everything everywhere all at once

Submitted by आत्रिक on 10 May, 2023 - 13:51

Everything Everywhere all at once
या चित्रपटाने जिंकलेल्या ऑस्करची हवा तयार होण्यापूर्वी मी हा चित्रपट पाहिला होता.
सामान्यत: मी, सिनेमॅटोग्राफी, ध्वनी, संवाद, अनुक्रमण, क्लायमॅक्ससाठी कथा तयार करत नेणे, दृश्यांमध्ये काहीतरी विचार करायला लावणे इत्यादी गोष्टींसाठी चित्रपटांचे कौतुक करतो. अशा प्रकारची चित्रपट निर्मिती मला आकर्षित करते. तरी हा चित्रपट मला अशा प्रकारे आवडला नाही. त्यामुळे मी चित्रपटगृहातून मंत्रमुग्ध होउन बाहेर पडलो नाही (जसा कंतारा पाहिल्यानंतर झालो होतो).
पण या चित्रपटात फक्त कथा (का अनेक कथा) किंवा चित्रपट निर्मिती यापेक्षा बरेच काही वेगळे आहे. निव्वळ करमणुकीपेक्षा बरेच नक्कीच आहे या चित्रपटात. चित्रपट बनवणे हे चित्रकला किंवा कथाकथन यासारख्या इतर कला प्रकारांसारखेच असते. ज्याप्रमाणे चित्रकार किंवा कथाकार अमूर्त कल्पनांना देण्याचा प्रयत्न करतात, तसेच चित्रपट तो प्रयत्न अधिक विस्तृत आणि गुंतागुंतीच्या पद्धतीने करतात.
हा चित्रपट बहुआयामी विश्वे (multidimensional universe) आणि त्यातील मार्गक्रमण याविषयी आहे. या प्रकारामध्ये अनेक सिनेमे मी पाहिले आहेत, पण हा सिनेमा ही गोष्ट फार वेगळ्या पध्दतीने करतो.
अमेरिकेत रोजचा संघर्ष करणाऱ्या आशियाई कुटुंबाच्या अमेरिकन स्वप्नाची पार्श्वभूमी या चित्रपटाला आहे. या थीममुळे चित्रपटाला ऑस्कर मिळण्यास मदत झाली, असे म्हटले जाते. मात्र, माझ्या भारतीय मनासाठी संघर्षाचे हे प्रदर्शन नवीन नाही. दैनंदिन आर्थिक, सामाजिक समस्या जसे कर अधिकारी, एलजीबीटी प्रश्न, वृद्ध पालकांच्या समस्या या सर्व गोष्टी कथेत मिसळल्या आहेत. यापैकी एक एक समस्या चित्रपटासाठी चित्रित करणे अवघड असते, तरीही हा चित्रपट साय-फाय (वैज्ञानिक कल्पना) चित्रपटाच्या सीमा रेषा ओलांडतो आणि ऊर्जा आणि पदार्थाच्या तत्त्वज्ञानावर स्पष्टपणे भाष्य करतो.
वैज्ञानिक कल्पनेमध्ये चित्त्रपटाने हे गृहीत धरले की, एखाद्याने स्वत:च्या चेतनेला दुसऱ्या विश्वातल्या स्वत:च्या शरीरात उडी मारण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. आणि ही विश्वे कशी निर्माण होतात? सोप्प , प्रत्येक वेळी आपण काही निर्णय घेतो तेव्हा नवनवीन, वेगवेगळे मार्ग, धोके, संधी घेऊन एक पर्यायी विश्व निर्माण होते.
