“ही चोळी कोणाची?” : सुखद दृश्यानुभव

Submitted by कुमार१ on 10 May, 2023 - 00:57

चित्रपट पाहताना सतत मध्येमध्ये येणारे कर्कश्य संगीत नकोसे झालेय ?
घिस्यापिट्या आणि ‘फ’कारयुक्त संवादांचा कंटाळा आलाय ?
तोच तोच मसाला पण नकोसा वाटतोय?
आणि
शांतपणे एखादी निव्वळ दृश्यमालिका बघावीशी वाटते आहे काय?
वरील सर्व प्रश्नांना तुमचे उत्तर ‘होय’ असेल.. तर मग खास तुमच्यासाठीच आहे हा चित्रपट:
The Bra.

The bra mov.jpg

जर्मन’ चित्रपट परंतु एकही संवाद नसलेला.
*चित्रपट प्रभावी दृश्यमान आणि पुरेसा गतिमान असल्याने संवादांची गरज जाणवत नाही. नाही म्हणायला एका म्हाताऱ्या बाईंचे आवाजरहित जोरदार हास्य मात्र खूप मजेदार दिसते.

*चित्रपटाचे चित्रीकरण बाकू या अजरबैजानच्या राजधानीत आणि जॉर्जियात.
*The Bra या नावावरून जे आपल्या मनात येते तोच तर चित्रपटाचा विषय आहे !
एका ट्रेनचालकाने त्याला सापडलेल्या चोळीच्या मालकिणीच्या शोधाची ही रंजक कथा.

ट्रेन खेड्यातील वस्तीच्या अगदी जवळून किंबहुना धोकादायक अंतरावरून जाताना दाखवलेली. ट्रेन वस्तीच्या शेजारून जात असताना लोकांनी अंगणात वाळत टाकलेले दोरीवरचे कपडे (ज्यात स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांचाही समावेश आहे) वाऱ्याच्या झोताने उडून ट्रेनच्या बाहेरील भागात अडकून पडणे ही नित्याची घटना.

अशाच एका दिवशी ट्रेनवर एक निळी आकर्षक चोळी (bra)अडकते. तो दिवस संबंधित ट्रेन चालकाच्या नोकरीतील अखेरचा दिवस असतो. त्याच्या त्या ट्रेन-प्रवासादरम्यान त्याने एका घराच्या खिडकीतून आतमध्ये चोळी बदलत असलेली एक स्त्री पाहिलेली असते. ती आठवण मनात ठेवून आता तो या सापडलेल्या चोळीच्या मालकिणीचा शोध घेऊ लागतो.
ही कल्पनाच मोठी मजेदार आहे.

*बारीक-सारीक तपशिलांचे सुंदर चित्रीकरण. ट्रेन सुरू करताना तिचा पँटोग्राफ जेव्हा इलेक्ट्रिक वायरला स्पर्श करतो तेव्हा उडणाऱ्या ठिणग्या मस्त दिसतात.

* ट्रेन नियंत्रण कक्षातील कर्मचारी स्त्रीच्या सुरेख हालचाली.

ही चोळी कोणाची?” या मोहिमेवर निघालेला चालक… त्याला दारोदारी आलेले अनेक अनुभव..
काही स्त्रिया त्याला दारातूनच परत पाठवतात तर काही स्त्रियांनी प्रत्यक्ष ती चोळी स्वतः घालून बघितल्याची भन्नाट दृश्ये...
जेव्हा तो अशा स्त्रियांना बॅगेतून काढून ती चोळी दाखवतो, तेव्हा त्या स्त्रिया "ही माझी नाही" असे लगेच का सांगत नाहीत, हा प्रश्न मात्र प्रेक्षकांनी विचारू नये !

अशा बऱ्याच स्त्रियांकडून नन्नाचा पाढा ऐकल्यानंतरही त्या चालकाने चालूच ठेवलेला शोध..

दरम्यान त्या गावात एक फिरते मॅमोग्राफी शिबिर भरते. तिथे लागलेली स्त्रियांची रांग.. चालकाने तिथे डॉक्टरचा वेश घालून तोतया डॉक्टर बनून जाणे..
तरीही अजून त्याचा शोध चालूच ..

एका घरात हा चोळीप्रयोग केल्यानंतर त्या बायकोचा नवरा आणि त्याने बोलवलेल्या माणसांकडून चालकाची झालेली बेदम पिटाई.. त्याला साखळदंडांनी जखडून रेल्वे रुळांवर आडवे टाकतात..

त्यातून त्याची सुटका होते का ? कोण मदत करते त्याला ?
अखेर..
कर्मधर्मसंयोगाने चोळीच्या मालकिणीचा शोध लागतो का? हे प्रत्यक्ष चित्रपटातच बघा.. !

यू ट्युबवर उपलब्ध.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चोळी,ट्रेन का डॉक्टरकी तुम्ही नक्की कशात अडकला आहात? हा प्रश्न चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांना विचारतात आणि तिकिटामागे आपले मत लिहून पेटीत टाकायला सांगतात.
😀

वेधक परिचय. मी ऐकलं होतं याबद्दल पण उत्सुकता वाटली नव्हती. आता हे वाचून वाटतेय. Happy

रच्याकने, ब्लाऊज म्हणजे चोळी व ब्रा म्हणजे काचोळी होईल नं बहुतेक.

अस्मिता, तुमचा मुद्दा बरोबर आहे.
एक बारीक शंका.
बृहदकोश असे म्हणतो आहे:

काचोळी=
जिचे बंद पाठीवर बांधतात अशी चोळी, हिला गांठ किंवा बिरडें नसतें ही तुकडयातुकड्याची करतात. लहान मुली, मारवाडी व गुजराथी स्त्रिया ही बहुधा वापरतात. '

>> म्हणजे काचोळी हा चोळीचाच एक प्रकार म्हणायचा का ?
लहान मुली, मारवाडी व गुजराथी स्त्रिया >> हा विशेष उल्लेख का केला असावा?
...
blouse = पोलकें =
बायकांची चोळीवजा बंडी.

