एक मुलायम स्पर्शक (२)

Submitted by कुमार१ on 4 June, 2023 - 19:56

पूर्वार्ध इथे: https://www.maayboli.com/node/83490
…………………………………………..
उत्तरार्ध

पहिल्या रंजनप्रधान भागात आपण निरोधची इतिहासकालीन संकल्पना, त्याचा शोध आणि शास्त्रशुद्ध विकास या गोष्टींचा विचार केला. या भागात आपण त्याच्या खालील शास्त्रीय पैलूंचा विचार करणार आहोत:

१. गर्भनिरोधनातील यशापयश
२. गुप्तरोगांपासून संरक्षण
३. वापराचे दुष्परिणाम/ समस्या
४. विल्हेवाट आणि पर्यावरण

गर्भनिरोधनातील यशापयश
जेव्हा एखादे स्त्री-पुरुष जोडपे तात्पुरत्या गर्भनिरोधनासाठी प्रथम निरोधचा वापर सुरू करते, त्या संपूर्ण पहिल्या वर्षातील अनुभवानुसार निरोधचे यशापयश मोजले जाते. हे अपयश टक्केवारीत मांडण्याची प्रथा आहे. त्या आकड्यांकडे जाण्यापूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट करतो.

निरोधच्या वापराबाबत दोन शास्त्रीय संज्ञा प्रचलित आहेत:
१. अचूक आणि सातत्यपूर्ण वापर
२. प्रातिनिधीक( टिपिकल) वापर
आता यांचा अर्थ पाहू.

१. अचूक : संबंधित जोडप्याने त्यांच्या प्रत्येक संभोगाचे वेळी निरोध वापरणे आणि प्रत्येक क्रियेदरम्यान तो अथ पासून इतिपर्यंत काळजीपूर्वक हाताळणे.

२. प्रातिनिधीक: इथे अर्थातच मवाळ धोरण स्वीकारलेले दिसते. मासिक ऋतूचक्राच्या “सुरक्षित” कालावधीत निरोध न वापरण्याकडे कल राहतो. प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत अ/सुरक्षित कालावधी नक्की किती दिवस आहे हे अचूक सांगणे अवघड असते; त्यात व्यक्तीभिन्नता असतेच.

याखेरीज अन्य काही चुका वापरकर्त्यांकडून होऊ शकतात:
१. Latex निरोधच्या जोडीने योनीमध्ये तेलयुक्त वंगणांचा वापर करणे.
२. निरोध परिधान करण्याची वेळ आणि संभोग समाप्तीनंतर विभक्त होताना घडणाऱ्या चुका.
३. निरोध फाटणे, सरकणे इत्यादी अकस्मात घडलेल्या घटना.

वरील सर्व मुद्दे लक्षात घेता एखाद्या जोडप्याच्या निरोधच्या पहिल्या वर्षातील वापराचे अपयश अंदाजे असे असते:
* अचूक वापर : 3%
* प्रातिनिधीक वापर: 14%
( निरनिराळ्या संशोधनानुसार या टक्केवारीत थोडाफार फरक पडू शकतो).

गर्भनिरोधनासाठी फक्त निरोधचा वापर करणाऱ्या जोडप्यांनी वरील गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत.

गुप्तरोगांपासून संरक्षण
ज्या रोगांचा प्रसार लैंगिक क्रियेद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस होतो अशा काहींचा आता आढावा घेतो. या आजारांचे तीन मुख्य गटांमध्ये वर्गीकरण करता येईल:
१. विषाणूजन्य आजार
२. जिवाणूजन्य आजार
३. इतर

आता एक महत्त्वाचा मुद्दा. वरील आजारांपैकी काही आजार असे आहेत, की ज्यांचे रोगजंतू मूत्रमार्गातून बाहेर पडणाऱ्या स्रावांच्या मार्फत पसरतात. फक्त अशा आजारांच्या बाबतीतच निरोधच्या वापराने मोठ्या प्रमाणावर संरक्षण मिळते. पण काही आजारांच्या बाबतीत त्यांचा प्रसार, निरोधने झाकले न गेलेल्या शरीराच्या इतर भागांमधून सुद्धा होतो. त्यांच्या बाबतीत अर्थातच संरक्षण कमी राहते.

लैंगिक क्रियेद्वारे प्रसार होणारे काही महत्त्वाचे आजार आणि त्यांच्या बाबतीत निरोधने मिळणाऱ्या संरक्षणाचे अंदाजे प्रमाण असे:
१. विषाणूजन्य:
A. HIV, Hepatitis B: >90%
B. CMV: 50 - 90 %
C. HSV-2 (हर्पिस) : 10 - 50 %

D. HPV: लैंगिक क्रियेद्वारे पसरणाऱ्या रोगांमध्ये याचे स्थान सर्वोच्च आहे. याच्या बाबतीत मात्र निरोधने मिळणारे संरक्षण बरेच कमी आहे. या विषाणूच्या दीर्घकालीन संसर्गातून विविध अवयवांचे कर्करोग होऊ शकतात. त्यामध्ये गर्भाशयमुख, योनी, पुरुषलिंग, गुदद्वार आणि घसा यांचा समावेश आहे.

