थांबावं. सावरावं, पुढे जावं."
तिने फक्त मान हलवली.
"चल आज तुला सुट्टी. आय मीन तू घेऊच शकते. सॉर्ट धिस आऊट. तसही आता मलाही जावं लागेल असं दिसतय."
"ओके सर. सी या..."
"सी या साक्षी..."
"...साक्षी तिथून निघून गेली."
अचानक काहीतरी ट्रिगर झाल्यासारखं तो बसून राहिला.
सगळ्या जुन्या आठवणी पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागल्या.
******
जेजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग!
कॉलेज डेज चालू होते.
अँकर फुल जोमात होता.
"मुलगी कुठल्याही स्ट्रिमची असो, तिला बॉयफ्रेंड पाहिजे तर फक्त मेकॅनिकल चा."
आणि जोरदार टाळ्या शिट्या झाल्या.
"आणि मेकॅनिकल मधली एकमेव मुलगी, तिचा बॉयफ्रेंड केमिकल मधला... विचार करा, किती क्वालिटी डाऊन झालीय मेकॅनिकल ची..."
...कुणीतरी मागून ओरडला...
आणि आता बाकीच्या स्ट्रिमवाल्यांनी कॉलेज दणाणून सोडलं.
दूरवर एक मुलगा आणि मुलगी हा तमाशा एन्जॉय करत होते.
"बघ, तुझ्यामुळे आमच्या मेकॅनिकल च्या पोरांना मान खाली घालावी लागली. ती म्हणाली."
तो उठला. त्याने त्याचे वेफेरेर चढवले, कुरळे केस अजून विस्कटले, आणि तो निघाला...
तो बेधडक स्टेजवर चढला.
"शरा..." तो माईकवर म्हणाला. "विथ युवर परमिशन प्लीज..."
ती थोडी लाजलीच.
"ओके. शराने लाजणं म्हणजे अमावस्येला चंद्र उगवणं. तर आपली मेकॅनिकलची बॅच म्हणजे कावळे. काव काव भरपूर करतात, पण कामाला शून्य..."
"एक मिनिट." सूत्रसंचालक ओरडला... "रेस्तिकेटेड माणसाला कॉलेजला एन्ट्री असते?"
"नाही. पण टॉपरला असतो. आणि रेस्तिकेटेड का झालो ते सांग? इज्जत नाहीये का सांगायला?
...मी सांगतो. केमिकल इंजिनीरिंगचा टॉपर एक दिवस कॅन्टीन मध्ये एकटा जाऊन मेकॅनिकलच्या लास्ट इयरचे जितके दिसतील, त्यांना मारत राहतो. मारतच राहतो, आणि त्यांना वाचवायला मेकॅनिकलचा एक माणूस पुढे येत नाही. सांग...
वेड लागतं, प्रेम करायला. चला. मेकॅनिकल वाल्यांना चॅलेंज... आता समोर येऊन तुमच्या आवडत्या मुलीला प्रपोज करून दाखवा. आहे दम?"
कुणीही पुढे आलं नाही.
"शरा... आय लव यू. जीवापाड प्रेम करतो मी तुझ्यावर. इतकं, की रामाने सीतेवर केलं नसेल. कृष्णाने राधेवर केलं नसेल. लव यू माझी राणी..."
...आणि पुन्हा शिट्या.
"बस कर... चल आता." ती तिकडून ओरडली.
त्याने माईक फेकला. आणि स्टेजवरून खाली उडी मारली.
"असा वेडेपणा नाही करायचा. कळलं?" ती म्हणाली.
"वेड नाही, ते प्रेम कसलं?" तो हसत म्हणाला.
"असं नसत राजा. सगळं उधळून टाकशील, सर्वस्व गुंतवून टाकशील, आणि मी नाही राहिले आयुष्यात तर? जगू शकणार नाहीस..."
"म्हणून कायम माझी रहा, माझी राणी. फक्त माझी राणी."
ती हसली.
"खूप अवघड आहेस तू, वेडा सुद्धा."
"हो. ऐक ना, सरप्राइज आहे."
"काय?"
"चल ना."
"कुठे."
तो कॉलेजच्या पार्किंगमध्ये तिला घेऊन आला.
समोर एक क्रीम कलरची नवीकोरी डस्टर उभी होती.
"आपली गाडी." तो म्हणाला.
"किती सुंदर आहे रे. शोभेन तुला."
"आपल्याला शोभेन शरा."
ती त्याच्याकडे बघतच राहिली.
"ज्युनियर." तिकडून आवाज आला.
"सिनियर." तो आनंदला.
तो त्याच्या जवळ आला, आणि त्याने त्याची गळाभेट घेतली.
"नवीन गाडी."
"बाबांनी घेतलीये. म्हटले जा कॉलेजला घेऊन. सूनबाईना दाखवून आण."
"सूनबाई लकी आहेत खूप." सिनियर म्हणाला.
"दोघांनी गप्प बसा. काय सूनबाई..."
"ओके, ज्युनियर, मी नंतर भेटतो. जस्ट तू खूप दिवसांनी दिसलास म्हणून आलो मी."
"अरे, आम्हीही निघतोय आता. शराला काळाराम मंदिरात जायचंय, मी कपालेश्वरला जातो."
"अरे जोडीने जा दोघांनी. चल बाय."
सिनियर तिथून निघून गेला.
"शरा. चल जोडीने जाऊ."
आणि दोघेही गाडीत बसून भरधाव निघून गेले.
*****
त्याची तंद्री भंगली.
एक खिन्न हसू त्याच्या चेहऱ्यावर पसरलं.
आणि क्षणार्धात प्राजक्ता त्याच्या डोळ्यासमोर आली.
आणि त्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावर रुंद हसू पसरलं.
तो स्वतःशीच विचार करू लागला.
' तू कुठे आहेस, माहिती नाही.
किती लांब आहेस, जवळ आहेस, माहिती नाही.
तुझा मी क्षणोक्षणी विचार करतोय राणी, पण तुला मी कोण आहे, काय आहे, हेही माहिती नसेल.
तू पुन्हा कधी दिसशील, भेटशील, माहिती नाही.
पण एक सांगतो. खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर. पहिल्या नजरेतलं प्रेम.
जे आयुष्यभर बदलणार नाही. कधीही नाही.'
तो पुन्हा एकदा स्वप्नरंजनात गढून गेला...

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users