'ब्रा' शब्दाचे तंतोतंत भाषांतर करणारा शब्द मिळणं कठीण आहे पण काचोळी हा शब्द 'ब्रा' या शब्दात जे अभिप्रेत आहे त्याच्या जास्त जवळ जाईल. मी बृहदकोश बघितला नव्हता पण हे आधीपासूनच माहीत होतं म्हणून किंचित खटकलं. तो मारवाडी-गुजराती संदर्भ माहिती नाही. ब्लाऊज -पोलकं हा स्वैर अनुवाद होईल, मी त्यातल्या त्यात जवळ जाणारं सुचवत होते. Happy

होय, बरोबर.
आणि या क्षेत्रात मी तुमचा अधिकार नक्कीच मान्य करेन ! Happy Happy

परीक्षण आवडलं.
जरा प्रश्न पडला.इतक्या छोट्या विषयावर एक पूर्ण पिक्चर बनू शकतो का.शॉर्ट फिल्म चा विषय वाटतो.अर्थात पिक्चर पाहिल्याशिवाय कळणार नाही.

*एक गुरु वाढवला>>> जेवढे गुरु वाढवू तेवढे चांगलेच की !
..
*पिक्चर पाहिल्याशिवाय कळणार नाही>> बरोबर. अजून काही उपप्रसंग घालून दिग्दर्शकाने छान खुलवला आहे.

सर,
छान व उत्सुकता निर्माण करणारा परिचय....

अरे वा .. नो डायलॉग... पुष्पक सारखा>> मलाही मूकपट म्हणल्यावर पुष्पकच आठवला. मस्त आहे तो मुव्ही.

बघायची उत्सुकता वाढावी असं लिहिलंय अगदी. पाहायला सुरू केलाय. माझा एका बैठकीत बघून होत नाही. मजेदार आहे. इथं लिहिलेत म्हणून कळले या चित्रपटाविषयी. धन्यवाद.

स्पोयलर:
मला एक प्रसंग समजला नाही. साधारण 22:40 मिनिटांनी ट्रेनचालक दोन मोठी खोकी घेऊन चालत चालत त्या मुलीच्या ( सुरवातीला ही मुलगी बदक, मेंढ्या बरोबर कुरणात खेळत असते)घरी येतो . त्या खोक्यात काय असतं? आणि ती लोखंडी वजने कशाला त्याला उचलायला लावतात?
फारच वेडगळ प्रश्न असेल म्हणा हा :डोक्यावर हात:

सर्वांना धन्स. जरूर बघा.

* त्या खोक्यात काय असतं? >>>
तो कोर्टाच्या खिशातून जे खोके काढून देतो त्यात बहुतेक काहीतरी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे का ? किंवा एखादा मापक आहे का ? मला नक्की नाही कळली.
ते लोक त्याची वजन उचलायची परीक्षा घेताहेत का ? किंवा किती वेळात उचलू शकतो असं काही मोजताहेत का ?
नीट नाही समजले +१.

मला वाटले तो त्या मूलीला मागणी घालायला जातो. पण तिची आई त्याला केटलबेल उचलायला लावते. ते त्याला जमत नाही. त्यामुळे तो शारिरीकदृष्ट्या सशक्त नाही म्हणून ते नकार देतात.
मी पूर्ण चित्रपट पाहिला नाही. मुळात ती ब्रा आपली नाही हे सांगायला घालून दाखवायची काय गरज असे वाटून तो आचरटपणा वाटला. मग बघायचा सोडून दिला.

मला वाटले तो त्या मूलीला मागणी घालायला जातो. >>
तो नोकरीतून निवृत्त झालेला आहे. मुळात त्याच्या वयाचा माणूस त्यांना त्यांच्या मुलीसाठी कसा काय चालणार होता हे आश्चर्य वाटते

>>>>>मुळात ती ब्रा आपली नाही हे सांगायला घालून दाखवायची काय गरज असे वाटून तो आचरटपणा वाटला. मग बघायचा सोडून दिला.
Happy क्रिएटिव्ह लायसन्स
पण येस मुद्दा बरोबर आहे.

मुळात त्याच्या वयाचा माणूस त्यांना त्यांच्या मुलीसाठी कसा काय चालणार होता >> नाहीच चालणार. तिची आई आधीपासूनच रागाने बघताना दाखविली आहे.

धन्यवाद डॉ कुमार, सोनाली. प्रश्न अगदीच वेडगळ नव्हता म्हणजे Wink
मलाही आधी तो लग्नासाठी मागणी सीन वाटला होता पण वयाच्या मुद्द्यावरून निकालात काढला.

मला एक अन्य शंका आहे.

जेव्हा एखादा चित्रपट असा मूकपट असतो तेव्हा त्याची अमुक एक भाषेतला (इथे जर्मन) अशी दप्तरी नोंद का केली जाते?
निव्वळ दिग्दर्शक / कलाकार आणि चित्रपटाच्या सुरुवातीची श्रेयनामावली त्या भाषेत आहे म्हणून?

मायला, त्या चोळीची मालकीण मिळो की न मिळो पण अनेक स्त्रीया ती चोळी या ड्रायव्हर समोर घालून पहातात हे चित्रिकरण मोठे रोमेंटीक आहे. मुख्य म्हणजे ड्रायव्हरच्या चेहेर्यावर दगडी हावभाव आहेत.