उड्या मारण्यामुळे त्या विश्वात कमावलेली कौशल्ये मिळवता येतात. ही कौशल्ये का आवश्यक आहेत? एका खलनायकाशी लढण्यासाठी. आणि नवल नाही, खलनायक ही दुसऱ्या विश्वातील नायिकेची मुलगी आहे. या वैश्विक उडी मारण्यातून अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी या मुलीच्या मनावर टोकाचा ताण पडलेला असतो आणि त्यातुन तिचे मन फ्रॅक्चर होते आणि खलनायक होते. या फ्रॅक्चरिंगमुळे एका विश्वातून दुसऱ्या विश्वात नियमितपणे उडी मारण्याऐवजी ती एकाच वेळी सगळीकडे सर्व काही अनुभवू लागते. प्रत्येक क्षणी आणि सगळीकडचे भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान जाणणे, भगवंतांसारखेच असू शकते का? पण ते भारी किंवा अप्रतिम नाही. स्मरणशक्ती कमी होण्याचा आशीर्वाद आपल्याकडे आहे; प्रत्येक वेळी सगळीकडे काय घडत आहे हे न कळण्याचे वरदान आपल्याकडे आहे. आपल्याकडे ती विलासिता आहे. कारण खरंतर आपण इतकी माहिती हाताळू शकत नाही आणि त्याहूनही वाईट म्हणजे असे झाल्यास आपल्याला प्रत्येक गोष्टीची निरर्थकता दिसेल. आपण आपल्या शरीराला, नोकरीला, कुटुंबाला दिलेला अर्थ त्या सेकंदात हरवून जाईल जेव्हा आपण एकाच वेळी सगळीकडे सर्व काही अनुभवू. मुलीच्या बाबतीत नेमके हेच घडते. तिला कळतं की कशाचा काहीच फरक पडत नाही. आणि चित्रपटासाठी हे वाईट आहे. कारण कुठेही उडी मारण्याच्या क्षमतेमुळे ती प्रत्येक गोष्टीवर प्रभाव टाकू शकते. मनासvatel तशी वागू शकते. शेवटी अपेक्षेप्रमाणे नायिका (आई) स्वत:चा त्याग करून मुलीसारखी बनते, सर्व काही जाणून घेण्याचा छळ अनुभवते आणि प्रेमाच्या माध्यमातून आपल्या मुलीला स्वत:चा नाश करण्यापासून परत आणते.
काही दृश्यांनी मला खूप प्रभावित केले. अशा अमूर्त संकल्पनांचे चित्रण हे नेहमीच एक आव्हान असते. हे आव्हान समर्थपणे स्वीकारताना एका दृश्यात आई आणि मुलगी अनेक विश्वातून उड्या मारताना दिसतात, ज्यात आई सर्वपराक्रमी, अनियंत्रित, त्रस्त मुलीला समजावण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी हे जाणवते की "सगळीकडे सर्वकाही" ही संकल्पना अद्वैत तत्त्वज्ञानाच्या अगदी जवळ आहे - द्वैत नाही, सर्व काही एक आहे. असा विचार करा, आपण अब्जावधी अणूंचे बनलेलो आहोत जे की एकमेकान जोडलेले आहेत लेगो तुकड्यांप्रमाणेच. म्हणजेच त्यांची पुनर्रचना केली जाऊ शकते. म्हणजे माझ्या जन्माच्या वेळी मला बनवणारे अणू मला फार पूर्वीच सोडून गेले आहेत, त्या काळापासूनचा माझ्या शरीरात एकही अणू शिल्लक नसेल. त्यामुळे सध्या "मी" तयार करणारे अणू एकेकाळी सूर्य, धूमकेतू, प्राणी, पक्षी, ग्रह, वृक्ष यांचा भाग असू शकतात आणि भविष्यात ते पुन्हा बनतील..... अगदी कोणत्याही गोष्टीसारखे आणि प्रत्येक गोष्टीसारखे.
हे चित्रण करताना आई मुलीची जोडी अनेक विश्वात भेटते, एकामध्ये दोन्ही बाहुल्या होत्या, दुसऱ्या एका विश्वात दगडाच्या रुपात करन त्या विश्वात जीवन तगू शकत नाही. तिथल्या अप्रतिम दगडी संवादाला आणि चित्रणाला मानलेच पाहिजे. आणि तिथे “नियम नाहीत” यावर विश्वास ठेवून विश्वाच्या नियमांची अवहेलना करण्याच्या दृश्याला तर अंगावरचा काटाच सलाम करतो.
