वैशालीतील भेट

Submitted by अंगारकी on 14 June, 2023 - 13:53

छन्दिफन्दी यांचा अरेन्ज्ड मॅरेजवरचा लेख वाचून हा ३० वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. लेख अन्य संस्थळावर प्रकाशित. फार पूर्वी हे स्फुट लिहीलेले आहे. -
------------------------------------------------------
त्यादिवशी रवीवारी संध्याकाळी आपण भेटायचं ठरलं, फर्ग्युसन समोरच्या वैशालीत. तू इंग्लंडहून नुकताच परतला होतास. बघण्याचा कार्यक्रम मोठ्या माणसांबरोबर एकदा झाला होता. आता आपली दोघांची भेट.
त्या रात्री अधीरतेनी, चिंतेनी माझा डोळ्याला डोळा लागला कसा तो नाही. सकाळी उठल्यानंतरदेखील कोणता पोशाख घालायचा, त्यावर कोणते डूल घालायचे हे ठरवण्यातच वेळ गेला.
तू जरी इंग्लंडमध्ये रुळलेला असलास तरी मी पहील्या भेटीत स्लीव्हलेस घालणं तुला कितपत रुचेल याबाबत मी साशंकच होते त्यामुळे ते रद्दबातल झालं. माझ्याकडे सुंदर शुभ्र पांढरा पोशाख होता पण अतिशुचितेचा काकूबाई रंग म्हणून त्यावर काट मारली गेली. गुलाबी फार coquettish न जाणो अधीरतेचं गुपीत फोडायचा नकोच. गडद जांभळा माझ्यावर अतिशय खुलतो पण तुला इंग्लंडमध्ये राहून राहून पेस्टल रंग आवडत असतील आणि न जाणो जांभळा भडक वाटेल म्हणून मी जांभळ्याच्या वाटेला गेले नाही. शेवटी पिस्ता रंग निवडला. ना भडक ना अतिसौम्य. नंतर खोलीचं दार लावून वेगवेगळे डूल, कानातल्या रिंगा यांची रंगीत तालीम झाली. एवढं होऊन, जेवण होइतो दुपार टळून गेली होती. "Butterflies in stomach" म्हणजे काय ते मला पहील्यांदा कळत होतं. परत बोलायचं काय त्याची तयारी शून्य सगळा भर दिखाव्यावरच याबद्दल मन कोसत होतं ते वेगळच. पण मी तिकडे दुर्लक्ष केलं.
संध्याकाळी मस्त आंघोळ करून, तो पिस्ता पंजाबी चढवला, काजळ-कुंकू केलं, कानातले घालून, मॅचींग चपला, पर्स वगैरे जय्यत तयारी करून बाहेर पाहीलं तो पावसाची लक्षणं. आभाळ अगदी आत्ता कोसळेल का मग इतकं दाटून आलेलं. मला काळजी वाटू लागली ती माझ्या साज-शृंगाराची.
रीक्षा केली तोपर्यंत वार्‍यानी जोर धरला होता.आतापावेतो तड तड पाऊसही सुरू झाला होता. नेमकी रीक्षाला ताडपत्री नव्हती मग काय व्हायचं तेच झालं.पाऊस आत येऊ लागला. ओढणी अंगाला चिकटली, डोळ्यात धूळ जाऊ लागली, केस विस्कटले. डोळे चोळल्याने का़जळ फिसकटलं.
शेवटी रीक्षा १० किमी अंतर पार करून कशीबशी वैशालीच्या दारात पोचली. तू आधीच हजर होतास. नीटसं आठवत नाही पण पावसात भीजल्याच्या सहानुभूतीपर काहीसं बोललास. पण हे नक्की आठवतय की भीजलेली मी छान दिसतेय अशा प्रकारचं विनोदाच्या अंगानी जाणारं बोललास : ) .... मी थोडी रिलॅक्स झाले.
जुजबी, इकडचं, तिकडचं बोलणं झाल्यावर मुख्य बोलणं सुरू झालं.आपल्या आवडी-निवडी, अपेक्षा, मित्र-मैत्रिणी, बालपण वगैरे. जसजसे तुझे विचार कळत गेले तसतसे त्यामागची प्रगल्भता, चिंतन, दूरदृष्टी जाणवत होती. मला तू "शॅलो/ सुपरफिशिअल" अजीबात वाटला नाहीस. मी अ‍ॅट इझ झाले. एव्हाना संकोचाचा पडदा बराचसा गळून पडला होता. माझं काजळ फिसकटलय की रेखीव आहे याची चिंता तर केव्हाच डोक्यातून गेली होती. तुझे विचार ऐकण्यात, तुला प्रतिसाद, उत्तरं देण्यात मी तन्मय होऊन गेले.अबोल मला, तू बोलकं केलस्.मला तुझ्याइतकं मुद्देसूद, आखीव-रेखीव बोलता येत नसेल पण मी प्रयत्न तर नि:संकोच करू लागले. आपण खूप बोललो. तू वादपटू देखील होतास. तुझा मुद्दा तू कौशल्यानी मांडत होतास, माझे विचार प्रश्न विचारून काढून घेत होतास. खरं तर मी मनसोक्त एन्जॉय केली ती भेट.
पण आता अंधार पडू लागला होता एव्हाना. निघायची वेळ जवळ आली होती. माझं मन समाधानानी काठोकाठ भरलं होतं. आता एक मी मनाशीच ठरवलं होतं - आपल्या दुसर्‍या भेटीत मी बिनदिक्कीत साधीसुधी येणार होते मात्र हो मी त्यावेळी भरभरून बोलणार होते, मी विषय निवडणार होते. तुला पूर्ण engaged ठेवणार होते माझ्या संभाषण्-कौशल्याने. कारण मला विश्वास मिळाला होता - तू बाह्यांगाला भुलणार्‍यातला नाहीस.
मला तुझ्याकडून शिकण्यासारखं खूप काही होतं. मला तू खूप आवडला होतास.
मला निघाल्यावर रीक्षात बसल्यावर कविता आठवत राहीली -
"देणार्‍याने देत जावे
घेणार्‍याने घेत जावे
घेणार्‍याने एके दिवशी
देणार्‍याचे हात घावे"
तसं तुझ्या गप्पा ऐकता ऐकता, मी देखील माझ्याही नकळत गप्पीष्ट व्हायची, बोलकी, बोलघेवडी व्हायची स्वप्न बघत होते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलं आहे.

