पाऊसवेळा

Submitted by TI on 28 June, 2023 - 11:05

रणरणत्या उन्हामुळे कोरडे वाटणारे रस्ते, झाडं, तसं म्हणलं तर सगळी सृष्टीच तापलेल्या तव्यासारखी कोरडी झालेली.काल आभाळ भरून आलेलं. आकाशात काळ्या ढगांची लगबग दिसायला लागली. अगदी चातक वगरे नाही पण बऱ्यापैकी सगळे पावसाची वाट बघायला लागले होते सध्या. आणि तो आलाच. तसं मला फार काही पाऊस वगरे आवडत नाही. बाहेर अगदी कुठ्ठेही जायचं नसेल, घरात नुसतं लोळत पडता येणार असेल, मग च्या मग वाफाळता आलं -गवती चहा घातलेला उकळता चहा मिळणार असेल, कसलीच महत्त्वाची, महत्त्वाची काय, कुठली कामच नसतील, सोबत छानसा जुना, जुना म्हणजे ९०-००च्या दशकातला सिनेमा लागला असेल, सोबत घरची माणसं पण तुमच्या काहीच न करता चहा कॉफया ढोसण्यात पुण्याई मनात असतील, तर आणि तरंच मला हा ऋतू आवडतो असं म्हणण्या इतपतच पावसाळा मला आवडतो.
उगाच रोमँटिक वगरे वाटतं म्हणतात! असेल बुवा! आपला रोमान्स चहाच्या भरलेल्या मगात पार्ले बुडावं असा असल्याने काही सांगता येत नाही, पण पाऊस आला कि वातावरण बदलतं हे मात्र खरंय! कधीतरी भरून आलेलं आभाळ बघून मन भरून येतं हे हि तितकच खरंय. मातीच्या ओल्या वासात सगळ्या गोष्टी विसरायला होतात हेही खरंच की. ओला चिंब स्वच्छ धुतल्यासारखा रस्ता, बाजूला नक्षी केल्यागत हिरवळ. त्यावर सुंदर पावसाचे कण, अशा वातावरणात एका हातात वडा पाव-कांदा भजी, सोबत पावसाची गारवा सारखी किंवा किशोरच रिमझिम गिरे सावन .. असाही पाऊस छानच! वर्षानुवर्षं जरा पावसाळी हवा झाली कि आपोआप हि अशी गाणी कशी काय बरं मनात रेंगाळतात, वर्षभर गारवा-सांज गारवा गाणी कुठे लपून बसतात.ढग दाटून आले की कुठून बाहेर डोकावतात कुणास ठाऊक.
तुमचं झालंय का कधी असं? चिंब भिजत कोणत्यातरी पायवाटेने एखादा किल्ला सर केलाय? चिंब पाऊस बघत नुसतं लोळत पडलायत? चिंब पाऊस बघत कोणाची वाट बघत हि अशी पाऊस-गाणी गुणगुणला आहात? रिमझिम पावसात बाईक वरून चक्कर मारलीयेत, किंवा सायकल वरून? सायकलच्या मागून उडणाऱ्या चिखल भरल्या काळ्या पाण्याने कपडे खराब करून घेतलेत? मोठं झाल्यावर एकदा तरी पावसाच्या साठलेल्या पाण्यात भदकन उडी मारलीय? हे सगळं दर पावसात पुन्हा अनुभवावं वाटतंच.
इतकं सृष्टी हिरवी आणि रोमँटिक करूनही पाऊस मला मात्र फारसा जवळचा वाटत नाही, असं मला प्रत्येक पावसात उगाचच वाटतं. आपण आपलं कोरड्या ठिकाणी राहून पाऊस आत बसून बघावा. गरजणारा, हळुवार झिमझिमणारा, गडगडाट करून मोकळा होणारा, किंवा उगाच चिडवल्यासारखा थोडाच येणारा. पावसाच्या बरसण्यावर आपले आतले तरंग बदलतात. पावसात न भिजता आपण अनुभवू शकतो ते. पावसा नंतर मोकळं स्वच्छ झालेलं आभाळ मला जास्त आवडतं. सगळं मळभ कसं ओसरून गेलेलं असतं.आता आत काही नसतं..
पावसात चहा कॉफी च्या वेळा सुद्धा असतात, हि एक गंमतच! म्हणजे पावसाचा प्रकार, आकार रंग-रूप, आपली सोबत, असेलेले ठिकाण ह्यावर चहा प्यावा कि कॉफी हे अवलंबून असतं असं आपलं मला वाटतं! एखाद्या संध्याकाळी पावसात भिजून आल्यावर, ट्रॅफिक मध्ये अडकून घरी आल्यावर 'त्या'च्यासोबत फर्मास असा चहा म्हणजे अहाहा! पाऊस असा कोसळत असतो! आपण आता छान कोरडे होऊन घरी गप्पा मारत चहा पीत असतो. असच हलक्या पावसाच्या सरी, एखादी कलती दुपार, एखादं कॉफीहाऊस, सोबत कोणीतरी किंवा स्वतःचीच सोबात, आणि गरम वाफाळती कॉफी, आसपास नुसता कॉफीचा दरवळ! अशी एखादी दुपार! किंवा एखादं थंड हवेचं ठिकाण, समोर मस्त निवांत पाऊस, आभाळ अजून भरलंय, कांदा भजी आणि चहा कॉफी येत राहतेय! अहाहा! घरी दुपारी आपण एकटेच अडकलोय, बाहेर इतका पाऊस बरसतोय, थांबायची काहीच चिन्ह नाहीत, सोबत एखादं पुस्तक फक्त आपल्या, अशा वेळी चहा पेक्षा कॉफी जवळची वाटते नाहीका? आपल्यापैकी प्रत्येकाने एकदा तरी ह्यातलं सगळं अनुभवलंय, अनुभवलं असावं! प्रेमात पडल्यावर माणसाला सगळं गुलाबी दिसतं म्हणतात तसं पावसात सगळं जग सुंदर हिरवं होतं, हवेत एक वेगळाच मूड असतो नाहीका?
सध्या हे लिहिता लिहिता हलकीशी पावसाची सुरुवात झालीये, मी पटकन चहाचं आधण ठेवलंय. गवती चहा आणि आल्याचा दरवळ संपूर्ण किचन मध्ये भरून राहिलाय! हवेत छान गारवा आलाय! आडोसा शोधात आमची मनी माझ्या बरोबर घरात बसून पाऊस बघतेय! ह्या पावसाळ्याची सुरुवात तरी छान झालीए!

