" अहो ऐकलं का ? "
चहाचा कप खाली ठेवत माधवने सुनंदाकडे पाहिले . " हं , बोल "
"आपली प्रिया आजकाल विचित्र वागती आहे असे नाही वाटत का तुम्हाला ?"
" म्हणजे ? " शेजारीच पडलेले वर्तमानपत्र हातात घेत माधव उद्गारला .
" सारखी तिच्या मोबाईलमध्ये तोंड खूपसून बसलेली असते , हल्ली तर रोज रात्री उशीरा घरी येते, या आठवड्यात दोनदा ब्युटीपार्लर मध्ये पैसे उधळले आहे तुमच्या लाडकीने "
" अगं, लहान आहे का ती आता , असतील तिची पण काही ऑफीसची कामे , पुर्वीसारखा काळ कुठे राहिले आहे आता , खाजगी नोकरीमध्ये राब राब राबवून घेतात शिवाय सुट्ट्या कमीच , आणि पोरीची जात आहे तर नट्टा पट्टा करणारच ना , करू दे "
" अहो , लहान नाही म्हणून तर काळजी वाटते .... यंदा पंचवीशी गाठेल ती , आजकालच्या मुलांचे मुक्त वागणे पटत नाही मनाला . तिचे तासनतास फोनवर बोलणे पाहून मनात पाल चुकचुकते हो.... कोणी अजून तर तिच्या आयुष्यात आला नसेल ना.... ? "
तिला मध्येच थांबवत माधव संतापला, " उगाच तोंड आहे म्हणून काहीतरी बडबडू नको , आपल्या प्रियाला मी चांगले ओळखतो , अभ्यासात हुशार आहे पहिल्यापासून, उगाच नाही विद्यापीठात दुसरी आली डिग्रीला "....
"तू जा डब्याचे बघ , मला आज १० वाजताच ऑफीसला पोहचावे लागणार आहे. या महिन्याचा रिपोर्ट हेड ऑफीसला पाठवायचा आहे सेल्सचा. "
माधव घरातून बाहेर पडला ते प्रियाचा विचार डोक्यात घेवूनच . गाडी चालवत असताना प्रियाचे बालपण त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले . अविनाश नावाचा एक मुलगा असतानाही साधारण २०-२२ वर्षापुर्वी त्याने प्रियाला आभाळमाया अनाथ आश्रमातून दत्तक घेतले होते. त्याचा स्वभावच मुळात मृदू होता . मुलगी दत्तक घेण्यासाठी सुनंदा तशी तयार नव्हती पण माधवने तिला समजावण्यात यश मिळविले आणि हो नाही म्हणत त्यांनी प्रियाला घरी आणले. प्रियाच्या तुरुतुरु चालण्याने आणि बोबडे बोलण्याने त्या दोघांनाही मिळणारा अमाप आनंद प्रियाला त्या घरात कायमचे स्थान देवून गेला. माधव आणि सुनंदाने अविनाश आणि प्रियाला कधीही वेगळे समजले नाही , उलट खूप वेळा प्रियालाच झुकते माप दिले असे म्हटले तरी हरकत नाही. प्रिया अभ्यासात हुशार निघाली , माधवला नेहमीच तिचे फार कौतूक असायचे . चौथीची स्कॉलरशीप , प्रज्ञाशोध वगैरे परीक्षा प्रिया सहज उत्तीर्ण झाली होती. कॉलेजमध्येही तिने भौतिकशास्त्र आणि गणितात युनिव्हरसिटी टॉपर चा बहुमान मिळविला होता. माधवला जशी नॅशनल केमीकल लॅब चा कर्मचारी ही ओळख होती तशीच आता प्रियाचे बाबा म्हणून वेगळी ओळख मिळाली होती. अविनाशचे मन तसे काही अभ्यासात रमले नाही . बारावीत असतानाच एन डी ए साठी त्याने कोचींग सुरु केले आणि तिकडे मेरीट लिस्टच्या शेवटी का होईना त्याला प्रवेश मिळाला. पुढे तो देशसेवेसाठी रुजू झाला.
