रमलखुणा

Submitted by द्वैत on 10 May, 2023 - 08:14

रमलखुणा

रांगत येती समुद्रलाटा
माड हालती वाऱ्याने
क्षितिजावरती रंग सांडता
मंद उगवत्या ताऱ्याने

पायापाशी ओली वाळू
सरकत येते पुढे पुढे
कभिन्नकाळ्या रेषेवरती
सफेद पक्षी एक उडे

दूर डोंगराखाली निजली
ती झाडांची बुटकी रांग
थेंब प्रकाशित टीमटीमणारे
कुणी फेकीले तेथे लांब

प्रहरामागून प्रहर लोटती
गाज वाजते पुन्हा पुन्हा
मिटून घेता डोळे स्मरती
काठावरच्या रमलखुणा

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर कविता!

जीएंच्या 'रमलखुणा'ची आठवण झाली. >> +१