आठवणींचा ठेवा ...फेण्या
होळी झाली की उन्हाळ्याच्या कामांना सुरवात करण्याचे दिवस होते ते. जवळ जवळ प्रत्येक घरात ही उस्तवार होत असे. त्यावेळची ती जीवन पद्धतीच होती. त्याला “ अगोठ “ म्हणजे पावसाळ्याची बेगमी हा खास शब्द ही होता. तेव्हा बाजारात हळद, तिखट, मसाले, पापड, कुरडया अश्या वस्तू चांगल्या प्रतीच्या मिळत नसत आणि असत्या तरी त्या विकत आणण्याची मानसिकता ही नव्हतीच. आमच्या कडे ही सगळं घरीच करत असे आई. आता मुलांसाठी सुट्ट्यांमध्ये अश्या काही गोष्टी मुद्दाम केल्या जातात ज्याला “ऍक्टिव्हिटी” असं फार भारी नाव आहे. उन्हाळी कामात आईला मदत करणे ही आमची सुट्टीतली मेन ऍक्टिव्हिटी होती.
हळद, तिखट तर घरीच होत असे पण शिकेकाई ही घरीच कुटली जात असे. शिकेकाई आणि मिरच्या कुटताना शिंका येऊन जीव हैराण व्हायचा तर मसाला म्हणजे गोडा मसाला कुटताना जो खमंग वास सुटायचा त्या वासाने कधी एकदा रात्री ताजा मसाला घातलेली मुगा तांदळाची खिचडी पानात पडतेय असं व्हायचं. मसाला कणभर ही न घालता मसाल्याची पातेली आणि खलबत्ता धुवून घेतलेलं नुसतं पाणी घालून ही अप्रतिम स्वादाची खिचडी आई करत असे. असो. तेव्हा आमच्या गावात सिझनल भाज्याच मिळत असत आणि कधी कधी तर भाज्यांचं दुर्भिक्ष्य ही असे. भाजी नसणारे दिवस आमटी, उसळ इत्यादीला पापड, लोणची , चीकवड्या, सांडगे, मिरच्या, गुळांबा अश्या पदार्थांची जोड देऊन निभावले जात आणि त्यांची बेगमी उन्हाळयातच करून ठेवली जाई.
अश्या तऱ्हेने डाळी , कडधान्य वाळवण्या पासून सुरवात झालेल्या अगोठीची सांगता तांदळाच्या फेण्यांनी ( तांदळाच्या पापड्यानी ) होत असे. देशावर जश्या गव्हाच्या कुरडया स्पेशल आहेत तश्या अष्टागरात फेण्या ...ह्या फेण्यांचं एकवचन जरी फेणी होत असलं तरी त्या फेणीचा ह्या फेणीशी काडी चा ही संबंध नाही.
. म्हटलं तर एक साम्य मात्र आहे. त्या फेणी सारखी ह्यांची नशा जरी चढली नाही तरी त्या भोवती असलेल्या गोड आठवणींनी हलकं आणि मस्त मात्र निश्चितच वाटत. ह्यांना सालपापड्या असं ही म्हणतात हे मला अलीकडेच समजलं आहे.
फेण्या करणं तसं खूप जिकिरीचं काम आहे. कोकणातला पदार्थ असल्याने तांदूळ हाच एकमेव घटक आहे फेण्यांचा. अनरसे करताना जसे रोज पाणी बदलून तांदूळ भिजवतो तसे तीन दिवस रोज पाणी बदलून तांदूळ भिजवायचे. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी ते तांदूळ थोडं थोडं पाणी घालून जात्यावर बारीक दळायचे. ते ओलं पीठ जात्या खाली घातलेल्या स्वच्छ कापडावरून नीट निपटून घेऊन एका पातेल्यात रात्रभर तसच ठेवून द्यायचं तेव्हा सकाळी त्याच्या फेण्या करता यायच्या.