२. जिवाणूजन्य:
a. गनोरिआ: >90%
b. सिफिलीस: 50 - 90 %

संभोगाचे अन्य प्रकार आणि रोगसंरक्षण
योनीसंभोगा व्यतिरिक्त गुद आणि मुखसंभोग हे अन्य पर्याय अस्तित्वात आहेत. त्यांच्या संदर्भात काही विशेष अभ्यास झालेले आहेत. त्यातील ठळक मुद्दे:

१. मुख संभोग: या क्रियेमध्ये योनी संभोगाच्या तुलनेत सातत्याने निरोध वापरण्याचे प्रमाण बऱ्यापैकी कमी राहते. या संभोगातून घशाचा गनोरिआ होण्याचा धोका बरेच पट अधिक असतो.

२. पुरुष समलैंगिकांमध्ये भिन्नलैंगिक जनतेच्या तुलनेत एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण सुमारे 18पट अधिक आहे. या क्रियेदरम्यान जर सातत्याने निरोधचा वापर केला तर मिळणारे संरक्षण 70 ते 87% असते.

दुष्परिणाम आणि वापरसमस्या
१. एलर्जी: Latex निरोधांच्या बाबतीत काही जणांना एलर्जी असू शकते. या समस्येचे सर्वसाधारण समाजातील प्रमाण 4 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान आहे. काहींच्या बाबतीत त्याची लक्षणे ताबडतोब दिसतात तर काहींच्या बाबतीत उशिराने.
विविध लक्षणांमध्ये त्वचेवर पुरळ उठणे, खाज येणे, नाकाडोळ्यांना पाणी सुटणे, छातीत दडपणे आणि श्वसनरोध इत्यादींचा समावेश आहे. प्रत्येकाच्या शरीरधर्मानुसार ही लक्षणे कमीअधिक स्वरूपात दिसू शकतात.

काही वेळेस वापरकर्त्याबरोबरच त्याच्या जोडीदाराला देखील अशी लक्षणे येऊ शकतात. अजूनही काही निरोधांत शुक्रजंतूमारक रसायने वापरलेली आहेत. काही जणांना या रसायनांची देखील एलर्जी असू शकते. ज्या लोकांना Latexचा त्रास होतो त्यांच्यासाठी PU किंवा प्राणीजन्य नैसर्गिक निरोधांची शिफारस आहे.

२. मानसिक समस्या: निरोधचा वापर करणे हे एखाद्या स्त्री-पुरुष जोडीतील जोडीदारांपैकी एकाला किंवा दोघांनाही पसंत नसते. अशा वेळेस तो बळजबरीने वापरताना मनात नाराजी राहते. त्यातून काही जणांना औदासिन्य वाटते तसेच चिडचिडही होते.

३. निरोधचा चुकीचा वापर : हा होण्यामागे काही परिस्थितीजन्य कारणे असतात. इच्छा नसताना तो मनाविरुद्ध चरफडत वापरावा लागणे किंवा मद्यधुंद अवस्थेत तो वापरणे ही काही महत्त्वाची कारणे. तसेच वेश्यागमन करणाऱ्या लोकांच्या बाबतीत संबंधित पुरुषाने वेश्येकडून स्वतःला निरोध घालून घेणे हे देखील एक दखलपात्र कारण आहे.

विल्हेवाट आणि पर्यावरणपूरकता
वापरुन झालेले निरोध कचऱ्यात कोणत्या पद्धतीने टाकावेत हा एक महत्त्वाचा आणि संशोधनाचा विषय आहे. सर्वप्रथम निरोधच्या वेष्टणाचा मुद्दा. सध्या वापरल्या जाणाऱ्या बहुसंख्य निरोधांचे वेष्टण प्लास्टिकस्वरूप असल्याने ते कोरड्या कचऱ्यातच टाकले गेले पाहिजे.