' प्रियाच्या मनात खरेच कोणी पुरुष तर नसेल ना ? ' , स्वतःच्या मनाशीच पुटपुट्त माधवने स्टेरींगवर तबला वाजवतो तशी बोट वाजविली. सुनंदा म्हणते तसे आपणच तिच्यासाठी योग्य वर शोधायला हवा. तसेही ती आता सेटल झाली आहे , समजदार तर ती आहेच.
चांगल्या कामाला उशीर नको , हे काम आजपासूनच सुरु करु.....
पण एकदा प्रियाला विचारायला तर हवे की 'ती लग्नासाठी तयार आहे का ?'
असे नाही की या आधी हा विषय कधीच निघाला नाही , पण जेंव्हा जेंव्हा विषय समोर आला तेंव्हा प्रियाने तो टाळला होता . तिच्या महत्वाकांक्षा मोठ्या होत्या . इस्त्रो साठी काम करण्याची तिची इच्छा होती , कदाचित म्हणूनच तिने लग्नाचा अडसर दूर ठेवला होता. पण अचानक प्रियाचा विचार बदलला असेल तर ? .
माधव ऑफीसमध्ये पोहचला , दिवसभर रिपोर्ट बनवायच्या कामात गुंतला , संध्याकाळी घरी येताना मात्र पुन्हा प्रिया बद्दल विचार करु लागला. आज या विषयावर प्रियाशी बोलूच असे त्याने मनाशी ठरवले.
रोजच्या मानाने प्रिया आज लवकर घरी आली होती त्यामुळे जेवायला तिघेही एकाच वेळी बसले. माधवने एकदमच प्रियाला सरळ प्रश्न विचारणे योग्य समजले नाही त्याने त्याचा प्रश्न थोडा फिरवून विचारला
" प्रिया बेटा , माझ्या मित्राचा मुलगा गेल्या वर्षीच पुण्याच्या बी जे मेडीकल मधून डॉक्टर झाला आहे , सध्या शासकीय नियमांनुसार तो ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करतो आहे , पुढील वर्षी आपल्या शहरात क्लिनिक टाकेन म्हणतो आहे , त्याच्याकडूनच तुझ्यासाठी मागणी आली आहे. तसा तो सहजच बोलून गेला मला , पण म्हटले विचार करायला काय हरकत आहे. तुझ्या मनात काही अपेक्षा वगैरे आहेत का मुलाच्या जर लग्न ठरवायचे झाले तर ? "
प्रियाचा चेहरा एकदम गोंधळून गेला. विषय फारसा वेगळा नसला तरी बाबांनी असे थेट विचारणे तिला अपेक्षित नव्हते.
" असे काही ठरवले नाही हो बाबा , बघू जेंव्हा ठरवायचे " असे बोलून तिने तात्पुरता का होईना विषय टाळला .
रात्री गादीवर मात्र प्रियाला झोप लागली नाही. अथर्व बरोबर तिची अनेक वर्षापासूनची मैत्री आता प्रेमाच्या नाजूक वळणावर पोहचली होती . मनात राहून विचार आला
' सांगायचे होते का मघाशीच बाबांना , मला अथर्व सारखा मुलगा .............. ?
छे , मध्येच तिने जीभ चावली , ' काय विचार करतील बाबा माझ्याबद्द्ल ' .
' तसे बाबांचे खूप प्रेम आहे माझ्यावर , शिवाय अथर्व माझ्यासारखाच उच्च शिक्षित आणि वेल सेटल्ड आहे , कदाचित बाबा लग्नाला सहज होकार देतील पण...'