सकाळी लवकरच कामचलाऊ स्वयंपाक आटपून आई फेण्या करायला सुरवात करायची. तिच्याकडे सपाट गोल ताटल्या एकावर एक बसणारा एका वेळी सहा फेण्या होतील असा स्टँड आणि बारा ताटल्या होत्या. फेण्यांच्या पीठात चवीनुसार मीठ आणि खसखस (ही असे की नाही नक्की आठवत नाहीये) घालून पीठ तयार केलं की प्रत्येक वेळी पीठ खालपासून ढवळून त्यातलं एक चमचा पीठ ताटली वर घालायचं आणि ताटली गोल गोल फिरवून ते ताटलीभर नीट पसरायच. अश्या सहा ताटल्या भरून घेऊन सँड मध्ये ठेवायच्या आणि मोदकपात्रात तो स्टँड चार पाच मिनिटं ठेवून फेण्या वाफवून घ्यायच्या. नंतर ताटलीची फेणी असलेली बाजू ओल्या चौघडीकडे करून ताटली चौघडीवर टाकून फेणी गार करायची आणि मग सुईच्या मदतीने तिची कड मोकळी करून अलगद फेणी सोडवायची आणि उन्हात एखाद्या स्वच्छ साडीवर अलगदच वाळत घालायची.
वाचायला जरी सोपं वाटत असलं तरी हा पदार्थ करणे सोपं अजिबात नाहीये. पीठाची कन्सिटन्सी बरोबर होऊन पीठ हात / चमचा न लावता ताटली नुसती फिरवून फिरवून गोल पसरवणे, ती ओली, नाजूक, पातळ , अलवार फेणी ताटलीपासून अलगदपणे अखंड सोडवणे आणि चुण्या न पाडता वाळत ही घालणे ह्यात कुठल्याही स्टेज ला माशी शिंकू शकते. असो. तर त्या फेण्या उन्हात खडखडीत वाळल्या की डब्यात भरून ठेवायच्या आणि हवं तेव्हा तळून खायच्या. त्या अतिशय हलक्या असल्याने तळताना ही खूप काळजी पूर्वक तळाव्या लागतात नाहीतर पटकन जळतात. तांदूळ भिजवून केल्यामुळे थोड्याश्या आंबूस चवीच्या, तोंडात टाकता क्षणी विरघळणाऱ्या, पांढऱ्या शुभ्र फेण्या म्हणजे नेवैद्याच्या ताटाचा जणू मानबिंदूच.
पण फेण्यांची गोष्ट इथेच संपत नाही. तळलेल्या फेण्या तर छान लागतातच आणि त्या वर्षभर कधी ही खाता येतात पण ताज्या ओल्या फेण्या तर त्या ही पेक्षा हजार पटीने मस्त लागतात आणि त्या वर्षातून एकदाच मिळत असल्याने त्यांची अपूर्वाई अधिक वाटे. वाळत घालताना कोणी बघत नाहीये हे बघून काही पोटात गेलेल्याच असत किंवा आईने नेमकच बघितलं तोंडात टाकताना तर “अग, मोडली म्हणून खाल्ली” ही कायमस्वरूपी सबब असेच आमच्या मदतीला हजर.
. तरी ही ताटलीत घेऊन खाराची मिरची आणि सायट्याच्या दह्याबरोबर ऑफिशियली फेण्या गट्टम करता याव्यात म्हणून थोड्या पडल्या वाळत कि आमची भुणभुण सुरू होई. “ आई, वाळवायच्या खूप झाल्यात, आता खायच्या कर “ म्हणून. आईला अंदाज असेच. पण ती ही “जा , मोजून या “ म्हणून आम्हाला मोजायला धाडायची. तिथे मोजताना मात्र आम्हा भावंडांची एकी व्हायची आणि संगनमताने आम्ही पंधरा वीसने तरी आकडा फुगवूनच सांगायचो.
अखेर तिला हव्या असायच्या तेवढया फेण्या वाळत पडल्या की मग उरलेल्या पीठात अगदी किंचित हळद आणि जिरं घालून केलेल्या खायच्या फेण्यांचा पहिला घाणा मोदकपात्रात जायचा. पुढच्या पाच दहा मिनिटात खाराची मिरची, दही आणि दोन वेळा दुडलेली चतकोर आकारातली गरम ,वाफाळती , लुसलुशीत फेणी असलेली ताटली हातात पडायची. दोन दोन करत किती पोटात जायच्या त्याला गणतीच नाही. शेवटी आता एक ही जाणार नाही अशी वेळ यायची तेव्हाच नको म्हटलं जायचं.
