मी बोललो ते कुणाला कधी कळलेच नाही

Submitted by दत्तात्रय साळुंके on 6 June, 2023 - 03:00

मी बोललो ते कुणाला कधी कळलेच नाही
ओसाड घरी माझ्या कुणीही वळलेच नाही

फसलो मी येथे जंगली चकव्यात नेहमी
हरवलेले गाव माझे मला मिळलेच नाही

भर चौकात केले वार मजवर आपल्यांनी
दयाळू लोक थोर येथे हळहळलेच नाही

वेदने तू सखी माझी एकटी कधीच नाही
काळजातून मी तुला कधी वगळलेच नाही

आता चालतो मी एकटाच वाटेवर माझ्या
कळपात चालणे अजूनही रूळलेच नाही

सोडू पाहे मी लाज जगाची जेव्हा जेव्हा
लाजरेपण लोचट हातातून गळलेच नाही

वांझोटी होती स्वप्ने त्या ओसाड गावाची
थेंबही इमानी घामाचे फळफळलेच नाही

© दत्तात्रय साळुंके

( एक प्रयत्न...चूकभूल द्यावी घ्यावी )

आवडल्यास प्रतिसाद जरुर द्या ही नम्र विनंती... प्रोत्साहन मिळेल .
न आवडल्यास काय खटकलं जरुर सांगा...माझं प्रशिक्षण होईल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली आहे. गेयताही आहे. दु:ख पोहोचले.

चूक माझी मलाच समजली,
वेळ निघून गेली.
मी बोललो तेव्हा ते ऐकत होते का,
लक्ष दिलेच नाही.

विनंती कशाला? किती छान लिहीले आहे. मला गझल वगैरे कळत नाही, पण हा भावार्थ नक्कीच कळला. आशय समजला.

भर चौकात आपल्यांनी वार मजवर केले
दयाळू लोक थोर येथे हळहळलेच नाही>>>>>> हसू नका, पण इथे असे हवे होते का?

भर चौकात केले वार मजवरी आपल्यांनी
दयाळु लोक थोर हळहळलेच नाही.

फसलो मी येथे जंगली चकव्यात नेहमी
हरवलेले गाव माझे मला मिळलेच नाही>>>>>> हरवलेले च्या ऐवजी हरवले गाव माझे असे हवे होते. चुभुदेघे.

srd खूप धन्यवाद अभिप्राय निश्चितच प्रेरणादायी आहे
>>मी बोललो तेव्हा ते ऐकत होते का,
लक्ष दिलेच नाही.>>>
अगदी हाच भाव आहे...मी भणंग होतो ... मी ओसाड घरात राहतो ...कोण ऐकणार?

रश्मीताई
अनेकानेक धन्यवाद..
ही गजल मात्रा वृतात बांधलीय..
तुम्ही सुचवलेले
>>>भर चौकात केले वार मजवरी आपल्यांनी>>>निश्चित सुंदर आहे...पण मजवरी केले तर मात्रा वाढतील त्यामुळे भर चौकात केले वार मजवर आपल्यांनी असा बदल करतो. हे जास्त सूट होतंय.

दुसरी सुचना
हरवलेले... माझं एक वेगळं निरागस, निर्मळ,प्रेमळ गाव व्यवहारी जगात हरवलंय...
हवले ही बरोबर होईल पण पुन्हा मात्रा कमी होतात

छान प्रयत्न आहे. काव्य म्हणून आवडलं. अर्थही छान.

गझलेसाठी मात्रा जुळणे आवश्यक आहे का? मला खात्रीने माहिती नाही. पण इथे सगळ्याच ओळींत लगावली कन्सिस्टंट वाटली नाही.
उदा:
मी बोललो ते कुणाला कधी कळलेच नाही - गा गा ल गा गा ल गा गा ल गा ल ल गा ल गा गा
ओसाड घरी माझ्या कुणीही वळलेच नाही - गा गा ल ल गा गा गा ल गा गा ल ल गा ल गा गा

'मिळलेच नाही' हे शब्द खटकले. 'मिळालेच नाही' पाहिजे. पण त्याने तुमचा -ळलेच हा काफिया पाळला गेला नसता.