माधवने सुनंदाने तिला दत्तक आणले आहे हे कधीही जाणवू दिले नसले तरी प्रियाच्या मनावर मात्र उगाच दडपण यायचे , या भल्या लोकांनी मला या घरात आणले नसते तर कदाचित माझे शिक्षण , माझी आजची स्थिती इतकी चांगली नसती याच उपकाराच्या छायेत ती जगत होती . कदाचित त्यामुळेच अथर्वने लग्नाबद्द्ल विचारल्यावरही तिने स्पष्ट होकार कळवला नव्हता , विचार करायला वेळ मागितला होता. संधी मिळताच बाबांना सांगून पाहू असा विचार करत तिचा डोळा लागला .
इकडे माधवने मात्र प्रियाला न सांगताच उद्याच्या रविवारी कांदेपोहे कार्यक्रम ठरविल्याचे प्रियाला कळाले तेंव्हा तिच्या पायाखालून जमीन सरकली. मी बाबांना आधीच सांगायला हवे होते अथर्वबद्द्ल असे मनाशीच पुट्पुटत ती कावरी बावरी झाली. आता वेळ दवडून उपयोग नाही हे जाणून संध्याकाळी माधव यायच्या आतच घरी पोहचून ती त्याची वाट पाहू लागली .
" काय ग , आज काम कमी होते का ? " आतून सुनंदाचा प्रश्न आला त्यावर तिने फक्त "हो ' एवढेच उत्तर दिले.
असंख्य लाटा एकाच वेळी किनाऱ्यावर आदळून भयानक आवाज कराव्या तसे तिच्या डोक्यात अनेक विचारांनी थैमान घातले. " बाबा मझं ऐकतील ना , हा भाबडा प्रश्न तिचा पिच्छा सोडत नव्हता. शनिवार असल्याने माधव घरी थोडा लवकर पोहचला , येताना त्याने हलवायाकडून काहीतरी आणले होते ते पिशवीच्या लेबल वरून दिसत होते. घरात येताच सुनंदाकडे पिशवी देवून " धर गं , फ्रीज मध्ये ठेव हे ." असं सांगून तो आंघोळीला गेला . त्या पिशवीत काय आहे हे सुनंदाने विचारले नाही , कदाचित तिला माहित असावं , किंवा तिनेच आणायला सांगितलेलं असावं .
' ह्या पिशवीत उद्याच्या पाहुण्यांसाठी गोड धोड तर नाही ना ?' प्रियाच्या ह्र्दयाचे ठोके अजूनच तीव्र होऊ लागले.
माधव त्याची आंघोळ वगैरे उरकून सोफ्यावर आसनस्थ झाला . रोज इकडे तिकडे धांदरटपणाने वस्तू शोधत फिरणारी प्रिया आज सोफ्यात शांतपणे बसलेली पाहून,माधवला आश्चर्य वाटले.
" काय प्रिया बेटा , काम लवकर संपले वाटते आज तुझे ? छान , तसेही उद्या कांदेपोहे कार्यक्रम ठेवला आहे , तुला वाटले तर जा शेजारच्या ब्युटीपार्लरमध्ये . पाहिजे तर तुझ्या आईलाही घेवून जा. "
प्रियाची स्थिती मात्र काही उत्तर देण्याची राहिली नव्हती , काय करावे , काय बोलावे काहीच कळत नव्हते. नकळतच तिच्या तोंडून केविलवाण्या स्वरात " बाबा " एवढाच शब्द फूटला . ती हलकीच माधवच्या जवळ सरकली . माधवनेही तिच्या खांद्यावर हात ठेवला
" अगं बेटा , मुलीच्या आयुष्यात हा लग्नाचा प्रसंग कधीतरी येणार ना ... त्यात एवढी का हळवी होते आहेस तू , आणि तसेही उद्या जर लग्नाची बोलणी फळाला आली तर तुझे सासर याच शहरात असेल , तू कुठे फार दूर जाणार आहेस आम्हाला सोडून ? "
" तसे नाही बाबा....." प्रियाने आता धाडस करुन बोलायचेच ठरविले .