आमच्या आईच्या फेण्या खूप छान होत असत आणि तेव्हा पध्दत ही होती त्यामुळे शेजारी पाजारी ही नमुना म्हणून दिल्या जातं. आमचे एक शेजारी म्हणजे कुटुंब कबिला नसलेले वयस्कर आजोबा होते. त्याना नमुना दिल्यावर पाचच मिनिटात “ वैनी, काय झकास झाल्यात हो “ (आईच्या लहान दीर नणंदा तिला वैनी म्हणत असल्याने आई सगळ्यांचीच वैनी होती. आम्ही ही आईला वैनी न म्हणता आई कसं म्हणू लागलो याच मला कधी कधी नवलच वाटत .) म्हणत ते आमच्याकडे यायचे आणि फेण्यांवर आडवा हात मारायचे. आमची आई ही “त्याना कोण आहे करून देणारं ? “ म्हणून अगदी आग्रहा आग्रहाने वाढायची त्याना. शेवटी मोठ्या बहिणी आईसाठी फेण्यांचे घाणे लावायच्या आणि मग ह्या वार्षिक फेण्या महोत्सवाची सांगता व्हायची.
फेण्यांनी पोट तुडुंब झाल्याने दुपारी जेवणाची कोणाला इच्छा नसायचीच. मात्र उन्ह उतरणीला लागली की त्या खडखडीत वाळलेल्या फेण्यांचं वाळवण घरात घेऊन हळुवार हाताने एक एक करत आई त्या घट्ट झाकणाच्या डब्यात भरायची. रात्रीचा मेन्यू फिक्स असे. भात, आमटी आणि तळलेल्या फेण्या.
आई असेपर्यंत अशी सुखं खूप अनुभवली. पण ती गेल्यानंतर खूप काही गमावलं त्यात असे निखळ आनंदाचे क्षण ही हरवले. कधीतरी वाटे सगळ्या भावंडाना बोलावून फेण्यांचा घाट घालावा असं पण दळायला जातं नाही, साचा नाही म्हणून गाडी अडत असे. मधल्या काळात मिक्सर घरोघरी आले, आणि दळण्याची सोय झाली. यु ट्यूब वर रेसिपी पाहून साचा नसला तरी चालत हे कळलं आणि एक दिवस फेण्यांच्या विचाराने पुन्हा उचल खाल्ली.
आम्ही भावंड फेण्या खायला आमच्या घरी एकत्र जमलो. खाराची मिरची, दही सगळी जय्यत तयारी केली. रेसिपी बघून बघून जवळ जवळ पाठ झाली होतीच. ताटली वर पीठ घालून ती ताटली वाफेवर ठेवली , पाच मिनीटांनी काढली आणि गार केली. सुईने काढायला गेले तर फेणी काही निघाली नाही. अश्या ट्रायल मध्ये बऱ्याच फेण्या गेल्या पण चार सुदधा नीट झाल्या नाहीत.. फेण्या जमत नाहीत म्हणून प्रत्येक जण काहीतरी कारण शोधू लागला. जातं नाही, साचा नाही, हल्लीचे तांदूळ बरोबर नाहीत, पीठात पाणी जास्त झालंय अशी प्रत्येकाने वेगवेगळी कारणं शोधली पण शेवटी करणारे आईचे हात नाहीत म्हणून फेण्या नीट होत नाहीयेत ह्या नोटवर मात्र आमचं सगळ्यांच एक मत झालं.