प्रत्यक्ष वापरलेला निरोध व्यवस्थित कागदात (टिशू) गुंडाळून ओल्या कचऱ्यात टाकावा हे ठीक आहे. परंतु ओल्या कचऱ्यातील गोष्टी नैसर्गिकरित्या विघटित होणे अपेक्षित असते. निरोधच्या बाबतीतली परिस्थिती त्याच्या उत्पादन-प्रकारानुसार अशी आहे:

१. शुद्ध स्वरूपातील latex आणि प्राणीजन्य निरोध विघटनशील आहेत.
परंतु, बाजारात उपलब्ध असलेल्या बहुसंख्य latex निरोधांमध्ये नैसर्गिक आणि कृत्रिम रबर अशा दोन्ही पर्यायांचे मिश्रण असते. तसेच बहुसंख्य निरोधांत वेगवेगळी वंगणे आणि रसायने घातलेली असतात; त्यांच्यामुळे विघटनात अडथळा येतो. अशा निरोधांचे नैसर्गिक विघटन अत्यंत मंद गतीने होते; त्यासाठी कित्येक वर्षे लागू शकतात.

२. PU आणि स्त्रीनिरोध हे प्लास्टिकसदृश्य गोष्टीपासून तयार केलेले असल्याने ते विघटनशील नाहीत.

३. अलीकडे शुद्ध नैसर्गिक स्वरूपातील latex पासून तयार केलेले आणि रसायनविरहित काही निरोध अल्प प्रमाणात का होईना बाजारात आलेले आहेत. अशा निरोधांचे वेष्टण देखील एक प्रकारच्या विघटनशील कागदाचे केलेले आहे.

प्राचीन काळी संभोगादरम्यान गुप्तरोगापासून संरक्षण मिळवण्यासाठी निरोध या संकल्पनेचा उगम झाला. कालांतराने आधुनिक जीवनशैलीत त्याला गर्भनिरोधनाचे स्थानही प्राप्त झाले. निरोधच्या उत्पादनात होत गेलेला तांत्रिक विकास आपण पाहिला. एकोणीसाव्या व विसाव्या शतकात निरोधचे समर्थन आणि त्याचा विरोध या दोन्ही गोष्टींनी हातात हात घालून प्रवास केला.

आजच्या घडीला विविध प्रकारचे आकर्षक निरोध वापरासाठी उपलब्ध आहेत. पुरुष निरोध हे वापरण्यास अत्यंत सुटसुटीत आहेत. या उलट स्त्री-निरोध योग्य प्रकारे बसवणे हे काहीसे कटकटीचे काम आहे आणि त्यामुळे ते फारसे वापरात नाहीत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले काही निरोध उंबरठ्यावर येऊन ठेपलेत. त्यातले काही कुतूहलजनक आहेत. भविष्यात पूर्णपणे पर्यावरणपूरक निरोधांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाची उत्सुकता आहे.

निरोधची ही कूळकथा वाचकांना उपयुक्त वाटली असेल अशी आशा आहे.
************************************************************************************
समाप्त.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निरोध लावताना हात स्वच्छ धुतलेले असावेत .
समजा एकाध्या स्त्री ल किंवा पुरुषाला hiv आहे.
त्यांचा योनी स्त्राव किंवा पुरुषांचे पण.
हात लागला असेल आणि निरोध तशाच अस्वच्छ हाताने लावला तर जंतू निरोधाच्या बाह्य भागात च असणार .
संरक्षण झीरो.
निरोध काढताना च पुढचे टोक नीट पकडुन काढला पाहिजे आणि पहिले हात नीट साबणाने धुतल्या नंतर गुप्त अंग साबणाने नीट धुतले पाहिजे.
हे सर्व व्यवस्थित खूप कमी लोक करतात.
नशेत संभोग करणारे ह्या सर्व स्टेप्स कधीच पाळत नाहीत.
अज्ञान मुळे नशेत नसणारे सर्व स्टेप्स पाळत नाहीत.
झाला ना संभोग आता धोका संपला असा एक गैर समज असतो
हे सर्व ज्ञान बालवीर पाशा मुळे मिळाले आहे ह्याची नोंद घ्यावी

मुळात अनोळखी व्यक्ती बरोबर शारीरिक संबंध च ठेवणे धोकादायक असते.

कारण बऱ्याच गुप्त रोगांच्या जंतू न च सुप्त काळ अगदी तीन चार महिन्यांचा पण असतो.
जंतू संसर्ग झाला असेल तरी तो detect होत नाही.
आणि आपल्याला रोग नाही असा गैर समज होतो.
आणि असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले जातात.

हे सर्व व्यवस्थित खूप कमी लोक करतात.
>>>

अगदी बरोबर,चांगला मुद्दा.
म्हणूनच हा मुद्दा लेखात विस्ताराने दिलाय.
निरोधचे अपयश पाहताना त्याचा वापर अचूक झाला आहे की सामान्यपणे (प्रातिनिधिक ) हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
त्यानुसार अपयश 3 वरून 14 टक्क्यांवर जाते.

अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
निरोध सुरुवातीस बसवताना त्याची योग्य बाजूच लिंगावर टेकली गेली पाहिजे. काही वेळेस ते उलटही होते आणि मग गडबड होऊ शकते. तसेच त्याचे टोक दाबून त्यात हवा अडकणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

निरोध बसवतानाचे बारकावे इथे अगदी व्यवस्थित दिलेले आहेत
https://www.nhs.uk/conditions/contraception/how-do-i-use-condom/

पुरुषाची सुंता केल्याने गुप्तरोगाचे प्रमाण कमी होते हे खरे आहे का?
>>>
या विषयावर वैद्यकात भरपूर संशोधन आणि खल झालेला आहे. पुरुषाची सुंता केल्याने त्याला जंतूसंसर्ग होण्याचा आणि त्याच्यापासून प्रसार होण्याचा धोका काही अंशी कमी होतो. थोडक्यात, अंशतः संरक्षण मिळते.

गुप्तरोगांच्या संदर्भात एचआयव्ही आणि एचपीव्ही या प्रमुख आजारांमध्ये बरेच संशोधन या संदर्भात झालेले आहे. त्याचा सारांश असा :
पुरुषाची सुंता केल्याने काही प्रमाणात रोगसंरक्षण मिळते हे जरी खरे असले तरी सुरक्षित संभोगाचे अन्य मार्ग (निरोध इत्यादी) तितकेच महत्त्वाचे आहेत.

1. https://read.qxmd.com/read/21216000/effect-of-circumcision-of-hiv-negati...

2.https://www.unaids.org/en/resources/presscentre/featurestories/2007/febr....

डब्ल्यूएचओच्या एड्स विभागाच्या संचालकांचे एक वाक्य या दृष्टीने मार्गदर्शक आहे,
“ एच आय व्ही प्रतिबंधाच्या संदर्भात पुरुषांची सुंता ही एक परिणामकारक कृती असली तरीही तिला जादूची कांडी समजू नये !”

लेख वाचला.
माहितीपूर्ण लेख आहे. खूपशा गोष्टी माहिती होत्याच.
पण प्रतिसादातील शंका निरसनात बऱ्याच नवीन गोष्टी कळाल्या. हे इतके सविस्तर नीट समजेल अशा भाषेत भारतात लोकांपर्यंत पोहोचतं का हा प्रश्न देखील पडला.
हे पोहचणे गरजेचे आहे.

हे इतके सविस्तर नीट समजेल अशा भाषेत भारतात लोकांपर्यंत पोहोचतं का ?
>>>
एड्स संदर्भात जागरूकता, प्रशिक्षण इत्यादी अनेक गोष्टी शासकीय पातळीवरून बरीच वर्षे केल्या जात आहेत. अनेक प्रादेशिक भाषांमध्येही यांचा चांगला प्रसार होत आहे.
एक उदाहरण म्हणून इथे पाहता येईल :

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1795547
मोहिमेदरम्यान, विद्यार्थ्यांनी चित्रकला, ऑनलाइन प्रश्नमंजुषा, फलक तयार करणे, स्वाक्षरी मोहीम, मास्क आणि रील बनवणे या स्पर्धांमध्ये एचआयव्ही/एड्स आणि क्षयरोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी भाग घेतला.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ग्रामीण भागातील इंटर्नशिपमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर देखील या संदर्भात समाजशिक्षणाचे चांगले काम करीत असतात.

पण प्रतिसादातील शंका निरसनात बऱ्याच नवीन गोष्टी कळाल्या. हे इतके सविस्तर नीट समजेल अशा भाषेत भारतात लोकांपर्यंत पोहोचतं का हा प्रश्न देखील पडला.
==>
मला नाही पोहचत असच वाटत .

पान 1 वरील स्वादिष्ट निरोधची चर्चा आठवायचे कारण म्हणजे नुकताच प्राईम व्हिडिओवर आलेला “कहानी रबर बँड की’ हा हिंदी चित्रपट.
आता पाहायला सुरुवात केली आहे. त्याने अर्ध्या तासात तरी काही पकड घेतलेली नाही. परंतु एक दृश्य मात्र मजेदार वाटले.
लहान गावातील किराणा विक्रीचे दुकान. त्यात निरोध देखील विक्रीला ठेवलेले. दारात मुली उभ्या असताना एक तरुण निरोध विकत घ्यायला आलेला आहे. पण तो दुकानदाराला ते विचारायला खूप लाजतो आहे. अखेर तो ओशाळून व खालच्या मानेने म्हणतो,

“ बरं .. नाही, एक चॉकलेट द्या”. त्यावर दुकानदार म्हणतो,
“चॉकलेट की चॉकलेट फ्लेवर?”

हा प्रसंग मजेशीर आहे.

Pages