असाधारण शक्तीमुळे मुलीला कळते की कशाचाच काहीच फरक पडत नाही आणि ती एक बेगल तयार करते. हे बेगल प्रतीकात्मक आहे. पण त्याआधी नथिंग मॅटर्सची जाणीव मुलीला होणे अत्यंत योग्य आहे कारण प्रत्येक गोष्टीला एकाच वेळी समजून घेण्याची क्षमता गाठली तर लक्षात येईल की कोणत्याच गोष्टीला अंत नसतो, अगदी त्या बेगलच्या वर्तुळाप्रमाणे .... अनंत. (एक प्रकारे वर्तुळ किंवा शून्य हा मनोरंजक आकार आहे, ते शुन्य आहे, शून्यतेला सुरुवात किंवा शेवट नसतो कारण त्यात काहीच नसते). आणि एखाद्या गोष्टीला अंत नसेल तर ती गोष्ट तिची किंमत गमावून बसते. शेवट नसलेल्या आणि अनंत लांबीच्या चित्रपटाची कल्पना करा, तो कोणीही पाहणार नाही. जीवन, आरोग्य इत्यादी गोष्टींना काही अंत आहे हे आपण जाणतो आणि म्हणूनच जेव्हा आपल्याकडे ते असते तेव्हा त्याचा जास्तीत जास्त उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. एखाद्याला अनंत जीवन मिळाले तर त्या जीवनाचा कंटाळा येईल. मुलीच्या बाबतीतही असेच घडते, ती एकाच वेळी सर्वत्र उपस्थित असते आणि रेखीव काळाच्या (linear time) परिमाणाच्या पलीकडे गेली आहे. मी एका नील डीग्रास टायसन व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे, आपल्यासाठी काळाची परिमाण म्हणून (लांबी, उंची, जाडी, प्रमाणे वेळ) कल्पना करणे कठीण आहे कारण आपण या रेखीव फक्त पुढेच जाणाऱ्या वेळेने बांधलेले आहोत. दोन आयामाच्या जगात वावरणाऱ्या कागदावरील बिंदूला, कागदातून (बिंदूच्या विश्वातून) जाणाऱ्या गोळ्याला एका बिंदूवरून वाढणारे आणि बिंदूपर्यंत कमी होणारे वर्तुळ म्हणूनच जाणवेल आणि संपूर्ण गोल म्हणून नाही. त्याचप्रमाणे, आपण वेळेच्या परिमाणात बांधलेले असल्यामुळे आपण वेळेचा प्रवास (time travel) समजून घेऊ शकत नाही.
पण……… पण जर कोणी वेळेचे परिमाण मोडले तर काय होईल, याची एक शक्यता म्हणजे हा चित्रपट.
वेड लागणे आणि सगळे मिथ्या आहे हे जाणवणे... आणि एकाच वेळी सर्वत्र सर्वकाही (everything everywhere all at once) असणे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय!
असंच डोकं भंजाळलेलं आणि त्याच वेळी काही तरी भारी वाटलेलं हा चित्रपट बघुन. टाईम/ मल्टीव्हर्स ट्रॅव्हल मस्त चित्रित केला आहे. आपण फारच स्थितीवादी विचार करतो हे ही पदोपदी जाणवलं चित्रपट बघताना.

हा चित्रपट अशक्य बोअरिंग आहे.

लोकांनी म्हणजे टीनेजर्सनी त्यातून मिनिंग वगैरे शोधले आहे म्हणजे बघा.

अ‍ॅकेडमीच्या लोकांचे अव्हरेज वय १४ असावे.