फेण्या जमल्या नाहीत ह्याच दुःख अजिबातच झालं नाही कारण फेण्या तर एक निमित्त होतं. फेण्या बिघडल्या तरी ते दिवस आठवून आठवून आमच्या खूप गप्पा रंगल्या. फेण्या करताना (की बिघडवताना
)लहान होऊन पुन्हा एकदा ते दिवस नव्याने अनुभवले. आईचं फिकट पिवळ्या रंगाचं लाल काठाचं फेण्या वाळवायला घातलेलं लुगडं नजरेसमोर आलं. काठ लाल की निळे ह्यावर चर्चा होऊन पुन्हा गप्पाना नवीन विषय मिळाला. फेण्यांचा घाट घालण्याच्या कल्पनेच सार्थक झालं. बोलता बोलता तेव्हा माझ्या अजाण वयाला न जाणवलेला खूप वेळ स्टोजवळ बसल्याने दमलेला / थकलेला आईचा चेहरा माझ्या नजरेसमोर फ्लॅश झाला आणि मन गलबलून गेलं..
हेमा वेलणकर
वा वा! आवडीचा विषय!
वा वा! आवडीचा विषय!
आईच्या निगुतीच्या हातच्या निराळ्याच लागतात हे खरंच!
मला नुसतं मीठ, तीळ, खसखस, हिरवी मिरची वाटून असे सगळे प्रकार आवडतात, आणि आता मुलांनाही. भारतातून साचा आणला आहे, आणि दर उन्हाळ्यात किमान एकदा करतेच. खायलाच फक्त अर्थात. इथे जोडीला सावर क्रीम घेते.
वाफवलेल्या ताटल्या ओल्या टॉवेलवर उपड्या घालून पाठींवर गार पाण्याचा हबका दिला की फेण्या अल्लाद सुटून येतात. हीच आयडिया इडल्या सोडवतानाही उपयोगी पडते.
हे फोटो:




वा पहिलाच प्रतिसाद आणि तो ही
वा पहिलाच प्रतिसाद आणि तो ही इतक्या भारी फोटोंसह...स्वाती, थॅंक्यु so much.
तुम्ही विषयच असा निवडलात!
तुम्ही विषयच असा निवडलात!
यंदा अजून झाल्या नाहीत - अजून थोडं वॉर्म व्हायची वाट पाहते आहे.
ममो, सुरेख वर्णन! कधी
ममो, सुरेख वर्णन! कधी खाल्ल्या नाहीत. असा साचा असतो हे माहिती नव्हतं . स्वातीच्या फोटोतून पहायवा मिळाला. माझ्या अशाच आठवणी कुरडयांच्या आहेत. खसखशीच्या/तीळाच्या कुरडया, बाजरीच्या खारोड्या, ज्वारीच्या लाह्या (ज्वारी ओलवून भडभुंज्याकडून लाह्या फोडून आणायचो) हे आमचे उन्हाळ्यातले स्नॅक्स आयटेम! गव्हाचा चीक आवडतो खायला म्हणून कुरडया करते दरवर्षी ! इथेही करायच्या आहेत. तापमान वाढायची वाट बघतेय …
आमच्याकडे कधी झाल्या नाहीत पण
आमच्याकडे कधी झाल्या नाहीत पण मन्जुताई म्हणतात तस सेम आठवणी कुरडयाच्या चिकाच्या,नागलिच्या पापडाच्या आहेत.
स्वातीचा फोटो छान आहे कधितरी करुन बघायला हव्या चिकापेक्षा फारच कमी उस्तावर आहे.
आहाहा.. बरेच दिवसांनी माबो वर
आहाहा.. बरेच दिवसांनी माबो वर आले आणि सुरेख आठवणी जाग्या झाल्या.
वाफवलेल्या सालपापड्या निव्वळ अप्रतिम लागतात.
वाह
वाह

भारी आठवण.
तुम्ही लिहिलंय तसं कोपुत सालपापडी म्हणतात.
तुटली तर खायला मिळते म्हणून वाळत घालण्याचं काम हौसेने घेत असू. स्टँड वै पाहिला नाही.
2 ताटल्या आणि एकामागे एक करायची आई.
कधी कधी आम्हालाही ताटात टाकलेले पातळ पिठ फिरवून गोल आकार करायला मिळायचा.
कधी कधी सुईने अलगद सोडवणे हे ही.