" मी खरे तर तुम्हाला आधीच सांगायला हवे होते , अथर्व बद्द्ल"
माधवने काही बोलायला तोंड उघडताच प्रियाने त्याला गप्प केले , " थांबा बाबा , मला बोलू द्या , माझे एकदा सर्व ऐकून घ्या , मग तुमचा निर्णय सांगा , मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. " माधव शांत झाला , एव्हाना सुनंदा किचेन मधून हॉलमध्ये आली , आवाज न करता सोफ्याच्या रिकाम्या जागेत बसली.
प्रिया सांगू लागली " अथर्व आणि मी बी एस्सी पासून मित्र आहोत , तो सध्या सिरम इन्स्टिट्युट मध्ये रिसर्च विभागात चांगल्या पोस्टवर काम करतो आहे . कोरोनाची लस बनविनाऱ्या अनेक टीम पैकी एका टीममध्ये तो ही होता. आम्ही आजवर मित्र म्हणून खूप फिरलो , एकत्र अभ्यास केला , ही मैत्री कधी प्रेमात बदलत गेली कळलीच नाही. मलाही तो आवडू लागला . त्याने मला लग्नासाठी विचारलेही आहे पण मी तुमच्याशी बोलून पुढचे सारे ठरविणार होते."
" बाबा , मला तुम्हाला सांगता आले नाही आणि तुम्ही उद्या कांदेपोहे कार्यक्रम ठरवला आहे . मी नाही जाऊ शकणार त्या पाहुण्याच्या पुढे . मला माफ करा बाबा................. "
भूकंपाचा हादरा बसल्यानंतर आक्रोश होण्याअधी जी भयाण शांतता असते ती त्या हॉलने त्या वेळी अनुभवली . प्रिया बोलून गेली आणि माधव निशब्द झाला.... , सुनंदाला मात्र हे असे होऊ शकते याची कल्पना असावी . ती काहीच न बोलता किचन कडे वळली.
काहीसा गंभीर चेहरा करुन माधव ताडकन उठून उभा राहीला.
" प्रिया ... तू आम्हाला इतके परके समजते का , कि तुझ्या मनातले सांगायलाही कुठली तरी परिस्थिती निर्माण व्हायला हवी. "
प्रियाला तिची चूक पुन्हा एकदा उमगली होती , तिच्या डोळ्यातून अश्रूंची धार थांबायला तयार नव्हती.
" पण ऐक बेटा , उद्या ज्यांना बोलविले आहे तो माझा अनेक वर्षापासून खूप चांगला मित्र आहे , मी आताच त्याला फोनवरुन नकार कळविणे योग्य होणार नाही. त्यांना उद्या येऊ दे , कार्यक्रम ठरलाच आहे तर कार्यक्रम करु आपण , तो झाल्यावर मी त्याला मैत्रीच्या नात्याने शांतपणे समजून सांगतो . किमान तोपर्यंत तरी तू अजून काही नवीन नाटक करु नको , आणि हो माझ्या पाकीटातून पैसे घेवून जा ब्युटीपार्लरमध्ये , हा उदास चेहरा येताना हसरा दिसला पाहिजे "
तो बाबांचा आदेश समजून प्रिया बाहेर पडली ती उशीराच घरी परतली तिच्या मैत्रिणीसोबत. त्या रात्री कुणीच एकमेकांशी फारसे काही बोलले नाही.
रविवारची सकाळ घाई गडबडीत सुरु झाली , पाहुणे येणार म्हणून त्यांच्या तयारीसाठी दूध , पोहे शिवाय एक दोन नारळही माधवने पिशवीतून आणले . प्रिया मात्र हे सारे पाहून अजूनही गोंधळातच होती. "बाबा तर माझ्यावर खूप प्रेम करतात , ते माझ्या मनाविरुध्द लग्न नाही लावणार पण त्यांच्या मित्राला दुखवू नये त्यासाठी ते इतकी काळजी घेत आहे. का ? "
प्रिया आपल्या खोलीत गेली ती बाहेर आलीच नाही . बाबांनी सांगितल्याप्रमाणे मात्र ती कांदेपोहे कार्यक्रमासाठी तयार झाली होती. नवीन शालू नेसून , नथ नाकात चढवून प्रिया नेहमेपेक्षा आकर्षक दिसत होती.