वेगवेगळ्या पावसाळ्यात टिपलेलं आमचं चहा प्रेम

१) भर पावसात घरचा चहा
WhatsApp Image 2023-06-28 at 8.06.58 PM.jpeg

२) महाबळेश्वरहुन कास पठाराकडे जाताना वाटेत एक छोटी टपरी, मागे मोठ्या पवनचक्क्या आणि आमचा चहा आणि मॅगी
WhatsApp Image 2023-06-28 at 8.06.06 PM.jpeg

३) घरी खूप जुना असा टी-सेट, कधीतरी सुट्टीच्या दिवशी छोटीशी पावसाळी टी-पार्टी
WhatsApp Image 2023-06-28 at 8.05.12 PM.jpeg

४) एक पावसाळी लॉकडाऊन मधली संध्याकाळ
WhatsApp Image 2023-06-28 at 8.03.59 PM.jpeg

५)पहाडातला चहा काही वेगळाच!
WhatsApp Image 2023-06-28 at 8.02.53 PM.jpegत. टि- सगळे फोटोज मी स्वतः काढलेले आणि अनुभवलेले आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सृष्टिसतीने हिरवा शालू नेसला आहे राहिलं की. थोडे परिच्छेद पाडता आले तर अजून सोपे जाईल वाचायला. स्पीड रीड व्हर्टिकली केले तर असे नजरेस पडत आहे.

काळ्या ढगांची ल गबग
तो आलाच.
वाफाळता आलं -गवती चहा
पार्ले बुडावं
भरून आलेलं आभाळ बघून मन भरून
ओला चिंब स्वच्छ
वडा पाव-कांदा भजी,
पावसाळी हवा झाली
पाऊस-गाणी गुणगुणला
गरजणारा, हळुवार
घरी गप्पा मारत चहा
कांदा भजी आणि चहा कॉफी
हवेत एक वेगळाच मूड
गवती चहा आणि आल्याचा दरवळ
घरात बसून पाऊस
डन. झाले वाचून.

फोटो मस्त आले आहेत.