बाकी उडीद पापड, अंडे पापड ( हे नाव का हे देवच जाणे pure veg तांदूळ पासून बनवतात, त्यालाच उकड पापड असेही नाव आहे ) हे बनवताना शेजारीपाजारी मदत लागायची. ह्या सालपापड्या मात्र फार माणसं नसले तरी चालेल असा प्रकार.
हे करणं फार सोप्प आहे असं लहानपणी वाटायचं.
ते आईसाठी खूप सोप्प आहे हे जाणत्या वयात कळालं.
डोळ्यासमोर जुन्या आठवणी एकदम इस्टमन कलर मध्ये तरळून गेल्या लेख वाचताना.
धन्यवाद त्यासाठी.
किती सुरेख गोफ विणला आहे,
किती सुरेख गोफ विणला आहे, आठवणींचा !!
आम्हाला फेण्या म्हणजे त्या शेवयांच्या गोड च माहिती आहेत. तीही एक वेगळीच डेलिकसी आहे अर्थात.
शेवटच्या वाक्याने..खरंच मन गलबलून आलं....
डोळ्यांत पाणीच आलं एकदम.
आईचे कष्ट आपल्याला कळत नाहीत तेव्हा... आपण उलट तिलाच बोल लावतो कितीदा तरी...!!!
त्या तिकडे वाचला होता. इथेही
त्या तिकडे वाचला होता. इथेही हा लेख आणल्याबद्दल धन्स.
हा प्रकार कधीही करतांना पाहीलेला ऑर चाखलेला ही नाही... असो.
रच्याकने, मेघना चा हा लेख याच विषयावर पण जरा चुरचुरीत आहे - https://khaintartupashi.blogspot.com/2015/07/blog-post.html
रुचकर आठवणी... खूप खूप सुंदर
रुचकर आठवणी... खूप खूप सुंदर लेख..
हो मीही आधी तिकडे वाचला ,
हो मीही आधी तिकडे वाचला , शेवटचा पॅरा अगदी हळवा
आठवणी मस्तच लिहिल्या आहेत
मीही फेण्या फॅन एक -२ दा इथे करून पाहिल्या सुरेख झालेल्या
मी काही सुई वगैरे ने नाही बॉ काढल्या सूरी ने काढल्या आणि अर्थात वाळवल्या नाहीतच ताज्या खाण्यासाठीच केलेल्या ....कसल्या भारी लागतात न लुसलुशीत आहाहा !!
स्वाती ताई फोटो भारीच !
हा पण लेख सुरेख. आमच्या
हा पण लेख सुरेख. आमच्या कडे साल पापड्या म्हणत व आई आणि काकू एकत्र बसून एखाद्या दुपारी हा घाट घालत. आमचे ते ७४६ डीजी तीन खोल्यांचे घर. त्यात देव घर व झोपायच्या कॉटा असलेली खोली तिला मोठी खोली म्हण त. एक विद्यालयाची खोली व एक स्वयंपाक घर त्यामुळे माझा बराचसा वावर ग्यालरीत पुढ च्या नाहीतर माग च्या असे. तर ह्या मोठ्या खोलीत जुन्या लोखंडी दोन कॉटा जोडून ठेवलेल्या असत. त्याच्या खाली आम्ही चादर व वर स्वच्छ धुतलेले जुने धोतर पसरू. आई व काकू सालपापड्या बनवत व मी ते आत शिरू शिरून वाळत घालत असे बाहेर येइ परेन्त. दोन दिवस अश्या सुकवू व मग परातीत घेउन उन्हात. ओल्या पापड्यांची चव अजून आहे तोंडात. पण आईसारखे जमणे अशक्यच आहे.
तो साचा अजून मिळतो का? ड्रॉप शेप बारीक पत्रे असायचे आमचे सहा सहाचे दोन असे होते. खस खस असायची का पापड्यात? बघितल्या सारखे आठवते. घाटे मावशी झिंदा बाद.
सुंदर लेख मनीमोहोर.
सुंदर लेख मनीमोहोर.