पाहुणे मंडळी आली बऱ्याच गप्पा टप्पा झाल्यानंतर पाहुण्यांनी मुलीला बोलवा असे सांगीतले .
सुनंदाची सूचना मिळताच प्रिया हॉलमध्ये आली . तिला पाहुण्यांकडे पहायची इच्छाही झाली नाही . ती खाली नजर घालून आपल्याच विचारात मग्न होती.
" मुलगी छान आहे , आम्हाला पसंत आहे " प्रियाच्या समोरच पाहुण्यांनी सांगितल्यामुळे प्रिया गडबडली . तेवढ्यात माधवने चर्चा पुढे नेली .
" ते ठिक आहे , पण माझ्या पोरीला पसंत आहे का नाही ते बघू दे मला... "
"काय प्रिया बेटा , तुला आहे का पसंत मुलगा ?"
प्रिया इकडे आड तिकडे विहीर अशा कात्रीत सापडली होती . हो म्हणावे तरी पंचायत आणि नाही म्हणावे तरी.......
आता मात्र तिचा संयम सुटत चालला होता . जे काही बाबांना सांगितले तेच आपण पाहुण्यांना सांगावे आणि हा विषय इथेच थांबवावा असा विचार करुन तिने मान वर केली , पण .......................
समोर अथर्व ला पाहून आनंदाने उड्या माराव्या की ओरडावे जोरजोरात ते तिला काही कळेना . तिच्या कावऱ्या बावऱ्या चेहऱ्याकडे पाहून पाहुण्यांसह आई बाबाही जोरजोरात हसू लागले तेंव्हा मात्र तिला हा सगळा डाव आधीच शिजला असल्याची खात्री पटली.
अगदी लाजतच आणि लटक्या रागाने तिने " बाबा , काय हे असं कुणी वागतं का आपल्या लाडक्या बेटीशी " अस म्हणत माधवच्या छातीवर डोक टेकवलं .
माधवने कधी त्या अथर्वला शोधले, त्यांच्या घरच्यांना जाऊन भेटला , प्रियाच्या लग्नाची मागणी घालून कांदेपोहे चा आगळा वेगळा प्लॅन ठरविला हे फक्त एकट्या माधवला माहीत होते.
' माझा सख्खा बाप असता तर त्याने सुद्धा एवढे केले नसते ' हे प्रियाला माहीत होतं , तिला तिच्या बाबांचा आणि त्यांचे आपल्या मुलीवर असलेल्या जीवापाड प्रेमाचा खूप खूप अभिमान वाटू लागला.
लाजणाऱ्या प्रियाच्या हनुवटीला तर्जनीने हलकेच उचलून माधव म्हणाला " काय मग प्रिया बेटा , कळवू का नकार पाहुण्यांना ? "
" जा बाबा , अजून चेष्टा केली तर मी बोलणारच नाही मुळी तुमच्याशी " .................
तिचे ते लडीवाळ हसणे , माधवने तिच्याकडे स्मित करत उगाच तिच्या केसांतून फिरविलेला मायेचा हात हे सगळे किचेनमधून पाहणारी सुनंदा आनंदाश्रूने भिजून गेली होती.
- किरण कुमार
खूप छान वाटलं गोष्ट वाचून ...
खूप छान वाटलं गोष्ट वाचून ... लिहिली आहे खूप छान.
पुलेशु
गोड कथा आहे.
गोड कथा आहे.
धन्यवाद मनीमोहर आणि सामो ....
धन्यवाद मनीमोहर आणि सामो ...../\.....
खूप हलकीफुलकी आणि गोड लिहीली
खूप हलकीफुलकी आणि गोड लिहीली आहे. छान वाटले वाचून. गुंतून गेलो प्रसंगात
अजून वाचायला आवडेल तुमचे..
खूप छान.
खूप छान.
धन्यवाद ऋन्मेऽऽष आणि
धन्यवाद ऋन्मेऽऽष आणि SharmilaR ....../\......