पाऊस आत येऊ लागला. ओढणी अंगाला चिकटली, डोळ्यात धूळ जाऊ लागली, केस विस्कटले. डोळे चोळल्याने का़जळ फिसकटलं. >> हे वाचून 'देणार्‍याने देत जावे' ही कविता आठवण्यापेक्षा खालील ओळी आठवल्या, एक्दम चपखल! -

सुटली वेणी केस मोकळे
धूळ उडाली भरले डोळे
काजळ गाली सहज ओघळे
या सार्‍याचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा

अर्थात तुम्ही घरी आल्यावर कुणी निराळा अर्थ काढला नसणार नक्कीच Wink

छान लिहिलंय..
आणि गप्पिष्ट झाल्यायत खऱ्या.. Lol

सामोचा आतापर्यंतचा बेस्ट लेख. नेमकं आणि थोडक्यात.
___________________
(अवांतर)
आम्ही पण असेच भेटलो होतो. तिच्या घराजवळचे हॉटेल ठरले. मला उशीर झाला,ती दहा मिनिटे (हॉटेल बाहेर) थांबून परत जात होती. हाक मारली. (ती शेवटचीच. कारण त्यानंतर मी अगोदरच हजर राहू लागलो.)
माझे काही रूक्ष बोलणे झाले. निघालो.

छान लिहिलंय!
याचा सिक्वेल आहे का?
Srd, स्मरणरंजन छानच.

सर्वांचे आभार. हपा सुंदर कविता हो!!! थँक्स. देवकी सिक्वेल हाहाहा आयुष्यभरची साथ. ममो चन्दीफन्दी, शर्मिला, अनिरुद्ध, पाटील, आंबटगोड, उर्मिला, ऋन्मेष, शरदजी, देवकी , मृ सर्वांचे खूप आभार.

मीरा ,झकासराव धन्यवाद.
पुढचा भाग - नाही लिहीता येणार मला कारण सर्व घडून गेलेले आहे.

मस्त लेख.

फक्त वर इंग्लंड आणि खाली अमेरिका झालंय, की तसचं आहे ते.

Pages