( मी नेलेल्या स्टँडचा उपयोग फणसाची सांधणं करायला होतो
)
आमच्या घरीसुद्धा होतात. साचा नव्हता आमच्या घरी. खरं म्हणजे मी लहान असताना पापड्या व्हायच्याच नाहीत. माझ्या वडिलांच्या लहानपणी माझी आजी करत असे, तेव्हा वडाच्या पानावर फेण्या घालून, मोदकपात्रात उकडत असे. गेल्या काही वर्षांपासून आई करायला लागली. तीही वडाच्या पानांवरच. तुळशीबागेत पापड्यांचा स्टँड मिळतो असं ऐकलं पण तो काही आणला गेला नाही. मी इथून तट्टे इडली स्टँड नेला. त्यात फेण्या होतात पण त्यापेक्षा आईला वडाची पानंच बरी वाटतात
जुन्या काळी हिंगाची डब्बी एक
जुन्या काळी हिंगाची डब्बी एक यायची. तिच्या झाकणात साबुदाण्याच्या पापड्या परफेक्ट होत. साबुदा णे भिजवायचे व मीठ मिक्स करुन त्या डब्बीच्या झाकणांम ध्ये ठेवुन उकडून घ्याय्चे. उकडले जाता ना साबुदा णे प्रसरण पावून एकमेकांस चिकटतात. मग वाळ त घालताना ते झाक णच उल टे करायचे. अलगद गोल सुटून चादरीवर पडतो. पुढील धागा ह्यावर येउद्या.
अमा , मी हेच लिहायला आले होते
अमा , मी हेच लिहायला आले होते . आमच्याकडे स्टँड नव्हता , आई हिंगाच्या डबीच्या झाकणातच करायची . शेवटची वाक्ये वाचून खरंच मन भरून आले . विशेष म्हणजे आई तेव्हा नोकरी सांभाळून हे सगळे वाळवणाचे पदार्थ करत असे.
सगळयांना मनापासून धन्यवाद.
सगळयांना मनापासून धन्यवाद.
तुम्ही विषयच असा निवडलात! Happy >> स्वाती
मंजू , देशावर बहुतेक करत नसतील ह्या. कदाचित अशी उस्तवार ज्वारीची करून ज्वारीच्या करत असतील. उकड जी आम्ही तांदळाच्या पीठाची करतो ती देशावर ज्वारीची करतात तस .
हे करणं फार सोप्प आहे असं लहानपणी वाटायचं.
ते आईसाठी खूप सोप्प आहे हे जाणत्या वयात कळालं. >> झकासरव , किती परफेक्ट लिहिलं आहे.
आईचे कष्ट आपल्याला कळत नाहीत तेव्हा... आपण उलट तिलाच बोल लावतो कितीदा तरी...!!! >> आंबट गोड , हो ना ज्या दिवशी हे कळतं त्या दिवशी आपलं बालपण / लहान पण संपलेलं असत.
मेघना चा लेख एकदमच भारी आहे. बर झालं योकु, इथे आणला ते .
स्वाती काय ,अंजली काय... तुम्ही परदेशात रहाणाऱ्या मुली ही तिकडे असे पदार्थ करता म्हणून खूप कौतुक वाटत.
अमा मस्त आठवण फेण्या आणि हिंगाच्या डबीतल्या पापडयांची.
वावे पानांवर पण करत पूर्वी , पण आईकडे स्टँड होता म्हणून मला ही घ्यायचाच आहे फेण्यांचा स्टँड , तुळशी बागेत की तिथेच जवळपास कुठे तरी डोंगरे म्हणून भांड्यांचं दुकान आहे त्यांच्याकडे मिळतो अस ऐकलं आहे.
हल्ली यु ट्यूब वर खूप म्हणजे खूप व्हिडीओ आहेत, हौस असेल तर ते फॉलो करून ट्राय करू शकता.
मस्त आठवण.फेण्या केल्या आणि
मस्त आठवण.फेण्या केल्या आणि खाल्ल्या नाहीयेत.पण याबद्दल ऐकलं आहे.मध्ये कोणत्या तरी ग्रुपवर पुण्यात कोणीतरी ओल्या फेण्या विकतं त्याचा चांगला रिव्ह्यू आला होता.