छान.
छान.
शेवटच्या वाक्यात कृपया बदल करा.
... हे सगळे किचनमधून पाहणारी सुनंदा...
छान कथा.. आवडली.
छान कथा.. आवडली.
खूप छान
खूप छान
शिक्षण पूर्ण करून
शिक्षण पूर्ण करून आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आणि लग्नाचं वय झालेल्या मुलीच्या आयुष्यात कोणी आला असेल का यावर बायकोला - उगाच तोंड आहे म्हणून वाटेल ते बडबडू नकोस , असं संतापून म्हणण्याचं कारण समजत नाही . आला असेल कुणी मुलगा तिच्या आयुष्यात तर त्यात संतापण्यासारखं काय आहे ?
शिवाय दत्तक असो वा सख्खी मुलगी , एवढं उच्चशिक्षण घेऊन , स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच्या आयुष्याचा निर्णय स्वतः खंबीरपणे घेऊ शकत नसेल तर त्या डिग्र्या पाण्यात नेऊन बुडवाव्यात . निदान सुशिक्षित आणि स्वावलंबी मुलींनी तरी लग्नासंबंधीचे स्वतःचे विचार स्पष्टपणे सांगणं अपेक्षित आहे , कोट्यवधी मुलींची पसंती न विचारताच त्यांना बोहल्यावर चढवलं जातंच , केवळ त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसल्याने .... तेव्हा निदान स्वावलंबी मुलींनी तरी स्पष्टपणे , ठाम भूमिका घ्यावी , असं काहीतरी अपराध केल्यासारखी वागणूक कशाला ? तरी शेवटी स्पष्ट बोलणार होती , ते एक त्यातल्या त्यात चांगलं आहे .
गोड गोड कथा म्हणून वाचायची असेल तर ठीक आहे , प्रतिलिपी वर शोभेल .
लेखकावर टीका नाही , वैयक्तिक टीका समजून राग मानू नये . क्षमस्व .
धन्यवाद उपाशी बोका , आबा ,
धन्यवाद उपाशी बोका , आबा , प्रथम म्हात्रे ...../\......
radhanisha आपले म्हणणे बरोबर आहे . पण
स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच्या आयुष्याचा निर्णय स्वतः खंबीरपणे घेऊ शकत नसेल तर त्या डिग्र्या पाण्यात नेऊन बुडवाव्यात .
हे पटत नाही .
सुशिक्षित , स्वतःच्या पायावर उभ्या राहणा-या मुलीही धाकात किंवा संस्काराच्या / जबाबदारीच्या ओझ्याखाली वावरतात. बाकी व्यक्तिगत मत प्रत्येकाचे वेगळे.
आणि राग मानन्याचा प्रश्नच नाही उलट वाचकाने त्याला खटकलेल्या गोष्टी निदर्शनास आणल्याबद्द्ल मीच आभार मानतो . ..../\....
अहो, आभार मानायचे सोडा एकवेळ,
अहो, आभार मानायचे सोडा एकवेळ, पण सांगितलेली दुरुस्ती तरी करा की. किचेनच्या (keychain) भोकातून पाहणारी सुनंदा डोळ्यासमोर येतेय सारखी.
छान आहे कथा... आवडली
छान आहे कथा... आवडली
वाचताना वाटत होत की शेवट गोड व्हावा, माधव बाबा आपल्या बेटी साठी चांगलाच विचार करेल अस वाटत होत आणि तसाच गोड शेवट केलात.
काही छोटया चुका (typo) कडे दुर्लक्ष करायला हरकत नाही (जमलं तर बघा बदलता आल तर)
>>>>सुशिक्षित , स्वतःच्या पायावर उभ्या राहणा-या मुलीही धाकात किंवा संस्काराच्या / जबाबदारीच्या ओझ्याखाली वावरतात. >>>>
हे खर आहे, जर प्रियाला ती दत्तक आहे हे माहीत असेल तर तिचं वागणं नक्कीच पटण्या सारखं आहे