अंमली (पुनर्लेखन) - भाग १!

Submitted by अज्ञातवासी on 2 June, 2023 - 08:08

(अंमली या कादंबरीच्या पुनर्लेखनाचा हा प्रयत्न, यात मुख्य कथानक तेच असेल, पण बाकी सगळी नावे आणि प्रसंग बदलतील.
या कादंबरीचा भाग आठवड्यातून दोनदा, म्हणजे शनिवारी आणि बुधवारी रात्री ७.३० वाजता प्रसिद्ध होईल.
उद्या रात्री साडेसात वाजता अजून एक भाग येईल.)

नाशिक शहरातील एक दिवस...
आणि त्या शहरातला एक तरुण.
खिन्न, छिन्नविच्छिन्न अवस्थेत बसलेला.
प्रचंड थकवा, प्रचंड मानसिक तणाव.
वजन वाढलेलं, चेहरा सुजलेला.
' काय करून घेतलंय मी स्वतःच? '
' सततच्या आजारपणामुळे आलेली निराशा... '
...शालिमार जवळील देवीच मंदिर.
तो तिथे असाच बसलेला असायचा.
कायम...
गेले काही महिने तो आजारपणाने आजारी होता...
साधासा फुल बाह्यांचा ढगळ टी शर्ट, साधी ढगळ जीन्स घालून तो बसलेला होता.
त्याची उंची कमीत कमी सहा फूट असेल. त्याचा बांधा भक्कम होता...
... पण त्यावर आता चरबी ठिकठिकाणी वाढलेली दिसत होती...
चेहऱ्याचा गोरा रंग काळवंडला होता. त्यावर ठिकठिकाणी डाग पडले होते.
लांब नाक सुजलेल्या गालांमध्ये लपून गेलं होतं.
निराशा, हताशा सगळ्या वाईट भावनांच तो मिश्रण झाला होता.
...आणि समोर ती आली...
ती...
तिला बघताच त्याचं काळीज हलल्यासारखं झालं.
थोडीशी कमीच उंची, गोरा रंग, मजबूत बांधा, चाफेकळी नाक, गोल चेहरा आणि शुभ्र दंतपंक्ती.
...एका नजरेत तो तिच्या प्रेमात पडला...
एका क्षणात...
पहिल्या नजरेत...
तिने त्याच्याकडे बघितलं, रागाने त्याच्याकडे बघत ती निघूनही गेली.
...तो तिच्याकडे बघतच राहिला...
******
"मेथमफेटामिन. नाव घ्या..."
"मेथम..." दोन तीन लोकांनी ट्राय केलं.
"तुमच्याकडून होणार नाही म्हणून सोपं नाव सांगतो. म्हणा मेथ."
"मेथ." सगळे म्हणाले.
"गुड, जशी मेथीची जुडी, तसं मेथ. हे मेथ आपल्याकडे बनतही नाही, आणि मिळतही नाही, म्हणून आपण कोकेन, गांजा, चरस विकतो. एक ग्रॅम मेथची किंमत काय आहे माहिती आहे का?"
कुणीही काहीही बोललं नाही.
"मी सांगतो... आठ ते दहा हजार."
समोरच्या प्रत्येकाने आ वासला.
त्याने समोर एक पुडी फेकली.
"पाचशे ग्राम मेथ. पन्नास लाख मार्केटची किंमत. होलसेल रेट पंचविस लाख. बोला, कोण विकणार..."
"मी,"
"नाही, मी विकतो दादा."
"दादा मला द्या."
एकच गलका सुरू झाला...
"शांत व्हा... माझं ऐकून तर घ्या. तुमचा उत्साह बघून मला खूप आनंद झाला आहे. पण...
...पण तुमच्या सगळ्यांची जरी किंमत लावली, तरीही ती पन्नास लाख नसेल. आणि जर या पुडीला काही झालं, तर त्याची किंमत फक्त तुमचा जीव असेल. आता सांगा... कोण तयार आहे?"
त्याच्या शांत आवाजात तलवारीची धार होती.
आता मात्र कुणीही समोर यायला तयार नव्हतं.
"अरेरे. कुणीही चांगला हॅण्डलर उरला नाही. जुन्या काळात..."
"दादा द्या... मी घेतो..." एक कृश माणूस समोर आला.
"अरे वाह. सुरेशकुमार... आवडलं मला. सुरेशकुमारसाठी टाळ्या. तर सुरेशकुमार. यशस्वी व्हा. फक्त पंचवीस लाख. कळलं?"
"हो दादा..." त्याने पुडी हातात घेतली.
तो समाधानाने हसला.
एक पांढरा शर्ट, खाली काळी ट्राऊजर. हातात स्मार्टवाच. नीट कापलेले केस. डोळ्यांवर गेलो शेडचा गॉगल. हातात सोन्याचं ब्रासलेट. मध्यम उंची, गव्हाळ रंग. नीट ठेवलेली दाढी.
' विलासभाऊ शिंदे. '
नाशिकचा सगळ्यात मोठा ड्रग डीलर...
*****
"मंदिरात गेला होतास."
"हो."
"जेवण केलं."
"हो."
"पोथी वाचली."
"हो गं..."
"आता काय करतोय."
"झोपतोय."
"जॉबचं?"
"अग बस कर ना, झोपतोय म्हटल्यावर सुद्धा बोलायचं असतं का?"
समोरून काहीही आवाज आला नाही.
"बस कर आई. बस कर. थकलोय मी. अक्षरशः कधी कधी रडतोय... का मी या अवस्थेत पोहोचलो यासाठी."
"बाळा सगळं ठीक होईल, महादेव सगळं ठीक करेल."
"मला माहित नाही आई, सगळा विश्वास उडत चाललाय. चल मी झोपतो... बाय."
त्याने फोन ठेवला, आणि त्याने झोपायचा प्रयत्न केला...
अजिबात झोप लागत नव्हती... सतत निराशेचे झटके...
...आणि आता डोळ्यासमोर ती...
अक्षरशः रात्री २ वाजेपर्यंत तो जाग जाग जगला...
आणि २ वाजता तो उठला...
' फाड... फाड.... '
तो गालात मारून घेऊ लागला...
...आणि आता त्याला रडू फुटलं...
तो ढसाढसा रडू लागला...
रात्र अजूनच भेसूर होत होती...
... आणि नियती त्याला हसत होती.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतोय.
कथानकाने थोडा आकार घेतल्यावर लिहीन.

पुन्हा तुम्ही लिहिते झालात हे बघून बरे वाटले.

कालच बातम्यांमधे पुण्यात विद्यार्थ्यांकडून खूप मोठ्या प्रमाणात हीच नशेची द्रव्ये सापडली असे दाखवत होते. आतापर्यंत कथा कादंबरीत वाचलेले हे विष इतक्या जवळपास येऊन ठेपलेले बघून धक्कादायक वाटले.

@केशवकुल - धन्यवाद..
@धनवंती - हा खूप मोठा इश्यू झालाय आजकाल... पंजाब सारखी राज्ये तर पूर्ण या गोष्टीच्या गर्तेत सापडली आहेत.

पळा...
पळू शकत नाही...चाला...
चालू शकत नाही...रांगा
रांगू शकत नाही... प्राणायाम करा...
वाचतोय....

Welcome Back अज्ञातवासी!!
तुम्हाला परत मा बो लिहिताना बघुन खुप आनंद होत आहे