खरंच आई लोकांची कमाल आहे.नोकरी सांभाळून त्यांनी जे केलं ते आपण आता जॉब ब्रेक घेऊनही करत नाही.ठरवून केलं तरी तशी चव येत नाही.
छान लेख!
छान लेख!
लॉकडाऊन मध्ये कुरडया,सालपापड्या बरेच केल्या होत्या
किती मस्तं आठवण!!
किती मस्तं आठवण!!
सालपापड्या आई करायची पण न वाळवलेल्या खाल्लेल्या आठवत नाहीयेत. हिंगाच्या डबीच्या झाकणात करायची. आता घरात खाणारी माणसे नाहीत आणि होतही नाही म्हणुन बंद केले तिने.
खूप सुंदर लेख.
खूप सुंदर लेख.
फेण्या कधीच बघितल्या नाहीत. आत्ता कृती कळली.
वाचायला जरी सोपं वाटत असलं तरी हा पदार्थ करणे सोपं अजिबात नाहीये>>> मला तर अजिबातच सोपा नाही वाटला वाचतांना पण... किती उस्तवार आहे..
आमच्याकडे ह्या अजिबातच केल्या
आमच्याकडे ह्या अजिबातच केल्या जात नाहीत पण गेल्या वर्षी स्वातीच्या हातच्या खाल्ल्या आहेत. आता या वर्षी कधी बोलावणं येतंय ह्याची वाट बघुया
मस्त!
मस्त!
ताज्या फेण्यांची बातच काही और. आठवले ते दिवस.
>>> स्वाती काय ,अंजली काय...
>>> स्वाती काय ,अंजली काय... तुम्ही परदेशात रहाणाऱ्या मुली
_/\_
'मुली' वाचूनच आधी मूठभर मांस चढलं. त्यात पुढे 'कौतुक'ही!
हाहा सायो, लेट समर - जरा तापू दे हवामान, मग उडवून टाकू बार.
माहेरी गेले की 100 फेण्या
मस्त लिहिलंय ममो.
माहेरी गेले की 100 फेण्या आणतो एका ताईंकडून. मग दोन दिवस अक्षरशः त्रिकाळ फेण्या खाते. आई ओरडेल म्हणून जरासा भात खायचा बास. सासरी परतायच्या दिवशी त्या ताईंकडून पुन्हा मागवायच्या आणि मग त्या घरीही खायचे. दोन्ही घरात हा पदार्थ आवडीचा आहे.काही कारणाने गेल्या वर्षी मात्र नाही मागवल्या. तुमचा लेख आणि स्वातीचा फोटो बघून तोंपासु
काय लिहिलंआठवणी आहेत या.बोलता
काय सुरेख आठवणी आहेत या. व्वा!
.....बोलता बोलता तेव्हा माझ्या अजाण वयाला न जाणवलेला खूप वेळ स्टोजवळ बसल्याने दमलेला / थकलेला आईचा चेहरा माझ्या नजरेसमोर फ्लॅश झाला आणि मन गलबलून गेलं.....
पोच देणं, कौतुक करणं, फीडबॅक देणं हे डोक्यातंच यायचं नाही तेव्हा.
हे मला फक्त आईच नव्हे तर कुटुंबातल्या मावशी, आजी, आत्ये... अनेक जणींबद्दल आता जाणवतं
यावरनं आठवलं - "भुस्कुटणीचा" फेण्यांवरचा हा लेख वाचला आहात का? -
सगळ्यांचे प्रतिसाद खूप आवडले,
सगळ्यांचे प्रतिसाद खूप आवडले, जावे त्यांच्या वंशा ….