हा.पा.
खूप धन्यवाद...विस्तृत आणि अभ्यासू अभिप्राय आवडला...
>>>पण इथे सगळ्याच ओळींत लगावली कन्सिस्टंट वाटली नाही.>>>>
अक्षरगणवृत्ताची लगावली क्रमबध्द असते. लघूगुरु क्रम ठरलेला असतो.
मात्रा वृत्ताला हे बंधनं नाही. मात्रा वृत्तात सर्वत्र मात्रा समान असणे बंधनकारक असते .
बाकीची बंधनं जसं मात्रा, रदीफ, काफिया ही अक्षरगणवृत्तासम असतात.
"मिळलेच" ऐवजी मिळालेच केले तर मात्रा देखील वाढतात.
केशवकूल खूप धन्यवाद...

दसा आणि हपा
तुम्ही बोललात ते मला कधी कळणारच नाही!
तेथे पाहिजे खानदानी कवी.

>>>दसा आणि हपा
तुम्ही बोललात ते मला कधी कळणारच नाही!>>>
केशवजी ....गझल लिहिणे अंशतः तंत्र आहे. आणि हे तंत्र मायबोलीकर बेफिकीर यांच्या पुढील धाग्यावर आहे.
https://www.maayboli.com/node/21889
नवीन गझलकारांसाठी खूप मार्गदर्शक आहे हे... तुम्हाला जमायला हरकत नाही...
तत्पूर्वी छोटासा उपोद्घात….
गझल किंवा काव्य छंदोबध्द किंवा वृत्तबद्ध का लिहायचं तर ते गुणगुणता यावं. हे करताना त्यातील शब्दरचना एका विशिष्ट पद्धतीने केली जाते आणि ही विशिष्ट पद्धत म्हणजे वृत्तबद्ध रचना. असे करण्यापूर्वी लघू अक्षर आणि गुरु अक्षर म्हणजे काय हे लक्षात घ्यायला हवे. ज्या अक्षराला उच्चारायला कमी वेळ लागतो ते अक्षर लघू आणि ज्याला उच्चारायला जास्त वेळ लागतो ते अक्षर गुरु.
आता तुमचे नावच घेऊयात
केशवकूल यात पहिले अक्षर गुरु म्हणून त्यांच्या दोन मात्रा, पुढे श लघू, व लघू म्हणून त्यांच्या एक एक मात्रा, कू गुरु म्हणजे दोन मात्रा, पुढे ल त्याची एक मात्रा म्हणजे तुमच्या नावाच्या मात्रा होतील २+१+१+२+१= ८
मी रचलेली गझल मात्रा वृत्तात आहे म्हणजे प्रत्येक ओळीत समान मात्रा आहेत.
अक्षरगणवृत्त हा अजून थोडा क्लिष्ट प्रकार आहे यात अक्षरांचा लघू गुरु क्रम ठरलेला असतो म्हणजे तुम्हाला प्रत्येक शब्द एका विशिष्ट पद्धतीनेच घ्यावा लागतो.
उदाहरणार्थ….
क्रमानेच येती य चारी जयात, (य गण चारदा)
म्हणावे तयाला भुजंगप्रयात ।
पदी अक्षरे ज्याचिया येत बारा
रमानायका दुःख माझे निवारा ॥
या सर्व ओळी भुंजंगप्रयात वृतांत आहेत. त्याचा लघूगुरु क्रम खालीलप्रमाणे…
यमाचा यमाचा यमाचा यमाचा
म्हणजे तुम्ही जर
रमानायका दुःख माझे निवारा
ही ओळ घेतली तर त्यात य अक्षरगण चार वेळा येतो. यमाचा यमाचा यमाचा यमाचा
य लघू, मा गुरु , चा गुरु यालाच लगावलीत बसवले तर …लघू अक्षर ल म्हणू गुरु गा…म्हणजे प्रत्येक यमाचा असा होतो लगागा लगागा लगागा लगागा
वृत्त लक्षात रहावे म्हणून यमाचा ४ वेळा
रमाना यकादुः ख माझे निवारा
यमाचा यमाचा यमाचा यमाचा
अक्षरगणवृत्तात आपोआप सर्वत्र मात्रा सारख्या येतात. भुजंगप्रयात वृतांत प्रत्येक ओळ बारा अक्षरांची असते.
हा माझा समुद्र घागरीत बसवण्याचा प्रयत्न येवढ्याचसाठी की त्यामुळे कुणाला तरी वृत्त अभ्यासायला हवे असे वाटावे. असं वाटलं तर जरुर वरील बेफिंचा दुवा उघडा.