आमच्याकडे फेण्या म्हणजे सुतरफेण्या! आई व मावश्या सुतरफेणी करण्यात expert ! प्रत्येक कार्यासाठी जमल्या की सुतरफेणीचा कार्यक्रम अगदी ठरलेला. वेसगाळ करण्याचं काम आईचं! धोतराच्या कापडावर रवा गाळला जायचा. गाळलेल्या सपीटाला भिजवून मुरत ठेवायचं हे काम करायचं जेवणापूर्वी. कारण पुढचे चारपाच तास कुणाच्या हाताला उसंत नसायची. जेवणीबिवणी आटोपली की बसायच्या सूतरफेणी करायला. शेवया करतो तसंच सूत काढायचं पण अगदी बारीक (झिरो फिगर)फार निगुतीने करायचं काम हे! तयार सुताची आठ आकाराची घडी घालायची. तळायला जिलबीची कढई किंवा परात . योग्य तापलेल्या तुपात अलगद सुतरफेणी सोडायची. खराट्याच्या काड्यांनी हळूवापणे सुतं मोकळी करायची. मंद आचेवर नाजूक फेण्या तळल्या जायच्या ना कच्च्या ना करपलेल्या . पांढऱ्याशुभ्र सुतरफेण्या तयार.त्यानंतर रंगीत फेण्यांचा नंबर लागायचा. वर्गवारीनुसार फेण्यांच्या चळती रचल्या जायच्या (एकसारख्या खास लोकांसाठी, तुटलेल्या घरी खाण्यासाठी, एकसारख्या रंगीत रुखवतावर, तुटलेल्या मुलांना खायला) इति सुतरफेणी पुराण !
वाह सुरेख चित्रदर्शी वर्णन.
वाह सुरेख चित्रदर्शी वर्णन. शेवट टचिंग.
हा प्रकार कधी केला नाही आमच्याकडे. तुमचं वाचून बरंच काही आठवलं. चिकवड्या, अनेक प्रकारचे पापड. आई गुजराथमधली असल्याने सारवडे म्हणजे तांदूळ पापड, त्याची एखादी खाण्यासाठी केलेली ढोकळ्यासारखी थाळी, सांडगी मिरच्या दोन प्रकारच्या (उपासाच्याही), साबूदाणा बटाटा चकल्या, बटाटा कीस वगैरे हे सर्व करणारी आई आणि चाळीतल्या अनेक काकू, आजी आठवल्या आणि त्यांना मदत करणारी आम्ही मुलं, डोळ्यासमोर तरळून गेलं सर्वच. आईचं लुगडेही आठवलं.
स्वाती आंबोळे मस्त फोटो. बाकी प्रतिसाद वाचायचे आहेत अजून.
वा मंजुताई,अगदी डोळ्यांसमोर
वा मंजुताई,अगदी डोळ्यांसमोर चित्र उभे केलेत.
तुमच्या या लेखात आईच्या
तुमच्या या लेखात आईच्या आठवणी आहेत, त्यामुळे तो अधिक सार्द्र झाला आहे. तांदळाच्या फेण्या माहीत नव्हत्या. आमच्याकडे साबुदाण्याच्या पापडांना (? - शिजवलेल्या साबुदाण्याच्या प्लास्टिक / मेणकापडावर घातलेल्या) फेण्या म्हणतात.
सुकवलेल्या तळण्यासाठी, ताज्या खाण्यासाठी, शेजारीपाजारी देण्यासाठी म्हणून किती फेण्या कराव्या लागत असतील असा प्रश्न वाचताना पडला. त्याचं उत्तर लेखाच्या शेवटच्या वाक्यात आहे.
विष्णू मनोहर यांनी तांदळाच्या वाफा असा एक पदार्थ दाखवला होता. त्यात उकळत्या पाण्याच्या भांड्यावर सुती कापड बांधून त्यावर पीठ पसरवून वाफवलं होतं.
मंजूताईंच्या प्रतिसादातलं सुतरफेण्या घरी करत हे वाचून अमाप नवल वाटलं. मा ऑ मधला सुतरफेण्या (मूळ मध्यपूर्वेतलं आहे) करतानाचा व्हिडियो मिळाला तर डकवेन.
भरत, विदर्भात करतात सुती
भरत, विदर्भात करतात सुती कापड रादर जुनं धोतर. त्याला तांदळाचे पापड म्हणतात.
Pages